दूध प्यायल्यामुळे हाडं खरंच मजबूत होतात का?

    • Author, क्लॉडिया हॅमंड
    • Role, बीबीसी फ्युचर

भारतातच नाही तर जगभरात वर्षानुवर्षे हेच सांगण्यात येतंय की, दूध प्यायल्याने हाडं मजबूत होतात. मात्र, याला काही शास्त्रीय आधार आहे का?

लहानपणी आपल्यापैकी जवळपास प्रत्येकानेच 'दूध पी, दूध प्यायल्यानं हाडं बळकट होतात' हे ऐकलं असेल. काहीअंशी ते बरोबरही आहे. कारण दूधात कॅल्शिअम असतं आणि कॅल्शिअममुळे हाडांची 'मिनरल डेन्सिटी' वाढते.

मात्र तरीही दूध पिणं आणि हाडं बळकट होणं, यात निश्चित संबंध मांडणं वाटतं तेवढं सोपं नाही. यावर प्रभावी संशोधन करायचं असेल तर जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेऊन त्यांचे दोन गट करावे लागतील.

एका गटातल्या प्रत्येक व्यक्तीला काही वर्षं भरपूर दूध प्यायला सांगावं लागेल आणि दुसऱ्या गटातल्या लोकांना दुधासारखं दुसरं एखादं पेय द्यावं लागेल. मात्र, प्रत्यक्षात असा प्रयोग करणे अवघड आहे.

मात्र, हाच प्रयोग दुसऱ्या पद्धतीनेही करता येईल. यातही हजारो लोकांचा अभ्यास करावा लागेल. प्रत्येकाकडून ती व्यक्ती कधीपासून दूध पिते तसंच किती दूध पिते, याची माहिती घ्यायची आणि पुढचं किमान एक दशक त्यांच्यावर लक्ष ठेवून जास्त दूध पिणाऱ्यांना पुढच्या आयुष्यात हाडं ठिसूळ होण्याचा किंवा मोडण्याचा त्रास कमी झाला का, हे तपासावं लागेल.

हॉर्वर्ड विद्यापीठानेही असाच एक प्रयोग केला होता. या संशोधनाचे निष्कर्ष 1997 साली प्रसिद्ध करण्यात आले होते. या संशोधनात 77 हजार नर्सेसचा तब्बल 10 वर्ष अभ्यास करण्यात आला. यात आठवड्यातून एक ग्लास दूध पिणाऱ्या आणि आठवड्यातून दोन ग्लास किंवा त्यापेक्षा जास्त दूध पिणाऱ्या नर्सेसमध्ये हात किंवा मांडीचं हाड मोडण्याच्या प्रमाणात फारसा फरक जाणवला नाही.

हाच प्रयोग जेव्हा 3 लाख 30 हजार पुरूष आरोग्य कर्मचाऱ्यांवर करण्यात आला, तेव्हा त्यांच्यातही हाड मोडण्याच्या प्रमाणात फारसा फरक दिसला नाही.

यानंतर एक रँडम कंट्रोल्ड चाचणी करण्यात आली. या प्रयोगात सहभागी होणाऱ्यांना कॅल्शिअमयुक्त आहार देण्यात आला. कॅल्शिअमसाठी कधी दूधही देण्यात आलं. 2015 मध्ये न्यूझीलंडमधल्या संशोधकांच्या एका गटाने या प्रयोगाच्या निष्कर्षांचा अभ्यास केला. इतर 15 प्रयोगांचाही एकत्रितपणे अभ्यास करण्यात आला.

यात त्यांना असं आढळलं की 'बोन मिनरल डेन्सिटी' दोन वर्षांसाठी वाढली होती. मात्र, दोन वर्षांनंतर ही वाढ थांबली.

कॅल्शिअम सप्लिमेंट दुधाला पर्याय म्हणून वापरले जातात. मात्र, या सप्लिमेंटचा शरीरावर दीर्घकालीन दुष्परिणाम होतो का हे जाणून घेण्यासाठी न्यूझीलंडच्या संशोधकांनी 51 रँडम कंट्रोल्ड प्रयोगांचा डेटा एकत्रित करून त्यांचा अभ्यास केला आणि कॅल्शिअम सप्लिमेंट्सचा त्यांच्या फायद्यांपेक्षा तोटे जास्त आहेत का, हे तपासलं.

यावेळीसुद्धा त्यांना आढळलं की, हाडांच्या क्षमतेत होणारी वाढ 1 ते 2 वर्षात थांबली. कॅल्शिअम सप्लिमेंटमुळे उतारवयात बोन मिनरल डेन्सिटी कमी होण्याचा वेग मंदावला. मात्र, तो थांबला नाही.

यावरून संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की, कॅल्शियम सप्लिमेंटमुळे हाड फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण किंचित कमी होतं.

वेगवेगळ्या देशांनी जेव्हा हाच डेटा अभ्यासला तेव्हा रोजच्या आहारात कॅल्शिअमचं प्रमाण किती असायला हवं, याबाबत प्रत्येकाचे निष्कर्ष खूप वेगळे होते. अमेरिकेचं उदाहरण घ्यायचं तर भारत किंवा युकेच्या संशोधकांनी जेवढं प्रमाण सांगितलं त्यापेक्षा दुप्पट अमेरिकेच्या संशोधकांनी सांगितलं.

अमेरिकेत दररोज 227 मिलीलीटर म्हणजे जवळपास पाव लीटर दूध पिण्याचा सल्ला देण्यात आला.

या गोंधळात 2014 साली स्वीडनमध्ये करण्यात आलेल्या संशोधनाने अधिक भर घातली. स्वीडनमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणावर एक प्रयोग करण्यात आला. या प्रयोगाचा निष्कर्षाच्या तर हेडलाईन्स झाल्या. त्यात म्हटलं होतं की, रोज तीन ग्लासांपेक्षा जास्त दूध प्यायल्याने हाडांना काडीचाही फायदा होत नाही. उलट तुमच्या आरोग्यावरच त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

या संशोधनासाठी स्वीडनमधल्या उप्पासाला विद्यापीठ आणि कॅरोलिन्स्का इन्स्टिट्युटने लोकांना तुम्ही आहारात किती दूध घेता याबद्दलची एक प्रश्नावली दिली. 1987 साली पहिल्यांदा ही प्रश्नावली देण्यात आली आणि त्यानंतर 1997 सालीही देण्यात आली.

2010 साली या प्रयोगात सहभागी झालेल्यांचा मृत्यूदर तपासण्यात आला. याचे निष्कर्ष आश्चर्यकारक होते. दिवसातून एक ग्लास दूध पिणे हाड मोडणे आणि मृत्यूशी संबंधित असल्याचं आढळलं.

या संशोधनांचे निष्कर्ष वाचून आपल्याही आहारातून दूध हद्दपार करण्याचा तुमचा विचार असेल तर तसं करता येणार नाही. इथेही एक मेख आहे.

स्वीडनमध्ये करण्यात आलेल्या या प्रयोगात सहभागी होणाऱ्यांना तुम्ही आतापर्यंतच्या आयुष्यात किती दूध प्यायलं, हे विचारण्यात आलं. आता खरंतर थेट दूध किती घेतलं, चहा-कॉफीतून किती घेतलं आणि जेवणातून किती दूध पोटात गेलं, हे अचूकपणे सांगणं तसं अवघड आहे.

या संशोधनात दूध प्यायल्याने फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते, असंही सिद्ध झालेलं नाही. इतकंच नाही तर चीज आणि दही खाणाऱ्यांमध्ये फ्रॅक्चरचं प्रमाण कमी असल्याचंही संशोधकांना आढळलं.

या संशोधनांच्या आधारे आहारात काही बदल करायचे असतील तर संशोधकांनीच त्याविषयी सावधगिरीची सूचना केली आहे. आहाराविषयी सल्ले देण्याआधी हे संशोधन पुन्हा करण्याची गरज असल्याचं स्वतः संशोधकांचं म्हणणं आहे, तर या संशोधनाच्या आधारे आहारात बदल करताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगली पाहिजे, असंही काहींचं म्हणणं आहे.

त्यामुळे याविषयी अधिक माहिती मिळेपर्यंत जी काही माहिती आतापर्यंत हाती आली आहे त्याआधारे एवढंच सांगता येईल की तुम्हाला दूध आवडत असेल तर नक्कीच प्या. कदाचित त्यामुळे हाडं मजबूत होत असतीलही. मात्र, जेवढी तुमची अपेक्षा आहे त्यापेक्षा कमी.

शिवाय, हाडं बळकट करण्यासाठी केवळ दूधावर अवलंबून न राहता व्यायाम आणि आहारात 'क' जीवनसत्वाचा समावेश, असेही उपाय करता येतील. 'क' जीवनसत्व आहारातून, सूर्यप्रकाशातून आणि हिवाळ्यात टॅबलेट्समधूनही मिळवता येईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)