लिव्ह इन रिलेशनशिप : 'प्रेमाला वय नसतं, मग लिव्ह इनसाठी का असावं?'

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वी लिव्ह इन रिलेशनशिपबद्दलच्या एका खटल्यात निर्णय देताना लिव्ह इन रिलेशनशिप नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह नसल्याचं म्हटलं.
दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानं मात्र दोन सज्ञान व्यक्तींना विवाहाशिवायही एकत्र राहण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं होतं.
आपल्याकडे आजही लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल मतमतांतरं आहेत, पण तरीही अनेक जोडपी सहजीवनासाठी हा पर्याय अवलंबंत आहेत. त्यामागे त्यांचे स्वतःचे काही विचार आहेत, दृष्टिकोन आहे.
वयाच्या सत्तरीत लग्न न करता केवळ सहजीवनासाठी दृष्टीने लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय आसावरी आणि अनिल यांनीही घेतला होता. पण हा निर्णय घेणे त्यांच्यासाठीही धाडसाचे होते. या निर्णयापर्यंत ते कसे आले, त्यांचा प्रवास कसा होता, हे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आम्ही जाणून घेतलं होतं.
"आम्ही गेल्या सहा वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो. लोक काय म्हणतील म्हणून आपण आपल्या घरात एकटे राहणार आहोत का? आपल्या मदतीला ऐनवेळी कोण येणार आहे? समाज हे करू शकणार नाही. पण लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय मात्र गांभीर्यानेच घ्यायला हवा," 69 वर्षांच्या आसावरी कुलकर्णी बीबीसी मराठीशी बोलताना सांगत होत्या.
पुण्यातील वसंत बाग परिसरात राहणारे अनिल यार्दी (69) आणि आसावरी कुलकर्णी (69) गेल्या सहा वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये म्हणजेच लग्न न करता सहजीवनात राहत आहेत.
आम्ही त्यांच्या घरी पोहचलो तेव्हा ते दोघंही मुलाखतीसाठी सज्ज होते. अनिल यार्दी यांनी आकाशी रंगाचा टी-शर्ट घातला होता, तर आसावरी कुलकर्णी यांनी गडद गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. अनिल यांनीही गडद रंगाचा एखादा टी-शर्ट घालावा असा आग्रह आसावरी यांनी केला. गडद रंग कॅमेऱ्यावर चांगला दिसेल असं त्या सांगत होत्या. अनिल हे लगेचच गडद निळ्या रंगाचा टी-शर्ट घालून बाहेर आले.
सत्तरीत प्रवेश करणारे दोन वृद्ध लिव्ह इन रिलेशनशिपबाबत काय बोलतात याची उत्सुकता आम्हालाही होती.
अनिल यार्दी म्हणाले, "लिव्ह इन रिलेशनशिपची पद्धतच अशी आहे की, ज्यामध्ये मित्र-मैत्रिणी एकत्र राहतात. प्रपोजल लग्नासाठी दिले जाते. लिव्ह रिलेशनशिपसाठी नाही. यात तुम्ही लिव्ह इनमध्ये एकत्र कायम राहू शकता का? हा प्रश्न असतो."
याला जोडूनच आसावारी म्हणाल्या, "एकदा आम्हाला खात्री वाटली की आता जमतंय. लोक आम्हाला काय म्हणतील त्याचा प्रश्न नाही. तेव्हा आम्ही ठरवलं एकत्र रहायचं."
लग्न न करता एकत्र एकाच घरात राहण्याचा निर्णय घेणारे आणि त्याबाबत आपली मतं सार्वजनिक जीवनात ठामपणे मांडणारे हे दोघं नेमके भेटले कसे? एकत्र राहण्याचा निर्णय त्यांनी कसा घेतला? ते एकमेकांच्या प्रेमात पडले का? असे अनेक प्रश्न मनात येत होते.

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR
साधारण सात वर्षांपूर्वी पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या माधव दामले यांच्या एका संस्थेच्या माध्यमातून सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीत आसावरी आणि अनिल या दोघांची भेट झाली.
एका प्रेमाची गोष्ट
"मी माझी गाडी घेऊन आलो होतो. माझ्या गाडीत आणखी तीन महिला होत्या. ही काय आमच्या गाडीत नव्हती. ही लेट कमरमध्ये होती. पण हीची एंट्री अशी होती की, पाहता क्षणी मला असे वाटले ही छान आहे. त्याठिकाणी काही गप्पा झाल्या आणि मग मैत्री सुरु झाली." असं अनिल यार्दी सांगतात.
सहलीनंतर पुढे दर दोन चार दिवसांनी हे दोघे एकमेकांना भेटायचे. अनिल यार्दी विद्युत अभियंता आहेत. ते नोकरी करतात. कामावरून घरी जाताना चहा घेण्यासाठी ते आसावरी यांच्या घरी जायचे. मग काही दिवसांनी चहासोबत नाष्टाही होऊ लागला. गप्पा रंगत गेल्या आणि विचार जुळत गेले.
आसावरी सांगतात, "हे असे दहा महिने सुरू होते. मग आमच्या लक्षात आले आपल्या आवडी निवडी जुळत आहेत. दोघांनाही फिरायला खूप आवडते. खाद्यपदार्थांची आवड आहे. एक दिवसाची सहल करायचे आम्हाला आवडते. दोघांनाही नॉनव्हेज आवडते. कधीतरी दोघंही ड्रिंक घेतो. या सगळ्या गोष्टी पाहता असं वाटलं आता एकत्र रहायला हरकत नाही. यादृष्टीनेच आमचा प्रवास सुरू आहे."

फोटो स्रोत, ANIL YARDI
वयाच्या सत्तरीत लग्न न करता केवळ सहजीवनासाठी दृष्टीने लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय आसावरी आणि अनिल यांनी घेतला. पण हा निर्णय घेणे त्यांच्यासाठीही धाडसाचे होते.
अनिल यार्दी सांगतात, "माझी पत्नी 2013 मध्ये गेली. यापूर्वी माझे आई-वडील, भाऊ आणि एका मुलाचे निधन झाले. मला एक मुलगी आहे. मी आता एकटाच राहतो. मला कुणीतरी सोबत हवंय. हा माझा निर्णय होता."
आसावरी कुलकर्णी एलआयसीमध्ये नोकरीला होत्या. 2012 मध्ये त्या निवृत्त झाल्या. 1997 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले.
"पतीच्या मृत्यूनंतर मी आणि माझा मुलगा आणि जावेचे कुटुंब शेजारीच राहत होतो. त्यामुळे मला कधी एकटेपणा वाटला नाही. पण मुलगा आणि जावेचे कुटुंब दुसऱ्या ठिकाणी रहायला गेल्यानंतर मला एकटं वाटू लागलं. तेव्हा पुण्यातील एका महाविद्यालयात 'ज्येष्ठांसाठीचे लिव्ह इन रिलेशनशिप' या विषयावर एक परिसंवाद होता. मी इथे गेले आणि मला हा पर्याय उर्वरित आयुष्य आनंदाने जगण्यासाठी योग्य वाटला."
"या लेक्चरमध्ये आम्हाला सर्व मार्गदर्शन देण्यात आले. तुम्ही या वयात कसे एकमेकांसोबत राहू शकता. त्यावेळी आमच्या दोघांचेही वय साधारण 62 होते. हे वय एकत्र राहण्याचा निर्णय घेण्यासाठी योग्य असल्याचं त्यांनी सांगितलं. सत्तरीनंतर आजारपण सुरू होतात. त्यानंतर असे सगळे जुळवून आणणे कठीण जाते," आसावरी सांगतात.
'समाजाला घाबरणं हा प्रकार आमच्यात नव्हता'
लग्न न करता लिव्ह इनमध्ये एकत्र राहण्याकडे आजही आपल्या समाजातील बहुतांश वर्ग सकारात्मक पद्धतीने पाहत नाही.

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR
याबाबत विचारल्यावर आसावरी म्हणाल्या, "माझं एक मन सांगत होते की समाज काय म्हणेल? पण दुसरं मन म्हणालं समाजाला घाबरून आपण आपल्याच घरात एकटं राहयचं का? आपल्याला काळजीने झोप येत नाही. चिंता वाटते. हे सगळं आपण कोणाला सांगणार आहोत? आपल्या मदतीसाठी कोण येणार आहे? आपण समाज समाज म्हणत आहोत पण समाज या सगळ्या गोष्टींची काळजी नाही घेऊ शकत."
मग तुम्ही लग्न का केले नाही? लिव्ह इनमध्ये राहण्याचा पर्याय का योग्य वाटतो? असे प्रश्न स्वाभाविकपणे आम्हीही त्यांना विचारले. त्या पटकन म्हणाल्या, "या वयात आम्हाला धोका पत्कारायचा नाही म्हणून सुरुवातीला लग्न न करता लिव्ह इनमध्ये राहत आहोत. उद्या गरज भासल्यास लग्नही करू. पण आपले आयुष्य आनंदाने जगायचा आपला स्वच्छ आणि स्पष्ट हेतू असेल तर समाजाला घाबरायचे काही कारण नाही. सगळं छान जमतंय तर लग्न करायला हरकत नाही. लग्न केले तर टेकन फॉर ग्रँटेड घेतले जाते. त्यामुळे लग्नाचे लेबल लावायची गरज भासली नाही."
"समाजाला भिणं हा प्रकार आमच्यात नव्हता." असं लगेचच पुढे अनिल यार्दी म्हणाले.
आमच्या सर्व मित्र-मैत्रिणींना आम्ही ही कल्पना दिली आहे. ते आमच्याकडे येतात. आम्ही त्यांच्याकडे एकत्र जातो. समाजाकडूनही आम्हाला काही वाईट अनुभव आतापर्यंत आलेला नाही असंही अनिल यांनी स्पष्ट केले.

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR/BBC
सात वर्ष लग्न न करता एकत्र राहणं. तेही या वयात. दोघांचाही लग्नाचा भूतकाळातील अनुभव, आठवणी याशिवाय मुलं असताना. तेव्हा या नात्यातील गाठ कशाच्या आधारावर घट्ट आहे?
"आमच्यातील विश्वास. एवढ्या वर्षांत एकमेकांच्या विश्वासाला तडा जाईल असं काही आमच्याकडून घडलेलं नाही." असं आसावरी म्हणाल्या. तर अनिल यार्दी यांनी मला कानात सांगितले, "आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे."
कौटुंबिक विरोध
मुलाखत सुरू असताना आसावरी आणि अनिल यांच्या चेहऱ्यावर सतत हास्य होते. मुलाखतीपेक्षा एकमेकांशी गप्पा मारत हा संवाद सुरू होता. या ज्येष्ठ नागरिकांच्या प्रेमाची गोष्ट ऐकत असताना त्यात प्रेम, विश्वास, आनंद, समाज भावना अशा अनेक पैलूंवर चर्चा झाली. पण विरोध हा विषय मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आला.
"सुरुवातीला दोघांनाही कौटुंबिक विरोधाचा सामना करावा लागला." अशीही प्रतिक्रिया दोघांकडून आली.

फोटो स्रोत, आसावरी कुलकर्णी आणि अनिल यार्दी
अनिल यार्दी सांगतात, "सुरुवातीला माझ्या मुलीचा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आम्ही दोघंही राहण्याला टोकाचा विरोध होता. आसावरी यांची भेट घालून देण्यासाठी आम्ही तिच्याकडे गेलो होतो. पण ती तयार नव्हती."
"आपल्या मुलांच्या समंतीसाठी किती काळ थांबायचे असाही विचार आमच्या मनात आला. पण आम्ही त्यांना समजावले. आम्ही दुसरे लग्न करत नाही असंही सांगितले. आम्ही एकमेकांसाठी एकमेकांच्या सोबत राहत आहोत असं सांगून समजूत काढली,"
सात वर्षांपासून आमचे नाते पाहून आता मुलंही आनंदी असतात. त्यांनाही आता आमच्या नात्यावर विश्वास आहे. "आम्ही एकमेकांच्या मुलांच्या वाढदिवसाला सगळे एकत्र येतो. नातेवाईकांच्याही घरी एकत्र जातो. आम्हाला सन्मानेही वागवले जाते. त्यामुळे आता सगळं छान सुरू आहे. हे क्षण आनंदाचे आहेत." आसावरी भरभरून सांगत होत्या.
'लिव्ह इन या नात्याला कोणीही हलक्यात घेऊ नये'
विविध संस्थांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण "लिव्ह इन रिलेशनशिप ही अतिशय योग्य आणि आदर्श पद्धत आहे." असे आसावरी यांना वाटते.

फोटो स्रोत, Anil yardi
पण हा निर्णय विचारपूर्वक आणि गांभीर्याने घ्यावा असंही दोघं सांगतात.
दोन व्यक्ती एकत्र राहत असताना त्यांच्यातील एक महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे आर्थिक व्यवहार.
आसावरी सांगतात,"आर्थिक व्यवहारांच्याबाबतीत आम्ही खूप स्पष्ट आहोत. महिन्याचा एकूण खर्च आम्ही निम्मा वाटून घेतो. कपडे आणि दागिने यांसारखी खरेदी वैयक्तिक खर्चाने करतो. त्यामुळे पैसे याविषयावरून कधीच भांडण झाले नाही. एखाद्या जोडप्यात पुरुष कमवता असेल आणि महिला कमवणारी नसेल तर त्यांनी एकत्र राहण्यापूर्वी यासर्व बाबी स्पष्ट करून घेणं गरजेचे आहे. मुलांची समंती आहेत का हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे."
"लिव्ह इन या नात्याला कोणीही हलक्यात घेऊ नये," असं अनिल यार्दी सांगतात.
"हे नातं टिकवता आलं पाहिजे. आज पटतंय म्हणून एकत्र आहोत. उद्या सोडून गेलो असं होता कामा नये. मग समाज प्रश्न उपस्थित करतो. तुम्ही जर मरेपर्यंत एकत्र राहिला तर कोणीही वाईट म्हणणार नाही."
कोणत्याही नात्यासाठीचा प्रेम हा कानमंत्र असला तरी त्यासोबत त्याग आणि तडजोड करण्याची तयारी हवी असा सल्ला आसावरी आणि अनिल देतात.

हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








