भारतीय कॅप्टननं ज्यांना युद्धकैदी बनवलं, तेच नंतर बनले पाकिस्तानचे वायूसेनाप्रमुख

    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

21 नोव्हेंबर 1971 ची ही गोष्ट आहे. भारत-पाकिस्तान युद्धाची औपचारिक सुरुवात होण्यास 11 दिवस बाकी होते.

दोन दिवसांपूर्वीच '4 शीख रेजिमेंट'च्या सैनिकांचे काही रणगाडे पूर्व पाकिस्तानच्या दिशेने चौगाचा गावाकडे निघाले.

सैनिकांचं एक पथक रणगाड्यांवर स्वार होतं, त्यामागे आणखी तीन कंपन्या चालल्या होत्या. पाकिस्तानच्या 107 इन्फॅन्ट्री ब्रिगेडचे सैनिक यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होते. पण भारतीय सैनिक पूर्ण जोशात होते. स्थानिक लोक 'जय बांग्ला'च्या घोषात त्यांचं स्वागत करत होते. '4 शीख रेजिमेंटचे जवानसुद्धा 'जो बोले सो निहाल' घोषणा देऊन प्रफुल्लित होत होते.

एकूणच 'बॅटल ऑफ द बल्ज' या हॉलीवूड चित्रपटाचं दृश्य नजरेस पडत होतं.

संध्याकाळपर्यंत भारतीय जवान चौगाचामध्ये कबाडक नदीच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचले. 4 शीखच्या रणगाड्यांसोबत जात असलेल्या डी-कंपनीने पुलापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले. पण ते तिथपर्यंत पोहोचतील इतक्यात पाकिस्तानी सैनिकांनी तो पूल उद्ध्वस्त केला.

पुलाच्या पश्चिम किनाऱ्यावर वाळूत एक भारतीय रणगाडा अडकून पडला. त्याला बाहेर काढण्याचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले.

चार सेबर जेट्सचा हल्ला

4 शीख रेजिमेंटचे अॅड्जुटंट कॅप्टन एच. एस. पनाग हे भारतीय लष्करातून लेफ्टनंट जनरल पदावरून निवृत्त झाले आहेत.

त्यांचं 'द इंडियन आर्मी, रिमेन्स, रिफॉर्म्स अँड रोमांस' हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे.

ते यामध्ये लिहितात, "22 नोव्हेंबरला धुके हटले तसे चार सेबर जेट्सनी 4 शीख रेजिमेंटच्या ठिकाणांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. उद्ध्वस्त केलेल्या पुलाजवळ अडकलेल्या भारतीय रणगाड्यांना तिथंच नष्ट करून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

"आम्ही सतत आपल्या वायूसेनेकडून एअर-कव्हर मागत होतो. पण युद्धाची औपचारिक घोषणा अद्याप झालेली नसल्यामुळे आम्हाला एअर-कव्हर पाठवण्यास नकार मिळत होता. आम्ही मशीनगनमधूनच विमानांवर गोळ्या झाडत होतो."

सेबर्सविरुद्ध लढण्यासाठी नॅट विमान दाखल

त्यावेळी डमडम विमानतळावर फ्लाईंग ऑफिसर डॉन लजारूस आणि सुनीथ सुआरेज स्क्रॅबल खेळत होते.

2 वाजून 37 मिनिटांनी डमडम एअरबेसचा सायरन वाजू लागला. लजारूस आणि सुआरेज यांनी आपला खेळ सोडला आणि ते नॅट विमानांकडे धावले.

दुसरीकडे, फ्लाईट लेफ्टनंट रॉय मॅसी आणि एम. ए. गणपती यांनीसुद्धा विमानांकडे धाव घेतली.

4 शीख रेजिमेंटवर पाकिस्तानी सेबर जेट हल्ला करत होते ते ठिकाण डमडम एअरबेसपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर उत्तर-पूर्व दिशेला होतं.

याठिकाणी चारही नॅट विमानं पोहोचण्यासाठी 8 ते 9 मिनिटं लागली. तिथं कॅप्टन पनाग आपल्या ठिकाणांवर वस्तूंच्या पुरवठ्याची सोय करून जीपने परतत होते.

पनाग यांना आठवतं, "3 सेबर्स जेट 3 वाजता 1800 फूट उंचीवर आले होते. बॉम्ब टाकण्यासाठी ते 500 फुटांपर्यंत खाली आले. तेव्हा माझी नजर चार विमानांकडे गेली. ही विमानं पूर्वेकडून झाडाइतक्या उंचीवरून माझ्या डोक्यावरून गेली. त्यांच्या वेगाने माझी जीपसुद्धा हादरली.

पाकिस्तानी वायुदलाने आम्हाला रोखण्यासाठी संपूर्ण क्वार्डन तर पाठवली नाही ना, अशी शंका त्याक्षणी मला आली. पण ती चार विमानं वेगळी झाली आणि एका-एका सेबर विमानामागे लागली. आपल्या मागे विमानं आहेत, सेबर्स विमानांना याचा पत्ताही लागला नाही. पण मला याचा अंदाज आला. मी जीप थांबवून हवेतील ही लढाई पाहू लागलो."

मॅसी यांनी पहिला बर्स्ट फायर केला

सुप्रसिद्ध वायुदल इतिहासकार पी. व्ही. जगनमोहन आणि समीर चोपडा यांनी 'ईगल्स ओव्हल बांग्लादेश' पुस्तकात लिहिलं, "सर्वात आधी सेबर्जवर सुआरेजची नजर पडली. ते सर्वात पुढे होते. मॅसी आणि गणपती हे त्यांच्यापासून दीड किलोमीटर दूर फायटिंग पोझिशनमध्ये उडत होते. सुआरेज रेडिओवर कॉन्टॅक्ट म्हणून ओरडले आणि त्यानंतर कोडवर्डमध्ये 'गाना डॉनी' असं म्हणाले.

याचा अर्थ सेबर तुमच्या उजव्या बाजूला 4 हजार फूट उंचावर उडत आहे. पण गणपती यांना त्यावेळी सेबर दिसलं नाही. सुआरेज पुन्हा रेडिओवर ओरडले, "एअरक्राफ्ट अॅट टु ओ क्लॉक, मूविंग टू वन ओ क्लॉक, 3 किलोमीटर्स अहेड."

यादरम्यान, मॅसी यांनी सेबर पाहिला त्यांनी 800 मीटर अंतरावरून आपला पहिला बर्स्ट फायर केला.

लजारुस यांनी 150 मीटर अंतरावरून निशाणा साधला

या लढाईत सहभागी झालेले फ्लाईंग ऑफिसर आजकाल मलेशियामध्ये असतात. त्यांना ही घटना अजूनही जशीच्या तशी आठवते.

लगारूस सांगतात, "तेव्हा माझी नजर तिसऱ्या सेबरवर गेली. मी त्याच्या मागे लागलो. मी 150 मीटर अंतरावरून त्यांच्यावर हल्ला केला. माझा हल्ला छोटा होता. मी 12 राऊंड मारल्यानंतरच त्या सेबरमध्ये आग लागली. मी रेडिओवर ओरडलो, 'आय गॉट हिम'. माझ्यासमोरच त्या सेबरमध्ये स्फोट झाला. त्या विमानाचे काही अवशेष माझ्या विमानाला येऊन धडकले, इतका जवळ तो स्फोट झाला."

तिथं मॅसी यांनी आपला दुसरा बर्स्ट फायर केला. तेव्हा त्यांची कॅनन जॅम झाली. पण तिसरा बर्स्ट सेबरच्या पोर्ट विंगमध्ये लागला. त्यातून धूर येऊ लागला. मॅसीने आपल्या रेडिओवर विमान पाडल्याचा कोडवर्ड सांगितला, "मर्डर, मर्डर."

पनाग यांनी पाकिस्तानी पायलटला मार खाण्यापासून वाचवलं

कॅप्टन पनाग जमिनीवरून ही लढाई पाहत होते. दोन सेबर खाली पडत असल्याचं त्यांनी पाहिलं. त्यातून दोन पॅराशूट उघडले आणि ते त्यांच्या सैनिकांच्या दिशेने येत होते.

पनाग यांना आठवतं, "आपले सैनिक बंकरमधून निघून पॅराशूटच्या दिशेने निघाले. लढाईच्या जोशात पाकिस्तानी पायलट्सच्या जीवाला धोका होता. मी जीप घेऊन त्यांच्या दिशेने निघालो. तेव्हा आपले सैनिक एका पायलटला मारहाण करत होते. मी त्यांना थांबवलं."

पाकिटात पत्नीचा फोटो

त्या पायलटवर कारवाई करून बटालियन हेडक्वार्टरला आणण्यात आलं.

पगान सांगतात, "आम्ही पायलटच्या डोक्यावर झालेल्या जखमेवर मलमपट्टी केली. त्याच्यासाठी चहा मागवला. परवेझ मेहंदी कुरेशी असं त्याचं नाव होतं. तो उंचापुरा सैनिक होता. त्याची उंची 6 फुटांपेक्षाही जास्त असेल. मारहाणीमुळे सुरुवातीला तो घाबरलेला होता. पण नंतर त्याला धीर आला. तो ढाकामधील वायुदलाच्या 14 व्या क्वार्डनचा कमांडर होता. त्यांना पाकिस्तान वायुदल अकादमीत 'स्वॉर्ड ऑफ ऑनर' म्हणजेच सर्वोत्तम वायुदल सैनिकाचा पुरस्कारही मिळालेला होता."

"मी त्याचं पाकिट तपासलं. त्यात त्याच्या पत्नीचा फोटो होता. मी त्याला तो फोटो परत दिला. त्याच्याकडे मिळालेल्या साहित्याची यादी बनवली. त्यामध्ये एक घड्याळ, 9 एमएम पिस्टल, 20 राऊंड गोळ्या आणि त्यांची सर्व्हायव्हल किट होती. तुम्ही युद्धकैदी आहात. तुम्हाला जिनिव्हा कराराप्रमाणे वागणूक देण्यात येईल, असं मी म्हणालो. त्या सैनिकाला ब्रिगेडच्या मुख्यालयाला पाठवण्यात आलं. तो एक शब्दही बोलला नाही. पण त्याच्या डोळ्यात आभार मानल्याची भावना स्पष्टपणे दिसत होती."

या घटनेनंतर पुढच्याच दिवशी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल याह्या खान यांनी पाकिस्तानात आणीबाणीची घोषणा केली.

यानंतर दोन दिवसांनी 25 नोव्हेंबरला त्यांचं वक्तव्य होतं, "पुढच्या दहा दिवसांत आपलं सैन्य भारताविरुद्ध युद्ध लढत असेल."

डमडम एअरबेसवर पायलट्सचं अभूतपूर्व स्वागत

पूर्ण हवाई लढाई दोन ते अडीच मिनिटात संपली. जेव्हा भारतीय नॅट विमान डमडम विमानतळावर उतरले, तेव्हा त्यांचं अभूतपूर्व स्वागत करण्यात आलं.

लजारूस सांगतात, "कॉकटेल आमच्या फॉरमॅशनचा कॉल साईन होता. त्यांनी विचारलं, कॉकटेल-1? ते म्हणाले, मर्डर, मर्डर. याचा अर्थ असा होता की, एक विमान पाडलं. कॉकटेल-2 ने सांगितलं, निगेटिव्ह. कॉकटेल-3 नं सांगितलं, मर्डर, मर्डर आणि मीही म्हटलं, मर्डर मर्डर. ही सर्व माहिती आम्ही उतरण्याआधीच त्यांच्यापर्यंत पोहोचली होती."

"जेव्हा आम्ही उतरलो, तेव्हा विमानाला चारही बाजूंनी लोकांनी घेरलं. सर्वसामान्यपणे पायलट शिडीवरून खाली उतरतो. नॅट विमान खूप लहान होतं. त्यामुळे उडी मारूनच पायलट खाली उतरतो. मात्र, त्यादिवशी आम्हाला खाली उतरूच दिलं नाही. आम्हाला आमच्या सहकाऱ्यांच्या खांद्यावर बसवून खाली उतरवलं गेलं"

त्यानंतर पायलट हिरो बनले आणि ते जिथेही कुठे गेले तिथे लोकांनी त्यांना घेरलं. भारतीय वायूसेनाध्यक्ष एअर चीफ मार्शल पीसी लाल हे वायूसेनेच्या सैनिकांचं अभिनंदन करण्यासाठी खास कोलकात्याला गेले.

ते म्हणतात, "प्रत्यक्षात युद्ध सुरू होण्याच्या आधीच आम्ही हवाई लढाई जिंकली होती."

काही दिवसांनंतर संरक्षणमंत्री जगजीवन राम आणि माजी वायू सेना प्रमुख एअर मार्शल देवान हे सुद्धा अभिनंदन करण्यासाठी डमडम एअरबेसवर आले. त्यांनी सर्वांना फुलांच्या माळा घातल्या आणि नॅट विमानावर चढून फोटोही काढला.

परवेझ कुरैशी मेंहदी बनले पाकिस्तानचे वायूसेना अध्यक्ष

या लढाईत सहभागी झालेल्या पायलट मॅसी, गणपती आणि लजारूस, तसंच फ्लाईंट कंट्रोलर बागची यांना वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आलं.

फ्लाईट लेफ्टनंट परवेझ कुरैशी मेंहदी जवळपास दीड वर्ष ग्वाल्हेरमध्ये युद्धबंदीच्या रुपात राहिले. 1997 साली परवेझ कुरैशी यांना पाकिस्तानच्या वायूसेनेचे अध्यक्ष बनवण्यात आले. या पदावर ते तीन वर्षांपर्यंत राहिले.

1999 साली अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळी पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांचा परिचय वाजपेयींशी करून दिला होता.

नंतर अशाही बातम्या समोर आल्या की, कारगील युद्धाच्या मुद्द्यावरून तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांच्याशी त्यांचे मतभेद झाले होते. कारगील युद्धात पाकिस्तानच्या सैन्याच्या सहभागास त्यांनी विरोध दर्शवला होता.

एअर मार्शल मेंहदी यांच्या कॉकपिट सीट, त्यांचं पॅराशूट आणि सेबर विमानाचे काही भाग आजही 4 शिखच्या मुख्यालयात आठवण म्हणून ठेवण्यात आले आहेत.

कॅप्टन पनाग भारतीय लष्करात लेफ्टनंट जनरल पदावरून निवृत्त झाले. त्याआधी ते उत्तर आणि मध्य भागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणूनही कार्यरत होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)