जवाहरलाल नेहरूः 1962 च्या चीनविरुद्धच्या युद्धात अमेरिकेने भारताला साथ दिली नसती तर काय झालं असतं?

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

1962 च्या चीनसोबतच्या युद्धादरम्यान चिनी सैन्य भारतीय सैन्याच्या दुप्पट होतंच पण त्यांच्याजवळ अधिक चांगली शस्त्रात्रंही होती आणि ते लढाईसाठी पूर्णपणे सज्जही होते.

त्यांच्याकडे रसदीचा तुटवडा नव्हता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं नेतृत्त्व अनुभवी होतं आणि 10 वर्षांपूर्वीचा कोरियात लढण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता.

भारताला पहिला झटका बसला वालाँगमध्ये. यानंतर से ला पासही भारताच्या हातून निसटत होता. या संपूर्ण भागात भारताचे 10 ते 12 हजार सैनिक चीनच्या 18 ते 20 हजार सैनिकांचा सामना करत होते.

त्यांच्याकडे होत्या पहिल्या महायुद्धाच्या काळात घेतलेल्या इनफील्ड रायफल्स. खरंतर अमेरिकतून पाठवण्यात आलेल्या ऑटोमॅटिक रायफल्स त्यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या, पण त्या अजून त्यांना पॅकिंग उघडून खोक्यातून बाहेरही काढता आल्या नव्हत्या.

दुसरी गोष्ट म्हणजे या ऑटोमॅटिक रायफल्स चालवण्याचं प्रशिक्षणही त्यांना अजून देण्यात आलं नव्हतं. से ला ताब्यात घेतल्यानंतर चिनी सैन्य बोमदिला शहराच्या दिशेने जाऊ लागलं. भारताचा एकूण 32,000 चौरस मैलांचा भूभाग चीनच्या ताब्यात गेला होता.

'इंडियाज चायना वॉर' या पुस्तकात नेव्हिल मॅक्सवेल लिहितात, "परिस्थिती इतकी वाईट होती की चीनवर प्रत्युत्तरादाखलची कारवाई करण्यासाठी काही परदेशी सेनांना भारताच्या मदतीसाठी बोलवावं असं भारतीय कमांडर बी. जी. कौल यांनी नेहरूंना सांगितलं होती."

त्यावेळचे भारतातले राजदूत जे. के. गॉलब्रेथ 'अ लाईफ इन अवर टाईम्स'या आत्मचरित्रात लिहितात, "भारतीयांना सगळीकडेच धक्के बसत होते. विमानांचा लष्करी वापर करता यावा म्हणून संपूर्ण भारतातली इंडियन एअरलाईन्सची उड्डाणं रद्द करण्यात आली होती. फक्त आसामच नाही तर बंगाल आणि इतकंच नाही तर कलकत्त्यालाही धोका निर्माण झाला होता."

नेहरूंनी केनेडींना लिहिली दोन पत्रं

या सगळ्यादरम्यान जवाहरलाल नेहरूंनी 19 नोव्हेंबरला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष केनेडी यांना दोन पत्रं लिहिली. वॉशिंग्टनमधल्या भारतीय दूतावासातून ही पत्रं व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचवण्यात आली. ही पत्रं, विशेषतः दुसरं पत्रं त्यावेळी सार्वजनिक करण्यात आलं नव्हतं.

नंतर गॉलब्रेथ यांनी आपल्या डायरीत नमूद करतात, "आमच्याकडे मदतीसाठीचे एक नाही तर दोन प्रस्ताव आले होते. दुसरा प्रस्ताव अतिशय गुप्त ठेवण्यात आला होता. हे पत्र फक्त राष्ट्राध्यक्षांनीच वाचायचं होतं. (For his eyes only), त्यानंतर ते पत्र नष्ट करणं अपेक्षित होतं."

यानंतरच्या वेगवेगळ्या अनेक भारतीय सरकारांनी अशा प्रकारचं कोणंतही पत्रं होतं हे मान्य केलं नाही.

प्रसिद्ध पत्रकार इंदर मल्होत्रा यांनी इंडियन एक्स्प्रेसमधल्या 15 नोव्हेंबर 2010च्या त्यांच्या 'जेएन टू जेएफके, आईज ओन्ली' या लेखात लिहिलंय, "आपण पंतप्रधान सचिवालय आणि परराष्ट्र मंत्रालयात असणारे सगळे रेकॉर्ड्स तपासून घेतले पण आपल्याला या पत्राच्या अस्तित्त्वाविषयीचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचं नेहरूंचे उत्तराधिकारी असणाऱ्या लालबहादुर शास्त्रींनी सांगितलं."

अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या आर्काईव्हज विभागाने असं पत्र होतं हे स्वीकारलं पण यामध्ये काय लिहिलं होतं, ते मात्र गुप्त ठेवलं होतं.

अखेर 2010 साली जॉन एफ. केनेडी प्रेसिडेन्शियल लायब्ररी अँड म्युझियमने ही पत्रं सार्वजनिक केली.

मंत्र्यानाही माहिती नव्हतं पत्रांबद्दल..

या पत्रात नेहरूंनी लिहिलं होतं, "चिन्यांनी नेफाच्या मोठ्या भूभागावर कब्जा केलाय आणि ते काश्मीरमध्ये लडाखमधल्या चुशालवरही कब्जा करणार आहेत."

यानंतर नेहरूंनी लिहितात, "चिन्यांचा हल्ला परतवून लावण्यासाठी भारताला प्रवासी आणि लढाऊ विमानांची गरज आहे." पत्राचा शेवट करताना नेहरूंनी लिहिलं, "याचप्रकारचं पत्र ब्रिटनचे पंतप्रधान हेरॉल्ड मॅकमिलन यांनाही पाठवत आहे."

व्हाईट हाऊसला हे पत्र मिळाल्याबरोबर गॉलब्रेथ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांना एक टॉप सिक्रेट टेलिग्राम पाठवला.

यात लिहिलं होतं, "नेहरू आपल्याला आणखी एक पत्र पाठवणार असल्याची गुप्त माहिती मला समजली आहे. या पत्राबाबत त्यांच्या मंत्र्यांनाही सांगण्यात आलेलं नाही."

अमेरिकेतले भारताचे राजदूत बी. के. नेहरू यांनी 19 नोव्हेंबरला स्वतः हे पत्र राष्ट्राध्यक्ष केनेडींना दिलं.

12 स्क्वॉर्डन विमानांची मागणी

या पत्रात नेहरूंनी लिहिलं होतं, "तुम्हाला पहिला निरोप पाठवल्याच्या काही तासांतच नेफातली परिस्थिती अजूनही बिघडलीय. ब्रम्हपुत्रेच्या संपूर्ण खोऱ्यालाच धोका निर्माण झालाय. जर ताडतोब काही करण्यात आलं नाही तर आसाम, त्रिपुरा, मणिपूर आणि नागालँड चीनच्या हाती पडेल."

यानंतर स्पष्टपणे मागणी करत नेहरूंनी लिहीलं, "आम्हाला लढाऊ विमानांची कमीत कमी 12 स्क्वॉर्डन्स हवी आहेत. सुरुवातीला जोपर्यंत आमचे पायलट ही विमानं उडवण्याचं प्रशिक्षण घेत नाहीत, तोपर्यत अमेरिकन पायलट्सना ही विमानं चालवावी लागतील. भारतीय शहरं आणि ठिकाणांच्या सुरक्षेसाठी अमेरिकन पायलट्सचा वापर केला जाईल. पण तिबेटमधले वायुहल्ले भारतीय वायुसेना एकट्याने करेल. यासाठी आम्हाला बॉम्बवर्षाव करणाऱ्या B - 47 च्या दोन स्क्वॉडर्न्सचीही गरज लागेल."

या हत्यारांचा वापर फक्त चीनच्या विरुद्ध केला जाईल आणि कधीही पाकिस्तानच्या विरोधात होणार नाही असं आश्वासन नेहरूंनी केनेडींना दिलं होतं.

(जॉन एफ. केनेडी प्रेसिडेन्शियल लायब्ररी अँड म्युझियम, नेहरू कॉरस्पॉन्डन्स, नोव्हेंबर 11-19 1962)

नेहरूंच्या पत्रामुळे राजदूत बी. के. नेहरूंना वाटलं ओशाळवाणं

दुसऱ्या पत्राद्वारे नेहरूंनी केनेडींकडे 350 लढाऊ विमानांची मागणी केली होती. ही चालवण्यासाठी किमान 10,000 जणांच्या सपोर्ट स्टाफची गरज होती.

'इंडिया अँड द युनायटेड स्टेट्स : एस्ट्रेंज्ड डेमॉक्रसीज' या पुस्तकात लेखक डेनिस कुक लिहितात, "पंतप्रधान नेहरूंचं हे पत्र पाहून अमेरिकेतली भारताचे राजदूत बी. के. नेहरू इतके स्तब्ध झाले की त्यांनी आपल्या स्टाफपैकी कोणालाही हे पत्र न दाखवता आपल्या टेबलाच्या खणात ठेवून दिलं. खूप मानसिक दबाव आल्यानंतरच नेहरूंनी ही दोन्ही पत्र लिहिली असावीत असं त्यांनी नंतर एका इतिहासकाराला सांगितलं."

बी. के. नेहरूंनी नंतर त्यांच्या 'नाईस गाईज फिनिश सेकंड' या आत्मचरित्रात लिहीलं, "पहिलं पत्रच आमच्या गटनिरपेक्ष धोरणाच्या विरुद्ध होतं. दुसरं पत्र इतकं केविलवाणं होतं की ते वाचल्यानंतर मला लाज आणि दुःखावर नियंत्रण ठेवणं कठीण गेलं."

दिल्लीतलं नैराश्य

तिथे दिल्लीतल्या रुझवेल्ट हाऊसमध्ये राजदूत गॉलब्रेथ यांनी आपल्या डायरीच्या 20 नोव्हेंबर 1962च्या पानावर लिहिलं, "आजचा दिवस दिल्लीतला सगळ्यात भीतीदायक दिवस होता. पहिल्यांदाच मी लोकांचा धीर सुटताना पाहिला. ताबडतोब हत्यारं आणि 12 सी- 130 विमानं पाठवण्याबाबत मी व्हाईट हाऊसला लिहिलं. सोबतच 'सेव्हन्थ फ्लीट'ला बंगालच्या खाडीच्या दिशेने पाठवायलाही सांगितलं."

भारताने अमेरिकन नौदलाकडून कोणत्याही प्रकारची मदत मागितली नव्हती. पण बंगलाच्या खाडीमध्ये सेव्हन्थ फ्लीट दाखल झाल्यास अमेरिका या संकटात भारतासोबत उभी असल्याचे संकेत चीनला मिळतील असा विचार गॉलब्रेथ यांनी केला.

केनेडींनी गॉलब्रेथ यांचा हा सल्ला ताबडतोब मानला आणि सेव्हन्थ फ्लीटला ताबडतोब पाठवण्याचे आदेश पॅसिफिक फ्लीटच्या होनोलुलूमधल्या मुख्यालयाला देण्यात आले. हे आदेश मिळताच USS किटी हॉकला बंगालच्या खाडीच्या दिशेने रवाना करण्यात आलं.

केनेडींचा दूत दिल्लीत दाखल

नेहरूंच्या या दोन्ही पत्रांना प्रतिसाद देत केनेडींनी भारताच्या गरजांचा आढावा घेण्यासाठी एव्हरॅल हॅरीमन यांच्या नेतृत्त्वाखालचं एक उच्चस्तरीय पथक ताबडतोब दिल्लीला पाठवलं.

अमेरिकन वायुसेनेचं KC 135 विमान अँड्य्रूज बेसवरून तातडीने रवाना झालं.

इंधन भरण्यासाठी थोडा वेळ तुर्कस्तानात थांबल्यानंतर हॅरिमन आणि त्यांच्यासोबतच केनेडी प्रशासनातील दोन डझन अधिकारी 18 तासांचा हवाई प्रवास करत 22 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 6 वाजता दिल्लीत दाखल झाले.

गॉलब्रेथ या सगळ्यांना विमानतळावरून थेट नेहरूंच्या निवासस्थानी घेऊन गेले. पण याआधीच 21 नोव्हेंबरच्या सकाळी 'शांतता दबक्या पावलांनी दाखल झाली होती.' कारण 20 नोव्हेंबरच्या रात्री चीनने युद्धविरामाची एकतर्फी घोषणा केली होती.

इतकंच नाही तर 7 नोव्हेंबर 1959 ला वास्तविक नियंत्रण रेषा - Line of Actual Control (LAC) पासून आपलं सैन्य 20 किलोमीटर मागे हटणार असल्याचंही चीनने जाहीर केलं.

अमेरिकेच्या हस्तक्षेपाच्या भीतीने युद्धविराम

पण माओंनी युद्ध विराम जाहीर करत नेफामधून माघार घेण्याचा निर्णय का घेतला?

'जेएफके'ज फरगॉटन क्रायसिस तिबेट, द सीआयए अँड द सायनो इंडियन वॉर' या पुस्तकात ब्रूस रायडेल लिहीतात, "माओंच्या या निर्णयामागची अनेक कारणं लॉजिस्टिकल होती.

थंडी सुरू होणार होती आणि तिबेट आणि हिमालयात आपल्या सैन्याला रसद पुरवत राहणं चीनला कठीण गेलं असतं. 'सिलीगुडी नेक' तोडत आसाममध्ये घुसण्याचा आकर्षक पर्याय चीनसमोर होता. असं करून ते पूर्व पाकिस्तानच्या सीमेला लागून असणाऱ्या भागांमध्ये पोहोचू शकले असते. पण असं केल्यास केनेडींना भारतातर्फे हस्तक्षेप करण्यास भाग पडेल असा विचार माओंनी केला असावा."

ज्या प्रकारे अमेरिकन वायुदल आणि ब्रिटनचं रॉयल एअरफोर्स भारताला मदत करण्यासाठी सामुग्री पोहोचवत होते त्यावरून अमेरिका आणि ब्रिटनचा भारताला फक्त नैतिकच नाही तर सैनिकी पाठिंबाही असल्याचं स्पष्ट झालं होतं.

नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत ही मदत युद्धाच्या मैदानापर्यंत पोहोचू लागली होती. भारत या युद्धात एकटा नसून जितकी दीर्घकाळ ही लढाई चालेल तितक्या प्रमाणात अमेरिकन आणि ब्रिटिश शस्त्रास्त्रं भारतात पोहोचतील याचा अंदाज नोव्हेंबर संपतासंपता माओंना आला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)