गुलाबराव पाटील छंदीफंदी शायर - सुषमा अंधारे : #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, FACEBOOK
आज सकाळी विविध वेबसाइट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. सुषमा अंधारे- मी तुम्हाला 'सळो की पळो' करून सोडणार आहे
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाचे नेते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीयेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मंगळवार (1 नोव्हेंबर) धरणगाव येथे प्रबोधन सभा घेऊन शिंदे गटावर चौफेर टीका केली.
अंधारे यांनी शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली आणि 'मी तुम्हाला सळो की पळो करून सोडणार, आज तुम्हाला झोप येणार नाही,' असा इशाराही त्यांनी पाटील यांना दिला. तसंच यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील छंदीफंदी शायर असल्याची टीकाही केलीय.
सुषमा अंधारे यांनी म्हटलं, "आमचं नेतृत्व हे संयमी आणि शिस्तबद्ध आहे. आमचे 40 भाऊ तिकडे गेले आहेत. त्यातील एक शेरो शायरी करणारे भाऊ गुलाबराव पाटील. एकाच घरात किती दिवस सत्ता ठेवायची असं म्हणतात. मात्र, ते कधीपासून पद भोगत आहेत? गुलाबराव पाटील यांनी स्वतःचा चेहरा आरशात पाहावा. तुम्ही 20 वर्षं वेगवेगळ्या मार्गाने सत्ता भोगत आहात. मग इतर कार्यकर्त्यांना तुम्ही पुढे करून त्यांना सत्तेवर का आणलं नाही?"
न्यूज18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.
2. '...तर राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं'
राज्यातील सत्ता संघर्षाची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. शिंदे आणि ठाकरे गटासाठी ही अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं असं मोठं विधान घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी केलं आहे.
शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं, अशी मागणी करणारी याचिका ठाकरे गटाने केली आहे. या आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे.

फोटो स्रोत, TWITTER/SHIV SENA
मुख्यमंत्रीच अपात्र झाले तर सरकार पडेल असा दावा उल्हास बापट यांनी केल्याचं टीव्ही9 मराठीनं आपल्या बातमीत म्हटलं आहे.
जर 16 आमदार अपात्र झाले तर 40 आमदारही अपात्र होतील, असं मत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केलं आहे.
कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी महाविकास आघाडीला बोलावलं तर सरकार पुन्हा येऊ शकतं, असा दावा देखील बापट यांनी केला आहे.
दरम्यान, सत्ता संघर्षाची सुनावणी लांबणीवर पडली आहे. चार आठवड्यानंतर आता पुढची सुनावणी होणार आहे. दोन्ही गटांना कागदपत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
3. पहिली वेळ असल्याने माफ करतो- बच्चू कडूंचा रवी राणांसोबतच्या वादावर पडदा
"कोणीही यावं आणि काहीही म्हणावं एवढं आम्ही सोप्पं नाही. पहिली वेळ असल्याने माफ करतो. पण, यानंतर कोणीही आमच्याविरुद्ध बोललं, तर 'प्रहार'चा वार दाखवू," अस म्हणत अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्यासोबतच्या वादावर पडदा टाकला.
आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात 'खोक्यां'वरून वाद रंगला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर रवी राणांनी दिलगिरी व्यक्त करत बच्चू कडू यांची माफी मागितली होती. बच्चू कडू यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं.

फोटो स्रोत, BACCHU KADU
1 नोव्हेंबरला 'प्रहार'च्या कार्यकर्त्यांची अमरावतीत बैठक पार पडली. यात बच्चू कडू यांनी रवी राणांना माफ केल्याचं जाहीर केलं.
लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
"रवी राणांनी दिलगिरी व्यक्त केली, त्याचा आनंद आहे. अन्यथा आम्हाला उगाच अधिक हातपाय हालावावे लागले असते. पण, रवी राणांनी मोठेपणा घेत माफी मागितली त्याबद्दल पुन्हा आभार मानतो," असंही बच्चू कडूंनी म्हटलं.
4. शिंदे गटात गेलेले सर्व आमदार नैराश्यात- बाळासाहेब थोरात
शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेले सर्व आमदार नैराश्यात असल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. थोरात यांनी मंगळवारी (1 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केल्याचं झी 24 तासने आपल्या बातमीत म्हटलं आहे.

फोटो स्रोत, BALASAHEB THORAT TWITTER
"राज्य सरकार मधील अनेक खाती रिकामी असून सरकारमध्ये सगळा गोंधळ आहे. राज्याचे प्रकल्प पळवून नेले जातायत. सगळीकडे अतिवृष्टी होऊन पिकं हातातून गेललीयत. सरकार मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे तिजोरीत पैसा नाही असं राज्य सरकारने जाहीर करावं," असंही ते म्हणाले.
राज्यात पंचनामे करण्यासाठी लाच मागितली जात असल्यानं राज्यातील परिस्थितीकडे मंत्र्यांनी लक्ष द्यावं, असंही ते म्हणाले.
5. आमची यात्रा द्वेष-हिंसाचाराच्या विरोधात- राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो' यात्रा तेलंगणामध्ये दाखल झाली आहे. मंगळवारी (1 नोव्हेंबर) हैदराबादमध्ये राहुल गांधी यांनी या यात्रेदरम्यान जाहीर सभेला संबोधित केलं.
यावेळी भाजपवर निशाणा साधत राहुल गांधी यांनी म्हटलं, "आमची यात्रा द्वेष आणि हिंसाचाराच्या विरोधात आहे. भाजप-आरएसएस द्वेष पसरवण्याचे काम करतात. ते भावाला भावाशी लढवण्याचं काम करत आहेत. यामुळे देश कमजोर होत आहे, मजबूत नाही. कोणतीही शक्ती या यात्रेला रोखू शकत नाही. ही यात्रा हा भारताचा खरा आवाज आहे."

फोटो स्रोत, Rahul Gandhi/ Twitter
राहुल गांधी यांनी हैदराबादची ओळख असलेल्या चारमिनारसमोर तिरंगा फडकावला. 32 वर्षांपूर्वी त्यांचे वडील आणि काँग्रेसचे तत्कालीन पक्षाध्यक्ष राजीव गांधी यांनीही याच ठिकाणाहून 'सद्भावना यात्रा' सुरू केली होती.
राहुल गांधींनी राष्ट्रध्वज फडकावला तेव्हा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश, पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रेवंत रेड्डीही उपस्थित होते.
एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.
2016 मध्ये आत्महत्या करणारा दलित विद्यार्थी रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला यांनीही 'भारत जोडो' यात्रेत राहुल गांधींची भेट घेतली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
त्यानंतर राहुल गांधी यांनी रोहित वेमुलाबद्दल ट्वीट करत म्हटलं की, रोहित वेमुला म्हणजे सामाजिक भेदभाव आणि अन्यायाविरुद्धच्या माझ्या संघर्षाचे प्रतीक आहे. तसंच रोहित वेमुलाच्या आईने या यात्रेत सहभाग दर्शवल्याने भारत जोडोला नवं धैर्य मिळालं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








