You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या भाषणातल्या 3 हुकलेल्या संधी आणि 1 चूक
- Author, नीलेश धोत्रे
- Role, बीबीसी मराठी
उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने केलेल्या भाषणत नवं काय होतं? असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर फार काही नवीन नाही असं देता येऊ शकतं.
भाजप, शहा-मोदी आणि शिंदेंवर टीका तर त्यांनी आधीच त्यांच्या गोरेगावच्या भाषणातसुद्धा केली होती. भाजपबरोबर अडीच वर्षांचा करार झाला होता, याचा पुनुरुच्चार करताना त्यांनी यंदा आईवडिलांची शपथ घेतली तोच काय तो वेगळा मुद्दा. ( अर्थात, शपथेवर सांगितलेल्या गोष्टींना भारतीय समाजात खूप स्थान आहे याची जाणीव उद्धव ठाकरेंना आहे.)
ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांना सारखं टीकेला आणि समीक्षेला सामोरं जावं लागतंय त्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काँग्रेसबरोबर जाऊन आपण हिंदुत्व वाढवलं असल्याचा दावा करून त्यांनी विरोधकांच्या हातात आयतं कोलीत दिलं आहे.
शिवसेना पक्ष म्हणून सध्या सर्वांत मोठ्या बंडाला सामोरा जातोय. अशा स्थितीत गर्दी जमवण्याचं सर्वांत मोठं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर होतं. गर्दी तर त्यांना जमवता आली. पण त्या गर्दींला दिशा त्यांना देता आली का? हा प्रश्न आहे.
या मेळाव्यात उद्धव ठकरे यांनी 3 संधी हुकवल्या, तर एक चूक त्यांना टाळता आली असती.
1. कार्यकर्त्यांना कार्यक्रम देता आला असता
उद्धव ठाकरे आजारी असल्याचं या मेळाव्याच्या सुरुवातीलाच दिसून आलं. जमलेल्या कार्यकर्त्यांना अभिवादन करण्यासाठी झुकताना त्यांना 2 माणसांची मदत घ्यावी लागली हे सर्वांनीच पाहिलं.
अशा स्थितीत स्वतः आणि पक्ष मजबूत आहे किंवा तो मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना द्यावा लागतो तो काहीतरी कार्यक्रम. तोच उद्धव ठाकरे यांना या सभेमधून देता आला नाही.
राज्यभरातून कार्यकर्ते आलेले असताना आणि मीडियामध्ये दसरा मेळाव्याला सर्वांधिक प्रसिद्धी मिळत असताना उद्धव ठाकरे आयती संधी चालून आली होती. या मेळाव्यात तो सर्वांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचला असता. पण, उद्धव ठाकरे यांनी ही आयती संधी गमावली.
2. मुंबईच्या मुद्द्यावर काहीच बोलले नाहीत
शिवसेनेसाठी मुंबई महापालिकेतील सत्ता प्राण आहे, हे सांगण्यासाठी वेगळ्या राजकीय पंडिताची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयातली लढाई आता निवडणूक आयोगाकडे पोहोचली आहे, चिन्हाचा निर्णय होण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. बीबीसीशी बोलताना माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी तशी शक्यता बोलून दाखवली आहे.
अशावेळी मधल्या काळात मुंबई महापालिका निवडणूक झाली तर त्यासाठीचा अजेंडा मांडण्याची संधी उद्धव ठाकरेंना होती. पण त्यांनी मुंबईच्या मुद्द्यांना हात घालणं टाळलं.
त्याचं कारण सभेला जमलेली गर्दी असल्याचं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांना वाटतं.
बीबीसी मराठीशी बोलताना ते सांगतात, "मुंबई महापालिके संदर्भात या भाषणात काहीच नव्हतं. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या भाषणात एकमेकांनाच टार्गेट केलं. गद्दारीच्या जखमेतून उद्धव ठाकरे बाहेर आलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या भाषणाचा रोख संपूर्णपणे शिंदेंच्या गद्दारीकडेच होता.
तसंच गर्दी पाहून शिवसेनेची लोकांमधली पाळंमुळं शाबूत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यातून मग त्यांनी इतर मुद्द्यांना हात घालणं टाळलं."
3. ठाकरे कुटुंबाच्या फुटीवर बोलणं टाळलं
एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे आणि निहार ठाकरे या ठाकरे कुटुंबातल्या तीन सदस्यांनी हजेरी लावली.
"या एकनाथाला एकटं पडू देऊ नका," हे जयदेव ठाकरे यांनी त्यांच्या छोटेखानी भाषणात काढलेले उद्गार सर्वत्र तात्काळ ब्रेकिंग म्हणून चालू लागले. त्याच्या हेडलाईन्स झाल्या.
बाळासाहेब ठाकरेंचे उद्धव ठाकरेसोडून इतर कुटुंबिय आपल्याबरोबर असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांना यानिमित्ताने करता आला. याआधीच त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांची आपल्याला साथ असल्याचा संदेश एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
एक काळ होता जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसदार कोण होणार यासाठी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांच्यामध्ये चढाओढ होती.
पण आपला राजकीय वारसदार उद्धव ठाकरेच असल्याचं बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या हायातीतच जाहीर केलं होतं. शिवाय "मी तुमच्यावर उद्धव आणि आदित्य लादले हे विसरून जा, घराणेशाही लादली हे विसरून जा. आदित्य आणि उद्धवला सांभाळा," असं बाळासाहेब ठाकरे त्यांच्या शेवटच्या भाषणात बोलले होते. आदित्य ठाकरेंचं लॉन्चिंग बाळासाहेबांच्या उपस्थितीत झालं होतं.
शिंदेंनी स्मिता ठाकरे, निहार ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांना त्यांच्या व्यासपीठावर आणून या स्पर्धेला पुन्हा एकदा उजाळा देण्याचा प्रयत्न केलाय.
"जयदेव यांना राजकारणात किती महत्त्व द्यावं किंवा गांभीर्याने घ्यावं हा देखील प्रश्न आहे, पण शिंदे यांनी ठाकरे कुटुंबीय आपल्या बाजूने आहेत आणि उद्धव ठाकरे एकटे पडलेत हे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते," असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांना वाटतं.
अशा परिस्थितीत शिंदेंच्या मेळाव्याला उपस्थित झालेले ठाकरे घराण्याचे सदस्य हे बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारसदार नाहीत हे बिंबवण्याची संधी उद्धव ठाकरेंनी गमावली आहे.
पण उद्धव ठाकरेंनी ते योग्य केल्याचं संजीव उन्हाळे यांना वाटतं. "या सभांमध्ये कौटुंबिक नाट्य दिसून आलं. पण घरातले तंटे एवढे चव्हाट्यावर मांडू नयेत. उद्धव ठाकरेंनी त्यावर न बोलून एक प्रकारे योग्य केलं," असं ते सांगतात.
पण जयदेव ठाकरे यांचं "या एकनाथाला एकटं पडू देऊ नका," हे वाक्य भविष्यात एकनाथ शिंदे गटाकडून निवडणुकांमध्ये वापरलं जाण्याची शक्यता अजिबात नकारता येत नाही.
तेव्हा त्याचा प्रतिवाद उद्धव ठाकरे कसे करतात हे पाहाणं रंजक ठरणार आहे.
4. दीड वर्षांच्या मुलावर टीका
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीका करताना त्यांच्या मुलावर आणि नातवावरसुद्धा टीका केली.
"काय कमी दिलं त्यांना? बाप मंत्री, कार्टं खासदार, कुणाचा आमदार, पुन्हा डोळे लावून बसलेत नातू नगरसेवक. अरे त्याला मोठा तर होऊ दे. शाळेत तर जाऊ दे. आताच नगरसेवक?" अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
शिंदेंचा नातू रुद्रांश फक्त दीड वर्षांचा आहे. हाच धागा पडकून शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेतला.
"काय म्हणाले, मी मुख्यमंत्री आणि मुलगा म्हणजे श्रीकांत. कार्टं? आणि खासदार. नातू नगरसेवकपदावर डोळा लावून बसला आहे. अरे, एवढा बच्चू दीड वर्षांचा आहे तो. रुद्रांश. अरे त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अधःपतन सुरू झालं. कुणावर टीका करताय? त्या दीड वर्षांच्या बाळावर? अरे, तुम्ही मुख्यमंत्री झालात त्या तुमचा मुलगा मंत्री झाला आम्ही काय बोललो? एक मंत्री कुणीतरी ग्रामीण भागातला झाला असता ना," असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
दीड वर्षांच्या मुलावर झालेल्या या टीकेवर बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे म्हणतात, " दीड वर्षांच्या मुलावर झालेली ही टीका चुकीची झाली. कार्टं खासदार हे म्हणणं सुद्धा योग्य नाही तो चांगला शिकलेला आहे. त्यामुळे हे टाळता आलं असतं."
कुटुंबातील वैयक्तिक टीका करणे हे चूकच आहे, असं हेमंत देसाई यांनासुद्धा वाटतं.
"बोलण्याच्या ओघात उद्धव ठाकरे तसं बोलून गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण हे देखील तितकेच खरे आहे की त्याचा उपयोग समोरची व्यक्ती कशा प्रकारे करेल हे तुमच्या हातात नाही. त्यांच्या नातवाबद्दल बोलल्यावर शिंदे लगेच म्हणाले की तो जन्मला आणि तुमच्या अधःपतनाला सुरुवात झाली," असं देसाई सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)