'... तेव्हा तू चड्डी घालायचास'- स्टीव्ह वॉने जेव्हा पार्थिव पटेलला सुनावलेलं

    • Author, शिवाकुमार उलगनाथन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

बहुप्रतिक्षित अशा ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत टेस्ट सीरिजला सुरुवात झाली आहे.

भारत-पाकिस्तानदरम्यानचे सामने असोत की ऑस्ट्रेलिया-इंग्लंड या देशांदरम्यान होणाऱ्या अॅशेस क्रिकेट सीरिज नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या आहेत.

पण नंतर काळ जसा पुढं सरकत गेला तशी भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणाऱ्या सीरिजची उत्सुकता वाढत गेली. विशेषत: टेस्ट सीरिजकडून अपेक्षा वाढल्या होत्या.

आजवर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 27 टेस्ट सीरिज झाल्या. यामध्ये ऑस्ट्रेलियाने 12 जिंकल्या आणि 10 भारताने जिंकल्या, तर पाच ड्रॉ झाल्या.

1995 नंतर भारत - ऑस्ट्रेलिया दरम्यान होणाऱ्या टेस्ट सीरिजचं नाव बदलून 'बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सीरिज' ठेवण्यात आलं.

आतापर्यंत 15 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टेस्ट सीरिज पार पडल्या असून भारताने 9 तर ऑस्ट्रेलियाने 5 सिरीज जिंकल्या, आणि एक सीरिज ड्रॉ झाली.

ऑस्ट्रेलियन टीमबाबत बोलायचं झाल्यास त्यांच्याकडे आक्रमक बॅटिंग, तुफान बॉलिंग आणि चांगली फिल्डिंग केली जातेच. पण याचबरोबर खेळाडूंची चेष्टा करणं, आक्रमक स्लेजिंग यात सुद्धा ते मास्टर आहेत.

मागच्या काही वर्षांपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मॅचेस मध्ये तिखट अशी स्पर्धा सुरू असल्याचं दिसतं. हे दोन्ही देश क्रिकेटच्या मैदानावर अतिशय आक्रमक पद्धतीने वागतात.

या दोन्ही संघांमध्ये बऱ्याचदा वाद झालेत आणि स्लेजिंगच्या तर घटना नव्या नाहीत. असे किती वाद आणि स्लेजिंगच्या घटना झाल्यात त्यावर एक नजर टाकू.

गांगुलीने स्टीव्ह वॉला वाट पाहायला लावली?

या दोन्ही देशांदरम्यान झालेली 2001ची सीरिज सर्वात संस्मरणीय मानली जाते.

कोलकात्यात पार पडलेली दुसरी टेस्ट मॅच आजही लोकांच्या चांगलीच लक्षात असेल. यात व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड या जोडगळीने त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली होती. त्याच्याच जोरावर भारताने ही मॅच आणि सीरिज आपल्या खिशात घातली होती.

पण 2001 ची ही टेस्ट सिरीज आणखीन बऱ्याच कारणांमुळे चर्चेत आली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियन मॅगझिनने त्यांच्या एका रिपोर्टमध्ये लिहिलं होतं की, ऑस्ट्रेलियन कॅप्टन स्टीव्ह वॉला ऐनवेळी टॉससाठी वाट बघत थांबावं लागलं. कारण भारताचा कॅप्टन सौरव गांगुली उशीरा पोहोचला होता.

स्टीव्ह वॉनेही आपल्या 'आऊट ऑफ माय कम्फर्ट झोन' या आत्मचरित्रात या प्रसंगाचा उल्लेख केलाय.

पण नंतर गांगुलीने स्पष्टीकरण दिलं होतं की, त्याने जाणून बुजून असं काही केलं नव्हतं. त्यादिवशी टीमचे ब्लेझर उशिरा आले, त्यामुळे त्यांना उशीर झाला.

'तेव्हा तू चड्डी घालत होतास ...'

टेस्ट क्रिकेट मधला सर्वात आक्रमक खेळाडू असलेला स्टीव्ह वॉ 2004 मध्ये भारताविरुद्धची शेवटची मॅच खेळत होता.

ही मॅच सिडनीमध्ये पार पडणार होती आणि ती त्याच्यासाठी फेअरवेल मॅच होती.

त्यावेळी 18 वर्षांचा भारताचा विकेट कीपर पार्थिव पटेलने स्टीव्ह वॉचं लक्ष विचलित करण्यासाठी त्याला सांगितलं की, तू स्लॉग स्वीप ट्राय करून का पाहत नाहीस?

स्टीव्ह वॉची विकेट घेणं म्हणजे सिरीजमध्ये भारताचा विजय पक्का करण्यासारखं होतं.

यावर स्टीव्ह वॉ मागे वळला आणि पार्थिवला म्हणाला, "जेव्हा मी टेस्ट मध्ये डेब्यू केलं, तेव्हा तू चड्डी घालत होतास."

स्टीव्ह वॉने ऑस्ट्रेलियाला मॅच हरू दिली नाही आणि सीरिज शेवटी ड्रॉ झाली.

मंकीगेट वाद

2007-08 च्या सीरिज दरम्यानचा वाद आजही कोणी विसरलं नसेल.

सिडनीमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय स्पिनर हरभजन सिंहने ऑस्ट्रेलियन बॅट्समन अँड्र्यू सायमंड्सवर वांशिक टीका केल्याचा आरोप करण्यात आला.

हरभजन सिंहने सायमंड्सला 'ए मंकी' म्हणून हाक मारली असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे हरभजन सिंहवर 3 मॅचेससाठी बंदी घालण्यात आली होती.

मात्र या प्रकरणात सुनावणी झाल्यानंतर हरभजनसिंह वरची बंदी उठवण्यात आली. या सुनावणीत भारताच्या बाजूने सचिन तेंडुलकर सहभागी झाला होता.

हरभजन सिंहने स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं की, मी असा कोणताही अपशब्द वापरला नव्हता ज्यातून वांशिक भेदभाव होईल. माझ्या हिंदी शब्दाने गैरसमज केला.

या घटनेमुळे दौरा रद्द होण्याची भीती निर्माण झाली होती. पण अनेक वर्षांनंतर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या वतीने खेळताना हरभजन सिंग आणि सायमंड्स एकाच ड्रेसिंग रूममध्ये दिसले.

'बेस्ट बेबीसिटर'

2018-19 साली ऑस्ट्रेलियामध्ये ज्या सीरिज झाल्या त्यात भारताची फारशी चांगली कामगिरी नव्हती.

ऋषभ पंत तेव्हा नवा प्लेयर होता आणि आपलं कौशल्य सिद्ध करण्याच्या प्रयत्नात होता. ऑस्ट्रेलियन विकेट कीपर टीम पेनने पंतला चिडवताना म्हटलं होतं की, सीरिज नंतर तो त्याच्या मुलाची बेबीसिटिंग करेल का?

त्याने पंतला टोमणा मारताना म्हटलं होतं की, एमएस धोनी वनडे टीममध्ये परतला आहे आणि पंतसाठी मैदानात आता कोणतंच काम शिल्लक नाहीत. यावर पंतनेही टीम पेनला प्रत्युत्तरात म्हटलं होतं की, तू सुद्धा जास्त दिवस कॅप्टन राहणार नाहीस.

पण विशेष गोष्ट म्हणजे, या सगळ्या घटनेनंतर पेनची पत्नी बोनीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, यात पंत ऑस्ट्रेलियन मुलांसोबत दिसतोय. या फोटोला तिने 'बेस्ट बेबीसिटर' असं कॅप्शन दिलं होतं. हा फोटो पुढे व्हायरल झाला.

खरं तर टीम पेनने ऑस्ट्रेलियन दौऱ्यावेळी रोहित शर्माला देखील टोमणे मारले होते.

यावर उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला होता की, मेलबर्न टेस्ट मॅचमध्ये टीम पेनने सेंच्युरी मारली, तर त्याला मुंबई इंडियन्ससाठी विकत घेऊ.

टीम पेन आणि अश्विन

जर 2018 ही स्लेजिंगची सुरुवात असेल तर 2020 सालचा भारताचा ऑस्ट्रेलियन दौरा शेवटचा मानला जाऊ शकतो.

यावेळच्या सर्वच टेस्ट मॅचेससाठी ऑस्ट्रेलियन टीमचा कॅप्टन टीम पेन होता. सिडनी टेस्ट मॅचमध्ये टीम पेनने भारताचा स्पिनर अश्विनला टार्गेट केलं होतं.

पेनने अश्विनची खिल्ली उडवताना म्हटलं होतं की, इंडियन ड्रेसिंग रूममध्ये कोणालाही तो आवडत नाही आणि इंडियन टीममध्ये अश्विनपेक्षा जास्त तर त्याचेच मित्र आहेत.

त्याने पुढे असंही म्हटलं होतं की, ब्रिस्बेनच्या गाबा पिचवर अश्विनला संघर्ष करावा लागेल. 'तू गाबाला येण्याची वाट पाहू शकत नाही, ऍश!'

यावर अश्विनने उत्तर देताना म्हटलं होतं की, आगामी भारतीय सीरिज टीम पेनची शेवटची सिरीज ठरेल. आणि या मॅचमध्ये भारत हरणार नाही याची अश्विनने घेतली आणि झालंही तसंच. ही मॅच ड्रॉ झाली.

एवढे वाद झाले तरी दोन्ही देशांच्या खेळाडूंनी मैदानावर आणि मैदानाबाहेर एकमेकांबद्दल आदर दाखवलाय.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकरचं नाव आदराने घेतलं जातं. मॅकग्रा आणि वॉर्नच्या बॉलिंगवर विरोधी खेळाडूंकडून कौतुकाचा वर्षाव होतो.

या पिढीतील खेळाडू असलेले विराट कोहली आणि स्टीव्हन स्मिथ यांनाही प्रतिस्पर्धी खेळाडूंबद्दल खूप आदर आहे.

क्रिकेटच्या मैदानाबाहेर स्टीव्ह वॉने केलेल्या चॅरिटीमुळे कोलकात्याने त्याची नेहमीच प्रशंसा केली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)