सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू अपघाती की हत्या?

    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आझाद हिंद फौजेचं नेतृत्व करणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू आजसुद्धा एक रहस्यच आहे. या मुद्द्यावरून वारंवार राजकीय विश्लेषक आणि विचारवंतांमध्ये वादविवाद होताना दिसतात.

नेताजी सुभाषचंद्र बोस नेमक्या कोणत्या परिस्थितीत गायब झाले? त्यांचा मृत्यू कसा झाला? त्यांच्या मृत्यूच्या बातमीवर अनेक जण विश्वास का ठेवत नाहीत?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न बीबीसीने केला आहे.

झियाउद्दीन यांनी गुप्तहेर यंत्रणेला चकवलं...

18 जानेवारी 1941. रात्री 1 वाजून 35 मिनिटांनी 38/2 एलगिन रोड, कोलकाता या ठिकाणी एक जर्मन वाँडरर कार येऊन थांबली.

कारचा नंबर होता बीएलए 7169. लांबलचक शेरवानी, सैल विजार आणि सोन्याच्या काड्यांचा चष्मा घातलेले विमा एजंट मोहम्मद झियाऊद्दीन यांनी कारचा मागचा दरवाजा उघडला.

ड्रायव्हर सीटवर त्यांचे पुतणे बसलेले होते. त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या खोलीची लाईट बंद केली नाही. काही तासांतच ते गाढ झोपले. दरम्यान, कोलकात्याची सीमा पार करून चंदरनागोरच्या दिशेने निघून गेले.

तिथंही त्यांनी आपली गाडी थांबवली नाही. ते धनबादजवळ गोमो स्टेशनवर थांबले. पेंगुळलेल्या डोळ्यांच्या एका कुलीने झियाउद्दीन यांचं सामान उचललं.

कोलकात्याहून दिल्लीकडे जाणारी कालका मेल येताना दिसली. ते पहिल्यांदा दिल्लीला उतरले. तिथून पेशावरमार्गे ते काबूलला गेले. तिथून बर्लिन आणि त्यानंतर काही काळाने पाणबुडीचा प्रवास करून ते जपानला पोहोचले.

काही महिन्यांनंतर त्यांनी रेडिओ स्टेशनवरून आपल्या देशवासीयांशी संवाद साधला, "आमी सुभाष बोलची."

आपल्या घरात नजरकैदेत असलेल्या सुभाषचंद्र बोस यांनी विमा एजंट झियाउद्दीन यांच्या वेशात 14 गुप्तचर अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली. त्यांनी फक्त भारतातून पलायन केलं नाही तर जवळपास अर्ध्या जगाची सफर करून ते जपानला पोहोचले.

अंक दुसरा : नेताजी समोरून बाहेर पडा

दुसरं महायुद्ध संपत आलं होतं. जपानने शरणागती पत्करून तीन दिवस उलटून गेले होते. 18 ऑगस्ट 1945 ला सुभाषचंद्र बोस यांचं विमान इंधन भरण्यासाठी ताइपे विमानतळावर थांबलं होतं.

दुसऱ्यांदा उड्डाण करत असतानाच एक जोराचा आवाज आला. शत्रूच्या विमानभेदी तोफेचा गोळा तर विमानाला लागला नसेल ना, असं बोस यांचे सहकारी हबीबुर रहमान यांना वाटलं.

पण नंतर विमानाच्या इंजिनाचं प्रोपेलर तुटल्याचं लक्षात आलं. विमान समोरच्या बाजूने जोरात खाली आदळलं. हबीब यांच्या डोळ्यासमोर काळकुट्ट अंधार दाटला.

काही वेळाने ते शुद्धीवर आले. विमानाच्या मागून बाहेर निघण्याचा रस्ता सामानामुळे बंद झाल्याचं त्यांनी पाहिलं. समोरच्या बाजूला आग लागली होती. हबीब यांनी सुभाषचंद्र बोस यांना आवाज दिला, "नेताजी, समोरून बाहेर पडा."

नंतर त्यांच्या लक्षात आलं, की जेव्हा विमान पडलं त्यावेळी नेताजींची खाकी वर्दी पेट्रोलने भिजली होती. ते आगीने घेरलेल्या दरवाजातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असताना त्यांच्या शरीराला आग लागली. आग विझवण्याच्या प्रयत्नात हबीब यांचे हातसुद्धा गंभीररित्या भाजले.

दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पुढचे सहा तास नेताजींचं बेशुद्ध पडणं आणि शुद्धीवर येणं सुरूच होतं. याच अवस्थेत त्यांनी आबिद हसन यांना हाक मारली.

"आबिद इथे नाही. मी हबीब आहे."

त्यावेळी थरथरत्या आवाजात नेताजींनी आपला अंत जवळ आल्याचं हबीब यांना सांगितलं. "आझादीची लढाई सुरू ठेवा, असं भारतात जाऊन लोकांना सांगा," असंही त्यांनी म्हटलं.

त्याच रात्री साडेनऊच्या सुमारास नेताजींनी शेवटचा श्वास घेतला. 20 ऑगस्टला नेताजींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारानंतर 25 दिवसांनी हबीबुर रहमान नेताजींच्या अस्थी घेऊन जपानला पोहोचले.

पत्नी एमिली यांना शोक अनावर

1945 मध्येच ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात नेताजींच्या पत्नी एमिली या आपल्या विएन्नामधल्या घरी आपली आई आणि बहिणीसोबत होत्या.

नेहमीप्रमाणे त्या रेडिओवर संध्याकाळच्या बातम्या ऐकत होत्या. तेवढ्यात वृत्तनिवेदकाने भारताचे देशद्रोही सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला, अशा स्वरूपाची बातमी दिली.

एमिली यांच्या आई आणि बहिणीने स्तब्ध होऊन त्यांच्याकडे पाहिलं. सावकाशपणे त्या उठल्या आणि बाजूच्या खोलीत निघून गेल्या. तिथं सुभाषचंद्र बोस यांची अडीच वर्षांची मुलगी अनीता गाढ झोपेत होती. याच बिछान्याच्या बाजूला बसून ओक्साबोक्शी रडल्याची आठवण एमिली यांनी अनेक वर्षांनंतर सांगितली होती.

'विमान अपघाताची नोंद नाही'

खरंतर सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत विमानात असलेल्या हबीबुर रहमान यांनी पाकिस्तानातून परतल्यानंतर शाहनवाज समितीसमोर साक्ष दिली होती. नेताजी त्या विमान अपघातातच मरण पावल्याचं आणि त्यांच्यासमोरच नेताजींवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं हबीबुर यांनी सांगितलं.

पण सुभाषचंद्र या अपघातातून वाचले आणि त्यानंतर ते रशियाला निघून गेले, असं भारतातले अनेकजण मानतात.

भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रह्मण्याम स्वामी सांगतात, "विमान अपघातावेळी तैवान जापानच्या ताब्यात होता. त्यानंतर त्यावर अमेरिकांनी कब्जा केला. दोन्ही देशांकडे या अपघाताची नोंदच नाही."

ते सांगतात, "1991 च्या सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर एक सोव्हिएत स्कॉलर मला भेटला. नेताजी तैवानला गेलेच नव्हते, असं त्यानं सांगितलं. ते सायगोनहून थेट मंचुरियाला गेले होते. तिथं आम्ही त्यांना अटक केली होती. त्यानंतर स्टॅलिन यांनी त्यांना सायबेरियाच्या यकूत्स्क तुरुंगात टाकलं. तिथं 1953 साली त्यांचा मृत्यू झाला."

नेहरूंच्या स्टेनोग्राफरची साक्ष

सुब्रह्मण्यम स्वामी पुढे नेहरू यांचे स्टेनोग्राफर श्यामलाल जैन यांचा उल्लेख करतात. त्यांनी शाहनवाज चौकशी समितीसमोर दिलेल्या साक्षीबाबत त्यांनी सांगितलं.

आयोगासमोर त्यांनी म्हटलं होतं, "1946 मध्ये एका रात्री तातडीनं भेटायला येण्याबाबत नेहरूंचा संदेश आला होता. ते तेव्हा तीन मूर्ती भवन नव्हे तर आसफ अली यांच्याकडे दरियागंजमध्ये राहत होते.

जैन यांच्यानुसार, त्यांनी ब्रिटिश पंतप्रधान एटली यांच्यासाठी एक पत्र लिहिलं होतं. यामध्ये सुभाषचंद्र बोस जिवंत आहेत आपल्या ताब्यात असल्याचं पत्र स्टॅलिनकडून मिळाल्याचा उल्लेख होता.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी बोस यांनी हिटलरशी हातमिळवणी केल्यामुळे स्टॅलिन नाराज होते.

जपानची विचित्र मागणी

याबाबतचा दुसरा पुरावा चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात मंत्री बनल्यानंतर आपल्याला मिळाल्याचं सुब्रह्मण्यम स्वामी यांनी बीबीसीला सांगितलं.

त्यांनी सांगितलं, "रिंकोजी मंदिरात बोस यांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत. त्या तुम्ही घेऊन जा, पण त्यांची डीएनए चाचणी करण्यात येऊ नये, अशी अट त्यांनी घातली.

स्वामींनी सांगितलं, की इंदिरा गांधी यांनी आपल्या कार्यकाळात नेताजींशी संबंधित एक फाईल पूर्णतः नष्ट केली होती, अशी माहिती मला मिळाली होती.

पण ही गोष्ट कोणत्याही प्रकारे सिद्ध होऊ शकलेली नाही.

इतर देशांशी संबंध बिघडण्याची भीती

सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूवर 'इंडियाज बिगेस्ट कव्हर अप' हे पुस्तक लिहिणारे अनुज धर सांगतात, "सोव्हिएत संघात बोस असल्याबाबत चौकशीचे दस्तऐवज उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला केली होती."

"पण पंतप्रधान कार्यालयाने ही मागणी फेटाळून लावली. इतर देशांसोबत असलेल्या संबंधांवर याचा प्रतिकूल परिणाम होईल," असं त्यांनी सांगितलं.

आंतरराष्ट्रीय संबंध तर फक्त एक बहाणा आहे, यामुळे देशातच गदारोळ माजेल, असं धर यांना वाटतं.

नेताजींचे पणतू आणि 'हिज मॅजेस्टीक अपोनन्ट' हे पुस्तक लिहिणारे सौगत बोस यांनासुद्धा इतर देशांसोबत संबंध बिघडण्याचं कारण पटत नाही.

त्यांच्या मते, विन्स्टन चर्चिल यांनी 1942 ला सुभाषचंद्र बोस यांना मारण्याचे आदेश दिले होते. पण याचा अर्थ हा नाही की या मुद्द्यावरून भारताने आज ब्रिटनसोबतचे आपले संबंध खराब करावेत.

"तर सोव्हिएत संघ आता राहिलेला नाही. त्यावेळी जगात नरसंहारासाठी जबाबदार मानले गेलेले स्टॅलिन संपूर्ण जगभरात बदनाम झालेले आहेत. त्यांच्यावर बोस यांना हटवल्याचा डाग लागला तर पुतिन यांना याबाबत काहीच हरकत नसेल," असं स्वामींना वाटतं.

नेहरूंना माहिती होती?

सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांवर ठेवल्या जाणाऱ्या पाळतीची माहिती नेहरू यांना वैयक्तिकपणे होती.

'रॉ' या भारतीय गुप्तचर संस्थेत विशेष सचिव पदावर काम केलेले सी बालचंद्रन सांगतात, "ही स्वतंत्र भारताने ब्रिटनकडून शिकलेली गोष्ट आहे. 1919 नंतर ब्रिटिश सरकारसाठी कम्युनिस्ट आंदोलन एक आव्हान बनलं होतं. त्यांनी सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित लोकांवर नजर ठेवण्यास सुरू केलं होतं. याच प्रकारे बोस यांच्यावर हेरगिरी सुरू करण्यात आली."

नेहरूंनी लिहिलेलं टिपण

पण अनुज धर बालाचंद्रन यांच्या मताशी सहमत नाहीत. त्यांच्या मते याप्रकारची हेरगिरी नेहरूंच्या माहितीशिवाय होऊ शकत नाही.

ते सांगतात, "आयबीवाले कोणतंही काम विना परवानगी करत नाहीत. बोस यांच्याबाबत प्रत्येक माहिती आयबीचे अधिकारी अफसर मलिक आणि काव यांच्यापर्यंत पोहोचत होती."

"सुभाषचंद्र बोस यांचे नातू अमिय बोस जपानला का गेले, तिथे ते काय करत आहेत, ते रिंकोजी मंदिरलासुद्धा गेले का, याची माहिती काढण्यास नेहरूंनी आयबीला सांगितलं होतं. याबाबत माझ्याकडे कागदपत्र आहेत," असं अनुज धर सांगतात.

नेहरूंच्या मनात शंका

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि ज्येष्ठ पत्रकार एम. जे. अकबर यांच्या मते, नेहरूंच्या मनात बोस विमान अपघातात मरण पावले किंवा नाही याबाबत शंका होती हे या प्रकरणातून दिसून येतं.

बोस आपल्या कुटुंबीयांशी संपर्क करू शकतात म्हणून त्यांच्या पत्रांची तपासणी करण्यात येत होती.

सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, वीस वर्षांपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांवर नजर ठेवण्यात आली. याच्याशी संबंधित कागदपत्रं सार्वजनिक झाल्यानंतरच याबाबत कळेल.

पण ब्रिटीश साम्राज्यावरचा सूर्य कधीच अस्ताला जात नाही, ही म्हण खोटी पाडण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी जोरदार प्रयत्न केले होते. या मोहिमेत ते काहीअंशी यशस्वीसुद्धा झाले, हे मात्र नक्की.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)