एकनाथ शिंदे वि. उद्धव ठाकरे: दसरा मेळाव्यात 'हे' मुद्दे गाजण्याची शक्यता

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे नेते दोन स्वतंत्र दसरा मेळावे घेत आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा नेहमीप्रमाणे शिवाजी पार्क येथे होणार आहे, तर शिवसेनेवर दावा केलेल्या शिंदे गटाचा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानात होणार आहे.

20 जून 2022 ला शिवसेनेच्या इतिहासातलं आतापर्यंतचं सर्वात मोठं बंड झालं. यानंतर गेल्या चार महिन्यात वेगाने घडामोडी घडल्या आणि राज्याचं संपूर्ण राजकारण यात ढवळून निघालं. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न आजही अनुत्तरित आहे आणि ही संपूर्ण लढाई त्यासाठीच सुरू असल्याचं दिसून येतं.

बुधवारी (5 ऑक्टोबर) होणाऱ्या दसरा मेळाव्यात ठाकरे विरुद्ध शिंदे या संघर्षाचं स्पष्ट चित्र पहायला मिळेल असं जाणकार सांगतात. म्हणूनच सर्वांना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय भाषण करणार याची उत्सुकता आहे. यानिमित्त दोन्ही नेत्यांच्या उद्याच्या भाषणात कोणते मुद्दे गाजू शकतात? भाषणाचा रोख कोणाकडे असेल? आणि यासाठी काय तयारी करण्यात आली आहे? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्क येथील मैदानावर होत आहे. शिवसेनेसाठी हे स्थान अनेक कारणांसाठी महत्त्वाचं आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी याच शिवाजी पार्कवर अनेक सभा घेतल्या आणि आपल्या भाषणांमधून पक्ष वाढवला. शिवाजी पार्क हे शिवसेनेतील अनेक मोठ्या बदलांचा साक्षीदार राहिला आहे. अनेक महत्त्वाच्या घोषणा बाळासाहेबांनी याच शिवाजी पार्कातून केल्या आहेत.

तसंच बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृती स्थळ देखील याच ठिकाणी आहे. त्यामुळे या जागेशी शिवसैनिकांचं भावनिक नातं आहे. आता जेव्हा पक्ष सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे अशावेळी शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांचा कसा आणि किती प्रतिसाद मिळतो हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.

दुसऱ्या बाजूला शिंदे गटाकडून खरी शिवसेना आमचीच असा दावा करण्यात आला आहे. याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आहे. पण तरीही जनतेच्या मनात ही प्रतिमा तयार करण्याचं आव्हान एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे. अशापरिस्थितीत दसरा मेळावा त्यांच्यासाठी नामी संधी असल्याचं जाणकार सांगतात.

'बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसा आम्हीच पुढे नेत आहोत,' असा दावा करणाऱ्या शिंदे गटाला त्यांनी सुरू केलेला दसरा मेळावा घेणं सुद्धा भाग होतं असंही जाणकार सांगतात. एवढेच नाही तर आम्ही बंड नव्हे उठाव केला आहे हे सिद्ध करण्यासाठी दसरा मेळाव्यात शिंदे गटाची भूमिका आणि ती लोकांना पटवून देण्यासाठी किती आणि कसा प्रयत्न केला जातो हे सुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे.

शक्तिप्रदर्शनाची स्पर्धा

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळवण्याची लढाई न्यायलयात जिंकल्यानंतर आता दसरा मेळावा यशस्वी करून दाखवण्यासाठी शिवसेनेची जय्यत तयारी सुरू आहे. दुसऱ्या बाजूला शिंदे गटाने आपल्या दसरा मेळाव्यात अडीच लाख शिवसैनिक येतील अशी अपेक्षा असल्याचं म्हटलं आहे.

दोन्ही बाजूंच्या नेत्यांची वक्तव्य आणि पक्षाची तयारी पाहिल्यानंतर दसरा मेळाव्यात कुणाची ताकद अधिक? याची स्पर्धा सुरू असल्याचं दिसतं.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईतून प्रत्येक शाखेतून 4 बसेस निघणार आहेत. मुंबईत एकूण 227 शाखा आहेत म्हणजे एकूण 908 बसेस या एकट्या मुंबईतून येणार आहेत.

मुंबई शहरातून शिवसेनेला यंदा 50 हजारहून जास्त गर्दी होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी मुंबईतल्या विभागप्रमुखांनी आपली ताकद पणाला लावली आहे.

मुंबईत शिवसेनेचे 12 विभागप्रमुख आहेत. प्रत्येक विभागप्रमुखाला दसरा मेळाव्याची जबाबदारी देण्यात आलीय.

मुंबई व्यतिरिक्त ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, नाशिक, औरंगाबाद आणि राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर पोहचण्यासाठी नियोजन करण्यात आलं आहे.

खासदार राजन विचारें यांच्यावर ठाण्यासह, मीरा भाईंदर आणि नवी मुंबईतल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी देण्यात आलीय.

एकनाथ शिंदेच्या बंडानंतरचा हा पहिलाच मेळावा असल्यानं पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून ट्रेन आणि बसमधून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते येणार आहेत.

शिंदे गटाकडून रेल्वे बुक केल्याची माहिती मिळते आहे. प्रत्येक आमदाराला काही हजार लोकांची व्यवस्था करण्यास सांगितलं आहे.

शिंदे गटाकडून हा पहिलाच दसरा मेळावा असल्याने सर्व नेत्यांची पूर्ण क्षमता वापरली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बीकेसी मैदानावर भव्य दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातुन लाखो शिवसैनिक बीकेसी मैदानात जमणार आहेत.

शिवतीर्थची क्षमता 80 हजार एवढीच असल्याने बीकेसी मैदानावर त्यापेक्षा पाचपट जास्त गर्दी जमवण्याचे नियोजन पक्षकार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.'

तसंच दोन्ही गटांकडून सोशल मीडियावर आपल्या मेळाव्यांसाठी प्रमोशन केलं जात आहे.

दसरा मेळाव्यातल्या भाषणांमध्ये कोणते मुद्दे गाजण्याची शक्यता?

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात व्यासपीठावर शिवसेनेच्या नेत्यांनाच बसण्यासाठी स्थान दिलं जाणार आहे. खासदार अरविंद सावंत, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांसह काही नेत्यांची भाषणं आधी होतील. काही नवीन चेहऱ्यांनाही संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साधारण साडे सात वाजताला भाषणाला सुरुवात करतील, अशी माहिती देण्यात येते.

दुसरीकडे शिंदे गटाचा दसरा मेळावा संध्याकाळी पाच वाजता सुरू होणार असून सुरुवातीला महत्त्वाचे नेते बोलतील आणि मग एकनाथ शिंदे यांचं भाषण होईल.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आपल्या भाषणात काय बोलणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आणि जनतेमध्येही दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "30 सप्टेंबरला शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना एकच आहे. त्यामुळे कोण कुठे काय करतं, असे दसरा मेळावे खूप होतात. मला वाटतं पकंजाताई पण करते. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा एकच, शिवाजी पार्कवर."

उद्धव ठाकरे यांच्या भाषणात खालील तीन मुद्दे प्रामुख्याने दिसून येतील असं जाणकार सांगतात-

'गद्दार' म्हणून उल्लेख

शिंदे गटाने बंड केल्यानंतर शिवसेनेकडून सातत्याने काही मुद्दे उपस्थित करण्यात आले. यापैकीच एक म्हणजे शिंदे गटावर 'गद्दार' म्हणून टीका करणं.

आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात शिवसंवाद यात्रा केली. यावेळी विविध जिल्ह्यात शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनीही शिंदे गटातील नेत्यांवर प्रतिक्रिया देताना त्यांचा गद्दार म्हणूनच उल्लेख केला आहे.

शिंदे गटाने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला दगा दिला असा आरोप शिवसेनेने अनेकदा केला आहे. त्यामुळे आपल्या भाषणात 'पक्षनिष्ठा आणि गद्दारी' याकडे ठाकरेंचा रोख असेल असं जाणकार सांगतात.

'50 खोके एकदम ओक्के'

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, '50 खोके एकदम ओक्के' ही घोषणाबाजी शिवसेनेकडून सातत्याने दिली गेली. पावसाळी अधिवेशनात शिवसेनेची ही घोषणा लक्षवेधी ठरली होती. या घोषणाबाजीमुळे "एक गोष्ट विरोधकांना साध्य करता आली ती म्हणजे कुठेतरी शिंदे गटाचं बंड पैशांच्या राजकारणाचा खेळ होता अशी प्रतिमा उभी करण्यात विरोधकांना यश आलं असं म्हणता येईल." असं मत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी मांडलं होतं. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात हा मुद्दा सुद्धा गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रकल्प गुजरातकडे

तिसरा मुद्दा म्हणजे, फॉक्सकॉन-वेदांताचा सेमीकंडक्टर उत्पादनाचा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरात राज्याला मिळाला.

यापूर्वी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर टीका केली होती. शिंदे सरकारच्या निष्काळजीपणामुळे महाराष्ट्राच्या हातातून मोठा प्रकल्प निसटला आणि यामुळे रोजगाराच्या संधी सुद्धा हातातून निसटल्या असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता.

राजकीय विश्लेषकांनुसार, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात गुजरातकडे प्रकल्प गेल्यावरून शिंदे गटावर निशाणा साधला जाणार.

शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "उद्धव ठाकरे भाषेची पातळी कधी सोडत नाहीत. इतर नेत्यांनी याचं भान ठेवावं. आपल्याला विचारांचं सोनं लुटायचं आहे. आपल्याला कुणाच्या चरित्राची चिरफाड करायची नाही. वैचारीक पातळीचं भान ठेऊ," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, "शिंदे गटाने विश्वासघात केला, महाराष्ट्रातील गुंतवणूक कशी गुजरातकडे जात आहे, 50 खोक्यांचा आरोप हेच मुद्दे उद्धव ठाकरे यांच्या भाषणात प्रामुख्याने दिसतील. गोरेगावची उद्धव ठाकरे यांची सभा काही दिवसांपूर्वी झाली. ही सभा म्हणजे दसरा मेळाव्याची रंगीत तालीम होती असं म्हटलं गेलं. यावेळी उद्धव ठाकरेंच्या भाषणात हेच सर्व मुद्दे होते. हे मुद्दे ते आणखी आक्रमकपणे मांडतील."

"महाराष्ट्रातली गुंतवणूक गुजरातला जात आहे. मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा डाव आहे असेही आरोप शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केले जातील. तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज व्हा, निवडणूक चिन्ह मिळालं नाही तरी न डगमगता काम करा," असाही संदेश आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे देऊ शकतात असं संदीप प्रधान यांना वाटतं.

एकनाथ शिंदे यांच्या भाषणात कोणते मुद्दे असू शकतात?

शिंदे गटाचा हा पहिला दसरा मेळावा आहे. 'धनुष्यबाण' मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू असताना दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

हिंदुत्ववाद आणि बाळासाहेब ठाकरे

'आम्ही बंड नाही तर शिवसेनेत उठाव केला आहे,' ही शिंदे गटाची भूमिका आहे. तसंच 'बाळासाहेबांनी दाखवलेल्या हिंदुत्ववादी विचारधारेचं पालन करण्यासाठी सत्तेतून बाहेर पडलो,' असंही स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी दिलं आहे.

त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या भाषणात हिंदुत्ववाद आणि बाळासाहेब ठाकरे हे मुद्दे प्रामुख्याने असतील असं जाणकार सांगतात.

स्वत: एकनाथ शिंदे यांनीही दसरा मेळाव्याची माहिती देताना या मुद्याचा उल्लेख केला आहे.

माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, "बाळासाहेबांचे विचार कोणी खंडित केले? त्यांच्या विचाराशी प्रतारणा कोणी केली? सत्तेसाठी तडजोड कोणी केली? हे मला सांगायची गरज आहे का. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहोत. त्यामुळे राज्यातला प्रत्येक घटक आणि राज्यातले हजारो लाखो लोक आमच्या भूमिकेला समर्थन देत आहे. मी योग्य वेळी सर्व बोलणार आहे."

तसंच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही प्रतिक्रिया देताना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सोनं लुटणार असल्याचं म्हटलं आहे.

त्यांनी म्हटलं, "कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं पालन होईल. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. अडीच तीन लाखापेक्षा जास्त लोक येतील अशी अपेक्षा आहे. विराट सभा होईल. बाळासाहेबांच्या विचारंचं सोन लुटलं जाईल. आनंद दिघे यांचे विचार मांडले जातील. एकनाथ शिंदे बोलणार आहेत."

महाविकास आघाडी

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली आघाडी. यापूर्वीही शिंदे गटाने यावर भाष्य केलं आहे. शिंदे गटातील आमदारांनी बंड केल्यानंतरही याचा उल्लेख केला होता. आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या एक पत्रात म्हटलं होतं की, 'काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केल्याने आम्ही बंड करत आहोत. आघाडीचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होत असून शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नाही आणि यावर नेतृत्त्वाकडून तोडगा काढला जात नाही.'

ही पार्श्वभूमी पाहता महाविकास आघाडीच्या स्थापनेवरही एकनाथ शिंदे पुन्हा टीका करू शकतात आणि यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधू शकतात.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही प्रतिक्रिया देताना यावर भाष्य केलं. ते म्हणाले, "आजपर्यंत झालेल्या मेळाव्यांमध्ये सगळ्यात मोठा आणि विक्रमी मेळावा मुख्य नेत शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली असेल. संयम राखून शिवसैनिकांनी यावं हे आवाहन केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्तेत सामील झाल्यानंतर बाहेर काढण्यासाठीच आम्ही बाहेर पडले."

शिंदे सरकारला 100 दिवस पूर्ण

7 ऑक्टोबरला शिंदे-फडणवीस सरकारला 100 दिवस पूर्ण होत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या भाषणात सरकारच्या कामांचा आणि भविष्यातील दृष्टीकोन यावरही भाष्य करतील.

शिंदे गटाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मेळाव्यात नक्की काय बोलणार, कोणते नवीन गौप्यस्फोट करणार, कुणाकुणाला पक्षात प्रवेश देणार याबाबत सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिवसेना भाजप युती सरकारला येत्या 7 ऑक्टोबर रोजी 100 दिवस पूर्ण होत असल्याने राज्याच्या विकासाबाबत त्यांची असलेला त्यांचा दृष्टिकोन देखील ते आपल्या भाषणातून मांडतील याची सगळ्यांना खात्री आहे.

शिवसेनेला पुढे घेऊन जाण्यासाठी इतर राज्यातील 13 प्रदेश प्रमुखांनीही एकनाथ शिंदे यांना पूर्वीच पाठींबा दिलेला आहे. त्यामुळे राज्यासह राज्याबाहेरही पक्षाची मजबूत बांधणी करता यावी यासाठी आवश्यक असलेल्या विचारांचे खरे सोने लुटण्याचा प्रयत्न या मेळाव्यातून होईल यात शंका नाही."

एकनाथ शिंदे यांच्या भाषणात साधारण कोणते मुद्दे असतील यावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, "उद्धव ठाकरेंनी हिंदुत्ववादाशी तडजोड करून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना ते पुढे नेत नसून त्यांचे विचार पुढे नेण्यासाठीच उठाव केला हा मुद्दा प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांच्या भाषणात असेल. शिवसेना मूळ विचारधारेपासून कशी भरकटली हे सांगण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करतील. शिवाय भाजपसोबत युती करणं कसं आवश्यक होतं हे सुद्धा पटवून देण्याचा प्रयत्न करतील."

"गेल्या काळी काळात शिंदे सरकारने केलेली कामं आणि रोजगारनिर्मिती यावरही एकनाथ शिंदे भाष्य करतील. प्रकल्प गुजरातकडे चालले या शिवसेनेच्या आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे त्यावर प्रतिक्रिया देऊ शकतात."

कोणाचा दसरा मेळावा अधिक भव्य होण्यासाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात स्पर्धा सुरू असल्याचं दिसंत. न्यायालयीन लढाई एकाबाजूला सुरू असली तरी जनतेमध्ये प्रतिमा तयार करण्यासाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांसाठी यंदाचा दसरा मेळावा महत्त्वाचा आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)