You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आहार : 'मी बाजरीची भाकरी खायला सुरुवात केली कारण...'
- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी न्यूज, दिल्ली
लहानपणी मी उत्तर प्रदेशातल्या माझ्या गावी जायचे तेव्हा बहुतेकदा माझी आजी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खाताना दिसायची.
आजी पिठात पाणी घालून कणीक मळायची, मग हाताने परातीत भाकरी थापायची आणि चुलीवर भाजायची.
मला कधी तिने भाकरी देऊ केली तर मी नाक मुरडायचे. पातळ, रुचकर, खायला सोप्या चपात्यांपेक्षा तिला भाकरी का आवडते, हे मला तेव्हा कळायचं नाही.
पण काही वर्षांपूर्वी मी आजीच्या आहारात होतं तसं अन्न खायला सुरुवात केली.
गव्हाच्या पिठाऐवजी बाजरीचं पीठ आरोग्याला अधिक हितकारक असल्याचं मी एका बातमीत वाचलं, तेव्हापासून माझ्या स्वंयपाकघरात गव्हाऐवजी बाजरीचं पीठ आलं.
माझ्या चिवट भाकऱ्या खाताना घास जास्त चावावा लागतो, पण त्याने माझी तब्येत चांगली राहत असल्यामुळे मी हाच आहार सुरू ठेवला आहे.
आणि असं करणारी मी एकटीच नाही. कृषीतज्ज्ञ म्हणतात त्यानुसार, अलीकडच्या वर्षांमध्ये अनेक 'विस्मृतीत गेलेले अन्नपदार्थ' शेतांवर आणि अर्थातच आपल्या ताटांमध्ये पुनरागमन करत आहेत.
गेल्या काही काळापासून बाजरीला 'विस्मृती'च्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी 'जागतिक पातळीवर जोरकस प्रयत्न' होत असल्याचं डॉ. जॅकलीन ह्यूजेस सांगतात. ना-नफा तत्त्वावर काम करणाऱ्या इक्रिसॅट (इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी-एरिड ट्रॉपिक्स) या संस्थेच्या त्या महासंचालक आहेत.
भारताने 2018 हे 'बाजरीचं वर्ष' म्हणून साजरं केलं आणि 2023 हे 'जागतिक बाजरी वर्ष' म्हणून साजरं करावं, असा भारत सरकारने दिलेला प्रस्ताव मार्च महिन्यात संयुक्त राष्ट्रांनी स्वीकारला.
बाजरीतून आरोग्याला कोणते लाभ होतात आणि जागतिक तापमानवाढीच्या काळात लागवडीसाठी बाजरी कशी सोयीची आहे (निकृष्ट जमिनीमध्येही बाजरीचं पीक घेता येतं आणि त्याला अत्यल्प कीटकनाशकं लागतात), इत्यादी गोष्टींबाबत जागरूकता निर्माण करण्याकरता या वर्षाचा वापर केला जाईल, असं माध्यमांमधील वार्तांकनात म्हटलं आहे.
डॉ. ह्यूजेस म्हणतात त्यानुसार, बाजरीला अधिकाधिक लोक 'स्मार्ट फूड' मानू लागले आहेत, कारण 'बाजरी पृथ्वीसाठी, शेतकऱ्यासाठी आणि आपल्यासाठीही चांगली आहे.'
"बाजरीला कमी पाणी लागतं आणि अतिशय उष्ण वातावरणातही तिचं पीक घेता येतं. बाजरी अतिशय चिवट पीक आहे आणि कीटकजन्य आजारांना तोंड देऊन ते टिकू शकतं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते चांगलं आहे. ते पोषक असल्यामुळे आपल्यासाठीही ते चांगलं आहे. बाजरीमुळे मधुमेह कमी होतो, कोलेस्टेरॉलची पातळी सुधारते, कॅल्शियम वाढतं, शरीरातील जस्त व लोह यांची उणीव भरून निघते, असं अभ्यासांमधून समोर आलं आहे. तसंच बाजरीत ग्लूटेन नसतं."
त्यामुळे भारतात आरोग्यविषयक तज्ज्ञ बाजरीमध्ये रस घेऊ लागले यात काही आश्चर्य नाही, कारण भारतात आठ कोटी मधुमेहाचे रुग्ण आहेत, दर वर्षी एक कोटी 70 लाखांहून अधिक लोक हृदयाशी संबंधित विकारांनी मरण पावतात, आणि 30 लाखांहून अधिक मुलं कुपोषित आहेत- त्यातील अर्धी मुलं आत्यंतिक कुपोषणाच्या अवस्थेत आहेत.
'देशातील कुपोषण नामशेष करण्यासाठी बाजरी क्रांती' घडवण्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत.
हे कार्य अशक्य नाही, कारण बाजरी भारतीयांच्या आहारात कित्येक शतकांपासून आहे, असं तज्ज्ञ म्हणतात.
भारतीय बाजरी संशोधन संस्थेचे संचालक विलास टोनापी म्हणतात की, "बाजरी हे मानवतेला माहीत असलेलं सर्वांत प्राचीन धान्य आहे."
"सिंधू संस्कृतीच्या काळात, इसवीसनपूर्व सुमारे तीन हजार वर्षं आधी बाजरीची लागवड करण्यात आली. एकवीस राज्यांमध्ये बाजरी पिकवली जाते, आणि त्या-त्या प्रदेशानुसार ती अन्नसंस्कृतीचा व धार्मिक रूढींचा भाग झालेली आहे."
दर वर्षी एक कोटी 60 लाख टन इतकं बाजरीचं उत्पादन घेणारा भारत हा जगातील सर्वांत मोठा बाजरी उत्पादक देश आहे. पण गेल्या 50 वर्षांमध्ये बाजरीच्या लागवडीखालील क्षेत्र तीन कोटी 80 लाख हेक्टरांवरून एक कोटी 30 लाख हेक्टरांपर्यंत खाली आलं आहे आणि भारताच्या अन्नसाठ्यातील बाजरीचा वाटा 1960च्या दशकात 20 टक्के होता तो आता 6 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, असं टोनापी म्हणतात.
डॉ. टोनापी यांच्या म्हणण्यानुसार, 1969-70 सालापासून बाजरीची घसरण सुरू झाली.
"तोवर भारताला स्वतःच्या लोकांची पोटं भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात अन्नसहाय्य मिळत असे आणि मोठ्या प्रमाणात धान्यांची आयातही केली जात होती. अन्नाबाबतीत स्वयंपूर्णता मिळून उपासमार संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने सरकारने हरित क्रांतीची सुरुवात केली आणि तांदूळ व गहू यांच्यासारख्या जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांवर लक्ष केंद्रित केलं."
भारतात 1960 ते 2015 या कालावधीमध्ये गव्हाचं उत्पादन तिपटीने वाढलं, तर तांदळाचं उत्पादन 800 % वाढलं, परंतु बाजरीचं उत्पादन मात्र कमी पातळीवरच कुंठीत होऊ राहिलं. विस्मृतीत केलेल्या अन्नांचा जागतिक जाहीरनामा तयार करण्यात सहभागी झालेल्या डॉ. ह्यूजेस म्हणतात की, "तांदूळ व गहू यांच्यावर अतिरिक्त भर देण्याच्या या धोरणामुळे बाजरीकडे दुर्लक्ष झालं आणि अनेक पारंपरिक अन्नपदार्थ बाजूला सारले गेले."
अशा पिकांच्या पुनरुज्जीवनासाठी कृषी वैज्ञानिकांनी सुचवलेल्या अनेक व्यूहरचना परिणाम दाखवू लागले आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये बाजरीची मागणी 146 टक्क्यांनी वाढल्याचं डॉ. टोनापी म्हणतात.
बाजरीच्या कूकी, काप, पफ आणि इतर रुचकर पदार्थ सुपरमार्केटमध्ये व ऑनलाइन दुकानांमध्ये विकले जात आहेत. सरकार रेशन व्यवस्थेद्वारे लाखो लोकांना प्रति किलो एक रुपया दराने बाजरी पुरवते आहे. काही राज्य सरकारं शालेय माध्यान्ह आहार योजनेअंतर्गत बाजरीचे तयार अन्नपदार्थ देत आहेत.
भरड धान्यांमध्ये नव्याने निर्माण झालेली ही रुची तेलंगण राज्यातील उत्तरेकडल्या जिल्ह्यांमध्ये आदिवासींसाठी वरदान ठरते आहे.
'इक्रिसॅट'ने जेवण तयार करण्याचं प्रशिक्षण दिलेल्या आसिफाबादमधील 10 आदिवासी महिलांच्या गटामध्ये पी. अइला यांचा समावेश आहे. या महिलांनी तयार केलेलं अन्न ग्रामीण भागांमधील संगोपन केंद्रातल्या मुलांना दिलं जातं.
त्यांच्या गावाहून माझ्याशी फोनवर बोलताना अइला यांनी त्यांच्याकडे जेवण करताना कोणते घटक व मसाले वापरले जातात याची यादी वाचून दाखवली. ऑगस्टमध्ये त्यांनी ज्वारीपासून तयार केलेले 12 टन गोड व स्वादिष्ट पदार्थ विकले, असं त्या म्हणाल्या.
आयुष्यभर त्या ज्वारी-बाजरीचा वापर जेवणात करत आल्या आहेत. या साध्या धान्यात अचानक लोकांना का रुची वाटू लागली आहे, हे अइला यांना पुरेसं लक्षात येत नसलं, तरी या धान्याकडे अधिकाधिक लोकांचं लक्ष जातंय याबद्दल त्यांना आनंद वाटत असल्याचं त्या म्हणाल्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)