भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे.

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो अर्थात PIB ने यासंदर्भातील एका प्रसिद्धीपत्रकामार्फत याची माहिती माध्यमांना दिली.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह लडाख केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल राधाकृष्णन माथुर यांचाही राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केल्याचं पत्रकात म्हटलं आहे.

कोश्यारी यांच्या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आता रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैस हे सध्या झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. आता झारखंडऐवजी ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम पाहतील.

राष्ट्रपतींकडून विविध राज्यपालांच्या नियुक्त्या

राष्ट्रपतींनी सी.पी. राधा कृष्णन यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. लडाखचे राज्यपाल राधा कृष्ण माथूर यांनी राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामाही राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे.

त्यांच्या जागी अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडियर डॉ. बीडी मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी सरकारमध्ये वित्त राज्यमंत्री म्हणून कार्यभार पाहिलेले शिव प्रताप शुक्ला आता हिमाचल प्रदेशचे राज्यपाल असणार आहेत.

राजेंद्र आर्लेकर हे बिहारचे राज्यपाल म्हणून काम पाहतील. ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. आंध्र प्रदेशचे राज्यपाल विश्व भूषण हरिचंद्रन आता छत्तीसगढचे राज्यपाल असतील.

छत्तीसगढचे राज्यपाल अनुसइया उइकिया या आता मणिपूरच्या राज्यपाल असतील. फागू चौहान यांच्याकडे आता बिहारऐवजी मेघालयच्या राज्यपालपदाची जबाबदारी असेल.

माजी न्यायाधीश अब्दुल एस नजीर गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले होते. नोटबंदीचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा त्यांच्या निर्णयाने दिला होता. अयोध्येसंदर्भात निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांमध्ये त्यांचा समावेश होता. ते आता आंध्र प्रदेशचे राज्यपाल असतील.

गुलाबचंद कटारिया आसामचे तर शिवप्रताप शुक्ल हिमाचल प्रदेशचे राज्यपाल असणार आहेत.

लक्ष्मण प्रसाद आचार्य सिक्कीमचे तर लेफ्टनंट जनरल (निवृत्त) केटी परनाईक आता अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल असणार आहेत.

पदमुक्त करण्याची पंतप्रधानांकडे विनंती

राज्यातील सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यावर आलेला असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त करण्याची इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केली होती.

राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालवण्याचा मानस पंतप्रधानांना कळवल्याचं राज्यपालांनी म्हटलं आहे.

या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली.

नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिली.

"महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील," असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं होतं.

कोण आहेत रमेश बैस?

रमेश बैस झारखंडचे 2021 पासून राज्यपाल आहेत. 2019 ते 2021 या कालावधीत ते त्रिपुराचे राज्यपाल होते.

1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते पर्यावरण आणि वनखात्याचे मंत्री होते.

1989 आणि 1996-2019 या कार्यकाळात ते रायपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

बैस यांचा जन्म रायपूरचा. भारतीय जनता पक्षाचे नेते असलेल्या बैस यांचं शालेय शिक्षण भोपाळ इथे झालं.

1978 मध्ये ते रायपूरच्या नगरपालिकेत निवडून आले. 1980 मध्ये झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत बैस यांनी काँग्रेसच्या सत्यनारायण शर्मा यांचा पराभव करत बाजी मारली.

1989 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. रायपूर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यानंतर सलग 6 वेळा याच मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून येत गेले.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये पोलाद, खाणी, खते, माहिती आणि प्रसारण खात्याचीही धुरा सांभाळली.

भगतसिंह कोश्यारी कोण आहेत?

उत्तराखंडच्या बगेश्वर जिल्ह्यात भगत सिंह कोश्यारी यांचा 17 जून 1942 रोजी जन्म झाला. उत्तराखंड हे स्वतंत्र राज्य होण्याआधी उत्तर प्रदेशचा भाग होता. त्यामुळं कोशियारींचं बालपण, शिक्षण आणि सार्वजनिक आयुष्याचा प्रारंभही उत्तर प्रदेशातच झाली. अलमोडा कॉलेजमधून त्यांनी इंग्रजी विषयात एमएचं शिक्षण घेतलं. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना राजकारणाची आवड होती. 1961-62 या काळात ते अलमोडा कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेत कार्यरत होते.

पेशानं शिक्षक आणि पत्रकार असलेल्या कोश्यारींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून सामाजिक कामास सुरुवात केली. त्यानंतर ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात आले.

उत्तराखंडचे दुसरे मुख्यमंत्री

कोश्यारी हे लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय राहिले आहेत. त्यांच्या सामाजिक जीवनाची सुरूवात संघातूनच झाली.

इंग्रजी विषयात एमएची पदवी मिळवलेल्या कोश्यारींनी शिक्षक म्हणूनही काम केलं. ते उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील राजा इंटर कॉलेजमध्ये काही वर्षे व्याख्याते (लेक्चरर) होते.

कोश्यारींनी पत्रकारितेतही योगदान दिलंय. 1975 पासून प्रकाशित होणाऱ्या 'पर्वत पियुष' या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक होते. विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी लेखही लिहिले आहेत.

समाजकारण, राजकारण यांसह साहित्य हाही कोश्यारींच्या आवडीचा प्रांत आहे. 'उत्तरांचल प्रदेश क्यों?' आणि 'उत्तरांचल संघर्ष एवंम समाधान' ही पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

आणीबाणीविरोधात कोश्यारी यांनी आवाज उठवला होता. परिणामी त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला होता. 3 जुलै 1975 ते 23 मार्च 1977 असे तीन वर्षे ते तुरुंगात होते.

उत्तराखंडमधील शिक्षण क्षेत्रात कोश्यारींनी काम केलंय. पिठोरागड येथील 'सरस्वती शिशू मंदिर', 'विवेकानंद विद्या मंदिर इंटर कॉलेज' आणि 'नैनिताल येथील सरस्वती विहार उच्च माध्यमिक शाळा' या संस्थांचीही स्थापना भगत सिंह कोशियारींनी केली.

अविवाहित असलेल्या भगत सिंह कोश्यारींनी अवघं आयुष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या कामासाठी घालवलं आहे.

कोश्यारींनी ट्रेकिंग करायला आवडतं. तत्त्वज्ञान, इतिहास आणि शिक्षण या विषयांची पुस्तकं त्यांना वाचायला आवडतात.

उत्तर प्रदेशपासून 2000 साली वेगळं झालेल्या उत्तराखंड राज्यात भाजपची धुरा कोश्यारींच्या हाती देण्यात आली. ते उत्तराखंडचे पहिले भाजप प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर उत्तराखंड राज्याचे दुसरे मुख्यमंत्री होण्याच मानही त्यांना मिळाला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)