ट्वेन्टी20 विश्वचषक : रोहित शर्माचा षटकारांचा विक्रम; भारतीय संघाचा नेदरलँड्सविरुद्ध 'विजयी' सराव

फोटो स्रोत, Mark Metcalfe-ICC
पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलपर्यंत विजयासाठी संघर्ष करून जिंकलेल्या भारतीय संघाने नेदरलँड्सवर दणदणीत विजय मिळवला. या दोन विजयांसह भारतीय संघाने 4 गुण झाले आहेत.
भारतीय संघाचा पुढचा मुकाबला 30 ऑक्टोबरला पर्थ येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होत आहे. पावसामुळे अनेक सामन्यांना फटका बसत असल्याने सर्वच्या सर्व गुण पटकात सेमी फायनलमध्ये आगेकूच करणं भारतीय संघासाठी महत्त्वाचं आहे.
सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सकाळी दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. मात्र जसजशी दुपार होत गेली तसं ढग सरले आणि सूर्याचं आगमन झालं.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला. भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धच्या लढतीतील संघच कायम ठेवला. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातला ट्वेन्टी20 प्रकारातला हा पहिलाच सामना होता.
के.एल.राहुल झटपट माघारी परतला. पॉल व्हॅन मीकरनने त्याला एलबीडब्ल्यू केलं. रिप्लेत बॉल लेगस्टंपच्या बाहेरून जात असल्याचं सिद्ध केलं. यानंतर अनुभवी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची जोडी जमली. दोघांनाही नेदरलँड्सच्या बॉलिंगचा समाचार घेतला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 73 रन्सची भागीदारी केली. आक्रमक पवित्र्यात खेळणाऱ्या रोहितचे शतकी मनसुबे दिसत होते पण फ्रेड लासेनने रोहितला तंबूत धाडलं. रोहितने 39 बॉलमध्ये 4 फोर आणि 3 सिक्ससह 53 धावांची खेळी केली.

रोहित आऊट झाल्यावर विराटला सूर्यकुमार यादवची साथ लाभली. कोहली-यादव जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 48 बॉलमध्ये 95 भागीदारी केली. कोहलीने 44 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्ससह नाबाद 62 रन्सची खेळी केली. सूर्यकुमारने कारकीर्दीत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळताना 25 बॉलमध्ये 7 फोर आणि एका सिक्ससह नाबाद 51 रन्सची वेगवान खेळी साकारली. या दोघांच्या भागीदारीच्या बळावर भारताने 179 रन्सची मजल मारली.

फोटो स्रोत, Getty Images
प्रत्युत्तरादाखल खेळताना नेदरलँड्सने सातत्याने विकेट्स गमावल्या. टिम प्रिंगलने सर्वाधिक 20 रन्स केल्या. भारतातर्फे भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि रवीचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत नेदरलँड्सच्या डावाला खिंडार पाडले.
सूर्यकुमार यादवला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या गटात 4 गुणांसह अव्वल स्थानी आहे.
रोहित शर्माचा षटकारांचा विक्रम
नेदरलँड्सविरुद्धच्या लढतीत भारताचा कर्णधार रोहित शर्माने ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय बॅट्समनचा सर्वाधिक सिक्सेसचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे रोहितने मित्र आणि माजी भारतीय खेळाडू युवराज सिंगचाच रेकॉर्ड मोडला.

रोहित शर्माच्या नावावर आता ट्वेन्टी20 वर्ल्डकपमध्ये आता 34 सिक्स आहेत. युवराजचा 33 सिक्सचा रेकॉर्ड रोहितने मोडला. ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक सिक्स ख्रिस गेलच्या (63) नावावर आहेत.
आतापर्यंतच्या झालेल्या सर्व ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. रोहित 2007, 2009, 2010, 2012, 2014, 2016, 2021 आणि आता होत असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी झाला आहे. रोहितच्या बरोबरीने हा रेकॉर्ड बांगलादेशच्या शकीब उल हसनच्या नावावर आहे.
रोहितने 144 सामन्यात 31.88च्या सरासरीने आणि 140.31च्या स्ट्राईकरेटने 3794 रन्स केल्या आहेत. ट्वेन्टी20 प्रकारात भारतासाठी खेळताना रोहितने 4 शतकं झळकावली आहेत. या शतकांच्या बरोबरीने रोहितच्या नावावर 29 अर्धशतकंही आहेत.
ट्वेन्टी20 प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत रोहित दुसऱ्या स्थानी आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली या यादीत अव्वल स्थानी आहे.
ट्वेन्टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सेचचा (181) विक्रमही रोहितच्याच नावावर आहे. आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माच्या नावावर पाच जेतेपदंही आहेत. ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच रोहित भारतीय संघाची धुरा सांभाळतो आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








