बलात्काऱ्याने रचला स्वतःच्या मृत्यूचा बनाव, पीडितेच्या आईने त्याला असं काढलं शोधून

महिला

फोटो स्रोत, Swastik Pal

    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी न्यूज प्रतिनिधी

गेल्या वर्षीची गोष्ट, एका आईला सांगितलं गेलं की तिच्या मुलीचा बलात्कारी आता मेलाय आणि त्याच्या विरोधातली केस बंद केली गेलीये. या महिलेने हा दावा मानला नाही, आणि सत्याचा शोध घेत राहिली.. तोपर्यंत जोवर तिला आणि तिच्या मुलीला न्याय मिळाला नाही. त्याचाच हा सविस्तर वृत्तांत.

कदाचित मागच्या वर्षीचा फेब्रुवारी महिना असावा. प्रसन्न सकाळ होती.

दोन माणसं आली, त्यांनी गंगेच्या काठावर चिता रचली. पण विचित्र गोष्ट अशी की सरण रचणाऱ्या या दोघांनीही खांद्यावर कोणतीच तिरडी आणली नव्हती, ना आणखी माणसं येत होती ना कोणता मृतदेह नजरेच्या टप्प्यात होता.

घडमोडी अजूनच विचित्र घडत होत्या.

या दोन माणसापैकी एक जण त्या चितेवर झोपला. पांढरी चादर अंगावर ओढून घेतली आणि डोळे मिटले. दुसऱ्याने त्या झोपलेल्या माणसाच्या अंगावर आणखी लाकडं रचली. आता फक्त त्या माणसाचं डोकं लाकडांच्या बाहेर दिसत होतं.

मग या प्रकाराचे दोन फोटो काढण्यात आले. आता हे फोटो कोणी काढले याची माहिती उपलब्ध नाही. चिता रचली त्या माणसाने काढले की आणखी तिसरा माणूस तिथे होता हे स्पष्ट नाही.

सरणावर झोपलेला माणूस होता 39 वर्षांचा नीरज मोदी, एक सरकारी शाळा शिक्षक आणि त्यांच्या अंगावर लाकड रचणारा माणूस होता राजाराम मोदी, एक साठीतला शेतकरी.

राजाराम मोदी मग आपल्या वकिलाला घेऊन 100 किलोमीटर लांब गेले आणि शपथपत्रावर लिहून दिलं की त्यांचा मुलगा नीरज मोदीचा 27 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला आहे. पुरावा म्हणून त्यांनी चितेचे दोन फोटो आणि लाकडं विकत घेतल्याची पावती सादर केली.

ही घटना घडली त्याच्या सहा दिवस आधीच पोलिसांनी नीरज मोदीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. नीरजने 12 वर्षाच्या एका मुलीचा ऑक्टोबर 2018 ला बलात्कार केल्याचा आरोप होता.

ती मुलगी उसाच्या शेतात एकटी असताना तिच्यावर हल्ला झाला आणि तिचा व्हीडिओही काढला गेला. हल्ला करणाऱ्याने धमकी दिली होती की या प्रकरणाची वाच्यता केली तर व्हीडिओ ऑनलाईन टाकेन.

तक्रार दाखल झाल्यानंतर नीरज मोदीला अटक झाली. मुलीच्या आईने तक्रार दाखल केली होती. दोन महिने तुरुंगात घालवल्यानंतर त्याला जामीन मिळाला.

नीरजचा 'मृत्यू' झाल्यानंतर गोष्टी तातडीने घडल्या. त्याच्या मृत्यूनंतर 2 महिन्यांनी प्रशासनाने त्यांच्या मृत्यूचा दाखला दिला. मे 2021 मध्ये कोर्टातली केस 'एकमेव आरोपीचा मृत्यू झाल्याने' बंद झाली.

फक्त एक व्यक्तीला हे सगळं खोटं वाटत होतं. फक्त एका व्यक्तीला नीरजचा मृत्यू झालाय हे मान्य नव्हतं. ती व्यक्ती होती पीडितेची आई - झोपडीत राहाणारी एक कृश महिला.

मोदी

फोटो स्रोत, Swastik Pal

फोटो कॅप्शन, नीरज मोदी 'मृत' झाला हे दाखवण्यासाठी ज्या फोटोचा वापर केला गेला तो फोटो

पीडिता आणि तिची आई मोदीच्याच गावात राहात होत्या.

"ज्या क्षणी मला कळलं की नीरज मोदी मेलाय, मला लक्षात आलं की ते खोटं बोलत आहेत. मला माहीत होतं तो जिवंत आहे," पीडितेची आई मला सांगत होत्या.

भारतात होणाऱ्या दर दहापैकी सात मृत्यू देशातल्या सात लाखांहून जास्त असणाऱ्या खेड्यांमध्ये होतात. खेड्यात होणाऱ्या मृत्यूंमध्ये घरात होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण सर्वाधिक आहे. जन्म-मृत्यू नोंदणी कायद्याप्रमाणे जन्म आणि मृत्यूची नोंद करणं बंधनकारक असलं तरी मृत्यूचं कारण लिहिणं बंधनकारक नाही.

राजाराम मोदी

फोटो स्रोत, Swastik Pal

फोटो कॅप्शन, नीरज मोदीच्या 'सरणा'जवळ उभे असलेले राजाराम मोदी

बिहारमधल्या एका खेड्यात कोणाचा मृत्यू झाला तर मृत व्यक्तीच्या नातेवाईंकाना त्यांचा आधार नंबर सबमिट करावा लागतो, तसंच गावातल्या 5 जणांची सही घ्यावी लागते, जे त्या व्यक्तीचा खरंच मृत्यू झाला आहे याची साक्ष देतील.

मग हा अर्ज स्थानिक ग्रामपंचायतीकडे जातो. तिथलं प्रशासन या अर्जाची छाननी करतं आणि सगळं व्यवस्थित असलं तर एका आठवड्यात मृत्यूचा दाखला मिळतो.

"आमची खेडी खूप छोटी असतात. सगळे जण एकमेकांना ओळखत असतात. त्यामुळे कोणाचा मृत्यू झाला आणि गावात कळलं नाही असं होतं नाही," पीडितेचे वकील करण गुप्ता सांगतात.

राजाराम मोदी यांनी गावातल्या पाच जणांच्या सह्या मृत्यूचा दाखला घेण्याच्या अर्जावर घेतल्या होत्या. मुलाचा मृत्यूचा दाखला मिळाला पण त्यावर मृत्यूचं कारण दिलं नव्हतं. सरणासाठी जिथून लाकूड विकत घेतलं त्या दुकानाच्या पावतीवर 'आजारीपणामुळे मृत्यू' असं लिहिलं होतं.

2022च्या मे महिन्यात पीडितेच्या आईला या मृत्यूबद्दल कळलं. केस बंद झालीये हेही कळलं.

"पण त्याचा मृत्यू झाला हे गावात कोणालाच कसं कळलं नाही, त्याचे कुठले विधी झाले नाहीत, त्याबद्दल कोणी बोलतही नव्हतं," त्या म्हणतात.

चित्र

फोटो स्रोत, Swastik Pal

फोटो कॅप्शन, अत्याचाराच्या घटनेनंतर पीडितेचं शाळेत जाणं बंद झालंय.

त्या घरोघरी जाऊन याबद्दल चौकशी करायला लागल्या. कोणालाच नीरज मोदीच्या मृत्यूबद्दल काहीही माहिती नव्हती. पीडितेची आई कोर्टात गेली आणि म्हणाली की या प्रकरणाची चौकशी करा. पण कोर्टाने नीरज मोदी जिवंत असल्याचा पुरावा सादर करायला सांगितलं.

मग पीडितेच्या आईने उच्च प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे आपली कैफियत मांडली. त्या म्हणाल्या की ग्रामपंचायतीने खोट्या कागदपत्रांच्या आधारे मृत्यूचा दाखला दिला आहे आणि याची चौकशी करण्यात यावी.

सरकारी पातळीवर हालचाली व्हायला लागल्या.

मृत्यू प्रमाणपत्र

फोटो स्रोत, Swastik Pal

फोटो कॅप्शन, नीरज मोदीचा रद्द झालेला मृत्यूचा दाखला.

प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आणि ग्रामपंचायतीला याबद्दल कळवलं. ग्रामपंचायतीच्या लोकांनी राजाराम मोदीकडे मुलाच्या मृत्यूचे पुरावे मागितले. त्यांनी म्हटलं की जळत्या चितेचे फोटो द्या आणि वेगळ्या पाच साक्षीदारांच्या साक्षी सबमिट करा.

ग्रामपंचायतीच्या लोकांनी गावातल्या लोकांच्याही भेटी घेतल्या. या गावात एकूण 250 घरं आहेत, पण कोणालाही नीरज मोदीच्या मृत्यूबद्दल कल्पना नव्हती. नीरजच्या मृत्यूनंतर घरातल्या कोणत्या पुरुषाने टक्कलही केलं नव्हतं.

"नीरज मोदीच्या नातेवाईकांनाही त्याच्या मृत्यूबद्दल किंवा तो कुठे आहे याबद्दल काहीही माहिती नव्हती. ते म्हणत होते की जर घरात कोणाचा मृत्यू झाला असता तर दहावं-तेरावं झालं असतं पण तसं काहीच झालं नाही," या प्रकरणाचे तपास अधिकारी रोहितकुमार पासवान म्हणतात.

नीरज मोदी

फोटो स्रोत, The News Post

फोटो कॅप्शन, नीरज मोदीला बलात्काराच्या गुन्ह्यासाठी 14 वर्षांची शिक्षा झाली.

ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा राजाराम मोदींची चौकशी केली. पण त्यांना आपल्या मुलाच्या मृत्यूचा काही नवा पुरावा देता आला नाही. "त्यांनी समाधानकारक उत्तरं दिली नाहीत," ग्रामसचिव धर्मेंद्र कुमार म्हणतात.

तपासाअंती कळलं की नीरज मोदीने आपल्या मृत्यूचा देखावा उभा केला होता आणि दोघा बापलेकानी खोटी कागदपत्रं दिली.

मृत्यूच्या दाखल्याच्या अर्जावर पाच साक्षीदारांचे आधार क्रमांकही द्यावे लागतात. नीरजने आपल्या पाच विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक देऊन त्यांच्या खोट्या सह्या केल्या. त्या या विद्यार्थ्यांना सांगितलं की तुमच्या स्कॉलरशिपसाठी हे आधार क्रमांक हवेत.

23 मे 2022 ला अधिकाऱ्यांनी नीरज मोदीचा मृत्यूचा दाखला रद्द केला. पोलिसांनी नीरज मोदीच्या वडिलांनाही अटक केली आणि त्यांच्यावर खोटी कागदपत्रं बनवण्याचा गुन्हा दाखल केला.

पीडिता आणि तिची आई बिहारमधल्या एका दुर्गम गावात राहतात

फोटो स्रोत, Swastik Pal

फोटो कॅप्शन, पीडिता आणि तिची आई बिहारमधल्या एका दुर्गम गावात राहतात.

पासवान म्हणतात, "मी माझ्या संपूर्ण करिअरमध्ये अशी केस पाहिली नव्हती. वरकरणी हा परफेक्ट गुन्हा वाटत होता, पण तसं नव्हतं."

जुलै महिन्यात कोर्टाने केस पुन्हा उघडली. पीडितेच्या आईने कोर्टात मागणी केली की आरोपीला अटक व्हावी.

ऑक्टेबर 2020 मध्ये नीरज मोदीने कोर्टात स्वतःला हजर केलं. तोपर्यंत त्याच्या 'मृत्यूच्या' दाव्याला नऊ महिने उलटून गेले होते.

या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान त्याने दावा केला की त्याच्यावर खोटे आरोप केले आहेत. यावेळी कोर्टातून बाहेर पडताना त्याच्या हातात बेड्या होत्या.

जानेवारी 2023 मध्ये कोर्टाने नीरज मोदीला बलात्कारप्रकरणी दोषी ठरवत 14 वर्षांची शिक्षा दिली. पीडितेला 3 लाख रूपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. राजाराम मोदीवरही आता खटला चालू आहे. त्यांना 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

जे. गुप्ता

फोटो स्रोत, Swastik Pal

"मी तीन वर्षं कोर्टाचे जायचे, एकाच आशेने की ज्याने माझ्या मुलीवर अत्याचार केले त्याला शिक्षा व्हावी. आणि एका दिवशी त्याच्या वकिलाने मला सांगितलं की तो मेलाय. हे कसं शक्य होतं? एक माणूस असा हवेत गायब कसा होईल?" पीडितेची आई म्हणते.

"मला वकिलांनी सांगितलं की आता जर नीरज मोदी जिवंत आहे हे कोर्टात सिद्ध करायचं असेल तर नव्याने दुसरी केस दाखल करावी लागेल आणि त्यासाठी बराच खर्च होईल. काही जणांनी सांगितलं की आरोपी तुरूंगातून सुटून बाहेर येईल. त्याला काही शिक्षा होणार नाही आणि मग तो सूड घेईल."

"मी म्हटलं मला पर्वा नाही. मी पैशांची व्यवस्था करेन. मला कोणाची भीती नाही. मी न्यायाधीश आणि पोलिसांना एकच विनंती केली - सत्य शोधून काढा."

आम्ही या महिलेला भेटायला बिहारमधल्या तिच्या गावी गेलो. तिचं गाव म्हणजे सांदीकोपऱ्यातलं एक लहानसं खेडं.

पीडितेची आई तिच्या मुलांसह एका लहानशा खोलीत राहाते. घरावर छप्पर म्हणून पत्रे टाकलेत. या महिलेला चार मुलं आहेत. दोन मुलगे शाळेत जातात, एक पीडित मुलगी आणि सगळ्यात मोठ्या मुलीचं लग्न झालंय.

त्या एवढ्याशा खोपटाच काहीच सामान नव्हतं. जी काही थोडी संपत्ती होती ती अस्ताव्यस्त पसरली होती - एक दोरी, एक खाट, धान्य साठवायला स्टीलची कोठी. जमिनीवर मातीची चूल मांडलेली आणि एक जीर्ण दोरी ज्यावर कपडे टांगलेत.

आई आणि मुलगी

फोटो स्रोत, Swastik pal

या कुटुंबाकडे शेती नाही. खेड्यात नळाचं पाणी आणि वीज आलीये पण हाताला काम नाही. त्यामुळे पीडितेचे वडील कामधंद्याच्या शोधात 1700 किलोमीटर लांब दक्षिणेकडच्या राज्यात गेलेत. ते तिथे हमाल म्हणून काम करतात आणि काही पैसे घरी पाठवतात.

2019 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की देशातली 100 टक्के खेडी आता उघड्यावर शौचाला जाण्यापासून मुक्त झालीत. घराघरात शौचालयं झालीत पण तरीही अनेक घरांमध्ये शौचालयं नाहीयेत. पीडिता आणि तिच्या आईचं घरही त्यातलंच एक.

म्हणूनच पीडिता शौचासाठी जवळच्या उसाच्या शेतात गेली होती. तिथेच नीरज मोदी मागून आला, तिचं तोडं दाबलं आणि तिच्यावर बलात्कार केला असा उल्लेख निकालपत्रात आहे.

नीरज मोदीने तिला या प्रकरणाची वाच्यता न करण्याचीही धमकी दिली. त्याने अत्याचाराचा व्हीडिओ रेकॉर्ड केला आणि कोणाला सांगितलं तर जो व्हीडिओ जाहीर करीन अशी धमकी दिली.

बलात्कारानंतर 10 दिवसांनी पीडितेने तिच्या आईला काय घडलं ते सांगितलं. त्यानंतर तिची आई पोलिसात तक्रार करायला गेली.

"नीरज मोदी मला शाळेतही मारहाण करायचा," पीडितेने पोलिसांना सांगितलं.

नीरज मोदीला अटक झाल्यानंतर पीडिता काही दिवस शाळेत जात होती, पण तो जामिनावर सुटल्यानंतर तिने पुन्हा शाळेत जाणं बंद केलं. ती गेल्या चार वर्षांपासून शाळेत गेलेली नाही. तिच्या शाळेची पुस्तकं रद्दीवाल्याला विकून टाकलीत.

घडलेल्या घटनेचा पीडितेच्या मनावर खूप परिणाम झाला आहे. ती नेहमी घाबरलेली असते आणि आपला बराचसा वेळा अंधाऱ्या खोलीत घालवते.

"तिचं शिक्षण संपल्यात जमा आहे. तिला बाहेर कुठे जाऊ द्यायची मला फार भिती वाटते. मला आशा आहे की आम्ही तिचं लग्न लावून देऊ शकू," तिची आई सांगते

तरीही काही प्रश्न अनुत्तरितच राहातात. प्रकरणाची पूर्ण चौकशी केल्याशिवाय ग्रामपंचायतीने मृत्यूचा दाखला दिलाच कसा? "मी त्यांना हाच प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की त्यांच्याकडून चूक झाली," पीडितेची आई म्हणते.

प्रभात झा टोरांटो विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्यांनी अकाली मृत्यूसंबंधी मोठा अभ्यास केला आहे. ते म्हणतात, "नीरज मोदीसारखी केस दुर्मिळ आहे. आमच्या अभ्यासात आम्हाला अशी एकही केस आढळली नाही."

त्यांनी भारतात 'मिलियन डेथ स्टडी' या नावाने लाखो लोकांच्या मृत्यूचा आणि त्यामागे असणाऱ्या परिस्थितीचा अभ्यास केला आहे.

"अशा प्रकारे खोटा मृत्यूचा दाखला बनवून घेणं आणि त्याचा चुकीचा वापर करणं दुर्मिळ आहे. त्यामुळे आपण लगेचच मृत्यूचा दाखला बनवण्याची प्रक्रिया अवघड करायला नको. कारण त्यामुळे आणखी अडचणी येतील," ते म्हणतात.

कारण : भारतात पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांच्या मृत्यूची नोंद कमी होते, तसंच श्रीमंतांच्या तुलनेत गरिबांच्या मृत्यूची नोंद कमी होते. त्यामुळे मृत्यूचा दाखला मिळाल्यानंतर संपत्ती हस्तांतरण किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ मिळणं गरिबांसाठी आणखी अवघड होऊ शकतं.

बिहारमध्ये मात्र पीडितेची आई दुहेरी आयुष्य जगतेय. एका क्षणी ती लढाऊ आणि धीरोदत्त आई आहे तर दुसऱ्या क्षणी ती भेदरलेली आई आहे.

"माझ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्याला शिक्षा झाली याचा मला आनंद आहे. पण माझ्या मुलीचं आयुष्य तर बरबाद झालंय, तिचं पुढे काय होईल?" ती म्हणते.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
फोटो कॅप्शन, बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)