व्हॅलेंटाईन डे: भारतीयांशी विवाहानंतर भूतानच्या नागरिकांच्या प्रेमाआड येणारी सीमेची भिंत

रजनीश
    • Author, रजनीश कुमार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, जयगावहून

भूतानच्या फुंतशोलिंग आणि भारताच्या जयगावदरम्यान असलेल्या सीमेच्या भिंतीवर कबुतराचं एक जोडपं बसलंय.

दोन्ही कबुतरं पंख फडफडत कधी भूतानमध्ये तर कधी भारतात फिरत असतात.

40 वर्षांच्या छोकी वांगमो मात्र, या कबुतरांकडं आशाळभूत नजरेनं पाहत आहे.

छोकी कदाचित विचार करत असाव्यात की, त्याही कबूतर असत्या तर बरं झालं असतं. कारण त्यामुळं, सीमेच्या भिंतींनी त्यांना रोज डिवचलं तरी नसतं.

छोकी अनेकदा भूतान-भारत सीमेवर येऊन बसत असतात. आज त्या भारताच्या बाजुला असलेल्या जयगावमध्ये बसल्या आहेत आणि त्यांचे पती पुष्पेंद्र सिंह दुसऱ्या बाजुला भूतानच्या फुंतशोलिंगमध्ये काम करतायत.

पुष्पेंद्र सिंह फुंतशोलिंगमध्ये मॅकॅनिकचं काम करतात. सायंकाळी जेव्हा पुष्पेंद्र सिंह काम करून परततात, तेव्हा त्यांना त्यांच्या पत्नीची साथ मिळते.

पुष्पेंद्र सिंह भारतीय नागरिक आहेत. त्यामुळं त्यांना भूतानमध्ये काम करण्यासाठी वर्क परमिट मिळालेलं आहे. दर तीन महिन्यांनी त्यांना वर्क परमिटचं नुतणीकरण करावं लागतं.

छोकी नेहमी त्यांच्या पतीची वाट पाहत सीमेवर बसलेल्या असतात. दोघं पश्चिम बंगालच्या जयगावमध्ये भाड्याच्या घरात राहतात.

छोकी मूळच्या भूतानच्या पारोमधील आहेत. त्यांनी 2019 मध्ये हिमाचल प्रदेशच्या पुष्पेंद्र सिंह यांच्याशी विवाह केला होता.

पण छोकी यांचे मोठे भाऊ त्यांच्या लग्नाच्या विरोधात होते, असं छोकी सांगतात.

भारतात विवाह केल्यानंतर छोकी यांना त्यांच्या पती आणि मुलांना भूतानचं नागरिकत्व मिळवून देता येणार नाही आणि त्याचा त्यांना नाहक त्रास होत राहील, असं त्यांच्या मोठ्या भावाला वाटत होतं.

पण प्रेम आणि अडचणी यातर पूर्वीपासून सोबतच चालत आलेल्या आहेत.

छोकी यांचे मामा हिमाचल प्रदेशच्या मनालीमध्ये एका बौद्ध मंदिरात लामा आहेत. त्या मामाला भेटण्यासाठी मनालीला आल्या होत्या.

त्यावेळी 2019 मध्ये रिकोंगपीओ इथं पुष्पेंद्र सिंह यांच्याशी त्यांची भेट झाली होती.

पुष्पेंद्र सिंह यांचा विवाहाचा प्रस्ताव छोकी वांगमो यांनी तत्काळ स्वीकारला होता. छोकी बौद्ध आहे, तर पुष्पेंद्र सिंह हिंदू आहेत.

पण दोघांच्या या प्रेमविवाहामध्ये त्यांचा धर्म जराही आडवा आला नाही. मात्र, सीमेच्या भिंती रोज त्यांच्यासमोर अडथळे निर्माण करतात.

भूतान

छोकी यांच्यासाठी भूतान किंवा भारतापैकी एकाची निवड करणं सोपं नाही.

भूतान किंवा भारतापैकी एकाची निवड करणं कठीण आहे. पण भूतान, भारत आणि प्रेम तिन्हीपैकी मी प्रेमाची निवड केली, असं छोकी म्हणतात.

माझ्या पतीनं भूतानमधील माझ्या घरी राहावं असं छोकी यांना वाटतं. पण पुष्पेंद्र जर त्यांच्या पत्नीसह पारो शहरात गेले तर त्यांना एसडीएफ म्हणजे, 'सस्टेनेबल डेव्हलपमेंट फीस' म्हणून रोज 1200 रुपये मोजावे लागतील.

भूतान सरकार भारतीय नागरिक भूतानमध्ये आले तर रोज त्यांच्याकडून एसडीएफ म्हणून 1200 रुपये घेतं. पुष्पेंद्र यांच्यावरही हा नियम लागू होईल.

भूतान पूर्वी भारतीयांकडून एसडीएफ घेत नव्हतं. पण गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये कोविडनंतर भूतान पर्यटकांसाठी पुन्हा खुलं झालं तेव्हा भारतीय नागरिकांवरही त्यांनी एसडीएफ लावला होता.

छोकी यांना जर भूतानमधून विवाह नोंदणीचं प्रमाणपत्र (मॅरेज सर्टिफिकेट) मिळालं असतं, तर त्यांच्या पतीला एसडीएफ द्यावा लागला नसता.

पण छोकी म्हणतात की, त्यांना मॅरेज सर्टिफिकेट मिळणार नाही. त्याचं कारण म्हणजे, भारतीयांबरोबर लग्न केल्यानंतर 15-15 वर्ष लोक मॅरेज सर्टिफिकेटची वाट पाहत आहेत.

भूतानच्या मुला-मुलींच्या अडचणी

या वेदना केवळ छोकी वांगमो यांच्या नाहीत. जयगावच्या खोकला परिसरात या वेदनांसह जगणाऱ्या अनेक छोकी वांगमो आणि पुष्पेंद्र आहेत.

करमा किनले पूर्व भूतानच्या हुंसी येथील रहिवासी आहेत. त्यांनी 2019 मध्ये भूतानला लागून असलेल्या भारताच्या बक्सा हिलमधील छृंग छोकी डुक्पा यांच्याशी प्रेमविवाह केला होता.

2020 मध्ये कोविडची साथ आली होती, तेव्हा करमा भारताच्या बक्सामध्येच होते. तेव्हा भूताननं सीमा बंद करण्याची घोषणा केली होती.

भूतान

संपूर्ण लॉकडाऊनमध्ये करमा भारतातच त्यांच्या पत्नीसह राहिले. त्याचदरम्यान, त्यांच्या पत्नी छोकी डुक्पा यांनी एका मुलाला जन्म दिला. त्यांचा मुलगाही आता दीड वर्षांचा झालाय.

करमा किनले यांच्या कुटुंबाला भेटल्यानंतर असं वाटतं की, त्यांचं प्रेम दोन देशांच्या सीमेमध्ये अडकलं आहे. छोकी डुक्पा या करमा यांच्या पत्नी असल्या तरी, त्यांना भूतानचं नागरिकत्व मिळणं कठिण आहे.

एवढंच काय पण, त्यांच्या मुलालाही भूतानची नागरिकता मिळणं कठीण आहे.

करमा हे नाईलाजानं त्यांच्या पत्नी आणि मुलांसह जयगावमध्ये राहत आहेत. करमा जयगावमध्येच हस्तकलेचं काम करतात.

त्यांचं प्रेम दोन देशांमध्ये अडकलं आहे का? असं करमा यांना विचारलं.

त्यावर करमा म्हणतात, "माझं नाव करमा आहे आणि माझा 'कर्मा'वर विश्वास आहे. प्रेमाला नागरिकत्व नसतं. चित्रपटांमध्ये डायलॉग असतो की, प्रेम अंधळं असतं. पण मला वाटतं की, प्रेम हे सीमांच्या पलिकडचंही असतं. अडचणी तर आहेत, पण मी प्रयत्न सोडलेले नाहीत."

भूतान

पत्नी आणि मुलांना घेऊन भूतानला जावं आणि तिथंच राहावं अशी करमा यांची इच्छा आहे. पण त्या ठिकाणच्या नियमांमुळं त्यांना तसं करता येत नाहीये.

कारण पत्नीला घेऊन जर करमा भूतानला गेले तर त्यांना रोज 1200 रुपये एसडीएफ द्यावा लागेल लागेल.

एकदा छोकी डुप्का चार दिवसांसाठी भूतानला गेल्या होत्या, तर त्यांना एसडीएफ म्हणून 4800 रुपये द्यावे लागले होते.

त्यामुळं, छोकी यांना भूतानमधून मॅरेज सर्टिफिकेट मिळावं यासाठी करमा प्रयत्न करत आहेत.

त्यासाठी छोकी यांनी भूतानला जाऊन मुलाखतही दिलीय. पण अद्याप त्याचा निकाल काही समोर आलेला नाही. पत्नीला चांगले गुण मिळाले असावेत, असं करमा यांना वाटतं. कारण छोकी यांना भूतानी भाषाही येते.

"भूतानहून मॅरेज सर्टिफिकेट मिळालं तर, माझी पत्नी भूतानमध्ये माझ्याबरोबर राहू शकते. मॅरेज सर्टिफिकेट दर 4 वर्षांनी रिन्यू करावं लागतं. मॅरेज सर्टिफिकेटसाठी मुलाबरोबर कोर्टातही गेलो होतो. सर्टिफिकेट मिळालं तर येण्या-जाण्याच्या अडचणी दूर होतील. तसंच एसडीएफही द्यावं लागणार नाही. मी भूतानमध्ये एकटा राहू शकत नाही आणि पत्नीला सोबत ठेवलं तर, रोजचे पैसे द्यावे लागतील. भारतात किमान प्रेमाला आश्रय तरी दिला जातोय," असं करमा म्हणतात.

भूतान

फोटो स्रोत, Getty Images

करमा म्हणतात की, त्यांना पत्नी आणि मुलांच्या भविष्याबाबत चिंता असते. करमा जेव्हा हे बोलत होते, तेव्हा त्यांचा दीड वर्षांचा मुलगा रडत होता. त्यांनी मुलाला जवळ घेतलं आणि काहीवेळासाठी ते शांत झाले.

करमा या शांततेचा संबंध भावनिकतेशी जोडतात. "भूतान माझी जन्मभूमी आहे. लग्नानंतर लोक पत्नीला त्यांच्या घरीच घेऊन जात असतात. त्यासाठीच मी संघर्ष करत आहे. माझ्या मुलांचं भविष्य तर माझ्याच हाती आहे. मी काहीही चुकीचं काम केलेलं नाही. प्रेम करणं हा काही गुन्हा नाही. कोविडपूर्वी भारतीयांना भूतानला पैसे द्यावे लागत नव्हते. जर तोच नियम कायम असता, तर माझ्यासाठी सोपं झालं असतं. मला स्वतःच्याच मुलीला सोबत ठेवण्यासाठी पैसे द्यावे लागतात. मला हे योग्य तर वाटत नाही, पण नियम आहे म्हटल्यावर पाळावा लागेलच."

भारतात राहिलं तर आईच्या आठवणी, भूतानमध्ये राहिलं तर पती आणि मुलांच्या

भूतानच्या छिमी डेमा यांनी 16 वर्षांपूर्वी जयगावच्या पूरन छेत्री यांना जीवनाचा साथीदार म्हणून निवडलं होतं.

पूरन आणि छिमी यांचे आता 12 आणि 13 वर्ष वयाचे दोन मुलंही आहेत.

भूतान

छिमी यांच्या जीवनात कशाचीही कमतरता नाही. जयगावमध्ये सुंदर घर आहे, जे भूतानच्या सीमेच्या अगदी मागे आहे.

भूतानच्या सीमेपासून छिमी यांचं घर एवढं जवळ आहे की, सीमेच्या भींतीवर बसलेलं एखादं कबूतर उडून आलं तर ते छिमी यांच्या छतावरच येऊन बसतं.

छिमी त्यांच्या प्रियकर आणि कुटुंबाबाबत अत्यंत आनंदी दिसतात. पण आईच्या आठवणीनं त्यांच्या भावना दाटून येतात.

छिमी यांच्या आई 67 वर्षांच्या आहेत. भूतानच्या पारोपासून दोन किलोमीटर अंतर असलेल्या गावात त्या राहतात.

भूतानमध्ये पारो हे विमानतळ असलेलं एकमेव शहर आहे. छिमी या एकुलत्या एक आहेत, त्यांना भावंडंही नाहीत.

छिमी यांचे वडील दार्जिलिंगच्या एका बौद्ध मंदिरात लामा होते. त्यांचं निधन झालंय. त्यामुळं पतीचं निधन आणि छिमी यांच्या भारतात विवाह झाल्यानंतर त्यांच्या आई एकट्या पडल्या आहेत.

"पाकिस्तानी चित्रपटातील एक डायलॉग आहे, -मोहब्बत सायन्स है, और बिछडना आर्ट. मैं पती के साथ सायन्स जी रही हूँ और माँ के साथ आर्ट- जगातील बहुतांश मुलींना हेच जीवन निवडावं लागतं," असं छिमी म्हणतात.

"आईला मी माझ्याकडं घेऊन येते पण तिला इथं करमत नाही. तिला तिच्या फुलांच्या आठवणी येऊ लागतात. डोंगरांच्या आठवणींमध्ये त्या रमू लागतात. भूतानची हवा त्यांच्या नसांमध्ये भिनलीये. तिला माझं लग्न मान्य नव्हतं. त्यामुळं ती अनेक वर्ष आमच्यावर नाराज होती. भूतानमध्ये नेपाळी भाषिक आणि गोरखांबाबत अनेक प्रकारचे ऐतिहास पूर्वग्रह आहेत.

"नेपाळी भाषकांच्या विरोधात भूतानमध्ये 90 च्या दशकात एक मोहीमही चालवण्यात आली होती. योगायोगानं मी नेपाळी जीवनसाथीच निवडला. आता माझ्या आईनं माझ्या पतीचा स्वीकार केलाय. माझ्या पतीनं माझ्या आईसाठी थोडी भूतानी भाषा शिकली आणि आईनं जावयासाठी थोडी नेपाळी शिकलीय," असं छिमी आईला आठवून सांगत होत्या.

भूतान

पण, भूतानमध्ये लोक मोठ्या प्रमाणात नेपाळी भाषादेखील बोलतात आणि त्यांना समजते देखील.

छिमी डेमा आणि पूरन छेत्री यांची पहिली भेट 2006 मध्ये कालिम्पोंगमध्ये झाली होती. पूरन त्यांच्या तिबेटी मित्राबरोबर एका धार्मिक कार्यक्रमासाठी कालिम्पोंगला गेले होते.

छिमीदेखील त्या पुजेसाठी आलेल्या होत्या. या पहिल्या भेटीनंतर त्यांच्या भेटी सुरुच राहिल्या. छिमीचे आई-वडिल नेपाळी भाषिक भारतीय पूरनबरोबर विवाहासाठी तयार नव्हते तर त्यांनी पळून जाऊन लग्न केलं.

छिमी यांना भूतानची प्रचंड आठवण येते. पण जर आई एकटी नसती तर कदाचित एवढी आठवण आली नसती, असं छिमी म्हणतात.

छिमी यांनी अद्याप भूतानचं नागरिकत्व सोडलेलं नाही. त्यांनी जर भूतानचं नागरिकत्व सोडलं तर त्यांचं भूतानमध्ये येणं-जाणंही कठिण होईल.

छिमी म्हणतात की, "मी पतीबरोबर आईकडे जाऊ शकत नाही. मुलांना आजीला भेटायला नेणंही तेवढंच कठीण आहे. आता तर नवा नियम असा आहे की, पती आणि मुलं एकत्र गेले तर रोज तिघांचे 3600 रुपये एसडीएफ म्हणून द्यावे लागतील. एवढी रक्कम मोजणं हे सोपं नसतं. पतीला सोबत न्यायलाही परमिट तयार करावं लागतं. आम्हाला आधीच सांगावं लागतं की, पती माझ्याबरोबर किती दिवस राहणार आहे. भूतानमध्ये एकही असा नियम नाही, ज्यामुळं प्रेमाला पाठिंबा मिळेल. प्रत्येक नियम वेगळं करण्याची प्रेरणा देतो. त्यांना आमच्या प्रेमाची किंमत नाही, पण आम्हाला त्यांचे सर्व नियम पाळावे लागतात."

"पूरन आणि छिमी यांनी भूतानमधून मॅरेज सर्टिफिकेट तयार करण्याचा प्रयत्नही केला. पण त्यांना यश आलं नाही. आता त्यांनी याची आशाच सोडलीय," असं छिमी म्हणतात.

भूतान

पूरन भूतानच्या नियमांबाबत कायम नाराज असतात. त्यांना वाटतं की, भारतानं याबाबत भूतानबरोबर चर्चा करायला हवी.

पूरन यांना वाटतं की, भूतानमध्ये रोज नियम बदलले जातात आणि त्यामुळं सीमेच्या इकडे राहणारे लोक अडचणीत येतात.

"भूतानच्या नागरिकांसाठी भारतात असे कोणतेही नियम नाहीत, ज्यामुळं त्यांना त्रास होईल. मात्र भूताननं भारतासाठी असे अनेक नियम तयार करून ठेवले आहेत. भूतानच्या शेकडो गाड्या रोज भारतात येतात. पण त्यांना काहीही शुल्क भरावे लागत नाही," पूरन सांगतात.

सीमेवरील हुंदके

भारत आणि भूतानच्या सीमेवरील चौकशी प्रचंड वाढलीय. विशेषतः भारतीयांसाठी भूतानला जाणं आता सोपं राहिलेलं नाही.

भूतानला जाण्यासाठी भारतीयांना व्हिसा लागत नसला तरी, मतदान ओळखपत्र किंवा पासपोर्ट दाखवणं अनिवार्य आहे.

याच दोन ओळखपत्रांच्या आधारे भारतीयांना भूतानला जाण्याचं परमिट दिलं जातं. हे परमिट म्हणजे एक प्रकारचा व्हिसाच असतो.

कुठे-कुठे जायचं आहे आणि किती दिवस राहणार याची संपूर्ण माहिती गेटवर द्यावी लागते.

एखादा भारतीय नागरिक 10 दिवसांसाठी भूतानमध्ये गेला तर त्याला 10 दिवसांसाठी भूतानचाच एक गाईड सोबत ठेवावा लागतो.

त्यासाठी गाईडला प्रत्येक दिवसाचे 1500 रुपये द्यावे लागतील. त्याशिवाय प्रत्येक व्यक्तिचे प्रत्येक दिवसाचे 1200 रुपये एसडीएफ द्यावे लागेल.

भूतान

पण भूतानचे लोक भारतात येतात तेव्हा त्यांच्यासाठी असा कोणताही नियम नाही. ते आरामात भारतात येऊ शकतात आणि हवे तेवढे दिवस भारताच्या कोणत्याही भागात राहू शकतात.

जयगावच्या सामान्य नागरिकांमध्ये भूतानच्या या नव्या नियमांविषयी प्रचंड नाराजीही दिसते.

भारतात भूतानचे राजदूत राहिलेले पवन वर्मा यांना भूताननं वैवाहिक दाम्पत्यांबाबत नरमाईची भूमिका घ्यायला नको का? असा प्रश्न आम्ही विचारला.

यावर पवन वर्मा म्हणाले, "भूतान आणि भारत यांच्यात काहीही समस्या असली तरी, त्यावर समाधान शोधणं सोपं आहे. दोन्ही देशांमध्ये विश्वासाचं नातं आहे. हा विश्वास आज निर्माण झालेला नाही, तर गेल्या 70 वर्षांमध्ये तो दृढ झालाय. पंडित जवाहरलाल नेहरू पायी चालत भूतानला गेले होते आणि त्यांनी भूतानला तो स्वतंत्र देश असल्याचं आश्वासन देत भारत कायम त्याचा सन्मान करेल, असं सांगितलं होतं."

भूतान

फोटो स्रोत, Getty Images

वर्मा यांच्या मते, भूतानच्या उत्तरेला 20 हजार फूट उंच हिमालय आहे. भूतान आणि भारताच्या दरम्यान येणं-जाणं सुरुच राहतं. भूतान नागरिकत्वाच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे. भूतान त्यांच्या अस्मितेबाबत सतर्क असणारा देश आहे. तुम्ही नेपाळ आणि सिक्कीमकडे उदाहरण म्हणून पाहू शकता.

दोन्ही ठिकाणी एवढे लोक आले की, त्यांची स्थानिक ओळख धूसर बनलीय. त्यातून सिक्किम आणि नेपाळच्या वैशिष्ट्यपूर्ण अस्मितेला धक्का पोहोचल्याचं भूताननं पाहिलंय. भूतानच्या नागरिकांचा जन्म त्यांच्यात भूमीत व्हावा आणि जे वारसा हक्कानं भूतानी आहेत, त्यांच्यात बदल होऊ नये, हा भूतानचा प्रयत्न आहे.

वैवाहिक जोडप्यांपैकी एकाला रोज भूतानला जाण्यासाठी एसडीएफ द्यावा लागणं हा मोठा मुद्दा असेल, तर चर्चेच्या माध्यमातून त्यावर तोडगा निघू शकतो. धोरणात्मक विचार करता भूतान भारतासाठी अत्यंत खास मित्र देश आहे. हा एक छोटा देश आहे.

भूतानचे काही नियम सरळ नाहीत हे शक्य आहे. पण मला वाटतं की, बहुतांश प्रमाणात आपल्या मदतीवर अवलंबून असलेल्या छोट्या शेजारी देशांकडून फार अपेक्षा ठेवण्याऐवजी आपण त्याबाबत लवचिकता ठेवायला हवी. प्रत्येक गोष्टीत तांत्रिक प्रतिक्रिया देता येणार नाही.

भूतान जे करतोय, तेच आपणही करावं असं आपण म्हणू शकत नाही. त्याची काही गरजही नाही. भूतानबरोबरचं आपलं नातं, प्रेमविवाहापेक्षाही बरंच पुढचं आहे. आपण केवळ या गोष्टींमध्ये अडकून राहू शकत नाही. भूतानबरोबर तयार झालेलं नातं हे दीर्घकाळानंतर तयार झालंय, असंही ते म्हणाले.

भूतान

असं म्हटलं जातं की, भूतान त्यांची संस्कृती, अस्मिता याबाबत अत्यंत जागरूक आहे.

भूतानला असं वाटतं की, भारताबरोबर सीमा खुल्या असाव्यात पण भारताची मोठी लोकसंख्या तिथं येता कामा नये. भूतानची लोकसंख्या फारतर आठ लाख एवढी आहे.

नेपाळचे लोक मोठ्या संख्येनं भूतानला येऊ लागले होते, त्यानंतर भूतानला यावर नियंत्रण आणावं लागलं होतं.

भूतानचा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं विचार केला तर, हा देश हिमाचल प्रदेशपेक्षाही लहान आहे. दक्षिण आशियामध्ये भारत सर्वात मोठा देश आहे.

भारत मोठा आहे तर लहान देशांबरोबर मोठेपणानं वागावंही लागेल, असं पवन वर्मा म्हणतात.

मोठा देश असल्यामुळं त्याचा कोणत्याही प्रकारे धोका निर्माण होता कामा नये, ही भारताचीच जबाबदारी असल्याचं ते म्हणतात.

दक्षिण आशियात भूतानमध्ये दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे. भूतान आर्थिक वृद्धी दरापेक्षा जीएचआय म्हणजे ग्रॉस हॅप्पिनेस इंडेक्सवर लक्ष देतो.

भूतान गोष्टी अधिक टिकाऊ बनवण्यासाठी स्वतःमध्ये फार बदल करत नाही, असं म्हटलं जातं.

भूतान

जयगाव पश्चिम बंगालच्या कालचिनी विधानसभा मतदारसंघात येतं. याठिकाणी भाजपचे विशाल लामा आमदार आहेत. हा विधानसभा मतदारसंघ अनुसुचित जमातींसाठी राखीव आहे.

लामा यांच्या मते, संपूर्ण विधानसभा मतदारसंघात 40 टक्के लोकसंख्या नेपाळी भाषकांची आहे. या परिसरात आल्यावर त्याचा अंदाजही येतो. सार्वजनिक ठिकाणी लोक एक तर नेपाळी बोलतात किंवा हिंदी बोलतात.

विशाल लामा यांना भूतानच्या नागरिकत्न आणि मॅरेज सर्टिफिकेटबाबत मतदारसंघातील नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल विचारलं असता, 'भूतान एक स्वतंत्र देश असून त्यांना नियम तयार करण्याचं स्वातंत्र्य आहे,' असं उत्तर त्यांनी दिली.

भूतानच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर ते स्पष्टपणे सांगतात की, त्यांच्या संविधानाचे जे नियम आहेत ती अधिकृत भूमिका आहे आणि त्यावर काहीही वेगळं वक्तव्य केलं जाणार नाही.

भूतानमध्ये मॅरेज सर्टिफिकेटसाठी काय-काय लागतं?

विदेशी व्यक्तीशी विवाह केल्यास भूतानच्या मुलाला किंवा मुलीला आई वडिलांची संमती म्हणजे एनओसी द्यावी लागते.

त्याशिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमी तर नाही यासाठी पोलिसांची एनओसी लागते.

त्यानंतर ब्लॉकमध्ये आणि नंतर कोर्टात जावं लागतं. भारतीय तरुणी असेल तर तिला भूतानबाबत काय माहिती आहे, हे मुलाखतीत तपासलं जातं.

तिला भूतानी भाषा येत असेल तर तिला अधिकचे गुण मिळतात. मुलाखतीत अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात. घरच्यांनी एनओसी दिली नाही तर, मॅरेज सर्टिफिकेटवर विचारही केला जात नाही.

भूतानच्या मॅरेज बिल, 2017 नुसार, भूतानच्या प्रत्येक नागरिक आणि रहिवाशाला धर्म, जात, लिंग, वर्ग, रंग-रूप याचा भेदभाव न करता कोणत्याही व्यक्तीशी विवाहाचा अधिकार आहे. पण मुलाची आणि मुलीची लग्नाला सहमती असावी आणि विवाह कायद्यातील सर्व तरतुदींचं त्यांनी पालन करायला हवं.

2015 मध्ये भूतानच्या सुप्रीम कोर्टानं एका निर्णयात म्हटलं होतं की, विदेशी व्यक्तींशी विवाह करणारे भूतानचे नागरिक मॅरेज सर्टिफिकेट मिळवू शकतात.

भूतानमध्ये मॅरेज सर्टिफिकेत देण्यासाठी सुप्रीम कोर्ट दरवर्षी मुलाखती आयोजित करत असतं.

या मुलाखतीत पास झाल्यानंतर ज्या जिल्ह्याच्या जनगणनेत तुमच्या पती किंवा पत्नीचं नाव असेल, त्याठिकाणच्या जिल्हा न्यायालयातून मॅरेज सर्टिफिकेट मिळवण्यासाठी तुम्ही पात्र ठरू शकता.

विदेशी नागरिकांसाठी मात्र भूतानचं नागरिकत्व मिळवणं सोपं नाही. तुम्हाला एखाद्या भूतानी व्यक्तीशी विवाह करण्याची इच्छा असेल तर आधी स्वतःला एक प्रश्न विचारा. तो म्हणजे, तुम्हाला भूतानमध्ये राहायचे आहे का?

तुम्ही भूतानी व्यक्तीशी विवाह केला तरी तुम्हाला आपोआप भूतानचं नागरिकत्व मिळत नाही.

तुम्हाला भूतानमध्ये स्थायिक व्हायचं असेल तर एक पर्याय आहे - नॅचरलायझेशनच्या माध्यमातून भूतानच्या नागरिकत्वासाठी अर्ज करून किंवा भूतानमध्ये राहण्यासाठी स्पेशल रेसिडेन्स परमिटसाठी अर्ज करून.

यापैकी पहिला पर्याय एवढा सोपा नाही. नॅचरलायझेशनद्वारे अर्जास पात्र होण्यासाठी तुम्हाला भूतानमध्ये राहावं लागेल आणि त्याठिकाणी तुमची स्वतःची जमीन हवी असेल. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये भूतानच्या राजांनी या नियमांमध्ये सूटही दिली आहे.

दुसरा पर्याय मात्र पहिल्याच्या तुलनेत काहीसा सोपा आहे.

भूतान आणि विदेशी पार्टनरवरील निर्बंध

विदेशी नागरिकांशी लग्न करणाऱ्या भूतानच्या नागरिकांना राजकीय पक्ष, लष्कर आणि काही सरकारी नोकऱ्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी नसते.

भूतानच्या कायद्यानुसार, जर भूतानच्या पुरुषानं एखाद्या विदेशी मुलीशी विवाह केला तर त्याच्या मुलाला भूतानचं नागरिकत्व मिळू शकतं. त्याचवेळी भूतानच्या मुलीनं एखाद्या विदेशी पुरुषाशी विवाह केला तर तिच्या मुलाला मात्र भूतान नागरिकत्व बहाल करत नाही.

त्यांच्या मुलांना नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्जाच्या एका दीर्घ प्रक्रियेचा सामना करावा लागतो.

भूतानमध्ये दुहेरी नागरिकत्वाची तरतूद नाही. तुम्हाला भूतानचं नागरिकत्व मिळालं तर तुमच्या मूळ देशाचा पासपोर्ट सोडावा लागतो.

भूतानचा विवाह कायदा खालील मुद्द्यांवरून समजून घ्या-

मुलगा आणि मुलगी यांना ओळखणाऱ्या दोन गॅरंटर्सना कोर्टासमोर हजर व्हावं लागतं. त्यापैकी एक गॅरंटर भूतानचा नागरिक असायला हवा.

भूतान

भूतानचे नसलेले पती किंवा पत्नी नागरिकत्व मिळवून भूतानमध्ये राहू शकतात.

एखादा भूतानी व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये असेल तर विदेशी व्यक्तीशी विवाह केल्यास लग्नाच्या वेळी असलेल्या पोस्टच्या पुढे त्याला पदोन्नती दिली जाणार नाही.

विदेशी व्यक्तीशी लग्न करणाऱ्या भूतानच्या नागरिकांना संरक्षण किंवा परराष्ट्र विभागात कामाची संधी मिळणार नाही.

विदेशी व्यक्तींशी विवाह करणाऱ्या भूतानी व्यक्तींना अनेक सरकारी योजनांच्या लाभांपासून वंचित केलं जाईल.

विदेशी पती किंवा पत्नीला भूतानच्या धर्माशिवाय दुसरा कोणताही नवा धर्म स्वीकार करण्यास किंवा त्याच्या प्रसाराची परवानगी नसेल.

विदेशी पती किंवा पत्नीला भूतानची संस्कृती स्वीकारावी लागेल आणि सरकारी आदेशांचं पालन करावं लागेल.

भारतातील तरतुदी

भूतानचे लोक भारतात एक ओळखपत्र दाखवूनही कुठेही येजा करू शकतात. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची बंदी नसते. भूतानचा मुलगा भारतातील कोणत्याही मुलीशी विवाह करून भारतातही राहू शकतो.

तसंच भूतानच्या मुलीनं कोणत्याही भारतीय मुलाशी विवाह केला तर त्या विवाहाच्या आधारे त्या मुलीला नागरिकत्वासह सर्व अधिकारही मिळतात. मतदार यादीत नाव आणि आधारकार्ड तर लगेचच तयार होते.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
फोटो कॅप्शन, बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)