T20 वर्ल्ड कप 2022 बाबत तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं

यावर्षी आयसीसी T-20 वर्ल्ड कपच्या मॅचेस ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहेत. या स्पर्धेमध्ये पहिली मॅच 16 ऑक्टोबरला, तर फायनल 13 नोव्हेंबरला खेळली जाईल. आता या स्पर्धेसाठी भारतीय संघाचीही घोषणा करण्यात आलीय.

त्यामुळे क्रिकेटप्रेमींनी T-20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक पाहायलाचं हवं.

T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये कोणते संघ सहभागी होणार?

या वर्ल्ड कपमध्ये एकूण 16 संघ सहभागी होतील. संपूर्ण स्पर्धा ही ग्रुप स्टेज आणि सुपर-12 मध्ये विभागण्यात आलीय.

पहिल्यांदा आपण ग्रुप स्टेज बघूया. या राऊंडसाठी दोन ग्रुप बनवण्यात आलेत.

ग्रुप A मध्ये श्रीलंका, नामिबिया आणि दोन क्वालीफायर संघांचा समावेश असेल. तर दुसरीकडे ग्रुप B मध्ये वेस्ट इंडिज, स्कॉटलंड आणि दोन क्वालिफायर संघ असतील.

या दोन्ही ग्रुपमधील टॉपच्या 2 संघांना सुपर-12 मध्ये खेळण्याची संधी मिळेल.

आता सुपर-12 स्टेज बघूया. 2021 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये जे टॉप 8 संघ होते तेच संघ या स्पर्धेच्या सुपर-12 स्टेजमध्ये असतील.

यात इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, साऊथ आफ्रिका आणि बांगलादेश हे संघ आहेत.

आता या सुपर-12 च्या ग्रुपमध्ये 8 संघांव्यतिरिक्त, ग्रुप A आणि ग्रुप B मधील टॉपचे 2 संघही असतील. आणि ही सुपर -12 सुद्धा दोन ग्रुपमध्ये विभागली जाईल.

ग्रुप- 1 इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, ग्रुप A मधील विजेता संघ आणि ग्रुप B मधील उपविजेता संघ असेल.

ग्रुप- 2 भारत, पाकिस्तान, साऊथ आफ्रिका, बांग्लादेश, ग्रुप B मधील विजेता आणि ग्रुप A चा उपविजेता संघ असेल.

T20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची निवड

आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताची टीम फायनल झाली असून या टीममध्ये रोहित शर्मा (कॅप्टन), के. एल. राहुल (व्हाईस कॅप्टन), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेट-कीपर), दिनेश कार्तिक (विकेट-कीपर), हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंह हे खेळाडू आहेत.

तर मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवि बिष्णोई आणि दीपक चाहर स्टॅण्ड बायवर आहेत.

T20 वर्ल्ड कप 2022 च्या मॅचेस कोणत्या देशात खेळवल्या जाणार?

T20 वर्ल्ड कप 2022 ची स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहे. ऑस्ट्रेलियातील सात ठिकाणी या मॅचेस होतील. यातील पहिल्या सहा मॅच जिलॉन्ग शहरातील कार्डिनिया पार्कच्या स्टेडियमवर पार पडतील.

तर बॉबार्टच्या बेलेरिव्ह ओव्हलवर नऊ मॅच खेळवण्यात येतील. त्यातल्या पहिल्या सहा आणि नंतर सुपर 12 स्टेजच्या तीन अशा एकूण नऊ मॅच होतील.

याव्यतिरिक्त सुपर - 12 च्या दुसऱ्या मॅचेस ऑस्ट्रेलियातील इतर स्टेडियमवर पार पडतील.

  • द गाबा, ब्रिस्बेन
  • पर्थ स्टेडियम, पर्थ
  • एडिलेड ओवल, एडिलेड
  • सिडनी क्रिकेट ग्राऊंड, सिडनी
  • मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, मेलबर्न

T20 वर्ल्ड कप 2022 च्या सुपर-12 मॅचेस कधीपासून सुरू होणार?

पहिली लढत 16 ऑक्टोबरला होणार असून त्यात श्रीलंका आणि नामिबिया आमनेसामने असतील. ही ग्रुप स्टेजची मॅच आहे. सुपर-12 च्या मॅचेस 22 ऑक्टोबरपासून सुरू होतील.

सुपर- 12 ची पहिली मॅच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार असून ही मॅच सिडनी ग्राऊंडवर पार पडेल. याआधी T-20 वर्ल्ड कप 2021 च्या फायनल्समध्ये हे संघ आमनेसामने आले होते. 22 ऑक्टोबरला दुसरी मॅच इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात होईल.

T-20 वर्ल्ड कप 2022 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान तर आहेच. पण त्याशिवाय इतरही महत्त्वाच्या मॅचेस आहेत.

भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरुद्धची पहिली मॅच 23 ऑक्टोबरला होणार आहे. ही मॅच ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न ग्राऊंडवर होईल.

इतर महत्त्वाच्या मॅचेस पुढीलप्रमाणे

  • 23 ऑक्टोबर : भारत विरुद्ध पाकिस्तान
  • 27 ऑक्टोबर : भारत विरुद्ध ग्रुप-1 उपविजेता संघ
  • 30 ऑक्टोब र: भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका
  • 2 नोव्हेंब र: भारत विरुद्ध बांग्लादेश
  • 6 नोव्हेंब र: भारत विरुद्ध ग्रुप-2 विजेता संघ

T20 वर्ल्ड कपची सेमी फायनल आणि फायनल कधी असणार?

सिडनीच्या क्रिकेट ग्राऊंडवर 9 नोव्हेंबरला पहिली सेमी फायनल होईल. त्यानंतर दुसरी सेमी फायनल 10 नोव्हेंबरला अॅडलेड ओव्हलवर असेल.

फायनल मॅच 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडेल. आणि याच दिवशी T20 वर्ल्ड कपचा नवा बादशाहा जगाला मिळेल.

T20 वर्ल्डकप 2021 चा निकाल ?

T20 वर्ल्डकप 2021 ची स्पर्धा ओमान आणि यूएईमध्ये खेळवण्यात आली होती. या टूर्नामेंटमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर 8 विकेट्स राखून एकतर्फी विजय मिळवला होता.

फायनल्समध्ये टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने बॅटींग सुरू केल्यावर कॅप्टन केन विल्यमसनने 20 ओव्हर्स मध्ये चार विकेट गमावून 172 रन्स जमा केले.

तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने 53 आणि मिचेल मार्शचे नॉट आऊट 77 रन्स जमा केले. 18.5 ओव्हर्समध्ये फक्त 2 विकेट गमावून ऑस्ट्रेलियाने हा विजय मिळवला.

विशेष म्हणजे भारत यात सेमीफायनल्स पर्यंतही पोहोचू शकला नव्हता.

आत्तापर्यंत कोणत्या देशांनी जिंकले T-20 वर्ल्ड कप

पहिला T-20 वर्ल्ड कप 2007 साली साऊथ आफ्रिकेत पार पडला. त्यावेळी भारताने पहिल्याच दमात या कपवर आपलं नाव कोरलं. 2007 मध्ये एकूण 12 संघ सहभागी झाले होते. या संघाची चार ग्रुप मध्ये विभागणी करण्यात आली. कट्टर प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये होते.

त्यावेळी फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने-सामने आले. भारताने 20 ओवर्समध्ये पाच विकेट गमावल्या आणि 157 रन्स काढले. त्यानंतर बॅटींग करायला आलेल्या पाकिस्तानला 19.3 ओवर्समध्ये 157 रन्स काढताच आले नाहीत. आणि अवघ्ये पाच रन्स राखून भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला.

आतापर्यंतचे विजेता संघ

  • T20 वर्ल्ड कप 2007 - भारत
  • T20 वर्ल्ड कप 2009 - पाकिस्तान
  • T20 वर्ल्ड कप 2010 - इंग्लंड
  • T20 वर्ल्ड कप 2012 - वेस्ट इंडीज
  • T20 वर्ल्ड कप 2014 - श्रीलंका
  • T20 वर्ल्ड कप 2016 - वेस्ट इंडीज
  • T20 वर्ल्ड कप 2021 - ऑस्ट्रेलिया

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)