टाटा एअरबस प्रकल्प वाद : सर्व प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढणार - उदय सामंत

फोटो स्रोत, Facebook
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे या दोघांनीही काल (31 ऑक्टोबर) एकमेकांवर महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जाण्याच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप केले. त्यानंतर आज महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकल्पांबाबत श्वेतपत्रिका काढणार असल्याची माहिती दिली.
उदय सामंतांनी महाविकास आघाडी सरकारला उद्देशून प्रश्न विचारले की, "वेदांताच्या बाबतीत 5 जानेवारी 2022 ला अर्ज सादर केल्यानंतर आपण हायपॉवर कमिटीची बैठक का घेतली नाही? ती बैठक शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर का घ्यावी लागली?"
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त, 1
"गाजावाजा करत जे MoU झाले, त्यांची अंमलबजावणी का झाली नाही? त्या अंमलबजावणीसाठी आवश्यक मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक 14 महिने का होऊ शकली नाही? याचं उत्तर महाराष्ट्राला आणि मला मिळालं नाही," असं उदय सामंत म्हणाले.

तसंच, या सर्व प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढणार असल्याची माहितीही उदय सामंतांनी दिली.
टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांकडून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली जात असताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची बाजू मांडली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आजच (31 ऑक्टोबर) केंद्र सरकारनं इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर केलंय. महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून ते विकसित करतील. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की, भविष्य हे इलेक्ट्रॉनिकमध्ये आहे. सर्वाधिक गुंतवणूक यात आहे."
"त्यामुळे एकप्रकारे केंद्र सरकारनं दिलेली ही भेटच आहे. यासोबत लवकरच मला अपेक्षा आहे की, नवीन वर्षात महाराष्ट्राला केंद्र सरकार टेक्स्टाईल पार्क सुद्धा देणार आहेत. यातनं टेक्स्टाईल क्लस्टर सुद्धा तयार होणार आहे. याचं प्रपोजल अंतिम टप्प्यात सादर झालंय. बजेटपर्यंत याची घोषणाही होण्याची शक्यता आहे."
"एकीकडे महाराष्ट्रात आमचं सरकार येऊन तीनच महिने झाले तरीही एक फेक नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतोय की, महाराष्ट्रातून उद्योग चालले आहेत. या फेक नेरेटिव्हमध्ये काही राजकीय पक्ष आणि त्यांची इकोसिस्टिम, आणि दुर्दैवाने बोटावर मोजण्याइतके चार-पाच HMV (His Masters Voice) पत्रकार. हे सगळे मिळून महाराष्ट्राच्या बदनामीचा घाट घातलाय," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीस पुढे म्हणाले की, "महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कारकीर्दीत भ्रष्टाचार, गृहमंत्री जेलमध्ये, पोलीस आयुक्त जेलमध्ये, वसुली इतके भयानक कांड झाले की, कुणीही महाराष्ट्रात यायला तयार नव्हतं, गुंतवणूक करायला तयार नव्हतं. ही जी महाराष्ट्रातली विस्कटलेली घडी आहे, ती घडी जागेवर आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय."

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC
"मागच्याच मंत्रिमंडळ बैठकीत 25 हजार कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना आम्ही मान्यता दिलीय. दुर्दैवानं, HMV नं ते ट्वीट केलं नाही, पण आपल्यापैकी अनेकांनी ते दाखवलं आहे, सांगितलंही आहे."
नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाला विरोध झाल्यामुळे या प्रकल्पाचा काही भाग केरळात जाणार आहे असे फडणवीस यांनी सांगितले. हा प्रकल्प 'गुंतवणुकीचा बाप' होता असे ते म्हणाले.
"गुंतवणुकीचा बाप म्हणजे महाराष्ट्रात येऊ घातलेली रिफायनरी. बाप यासाठी की, आजपर्यंत देशात कधीही गुंतवणूक झाली नाही. एक लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना थेट रोजगार, 5 लाखांपेक्षा जास्त इतर रोजगार, अशी रिफायनरी ज्या लोकांच्या विरोधामुळे होऊ शकली नाही. रिफायनरी होणारच आहे. पण काही भाग केरळमध्ये होऊ शकते. आमचा प्रयत्न आहे की, महाराष्ट्रात व्हावी. आलेल्या गुंतवणुकीला परत पाठवली आणि महाराष्ट्राचं अतोनात नुकसान केलं. तेच आता बोलतायेत. हे जात असताना कुठलेही HMV बोललेले नाहीत, साधा ट्वीटही त्यांनी केलेला नाही."
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त, 2
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू-रवी राणा वादावरही भाष्य केलं. ते म्हणाले, "बच्चू कडू माझ्या फोनवर गुवाहाटीला गेले होते. माझ्या एका कॅालवर ते केले. त्यांना सौदा केला असं म्हणणं चुकीचं. बच्चू कडू यांच्यावर केलेला आरोप चुकीचा आहे."
फडणवीसांनंतर आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि फडणवीसांनी मांडलेले मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला.

"राज्याच्या प्रमुखांनी उत्तर देणं अपेक्षित आहे. भले लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचली तरी चालेल. पण त्यांनी बोललं पाहिजे. या सरकारमध्ये पॉवर सेंटर कुठे आहे हे आज कळलं," असं म्हणत आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
"आपल्या राज्यात येणार अनेक उद्योग दुसऱ्या राज्यात गेले. या सरकारने एक प्रकल्प दाखवला. त्याचा MOU आम्ही केला होता. उपमुख्यमंत्र्यांना कोणीतरी चुकीचं ब्रीफ केलंय," असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य पुढे म्हणाले, "सुभाष देसाई यांच्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे. दोन विविध प्रस्ताव होते. चुकीच्या गोष्टी पसरवू नका. महाराष्ट्राशी खोटं बोलण्याचा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीसांनी दावा केलेला फॉक्सकॉन आणि आता गुजरातला गेलेला प्रकल्प दोन्ही वेगळे आहेत."
वेदांता प्रकल्पाबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "दावोसमध्ये आम्ही वेदांताच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तुम्ही राज्यात या असं आम्ही त्यांना सांगितलं. आपण गुजरातपेक्षा 10 हजारो कोटी जास्त सबसिडी दिली होती. पण तरी हा प्रकल्प गुजरातला गेला. ते म्हणतात 21 मध्ये वेदांताने गुजरातला जाण्याचं निश्चित केलं तर मग आमच्यासोबत काय टाईमपास करत होते का? वेदांता-फॉक्सकॉन आणि वेदांता हे दोन्ही प्रकल्प वेगळे आहेत."
"पत्रकारांना हिज मास्टर्स व्हॉईस आणि बेरोजगार तरुणांना शेंबडी पोरं म्हणणं हे पत्रकार आणि आंदोलकांचा अपमान आहे. हे निंदनीय आहे. हे वक्तव्य त्यांनी मागे घ्यावं," असं म्हणत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना उत्तर दिलं.
"समृद्धी महामार्गाचं उद्घाटन अजून का झालं नाही? कोणत्या निवडणुकीसाठी थांबला आहात का? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं," अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








