You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IndvsAus: शेरेबाजीला थारा नाही; क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मागितली भारतीय खेळाडूंची माफी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी टेस्ट प्रेक्षकांमधून करण्यात आलेल्या आक्षेपार्ह उद्गारांमुळे थांबवण्यात आली. कारवाईनंतर खेळ पुन्हा सुरू करण्यात आला.
सिडनी टेस्टचा चौथा दिवस सुरू आहे. ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग सुरू असताना, बुमराह 21वी ओव्हर टाकायला घेणार तेव्हा खेळ थांबवण्यात आला.
बाऊंड्रीजवळ फिल्डिंग करणाऱ्या मोहम्मद सिराजने कर्णधार अजिंक्य रहाणेशी संपर्क साधला. रहाणेने अंपायर्सशी चर्चा केली. मैदानावरील अंपायर पॉल रायफेल आणि पॉल विल्सन यांनी फोर्थ अंपायर आणि सुरक्षारक्षकांशी संपर्क केला. सुरक्षायंत्रणांनी मैदानातील सहा प्रेक्षकांना बाहेर काढलं.
वंशभेदी तसंच कोणत्याही स्वरुपाची आक्षेपार्ह टिप्पणी, शेरेबाजी यांना क्रिकेट ऑस्ट्रेलिया जराही थारा देत नाही. असे प्रकार आम्ही कदापि खपवून घेणार नाही. अपमान आणि विचलित करणाऱ्या उद्गरांना जराही स्थान नाही असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे इंटिग्रिटी आणि सेक्युरिटी विभागाचे प्रमुख शॉन कॅरोल यांनी म्हटलं आहे.
सिडनीत भारतीय खेळाडूंना उद्देशून प्रेक्षकांमधील काही व्यक्तींनी वंशभेदी शेरेबाजी केली. अशा स्वरुपाच्या वर्तनाचा आम्ही तीव्र निषेध करतो. तुम्ही वंशभेदी शेरेबाजी करणार असाल तर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटला तुमची आवश्यकता नाही.
यासंदर्भात आयसीसीची कार्यवाही पूर्ण होण्याच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत. आक्षेपार्ह उद्गार काढणाऱ्या व्यक्तींची ओळख पटल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया यासंदर्भात कठोर कारवाई करेल. या प्रेक्षकांना मैदानात प्रवेशबंदी होऊ शकते. अधिक कारवाईसाठी हे प्रकरण न्यू साऊथ वेल्स पोलिसांकडे सोपवण्यात येईल.
मालिकेचे आयोजक म्हणून, भारतीय क्रिकेट संघातील आमच्या मित्रांची आम्ही माफी मागतो. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याची आम्ही हमी देतो असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
तिसऱ्या दिवशी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रेक्षकांमधून वंशभेदी टिप्पणी झाल्याची तक्रार केली होती. भारतीय संघव्यवस्थापनाने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.
सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 338 रन्स केल्या. स्टीव्हन स्मिथने 131 रन्सची शतकी खेळी केली. स्मिथचं हे 27वं शतक आहे. मार्नस लबूशेनने 91 तर विल प्युकोव्हस्कीने 62 रन्सची खेळी केली. रवींद्र जडेजाने 4 विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना, टीम इंडियाचा डाव 244 रन्समध्येच आटोपला. शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी प्रत्येकी 50 रन्सची खेळी केली. ऑस्ट्रेलियातर्फे पॅट कमिन्सने 4 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी 312/6वर डाव घोषित केला. मार्नस लबूशेनने 73, स्टीव्हन स्मिथने 81 तर कॅमेरुन ग्रीनने 84 रन्सची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 407 रन्सचं लक्ष्य दिलं.
अॅडलेड टेस्टमध्ये भारतीय संघावर नीचांकी धावसंख्येची नामुष्की ओढवली होती. या टेस्टमध्ये पराभवानंतर, टीम इंडियाने मेलबर्न टेस्ट जिंकत मालिकेत 1-1 बरोबरी केली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)