भास्कर जाधव- '...आणि उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात मी पाणी पाहिलं' #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. 'उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात मी पाणी पाहिलं,' भावनिक प्रसंग ऐकल्यानंतर शिवसैनिकांना अश्रू अनावर

"रविवारी (9 ऑक्टोबर) दुपारी भेटायला गेलो तेव्हा मी उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात पाणी पाहिलं. ते पाहून मी म्हटलं की तुम्ही कितीही लपवलं तरी तुमचा चेहरा सांगतोय.

यावेळी बाळासाहेब ठाकरेंसोबत काम करणारे रवी म्हात्रे तिथेच उभे होते. ते म्हणाले, बाळासाहेब देवाची पूजा करायचे आणि सोबत धनुष्यबाणाचीही पूजा करायचे. आता तेच धनुष्यबाण गोठवलं असं ते म्हणाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले," शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी महाप्रबोधन यात्रेच्या भाषणात हा प्रसंग सांगितला.

शिवसेनेत बंड झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कमालीचे भावूक झाले होते असं शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी म्हटलं. हा प्रसंग भास्कर जाधव यांनी सांगितला आणि सभागृहातल्या शिवसैनिकांना रडवलं.

महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.

रविवारी दुपारी 12.30 वाजता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या उपनेत्यांची बैठक बोलावली होती. 9 नोव्हेंबरपासून शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला ठाण्यापासून शिवसेनेने या यात्रेला सुरुवात केली आहे.

भाजपच्या नादाला लागून शिंदेंनी पक्ष अडचणीत आणला अशीही टीका यावेळी भास्कर जाधव यांनी केली.

ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे, उपनेत्या सुषमा अंधारे, नेते भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली.

2. एकनाथ शिंदे गटाकडून कोणत्या चिन्हांना प्राधान्य?

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पर्यायी नावं आणि चिन्हांचे पर्याय दिल्याची माहिती दिली आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून कोणती नावं आणि चिन्हं पर्याय म्हणून दिले जाणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

एकनाथ शिंदे गटाकडून आज (10 ऑक्टोबर) एक परिपत्रक जारी करुन निवडणूक चिन्हावर आपली भूमिका मांडण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिंदे गटाची महत्त्वाची बैठक रविवारी (9 ऑक्टोबर) संध्याकाळी पार पडली.

यावेळी पक्षाच्या चिन्हाबाबत पक्षाच्या कार्यकारिणीने निर्णय घ्यावा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याचं समजतं. तसंच शिंदे गटाकडून तुतारी, गदा आणि तलवार या चिन्हांना प्राधान्य देण्यात आलं असून याबाबत सोमवारी (10 ऑक्टोबर) निवडणूक आयोगाला माहिती देण्यात येणार आहे.

एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

उद्धव ठाकरे गटाकडून आपल्या निवडणूक चिन्हासाठी उगवता सूर्य, त्रिशूळ आणि मशाल या चिन्हांचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच पक्षाच्या नावासाठी तीन पर्याय देण्यात आले असून त्यामध्ये बाळासाहेबांच्या नावाचा समावेश आहे.

3. शिंदे गटाच्या बैठकीतून अब्दुल सत्तार निघून गेले?

रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत अब्दुल सत्तार यांनी गोंधळ घातल्याचे वृत्त आहे. तसंच त्यानंतर ते बैठकतून निघून गेल्याचीही चर्चा आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान वर्षा याठिकाणी ही बैठक होती. यावेळी अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी सचिवांवर भडकल्याचं समजतं. यावेळी इतर आमदारांनी मध्यस्थी केली.

या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जात आहे.

या बैठकीत पक्षाचं पर्यायी नाव आणि निवडणूक चिन्हांवर चर्चा झाली. तसंच शिंदे-फडणवीस सरकारला 100 दिवस पूर्ण झाले यानिमित्त 100 दिवसांच्या कामाची माहिती लोकांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी मंत्री आणि आमदारांवर सोपवण्यात आली आहे.

4. 'काँग्रेसमध्ये बदल करण्याची गरज' - शशी थरूर

काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात मुख्य लढत होत आहे.

शशी थरूर यांनी मुंबईत नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अपेक्षेनुसार बदल घडवू असा दावा शशी थरूर यांनी केला आहे.

2024 च्या निवडणुकीनंतर भाजपने विरोधी पक्ष बनण्याची तयारी सुरू करावी कारण निवडणुकीनंतर त्यांना तिथेच बसावे लागणार आहे, असंही ते म्हणाले.

सकाळने हे वृत्त दिलं आहे.

काँग्रेसमध्येही बदल करण्याची गरज असल्याचं त्यांनी मान्य केलं. काँग्रेसकडे अनुभवी नेते आहेत, मतदारांना ताकद दाखवण्यासाठी पक्ष चांगला स्थितीत असावा, आत्मविश्वास असायला हवा, असंही शशी थरूर म्हणाले.

5. 'प्रेशर येत असेल तर IPL खेळू नका' - कपिल देव

"मी हल्ली अनेकदा ऐकतो की खेळाडू सांगतात आम्ही आयपीएल खेळतो, खूप प्रेशर आहे. मी एकच गोष्ट त्यांना सांगतो की मग खेळू नका. एवढं प्रेशर आहे तर खेळू नका. प्रेशर नाही तर पॅशन असायला हवं," भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी एका कार्यक्रमादरम्यान हे वक्तव्य केलं आहे.

आयपीएलमुळे खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परीणाम होत असेल तर त्यांनी हे टाळायला हवं असाही सल्ला त्यांनी दिला आहे. सलग सामने खेळल्याने खेळाडूंना शारीरिक आणि मानसिक थकवा येतो यावरून वाद आता वाढत चालल्याचं दिसत आहे.

एखादा खेळाडू जखमी झाला किंवा त्याला दुखापत झाली तर यावरूनही गदारोळ होतो.

कपिल देव म्हणाले, आयपीएलसारख्या टुर्नामेंटमुळे त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात येत असेल किंवा थकवा येत असेल तर त्यांना त्यातून बाहेर पडायला हवं. तुम्हाला क्रिकेट खेळण्याची आवड आहे मग प्रेशर कशाचं येतं? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

बीबीसी हिंदीने हे वृत्त दिलं आहे.

सर्व फॉरमॅटमध्ये खेळणं आता कठीण होत चाललं आहे अशी प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूंकडून येत असताना कपिल देव यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)