You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IND vs AUS : रवींद्र जडेजाला दंड, ऑस्ट्रेलियन माध्यमांनी व्यक्त केलेला बॉल टेम्परिंगचा संशय
नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि 132 धावांनी पराभूत केलं आहे.
दुसऱ्या डावात भारताने ऑस्ट्रेलियाला 91 धावांवर ऑलआउट केलं होतं. पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियावर 223 धावांनी आघाडी घेतली होती. इतकी मोठी आघाडी कमी करण्यात ऑस्ट्रेलियाला अपयश आलं.
गुरुवारी (9 फेब्रुवारी) सुरू झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.
पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा पूर्ण संघ 177 धावांवर बाद झाला.
पहिल्या डावात चमकला जडेजा
ऑस्ट्रेलियाचा डाव 177 धावांमध्ये गुंडाळण्याचं श्रेय हे रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन यांना जातं. पहिल्या डावात जडेजा आणि अश्विन यांनी कोणत्याही ऑस्ट्रेलियन फलंदाजाला क्रीझवर टिकूच दिलं नाही.
रवींद्र जडेजाने 47 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या, तर अश्विनने 42 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी आणि मोहम्मद शिराजसारख्या वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात मार्नस लाबूशानने 49 धावा केल्या आणि स्टीव्हन स्मिथने 37 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त पीटर हँड्सकॉम्बने 31 धावा केल्या, तर अलेक्स करीने 36 धावा केल्या. या चौघांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा कोणताही फलंदाज दहाचा आकडाही गाठू शकला नाही.
दुसरीकडे भारतीय फलंदांनी पहिल्याच डावात 400 धावांचा डोंगर रचला. त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियावर 223 धावांनी विजय मिळवता आला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 120 धावांची शतकी खेळी केली.
अक्षर पटेलने 84 धावा केल्या, तर रवींद्र जडेजाने 70 धावांची खेळी केली.
दुसऱ्या डावात अश्विनची कमाल
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने जेव्हा आपला दुसरा डाव सुरू केला, तेव्हा ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर अश्विन कर्दनकाळ बनून उभा राहिला.
अश्विनने 12 ओव्हरमध्ये 37 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. दुसरीकडे रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमीनेही 2-2 विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलने एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक रन स्टीव्हन स्मिथने केल्या. त्याने नाबाद 25 धावा केल्या. त्याखालोखाल मार्नस लाबूशानने सर्वांत अधिक 17 धावा केल्या.
रवींद्र जडेजाला दंड, चेंडू कुरतडल्याचा संशय
दरम्यान भारताच्या विजयाला वादाचंही गालबोट लागलं आहे. बॉर्डर-गावस्कर सीरिजच्या पहिल्याच सामन्यात शानदार कामगिरी बजावणाऱ्या रवींद्र जडेजाला दंड करण्यात आला आहे. मॅचच्या मानधानातून मिळणाऱ्या रकमेपैकी 25 टक्के रक्कम ही दंडाच्या स्वरुपात घेतली जाईल. त्याच्यावर आयसीसीच्या आचार संहितेतील लेव्हल 1 च्या उल्लंघनाचा आरोप करण्यात आला आहे.
मॅचच्या पहिल्याच दिवशी, गुरुवारी (9 फेब्रुवारी) जडेजाने अंपायरला न विचारता आपल्या तर्जनीवर क्रीम लावली होती. त्यानंतर त्याच्यावर बॉल टॅपरिंगचा आरोप केला जातोय.
रवींद्र जडेलाला आयसीसीच्या आचार संहितेच्या अनुच्छेद 2.20 चं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलं आहे. खिलाडूवृत्तीला धरुन कृती न केल्याप्रकरणी त्याला दंड करण्यात आला आहे.
नियमांच्या उल्लंघनाच्या आरोपात त्याच्या शिस्तीच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पाँइट घालण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांत हे त्यानं केलेलं नियमांचं पहिलं उल्लंघन आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात हे घडलं. 46 व्या ओव्हरमध्ये जडेजाने गोलंदाजी करण्याआधी मोहम्मद सिराजच्या हातातून क्रीम घेऊन आपल्या तर्जनीवर लावली होती. सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चाही झाली होती. जडेजावर बॉल टेंपरिंगचे आरोपही केले गेले.
ऑस्ट्रेलियन मीडियाने आणि ऑस्ट्रेलियातील काही माजी क्रिकेटपटूंनी जडेजावर बॉल टेंपरिंगचा संशय घेतला होता.
भारतीय टीम व्यवस्थापनाने जडेजाचा बचाव करताना म्हटलं होतं की, तो वेदना कमी करण्यासाठी आपल्या बोटाला क्रीम लावत होता.
मात्र, त्याने मैदानात उपस्थित असलेल्या अंपायरच्या परवानगीशिवाय क्रीम लावली होती. ही कृती आचारसंहितेचा भंग मानली जाते.
जडेजाने आपली चूक कबूल केली आहे. त्याने आयीसीसीचे मॅच रेफरी अँडी पिक्रॉफ्ट यांनी लावलेले निर्बंध मान्य केले आहेत. त्यामुळेच या प्रकरणाची कोणतीही औपचारिक सुनावणी झाली नाहीये.
रवींद्र जडेजाने नागपूर टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या होत्या आणि 70 धावा केल्या होत्या. जडेजाने आपल्या टेस्ट करिअरमध्ये सहाव्यांदा 5 विकेट्स आणि अर्धशतक ही कामगिरी बजावली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)