भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसाममध्ये, महाराष्ट्रात नाहीच- आसाम सरकारचा दावा

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी विविध वेबसाइट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. खरं भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात नाही- आसाम सरकारचा दावा
देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर. महाराष्ट्रात असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर आसाम सरकारने प्रश्न उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरं नसल्याचं आसाम सरकारनं म्हटलं आहे. भीमाशंकरचं सहावं ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केला आहे. एवढंच नाही तर आसाम पर्यटन विभागानं संदर्भात जाहिरातबाजी देखील केली आहे.
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आसाम सरकारच्या पर्यटन विभागाकडून संकेतस्थळावर एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये "भारतातील सहावं ज्योतिर्लिंग असलेलं, कामरुप डाकिनी पर्वत, आसाम आपलं स्वागत आहे," असं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Supriya Sule Twitter
दरम्यान, आसाम सरकारच्या या अजब दाव्यावर आता चौफेर टीका होताना दिसत आहे. यावर सरकारनं भूमिका जाहीर करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे म्हणाले, "प्रत्येक राज्यामध्ये असलेल्या मंदिराबाबत आम्हाला आदर आहे. मात्र उद्योगाप्रमाणे मंदिरे पण दुसरा राज्यामध्ये घेऊन जात आहेत का? असा प्रश्न पडला आहे. महाराष्ट्राला डिवचण्यासाठी वाद करू नका."
एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.
2. टाटा समूहाचा फ्रेंच कंपनी एअरबससोबत सर्वांत मोठा करार
टाटा समूहाने मंगळवारी (14 फेब्रुवारी) फ्रेंच कंपनी एअरबससोबत इतिहासातील सर्वांत मोठा करार केला आहे.
टाटांच्या एअर इंडियासाठी 250 विमाने खरेदी करण्याचा हा करार असून, दोन्ही कंपन्यांमधील हा करार आतापर्यंतचा सर्वांत मोठा करार असल्याचे बोलले जात आहे.
या करारांतर्गत टाटा समूहाच्या मालकीची एअरलाइन एअरबसकडून 40 वाइड-बॉडी A350 आणि 210 लहान-बॉडी विमाने खरेदी करणार आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
या करारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावली.
यादरम्यान पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांचे या मोठ्या करारासाठी अभिनंदन केले.
सकाळने ही बातमी दिली आहे.
3. सत्तांतर झालं तरी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकलेलेच
महाविकास आघाडी सरकारप्रमाणे बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप सरकारच्या काळातही पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत.
निम्मा फेब्रुवारी गेला असला तरी अजूनही 88 हजार एसटी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जानेवारीचा पगार झालेला नाही. यात नागपूर विभागातील अडीच हजार कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
यामुळे कामगार संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत एसटी महामंडळाला पुन्हा एकदा न्यायालयात खेचण्याची तयारी केली आहे.

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES
अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन, इंधन आणि अन्य असा एसटीचा दरमहा एकूण सुमारे साडेआठशे कोटींचा खर्च आहे. यापैकी सवलतीसह प्रवासी तिकिटांतून 600 कोटींपर्यंत उत्पन्न मिळते. उर्वरित 150 कोटींचा तुटवडा असून, तो भरून काढण्यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत घेण्यात येत असल्याचं एसटी महामंडळाकडून सांगण्यात येते.
'मागील सहा महिन्यांच्या थकीत वेतनासह यंदाच्या वेतनासाठी एकूण एक हजार कोटींची मदत महामंडळाने सरकारकडे मागितली. मात्र, अर्थ खात्याने या मागणीला प्रतिसाद दिलेला नाही,' असं एसटी महामंडळाचं म्हणणं आहे.
महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.
4. शरद पवारांबद्दल फडणवीस जे बोलले ते खरंच- चंद्रशेखर बावनकुळे
शरद पवार यांच्या परवानगीनेच शपथविधी झाल्याचे देवेंद्र फडणवीस जे बोलले ते खरे आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केला.
बावनकुळे यांनी म्हटलं, "देवेंद्र फडणवीस यांना मी तीस वर्षांपासून ओळखतो. असत्य बोलून कधीही ते राजकारण करत नाही. खोटे बोलून वा कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून ते मोठे झाले नाहीत. फडणवीस जे बोलले ते जबाबदारीने बोलले."
"विरोधी पक्षातील मराठा,ओबीसी नेत्यांच्या विरोधात तक्रारी आल्यावरच कारवाई केली जात आहे. त्यांनी चौकशीला सामोरे जावं. चुका करायच्या आणि पोलिसांकडून कारवाई झाली तर आकांडतांडव करायचे हे चुकीचं आहे. पोलीस नियमाच्या बाहेर जाऊन कारवाई करणार नाही," याकडेही बावनकुळे यांनी लक्ष वेधलं.
"फडणवीस यांच्यावर बोलावे इतकी शिवसेना नेते संजय राऊत यांची उंची नाही आणि आता तर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही," असंही बावनकुळे यांनी म्हटल्याचं लोकसत्ताने आपल्या बातमीत म्हटलं आहे.
5. दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपी टाळण्यासाठी घेतली जाणार 'ही' खबरदारी
राज्य मंडळाकडून दहावी-बारावी परीक्षेत कॉपी टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली जातेय. याशिवाय राज्य शिक्षण मंडळाने यासाठी नवी नियमावली जारी केली आहे.
या नियमावलीनुसार दहावी-बारावीच्या परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्राजवळ असणारे झेरॉक्स दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्या असून या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्या यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली तयार केली आहे. याची माहिती पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
येणाऱ्या शालांत परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेप्रमाणे तहसीलदार, स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी आणि इतर कर्मचारी यांची फिरती पथक तैनात करण्यात आली आहेत .
टीव्ही9 मराठीने ही बातमी दिली आहे.
तालुका स्तरावरील अधिकारी या सर्व परीक्षा केंद्रांवर जाऊन या सगळ्याचा आढावा घेणार आहेत. तसंच कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी नियमांचं काटेकोर पालन केला जाईल, असं आश्वासन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलं.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









