You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिंदे गट दसरा मेळावा: 'स्वतःही खुराड्यात राहिलात आणि आम्हालाही कोंडून ठेवलं'- शहाजी बापू पाटील
शिंदे गटाचे समर्थक आमदार शहाजी बापू पाटील यांनी थेट मातोश्रीवरच टीकेची तोफ डागली.
"अडीच वर्षं मातोश्रीचे नेते मातोश्रीतच राहिले. ते खुराड्यातच राहिले आणि त्यांनी आम्हालाही कोंडून ठेवलं," असं शहाजी बापू पाटील म्हणाले.
"आता उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे हे दोघेही महाराष्ट्र फिरत आहेत. अडीच वर्षांत तर ते कुठे गेले नव्हते. मग नंतर काय झालं, तर एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीहून औषध आणलं आणि त्यांना दिलं. त्यानंतर दोघेही आता फिरू लागले आहेत. आता सांगायचं काही राहिलं नाही," असे शहाजी बापू म्हणाले.
शहाजी बापू पाटील म्हणाले की "काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणे बाळासाहेब ठाकरे यांना कधीच आवडलं नसतं. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आणि आता आम्हाला गद्दार म्हणत आहात."
मी कुणाचा बाप चोरला नाही - राहुल शेवाळे
शिंदे समर्थक राहुल शेवाळे यांनी भाषण केले. ते म्हणाले की "राहुल रमेश शेवाळे सर्वांचे अभिवादन करतो. हा माझ्यासाठी म्हणजेच राहुल रमेश शेवाळेसाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. तुम्हाला सर्वांना वाटत असेल मी सारखं माझ्या वडिलांचे नाव का घेत आहे?"
"याचे कारण आहे की सतत उद्धव ठाकरे म्हणत आहेत की तुम्ही आमचा बाप चोरला मी कुणाचाही बाप चोरला नाही. असं भारतात कधीही कुणी म्हटलं नसेल की माझा बाप कुणी चोरला. इंदिरा गांधी, एनटी रामाराव, मुलायम सिंह यादव, राम विलास पासवान यांचे पक्ष फुटले पण कुणीही कधी म्हटलं नाही तुम्ही आमचा बाप चोरला पण हे लोक म्हणत आहेत."
"दुसरी गोष्ट म्हणजे सारखं आम्हाला खोके घेतले असं म्हटलं जातं. पण तुम्हीच सांगा की तुम्ही केव्हा केव्हा कसे खोके घेतले ते सांगा," असं शेवाळे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांचा उल्लेख शेवाळेंनी युवराज असा केला. ते म्हणाले की "तुम्ही खोके घेत घेतच लहानाचे मोठे झालात. मुंबई महानगर पालिकेचे खोके घेत घेतच तुम्ही मोठे झाला असं शेवाळे म्हणाले. आम्ही शिवसेना वाढवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केले. कुटुंबापासून दूर राहिलो आणि त्याचं फळ काय मिळालं तर आम्हाला गद्दार म्हटलं जात आहे, तुम्हीच जनतेशी गद्दारी करून आम्हाला गद्दार म्हणत आहात," असं राहुल शेवाळे म्हणाले.
बिभीषणाचा कुणी गद्दार म्हणून उल्लेख केला नाही - शरद पोंक्षे
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेना उप-नेते आणि मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील भाषण केले. सर्वांत आधी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण केले.
भाषणाची सुरुवात त्यांनी रामायणापासून केली. ते म्हणाले की "रावणाचा भाऊ बिभीषण हा रामाकडून लढला पण त्याला कुणीही गद्दार म्हटले नाही."
पुढे ते म्हणाले की "कुरुक्षेत्रात श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने निःशस्त्र कर्णावर बाण मारला पण त्याला देखील कुणी गद्दार म्हटले नाही."
"त्याच प्रमाणे एकनाथ शिंदेंनी आपली सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून हा निर्णय घेतला मग ते गद्दार कसे?" असं शरद पोंक्षे म्हणाले.
"सातत्याने हिंदू देवी देवतांची टिंगल करणाऱ्या लोकांसोबत शिवसेना गेली हीच गद्दारी," असं पोंक्षे म्हणाले.
सगळं बरखास्त करा पुन्हा निवडणुका घेऊन शिंदे राज्य येऊ द्या - जयदेव ठाकरे
बाळासाहेबांचे पुत्र आणि उद्धव ठाकरेंचे भाऊ जयदेव ठाकरे हे देखील शिंदे गटाच्या दसऱ्या मेळाव्याला हजर होते.
जयदेव ठाकरे म्हणाले, "लोक मला विचारतात की तुम्ही शिंदेंच्या गटात गेलात का, त्यांना सांगतो की हा ठाकरे कुणाच्याही गोठ्यात बांधला जाऊ शकत नाही."
"पण एकनाथच्या प्रेमापोटी मी इथे आलो आहे. एकनाथ हा माझा अत्यंत आवडता आहे पण आता मुख्यमंत्री झाला तर त्याला एकनाथ राव म्हणावं लागेल," असे जयदेव ठाकरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, "एकनाथाला एकटं पडू देऊ नका. तो गरीबांसाठी कष्टकऱ्यांसाठी काम करत आहे, त्याला एकनाथच राहू द्या."
त्यानंतर ते म्हणाले, "माझी विनंती आहे की आता हे सर्व बरखास्त करा आणि निवडणुका घ्या. बहुमताने निवडून या आणि शिंदे राज्य येऊ द्या," असे जयदेव ठाकरे म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)