You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तूर डाळ आपल्या आहारात आफ्रिकेतून आली की ती मूळ भारतीयच आहे?
- भारतीयांच्या आहारातील एक महत्वाचं द्विदल धान्य म्हणजे तूर.
- या तुरडाळीच्या उत्पत्तीबद्दल वेगवेगळ्या समजुती आहेत. उदाहरणार्थ- ही तूरडाळ 3000 वर्षांहून अधिक काळापासून भारतीयांच्या आहारात वापरली जाते. आणखी एका समजुतीनुसार, तूर डाळ ही मूळची आफ्रिकेची असल्याचं मानलं जातं.
- आज तुरीच्या उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो.
- गुजरातमध्ये दर महिन्याला 200 टन तुरीची डाळ विकली जाते. यात तेल लावलेल्या तुरीची डाळ मोठ्या प्रमाणावर विकली जाते.
गुजराती थाळी म्हटलं की, यात गोड आणि आंबट डाळ, वाघरेली खिचडी, दाल ढोकळी किंवा दाल बाटी चुरमा हे पदार्थ आलेच. पण या सगळ्यात कॉमन काय असं विचाराल तर तुरीची डाळ. म्हणजे कोणताही गुजराती पदार्थ करा त्यात तुरीची डाळ हमखास असते. नाहीतर गुजराती थाळी त्याशिवाय अपूर्णच म्हणता येईल.
पण तूर डाळ फक्त गुजराती थाळीचा मुख्य घटक आहे का? तर नाही, संबंध भारतभर प्रत्येक पाककृतीत या तुरीच्या डाळीचा सहभाग आहेच. महाराष्ट्रात वरण-भात म्हटलं की, डोळ्यांसमोर पिवळंधमक तुरीचं वरण येतं. दक्षिण भारतात सांबार असो वा त्यांचे इतर पदार्थ...तुरीच्या डाळीचा समावेश असतोच.
आज भारतात प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात दिसणाऱ्या या तूरडाळचा इतिहासही खूप जुना आहे. दशकांपासून तूरडाळ भारतातील शाही राजघराण्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांची पहिली पसंती राहिली होती आणि आजही आहे.
तुरीच्या इतिहासाबद्दल इतिहासकार, फूड ब्लॉगर्स आणि संशोधकांमध्ये अनेक मतप्रवाह आहेत. यातल्याच एका मतप्रवाहानुसार, तुरीच्या उत्पत्तीचा संदर्भ हा आफ्रिकन देश झांझिबारमध्ये सापडतो. इजिप्तमध्ये इ.स. 2200-2400 प्रागैतिहासिक काळातील एक थडगं सापडलं होतं. या थडग्यात संशोधकांना तुरीच्या डाळीचे अवशेष सापडले.
आणखीन एक मतप्रवाह असा आहे की, आफ्रिकेतील काही व्यापाऱ्यांनी या तुरीचे बियाणे भारत आणि म्यानमारमध्ये आणले. इथूनच ही डाळ आशिया आणि आग्नेय आशियापर्यंत पोहोचली. इंग्लिश लेखक सर जॉन हूकर यांनी त्यांच्या 'फ्लोरा ऑफ ब्रिटिश इंडिया' या पुस्तकात नमूद केलंय की हिमालयात 2000 फूट उंचीवरही तुरीची लागवड केली जाते.
मात्र भारतीय शास्त्रज्ञ एम. जी. मुळा आणि के. बी. सक्सेना यांच्या संशोधनानुसार, तूर डाळ ही मूळची भारतीय असून नंतर ती जगभर पसरल्याचं ते सांगतात. या दोन शास्त्रज्ञांनी इतिहासकारांचा हवाला देत 'लिफ्टिंग द लेव्हल ऑफ अवेअरनेस ऑन पीजनपी' हे पुस्तक लिहिलंय. यात त्यांनी तूर डाळीची उत्पत्ती भारताच्या पूर्व घाटात झाली असल्याचं लिहिलंय.
किंबहुना महाराष्ट्रातील पुरातत्व उत्खननात तुरडाळीच्या अस्तित्वाचे काही पुरावे सापडले आहेत. त्यानुसार इ.स. पूर्व दुसऱ्या ते तिसऱ्या शतकात लोकांच्या आहारात तूर डाळीचा समावेश होता.
मुळा आणि सक्सेना यांच्या पुस्तकानुसार, आज भारतात 16 जातींच्या तूर डाळी अस्तित्वात आहेत. आणि हाच पुरावा आहे की, तूरडाळ भारतीय वंशाची आहे. भारतीय पाककृतीमध्ये तूर डाळीच्या विविध उपयोगांबद्दलची प्राचीन माहिती आणि कागदोपत्री पुरावे देखील उपलब्ध आहेत.
या दोन्ही शास्त्रज्ञांच्या मते, भारत आणि म्यानमारमध्ये तूर डाळीशी संबंधित 16 वनस्पतींचे जीवाश्म सापडले आहेत. त्यापैकी कॅजानस कॅजॅनिफोलियस प्रजाती तुरडाळीची पूर्वज असल्याचं मानलं जातं. ही प्रजाती 3000 वर्षांपूर्वी भारतातील तीन ठिकाणी आढळून आली आहे.
तूर ही उपोष्णकटिबंधीय वातावरणात आढळणारी वनस्पती असून याचं उत्पादन विशेषतः अर्ध-शुष्क भागात घेतलं जातं. कारण तुरीची लागवड ही पावसावर आधारित आहे. तूर ही शून्य अंश तापमान आणि मुसळधार पावसात तग धरू शकते. त्यामुळे हे पीक भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहचलं असून लोकांच्या दैनंदिन आहारात या डाळीचा समावेश झाला आहे.
पण तुरीला तूर हे नाव कसं पडलं?
तूर हा शब्द संस्कृत भाषेतील 'तुवरा' किंवा 'तुबारा' या शब्दाचा अपभ्रंश म्हणता येईल. या तुवराचा अर्थ आहे 'हिरवं धान्य'. एम. जी. मुळा आणि के. बी. सक्सेना यांच्या म्हणण्यानुसार, तूर डाळ फार पूर्वीच गुजरातमध्ये आली होती.
या तुरीला काही भागांमध्ये 'तुवर' असंही म्हटलं जातं.
तुरीला हिंदीत 'अरहर' असं म्हटलं जातं. संस्कृत मधील 'आधाकी' या मूळ शब्दाचा अपभ्रंश म्हणता येईल. चरक आणि सुश्रुत यांनीही त्यांच्या ग्रंथांमध्ये अधाकीचा उल्लेख केलाय. अधाकी म्हणजे अर्धी किंवा दोन भागांमध्ये विभागलेली. अर्थात तूर हे द्विदल धान्य आहे.
त्यामुळे सामान्यपणे उत्तर भारतात तुरीला अरहर तर दक्षिण भारतात तूर किंवा तुवर असं म्हटलं जातं. तमिळ संगम साहित्यात तुरीचा उल्लेख येत नाही. त्यामुळे संगम साहित्याच्या काळात तुरीला तमिळ स्वयंपाकघरात स्थान नसल्याचं समजतं.
गुजरातला तुरीचा परिचय मुघलांनी करून दिला...
तूर डाळ ही गुजरात्यांची आवडती डाळ असं म्हटलं तर वावगं ठरू नये. गुजराती लोकांनी शतकानुशतके या डाळीवर प्रेम केलंय जे आजही टिकून आहे. गुजराती जेवणातील बरेचसे पदार्थ हे तुरीच्या डाळीपासून बनलेले आहेत.
फूड ब्लॉगर आणि लेखिका पूजा सांगानी म्हणतात, '14 व्या शतकापासून ते मुघलांपर्यंतच्या शाही इतिहासात तुरीला विशेष महत्व देण्यात आलंय. प्राचीन कालखंडात तुरीला तिच्या चवीमुळे 'धान्यांची राणी' म्हटलं जायचं. अकबराची बेगम आणि जहांगीरची आई जोधाबाईला देखील तूर आवडायची."
मग प्रश्न पडतो की, मुघलांनीच गुजरातमध्ये तूरडाळ लोकप्रिय केली का?
"असं सांगतात की, जोधाबाईंला पाच प्रकारच्या डाळींपासून बनलेली पंचमेल डाळ खूप आवडायची. पंचमेल डाळीत तुरीचं प्रमाण सर्वाधिक असतं. अशाप्रकारे गुजरातमध्ये पंचमेलदालही प्रसिद्ध झाली आणि त्यासोबत तूर डाळही."
पूजा सांगतात, "शिवाय तुरीच्या लागवडीसाठी गुजरातचं हवामान अनुकूल आहे. गुजरातमध्ये खूप मोठ्या क्षेत्रावर कमी पाऊस पडतो. या भागात हळदीचं उत्पादन घेतलं जातं, विशेषतः गुजरातच्या किनारपट्टीच्या भागात हळद पिकवली जाते. आणि याला पर्याय म्हणून तुरीचं पीकही घेतलं जातं त्यामुळे तूर जास्त लोकप्रिय झाली."
आता या नैसर्गिक कारणांसोबत काही आरोग्याची कारणं देखील आहेत, ज्यामुळे तुरीचा तिथल्या अन्नात समावेश झाला. जसं की, गुजरातमध्ये कुपोषण ही खूप मोठी समस्या होती. ही समस्या लक्षात घेऊन आपल्या दैनंदिन आहारात तुरीचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात आले.
निकुंज सोनी हे फूड ब्लॉगर आहेत. बीबीसीशी बोलताना ते सांगतात, चविष्ट असण्याव्यतिरिक्त, तुरीमध्ये प्रथिनं आणि इतरही अनेक पोषक घटक आहेत. त्यामुळे ही डाळ लोकप्रिय आहे. कोव्हीड नंतर तर आपल्या शरीराला प्रथिनांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासते आहे, त्यामुळे तुरीचा वापर वाढलाय.
तेच पूजा सांगानी म्हणतात, 'तूर डाळ लोकप्रिय होण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे यापासून तयार होणाऱ्या रेसिपी या सोप्या आणि वैविध्यपूर्ण असतात. तुरीपासून तयार केली जाणारी सर्वात लोकप्रिय रेसिपी म्हणजे गूळ घालून तयार केलेली तुवरणी डाळ'.
तुरीशिवाय भारतीयांचं जेवण अपूर्ण
तूर हे भारतातील महत्वाचं कडधान्य पीक आहे. भारतीयांच्या दैनंदिन आहारात या डाळीचा वापर केलाच जातो. मग महाराष्ट्रातील 'वरण भात' असो की बिहार आणि उत्तरप्रदेशमधलं 'आमचूर अरहर', पंजाबची 'अरहर दाल फ्राय' असो की दक्षिण भारतातलं ' सांबार' आणि गुजरातमधील गूळमिश्रित 'तुवरणी डाळ'...उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सगळ्याच स्वयंपाक घरात तूर सापडते.
या तुरीशिवाय जेवणाची कल्पना करताच येत नाही.
फूड हिस्टोरियन सदफ हुसेन बीबीसीशी बोलताना सांगतात की, "उपलब्ध पुराव्यांवरून असं लक्षात येतं की, तूर डाळ ही महाराष्ट्र, कर्नाटक आणि ओडिशामधून नंतर उत्तर भारतात आली. त्यानंतर ती राजस्थानमार्गे गुजरात आणि इतर राज्यांमध्ये पोहोचली. राजस्थानमध्ये तूर डाळीला खूपच महत्व प्राप्त झालं. राजस्थानची दाल चुरमा बाटी असेल किंवा पंचमेलदाल असेल या माध्यमातून ही डाळ मोठया प्रमाणात लोकप्रिय झाली."
तूर म्हणजे अरहर. यात लोह, आयोडीन, लाइसिन, थ्रेओनिन, सिस्टीन आणि आर्जिनिन सारखे आवश्यक अॅमिनो अॅसिड असतात. तुरीत असलेल्या पौष्टिक घटकांमुळे तिचा आहारात वापर केला जातो.
सदफ सांगतात, "तुरीची डाळ संपूर्ण आशिया खंडात वापरली जाते आणि ती संपूर्ण महाद्वीपला एका सूत्रात बांधते."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)