COP27 ही हवामान बदलाची परिषद काय आहे? तापमान वाढीमुळे जगाचं याकडे का लक्ष आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, एस्मे स्टॅलर्ड
- Role, बीबीसी न्यूज विज्ञान आणि हवामान प्रतिनिधी
गेल्या काही काळापासून तुमच्या वाचनामध्ये COP27 हे नाव आलं असेल. COP27 हे एका परिषदेचं नाव असून ही परिषद इजिप्तमध्ये 6 ते 18 नोव्हेंबरमध्ये होणार आहे. ही संयुक्त राष्ट्राची पर्यावरण परिषद आहे.
जगभरातील विविध देशांचे नेते या परिषदेत एकत्र येऊन हवामान बदल आणि तापमान वाढीवर चर्चा करणार असून सध्या जगासमोर असलेल्या प्रश्नांवर उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतील.
2022 United Nations Climate Change Conference असे या परिषदेचे पूर्ण नाव आहे. तर COP चा अर्थ 'कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज' (सहभागी देशांची परिषद) असा आहे.
गेलं वर्ष हवामान बदलाशी संबंधित अनेक संकटांचा सामना करत संपलं आहे. अनेक ठिकाणी भरपूर पाऊस पडला तसेच अभूतपूर्व असा पूरही आला. काही प्रदेशांमध्ये तापमानानं स्वतःचंच रेकॉर्ड मोडल्याचंही तुम्ही वाचलं असेल.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळेच या परिषदेकडे सर्व जगाचे लक्ष आहे. या COP27 परिषदेसंदर्भातील तुमच्या मनातील काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे येथे मिळवू.
संयुक्त राष्ट्राची ही हवामान बदल परिषद काय आहे?
संयुक्त राष्ट्राची हवामान परिषद दरवर्षी होते. यामध्ये हवामान बदल जागतिक स्तरावर थांबवण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांवर चर्चा होते. त्यावर सहमतीने निर्णय घेतले जातात.

त्यांना COP म्हणजे 'कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज' म्हटलं जातं.
1992 मध्ये झालेल्या हवामान बदलासंदर्भातील मूळ करारावर स्वाक्षरी करणारे देश यात सहभागी होतात. तेच याचे सदस्य किंवा भागीदार आहेत.
COP 27 संयुक्त राष्ट्राची हवामान बदलावरची 27 वी वार्षिक बैठक आहे.
ही बैठक इजिप्तच्या शर्म अल-शेख या शहरात 6 ते 18 नोव्हेंबर या काळात होत आहे.
अशा परिषदांची गरज का आहे?
पृथ्वीचं तापमान सतत वाढत आहे. हे तापमान मुख्यत्वे तेल, वायू, कोळसा अशा जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून होणाऱ्या उत्सर्जनामुळे वाढत आहे.
संयुक्त राष्ट्राच्या हवामान शास्त्रज्ञांच्या मतानुसार जागतिक स्तरावर पृथ्वीचं तापमान 1.1 अंश सेल्सियसने वाढलेले आहे आणि ते 1.5 अंश सेल्सियस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे, असं इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी)चं म्हणणं आहे.

आयपीसीसीच्या अनुमानानुसार, जर तापमान 1850च्या दशकाच्या तुलनेत 1.7 किंवा 18. अंश सेल्सियसने वाढलं तर जगातली अर्धी लोकसंख्या जीवघेणी उष्णता आणि आर्द्रतेच्या तडाख्यात सापडेल.
हे थांबवण्यासाठी 194 देशांनी 2015 साली पॅरिस करार केला होता. जागतिक तापमान वाढ 1.5 अंश सेल्सियसच्या खालीच रोखून धरणं हे त्याचं उद्दिष्ट्य होतं.
COP27 मध्ये कोण-कोण असेल?
या परिषदेत सहभागी होण्यासाठी 200 पेक्षा अधिक देशांच्या सरकारांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Reuters
युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान ऋषी सुनक, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासारखे काही नेते कदाचित या परिषदेत सहभागी होऊ शकणार नाही, अर्थात त्यांचे प्रतिनिधी तेथे येतील.
चीनसारख्या काही देशांनी आपले नेते उपस्थित राहातील की नाही याबद्दल कळवलेले नाही.

फोटो स्रोत, Reuters
यजमान इजिप्तने सर्व देशांनी आपापले मतभेद बाजूला ठेवून आपल्या नेतृत्व गुणाचे प्रदर्शन करण्याचं आवाहन केलं आहे.
या नेत्यांशिवाय पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना, कम्युनिटी ग्रुप्स, थिंक टँक, व्यापारी कंपन्या, धार्मिक समूहसुद्धा या परिषदेत सहभागी होतील.
COP27 इजिप्तमध्येच का होत आहे?
अफ्रिकेत होणारी ही पाचवी हवामान परिषद आहे.
अफ्रिकेत होणाऱ्या हवामान बदलाकडे जगाचं लक्ष वेधलं जाईल असं तिथल्या देशांमधील सरकारांना वाटतं. अफ्रिका हे जगातील सर्वात संवेदनशील क्षेत्र आहे असं आयपीसीसीला वाटतं.
एका अंदाजानुसार सध्या पूर्व अफ्रिकेत दुष्काळामुळे 1.7 कोटी लोकांना अन्नाच्या तुटवड्याची समस्या भेडसावत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अर्थात इजिप्तच्या यजमान देश होण्यावरही काही वाद झाले आहेत.
तिथल्या सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभं केल्यामुळे आपल्याला सरकारनं परिषदेत येण्यास मज्जाव केला आहे असं काही मानवाधिकार संघटना आणि पर्यावरण कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
COP27 मध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल?
ही बैठक होण्यापूर्वी सर्वांनी आपापल्या महत्वाकांक्षी राष्ट्रीय योजना प्रस्तुत कराव्यात असं आवाहन केलं होतं. मात्र फक्त 25 देशांनीच ते पूर्ण केलंय.
COP27 मध्ये मुख्यतः तीन मुद्द्यांवर चर्चा होईल-
- उत्सर्जन कमी करणं
- हवामान बदलाचा सामना करण्यासाठी तयार राहणं आणि त्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी विविध देशांना मदत करणं
- या सर्व गोष्टींसाठी विकसनशिल देशांसाठी निधी उभारणं

याशिवाय COP26 मध्ये जे मुद्दे चर्चेत आले नाहीत त्यावरही चर्चा होईल. जसे की-
- नुकसान निवारण आर्थिक सहकार्य. हवामान बदलाच्या परिणामाला तोंड देण्यासाठी देशांसाठी पैसे उभे करणं.
- जागतिक कार्बन बाजाराची स्थापना. जागतिक स्तरावर उत्पादवं आणि सेवांच्या किंमतीत उत्सर्जनाच्या प्रभावालाही जोडणं.
- कोळशाचा वापर कमी करण्यासाठी कटिबद्धतेला अधिक मजबूत करणं.
या संमेलनातून आपल्याला काय अपेक्षा आहेत?
लैंगिक असमानता, कृषि आणि जैवविविधतेसारख्या मुद्द्यांवरील चर्चा आणि घोषणांसाठी या परिषदेतील वेगवेगळ्या दिवसांची वेगवेगळी थीम असेल.

फोटो स्रोत, Getty Images
हवामानावरील चर्चांमध्ये आर्थिक सहकार्य हा मोठा मुद्दा राहिला आहे.
2009 मध्ये विकसित देशांनी 2020मधील विकसनशील देशांना उत्सर्जन कमी करणे आणि हवामान बदलासाठी तयार राहाण्यासाठी 100 अब्ज डॉलर देण्यास कटिबद्ध असल्याची घोषणा केली होती. मात्र हे लक्ष्य साध्य झालं नाही आणि आता ते 2023 पर्यंत पूर्ण करायचे आहे.
ज्या देशांचं नुकसान झालं आहे ते भरपाईसाठी निधी मागत आहेत.
बॉनमध्ये झालेल्या हवामान परिषदेतून भरपाईचा पर्यायच हटवण्यात आला. जर पैसे देण्यास बाध्य केलं तर अनेक दशकं आपल्याला पैसे देत राहावं लागेल अशी भीती विकसित देशांना वाटते.
यावर COP27मध्ये चर्चा व्हावी असं युरोपिय संघाचं म्हणणं आहे.
या परिषदेत तुम्हाला हे पुढील शब्द अनेकदा ऐकायला मिळतील-
पॅरिस करारः हरितगृह वायू उत्सर्जन आणि हवामान बदलाला रोखण्यासाठी पॅरिस कराराने जगातील सर्व देशांना एकत्र आणलं आहे.
आयपीसीसीः हवामान बदलासंदर्भात स्थापन केलेल्या या समुहात अनेक देशांतील शास्त्रज्ञ सहभागी झाले असून ते हवामान बदलावर नवनवीन शोधांसाठी अभ्यास करतात.
परिषद यशस्वी झाल्याचं आपल्याला कसं समजेल?
याचं उत्तर तुम्ही कोणाशी चर्चा करताय यावर अवलंबून आहे.
चर्चेच्या अजेंड्यात नुकसानाच्या भरपाईसाठी निधीची मदत असावी अशी अपेक्षा विकसनशील देश करतील. निधी मिळण्याचा आरंभ करणारी तारीख निश्चित व्हावी अशी त्यांची अपेक्षा असणार.

फोटो स्रोत, Getty Images
भारत, चीन, ब्राझिल, इंडोनेशिया, दक्षिण अफ्रिकेसारखे विकसनशील देश कोळशाचा वापर बंद करण्यास कटिबद्ध असल्याचे जाहीर करतील अशी विकसित देशांना अपेक्षा आहे.
गेल्या वर्षी वने, कोळसा आणि मिथेन वायूसंदर्भात काही करार झाले होते. यावर आणखी काही देश स्वाक्षरी करू शकतात.
काही शास्त्रज्ञांच्या मते जागतिक नेत्यांनी हवामान बदलावर निर्णय घेण्यास फार उशीर केला आहे आणि आता कोणतेही करार होवोत 1.5 अंश सेल्सियसचं लक्ष्य COP27 मध्ये साध्य होणं कठीण आहे.
हवामान बदल
माणसाच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि या Climate Change म्हणजेच हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण होत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
जर याविषयी पावलं उचलली नाहीत तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होईल. भयानक दुष्काळ होतील, समुद्राची पातळी वाढेल आणि पक्षी-प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होतील.
वाढत्या मानवी घडामोडींमुळं कार्बन डाय ऑक्साईड (CO2) उत्सर्जनाचं प्रमाण वाढलं असून, परिणामी तापमानातही वाढ झाली आहे.
हवामान बदल (Climate Change) म्हणजे काय?
एखाद्या ठराविक ठिकाणी अनेक वर्षांपासून असलेली ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची स्थिती म्हणजे हवामान. या सरासरी हवामानातला बदल म्हणजेच क्लायमेट चेंज - हवामान बदल.
माणसाद्वारे घरी, फॅक्टरी आणि वाहतुकीसाठी केला जाणाऱ्या तेल, गॅस आणि कोळशाच्या वापरामुळे हवामानत झपाट्याने बदल होत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
जैवइंधन ज्यावेळी जाळलं जातं, त्यावेळी त्यातून ग्रीन हाऊस गॅसेसचं उत्सर्जन होतं. यात कार्बन डाय ऑक्साईड (CO2)चं प्रमाण जास्त आहे. या वायूंमुळे सूर्याकडून आलेली उष्णता अडकून राहते आणि त्यामुळे पृथ्वीवरचं तापमान वाढतं.
19व्या शतकाच्या तुलने आता जगभरातलं तापमान 1.2 सेल्सिअसने वाढलेलं आहे. तर वातावरणातल्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 50 टक्क्यांनी वाढलंय.
हवामान बदलाचे विपरित परिणाम होणं टाळायचं असेल तर जगाचं तापमान वाढण्यापासून रोखणं गरजेचं असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलंय. 2100 पर्यंत ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण 1.5 सेल्शियसपर्यंत रोखणं गरजेचं आहे.
पण जर वेळीच पावलं उचलली नाहीत तर या शतकाच्या अखेरपर्यंत पृथ्वीचं तापमान 2 अंशांनी वाढण्याची भीती आहे.

फोटो स्रोत, Getty Images
काहीही केलं नाही तर पृथ्वीचं तापमान 4 सेल्सियसने वाढेल आणि परिणामी विनाशकारी उष्णतेची लाट येईल, समुद्राची पातळी वाढल्याने लाखो लोकांची घरं जातील आणि पृथ्वी ग्रहाचं आणि यावरच्या जैवसृष्टीचं भरून न येणारं नुकसान होईल.
हवामान बदलाचे परिणाम काय?
हवामानात होणाऱ्या टोकाच्या बदलांचे परिणाम पहायला मिळत आहेत. यामुळे अनेक आयुष्य आणि रोजीरोटी धोक्यात आलेली आहे.
हवामान बदलामुळं आपली (मानवाची) जीवनशैली बदलू शकते. सुपीक जमिनीचं रेताड जमिनीत रूपांतर होईल. पाण्याच्या कमतरतेुमळं पिकं, अन्न उगवणं देखील कठीण होईल.
समुद्राच्या पातळीत होत असलेल्या वाढीमुळं काही भागांत प्रचंड उष्णता वाढेल, आणि ते ठिकाण निवास करण्यास योग्य राहणार नाहीत. चीन, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्समध्ये आलेल्या पुरामध्ये हे पहायला मिळालं.

फोटो स्रोत, AFP
हवामानात टोकाचे बदल जाणवतील. उष्णतेची लाट, मुसळधार पाऊस, वादळं हे सर्व वारंवार होईल, त्याचं प्रमाणही वाढत जाऊन मानवी जीवनासाठी ते धोकादायक ठरेल.
गरीब देशांतील लोक ज्यांना याच्याशी जुळून घेणं सर्वाधिक कठीण ठरेल त्यांना सर्वाधिक त्रास होईल.
वातावरणावर हवामान बदलाचे परिणाम
ध्रुवावरील बर्फ आणि हिमनद्या वेगानं वितळत आहेत. त्यामुळं समुद्राची पातळी वाढत असलेल्या सखल किनारी भागांमध्ये पुराचा धोका वाढला आहे.
सायबेरिया सारख्या ठिकाणी पर्माफ्रॉस्टसारखी ठिकाणं वितळतील.
आपल्या वातावरणात सोडला जाणारा मिथेन हा आणखी एक हरितगृह वायूदेखील हवामान बदलाची तीव्रता अधिक वाढवत आहे.

जंगलात आगी लागण्याच्या, वणवे पेटण्याच्या घटनांसाठी अनुकुल असं हवामान अधिक प्रमाणात तयार होईल.
निसर्गावरचे हवामान बदलाचे परिणाम
निवासस्थानं बदलत असल्यानं काही प्रजाती या नव्या ठिकाणी स्थलांतरीत होतील.
मात्र हवामान बदल एवढ्या झपाट्यानं होत आहे, की त्यापैकी अनेक नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
ध्रुवीय अस्वलं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कारण ते अवलंबून असलेल बर्फच वितळू लागला आहे.
अटलांटिक साल्मन नदीच्या पाण्यात नष्ट होऊ शकतात. नदीच्या पाण्याचं तापमान वाढल्यानं त्यांच्यावर परिणाम होईल.
समुद्र अधिक प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषत असून त्यामुळं पाण्यात अॅसिडचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळं Tropical coral reefs सारखे सागरी जीव नष्ट होतील.
हवामान बदलाची कारणं काय?
हवामानात नैसर्गिक बदल हे पूर्वीपासून होत आलेले आहेत.
मात्र आता, विविध मानवी घडामोडींमुळं जागतिक तापमानात वाढ होत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
वीज प्रकल्प, वाहतूक आणि घरांमध्ये उष्णता वाढवण्यासाठी आपण इंधन, गॅस आणि कोळसा वापरायला सुरुवात केली, तेव्हापासून आतापर्यंत जगात 1.2 सेल्सिअस एवढं तापमान वाढलं आहे.
त्याशिवाय या इंधनांच्या वापरामुळं हवेत सोडले जाणारे वायू हे, सूर्याची ऊर्जा अडवतात.
19 व्या शतकापासून आतापर्यंत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड (CO2) या एकट्या हरितगृह वायूचं प्रमाण 50 टक्क्यांनी वाढलं आहे. तर गेल्या 20 वर्षात त्यात 12 टक्के वाढ झाली आहे.
हरितगृह वायुंचं प्रमाण वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे जंगलतोड.

फोटो स्रोत, Getty Images
झाडं जेव्हा जाळली किंवा तोडली जातात, तेव्हा ते साठवलेला कार्बन वातावरणात सोडत असतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








