धनुष्य-बाणाऐवजी त्रिशूळ, मशाल आणि उगवता सूर्य; यादीत नसलेलं चिन्ह उद्धव ठाकरेंनी का मागितलं?

निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह आणि नाव गोठवण्याचा निर्णय शनिवारी घेतला. यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आयोगाच्या या निर्णयाला आव्हान देत तीन नावांचा तसंच चिन्हांपैकी एक मिळावं यासाठी पत्र दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नावासाठी खालील तीन पर्याय दिले आहेत.

  • शिवसेना (बाळासाहेब ठाकरे)
  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
  • शिवसेना (बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे)

याबरोबरीने चिन्हासाठी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल हे तीन प्रस्ताव देण्यात आले आहेत. परंतु शिवसेनेने आयोगाला दिलेल्या तीन पर्यायांपैकी एकही चिन्ह आयोगाच्या यादीत नसल्याचं समोर आलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. त्यांनी सांगितले की आम्ही मशाल, त्रिशूळ आणि उगवता सूर्य या चिन्हांची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

यादीत नसलेले चिन्ह आयोग कसं काय देणार, यावर तोडगा काय निघणार, किंवा ठाकरे गटाने दिलेल्या पर्यायांपैकी चिन्ह मिळणार का हे लवकरच स्पष्ट होईल.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर आज मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेली बैठक जवळपास दीड तास सुरू होती.

या बैठकीत शिवसेना नेत्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काही सूचना केल्या आहेत. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

त्यामुळे शिवसैनिकांना शांततेचे आवाहन करताना त्यांची समजूत काढावी असे आवाहनही ठाकरे यांनी केले असल्याचे समजते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी सहा वाजता फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधून आपली भूमिका मांडली.

"लवकरात लवकर चिन्ह मिळालं तर आम्ही जनतेकडे जाऊन कौल मागू," असं ते यावेळी म्हणाले.

शिवसेनेनी उगवता सूर्य, मशाल या चिन्हांवर याआधी निवडणुका लढवल्या आहेत. तर त्रिशूळ हे देखील धनुष्यबाणाप्रमाणेच हिंदू देवतांचे आयुध आहे. त्यामुळे ते मागितले असण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात काय म्हटलं?

शिवसेनेने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना (बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे) या तीन नावांचा प्रस्ताव दिला.

या नावांच्या बरोबरीने शिवसेनेनं या पत्रात त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल अशा तीन चिन्हांचाही प्रस्ताव दिला. लवकरात लवकर नाव आणि चिन्ह द्यावं अशी विनंती करण्यात आली आहे.

धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यासंदर्भात भूमिका मांडण्याची संधी न मिळाल्याबद्दल शिवसेनेनं तीव्र शब्दात आक्षेपही नोंदवला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत एकनाथ शिंदे गटाने उमेदवार दिलेला नाही याकडे शिवसेनेनं लक्ष वेधलं आहे.

आयोगाने उपलब्ध करुन दिलेल्या चिन्हांपैकी कोणत्याही चिन्हाशी आमच्या पक्षाची विचारधारा, कार्यपद्धती, तत्वं संलग्न होत नाही असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

कोणत्याही पक्षाला देण्यात न आलेल्या चिन्हासंदर्भात प्रस्ताव देण्याबाबत कायदेशीर प्रतिबंध नसल्याने तीन चिन्हांचा प्रस्ताव दिल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.

शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि त्रिशूळ हे चिन्ह द्यावं याबाबतही पत्रात भूमिका मांडण्यात आली आहे.

धनुष्यबाणावर प्रतिक्रिया देऊ नका - राज ठाकरे

शिवसेनेच्या धनुष्यबाण प्रकरणावर अनेक नेते हे प्रतिक्रिया देत असल्याचे पाहून धनुष्यबाणावर प्रतिक्रिया देऊ नका असे आवाहन राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.

पक्ष प्रवक्त्यांना सुद्धा याबाबत सूचना देण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे.

निवडणूक आयोगाच्या निकालावर सकाळपासून वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांची प्रतिक्रिया येत असतांना, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मात्र यावर न बोलण्याची भूमिका घेतली आहे.

योग्य वेळ आल्यावर आपण यावर भूमिका मांडणार आहोत असं राज यांनी स्पष्ट केलं आहे.

मनसेच्या कोणत्याही प्रवक्त्याने, पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने यावर प्रतिक्रिया देऊ नयेत अशा सूचना राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

'आमचं बाळासाहेबांवर प्रेम आहे, म्हणून आम्हाला धनुष्यबाण चिन्ह हवं आहे'

याआधी, शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली.

"धनुष्यबाणावर आमचाच अधिकार आहे. आम्ही रडत राहत नाही, लढत राहतो आणि तोच खरा शिवसैनिक. आमचं बाळासाहेबांवर प्रेम आहे, म्हणून आम्हाला धनुष्यबाण चिन्ह हवं आहे," असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले.

"आमच्यावर अन्याय झालाय. विचारांपासून तुम्ही लांब गेलात, आम्ही नाही, म्हणून ही वेळ आली. आम्ही प्रतिज्ञापत्रं कधी दिली याचा तपशील आहे. जे जे आवश्यक आहे ते आम्ही दिलं आहे. आमच्याकडे काही शिल्लक नाही.

"त्यांची बाजू खोटी आहे. चिन्ह आमचं आहे, ते गोठल्याचं दु:ख आम्हाला आहे. पर्यायी चिन्हासाठी त्यांची पत्रं गेली आहेत. आमचा दावा धनुष्यबाणासाठीच आहे. आम्हाला हे चिन्ह मिळायला हवं. आम्ही निवडणूक आयोगाकडे आमची भूमिका मांडणार आहोत", असं ते म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)