ट्वेन्टी-20 वर्ल्डकप : क्रिकेटमध्ये 'या' 11 प्रकारे खेळाडू आऊट होऊ शकतो...

विराट कोहली बाद

फोटो स्रोत, Getty Images

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत-पाकिस्तान लढतीदरम्यान विराट कोहली बोल्ड होऊनही आऊट झाला नव्हता.

आधीचा बॉल नोबॉल दिल्याने त्या बॉलला फ्री हिट लागू होती. फ्री हिटवर बॅट्समनला फक्त रनआऊट केलं जाऊ शकतं. यानिमित्ताने बॅट्समनला आऊट करण्याचे किती प्रकार आहेत याचा घेतलेला आढावा.

1.बोल्ड (त्रिफळाचीत)

बॉलर मंडळींना सर्वाधिक आनंद देणारा प्रकार. बॅट्समनच्या मागे असलेले स्टंप्स आणि बेल्स उडवणं यासारखा आनंद नाही असं अनेक बॉलर आवर्जून सांगतात.

बॅट्समनच्या बचावाचा भेद करून अशी विकेट मिळवणं प्रत्येक बॉलरचं स्वप्न असतं. मोठे बॅट्समन बोल्ड होणं चांगलं मानत नाही कारण त्यातून तुमचं तंत्रकौशल्य समाधानकारक नसल्याचं सिद्ध होतं.

बोल्ड, आऊट

फोटो स्रोत, Quinn Rooney

फोटो कॅप्शन, के.एल.राहुल बोल्ड झाला तो क्षण

बॅट आणि बॉलमधली ही जुगलबंदी चाहत्यांना अतीव आनंद देते. तीन स्टंप्स आणि दोन बेल्स यांच्यापैकी कशालाही बॉल लागून ते आपल्या जागेवरून विलग झाले तर बोल्ड असं लिहिलं जातं. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर इलेक्ट्रिक बेल्स बसवण्यात येतात. ज्यावेळी बॉलचा बेल्सला संपर्क होतो तेव्हा बेल्समधले लाईट प्रज्वलित होतात.

2.कॉट (झेलबाद)

बॅट्समनने टोलवलेला बॉल विकेटकीपर तसंच अन्य फिल्डर्सच्या हातात जाऊन विसावला तर त्याला कॉट म्हटलं जातं. विकेटकीपर स्टंप्सच्या मागे कॅच पकडू शकतो. विकेटकीपर आणि स्लिपमध्ये तैनात फिल्डर्सनी कॅच पकडला तर कॉट बिहाइंड अर्थात स्टंप्सच्या मागे कॅच असं म्हटलं जातं.

कॅच

फोटो स्रोत, Joe Allison

फोटो कॅप्शन, फिल्डरने कॅच पकडला तो क्षण

बाकी फिल्डर आपापल्या जागी कॅच टिपू शकतात. बॉलरने फॉलोथ्रूमध्ये म्हणजे बॉल टाकल्यानंतर स्वत:च कॅच पकडला तर त्याला कॉट अँड बोल्ड म्हटलं जातं.

3.लेग बिफोर विकेट (पायचीत)

कोणताही वैध बॉल बॅट्समनच्या पायाला किंवा अन्य भागाला बॅटला स्पर्श होण्यापूर्वी लागला आणि तो बॉल स्टंप्सचा वेध घेत असेल तर त्यावेळी एलबीडब्ल्यू आऊट दिलं जातं. क्रिकेटविश्वातला हा सगळ्यात वादग्रस्त मानला जाणारा आऊट होण्याचा प्रकार आहे.

एलबीडब्ल्यू

फोटो स्रोत, MARCO LONGARI

फोटो कॅप्शन, एलबीडब्ल्यूचं अपील

बॉल आधी पायाला किंवा शरीराच्या भागाला लागला? का आधी बॅटला लागला यावरून पुरेशी स्पष्टता नसते. एलबीडब्ल्यू आऊट देण्यासाठी हॉकआय आणि बॉल ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. मात्र एवढं अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुनही अनेकदा एलबीडब्ल्यूबाबाबत वाद निर्माण होतो.

4.रनआऊट (धावबाद)

बॉल तटवून काढल्यानंतर बॅट्समन धाव घेऊ लागतात. धाव पूर्ण करताना विकेटकीपर एन्डला किंवा बॉलर एन्ड असलेल्या क्रीझमध्ये बॅट असणं अपेक्षित असतं. बॅट्समन धाव पूर्ण करत असताना तो किंवा बॅट क्रीझमध्ये नसेल आणि त्याचवेळी विकेटकीपर किंवा बॉलर तसंच अन्य फिल्डरने स्टंप्स-बेल्स उडवल्या तर रनआऊट दिलं जातं.

रनआऊट होऊ नये यासाठी रनिंग बिटविन द विकेट्स उत्तम असावं लागतं. दोन्ही बॅट्समनमधला समन्वय कमालीचा लागतो. तसं झालं नाही तर रनआऊटची शक्यता वाढते. अनेक मोठे बॅट्समन चापल्य नसल्यामुळे रनआऊट होतात.

रनआऊट

फोटो स्रोत, Alex Davidson

फोटो कॅप्शन, रनआऊट

काही दिवसांपूर्वी इंग्लंड आणि भारत महिला संघाच्या सामन्यादरम्यान बॉलर दीप्ती शर्माने इंग्लंडच्या बॅट्समनला बॉलिंग करताना रनआऊट केलं. नियमानुसार नॉन स्ट्रायकर एन्डला असलेल्या बॅट्समनची बॅट, बॉलर बॉलिंग करत असताना क्रीझमध्ये असणं अपेक्षित आहे.

इंग्लंडची बॅट्समन सातत्याने क्रीझबाहेर राहून खेळत असल्याचं लक्षात आल्यानंतर दीप्तीने तिला रनआऊट करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या रनआऊटला मंकडिंग असं म्हटलं जायचं. यासंदर्भातला नियम संदिग्ध होता. अशा पद्धतीने आऊट करणं स्पिरीट ऑफ दे गेमला धरून नाही असंही मानलं जातं. पण आता यासंदर्भातील नियम सुस्पष्ट करण्यात आला आहे.

5.स्टंपिंग (यष्टीचीत)

जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅट्समन क्रीझबाहेर जातो, बॉलचा अंदाज न आल्याने तो विकेटकीपरकडे जातो. विकेटकीपरने झटपट स्टंप्सचा-बेल्सचा वेध घेतला तर त्याला स्टंपिंग म्हटलं जातं. हा एकप्रकारे रनआऊटचाच प्रकार आहे.

स्टंपिंग

फोटो स्रोत, Stu Forster-ICC

फोटो कॅप्शन, भारताचा माजी खेळाडू महेंद्रसिंग धोनी स्टंपिंग करताना

स्टंपिंग करण्याचा अधिकार आणि संधी फक्त विकेटकीपरलाच मिळते. स्पिनर बॉलिंग करताना विकेटकीपर स्टंप्सजवळ उभा राहतो. त्यावेळी स्टंपिंगची शक्यता वाढते. ट्वेन्टी20 क्रिकेटमध्ये कमीत कमी बॉलमध्ये जास्तीत जास्त रन्स करणं हे बॅट्समनचं उद्दिष्ट असतं. अशावेळी क्रीझबाहेर पडून मोठा फटका मारण्याचा बॅट्समनचा प्रयत्न असतो. हा प्रयत्न फसला तर विकेटकीपर आपलं काम फत्ते करू शकतो. स्टंपिंगचं यश विकेटकीपर किती चापल्यपूर्ण आहे यावर अवलंबून असतं.

6.रिटायर्ड (निवृत्त)

बॅट्समन दुखापतीमुळे किंवा अन्य काही कारणांमुळे खेळताना अंपायर्सच्या परवानगीविना तंबूत परतला. परतल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराच्या संमतीने तो इनिंग्ज पुन्हा सुरू करू शकतो. तो निर्धारित वेळेत खेळायला परत आलाच नाही तर आऊट दिलं जाऊ शकतं. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत केवळ दोन बॅट्समनना रिटायर्ड आऊट देण्यात आलं आहे. 2001 मध्ये श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील टेस्टदरम्यान मर्वन अट्टापट्टू (201) आणि माहेला जयवर्धने (150)

7.हिट द बॉल ट्वाईस

बॅट्समनला बॉलरने बॉल टाकल्यानंतर एकदाच खेळण्याची संधी मिळते. एकदा फटका खेळल्यानंतर बॅट्समनने पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला तर नियमानुसार आऊट दिलं जाऊ शकतं. बॅट्समनने बॅटने किंवा शरीराच्या एखाद्या भागाने दुसऱ्यांदा खेळणं नियमानुसार अवैध आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये अद्यापतरी या नियमानुसार कोणीही आऊट झालेलं नाही.

8.हिट विकेट (स्वयंचित)

क्रिकेटविश्वातला आऊट होण्याचा हा सगळ्यात विचित्र प्रकार आहे. बॅट्समन बॉल तटवून खेळण्याच्या प्रयत्नात असताना त्याची बॅट किंवा शरीराचा कोणताही भाग स्टंप्सवर, बेल्सवर आदळला तर हिट विकेट दिलं जातं. मोठा फटका मारताना किंवा स्वीप करताना बॅट्समन संतुलन गमावतो आणि तो स्वत:च स्टंप्सवर आदळतो किंवा त्याची बॅट, हेल्मेट, अन्य उपकरणांपैकी एखादं स्टंप्सवर जाऊन आदळतं.

हिटविकेट

फोटो स्रोत, Twitter/Iceland Cricket

फोटो कॅप्शन, इंझमाम उल हक हिटविकेट झाला तो क्षण

बॅट्समन शक्यतो फटका खेळताना आपण क्रीझमध्ये कुठे उभे आहोत याचं भान राखून असतात पण काहीवेळेला स्टंप्सजवळ उभं राहिल्याने शरीराचा भाग स्टंप्सला लागतो. हेल्मेट किंवा कॅप स्टंप्सवर जाऊन पडते. 2007 साली ड्वेन ब्राव्होने टाकलेल्या उसळत्या चेंडूने केव्हिन पीटरसनच्या हेल्मेटचा वेध घेतला. हेल्मेट पीटरनसच्या डोक्यातून निघालं आणि स्टंप्सवर जाऊन आदळलं.

हिटविकेटचं सगळ्यात चर्चित उदाहरण म्हणजे 2006 मध्ये पाकिस्तान-इंग्लंड टेस्टदरम्यान पाकिस्तानचा कर्णधार इंझमाम उल हकचा स्वीपचा प्रयत्न फसला आणि तो स्वत:च स्टंप्सवर पडला. अर्थातच त्याला हिटविकेटच्या नियमानुसार आऊट देण्यात आलं.

9.ऑब्स्ट्रक्टिंग द फिल्ड

बॅट्समनने कृतीने किंवा बोलून फिल्डिंग करणाऱ्या टीमला रोखायचा प्रयत्न केला तर ऑब्स्ट्रक्टिंग द फिल्डनुसार आऊट दिलं जातं. टेस्ट क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ एकदा या नियमानुसार इंग्लंडच्या लेन हटन यांना आऊट देण्यात आलं आहे.

भारत-पाकिस्तान सामन्यात एकदा अशा प्रकारची विकेट भारताला मिळाली होती. भारताचा क्षेत्ररक्षक सुरेश रैना याने विकेटकिपरकडे फेकलेला थ्रो अडवल्याने पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू इंझमाम-उल-हक याला अंपायरनी बाद ठरवलं होतं.

10.टाईम आऊट

एखादा बॅट्समन आऊट झाल्यानंतर पुढचा बॅट्समन मैदानात खेळायला उतरतो. या बदलासाठी तीन मिनिटं मिळतात. ड्रेसिंगरुममध्ये सज्ज असलेल्या बॅट्मनला क्रीझवर पोहोचण्यासाठी हा वेळ मिळतो. त्यावेळेत बॅट्समन मैदानात खेळायला पोहोचला नाही तर त्याला टाईम आऊट दिलं जातं.

11.हँडल द बॉल

बॅट्समनने हाताने बॉल रोखायचा प्रयत्न केला तसंच बॉल आपल्यादिशेने येत असताना हाताने किंवा शरीराच्या कोणत्याही भागाने थांबवण्याचा प्रयत्न केल्यास हँडल द बॉल नियमामुसार आऊट दिलं जाऊ शकतं.

मायकेल वॉन, हँडल द बॉल

फोटो स्रोत, Laurence Griffiths

फोटो कॅप्शन, 2001 मध्ये इंग्लंडच्या मायकेल वॉनला हँडल द बॉल साठी आऊट देण्यात आलं होतं.

स्पिरीट ऑफ द गेम लक्षात घेऊन अशी घटना घडल्यास प्रतिस्पर्धी संघ अपील करत नाही. टेस्ट क्रिकेटमध्ये आतापर्यंत सात तर वनडेत दोन बॅट्समनना हँडल द बॉल साठी आऊट देण्यात आलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)