मुंबई महापालिका की शिवसेना? उद्धव ठाकरे काय वाचवणार?

    • Author, दीपाली जगताप आणि मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या दोन आठवड्यात महापालिका आणि नगरपालिका निवडणुका जाहीर होतील. तसे आदेशच बुधवारी सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

यात मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक, औरंगाबादसह 9 महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्याशिवाय महाराष्ट्रातील या 22 महापालिकांच्या निवडणुका 2 आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

'मिनी विधानसभा' मानल्या जाणाऱ्या या निवडणुका सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनेतील उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यासाठी या निवडणुका अधिक आव्हानात्मक आहेत.

उद्धव ठाकरे यांच्यासाठी आगामी निवडणुका किती कठीण आहेत? एवढ्या कमी कालावधीत शिवसेना पुन्हा उभी करण्यात उद्धव ठाकरेंना यश येईल का? एकनाथ शिंदे गटाने मूळ शिवसेना पक्षावर केलेला दावा मान्य होईल का? सर्वांत महत्त्वाचं म्हणजे धनुष्यबाण चिन्हा कुणाच्या वाट्याला येणार? या प्रश्नांचा आढावा आपण घेणार आहोत.

पक्षाची पुनर्बांधणी करण्याचं आव्हान

एकनाथ शिंदे यांनी आपल्या 39 आमदारांसह बंड पुकारला आणि त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाडलं. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश अमान्य करत भाजपसोबत सत्ताही स्थापन केली.

आता तर शिवसेनेच्या 18 पैकी 12 खासदारांनी शिंदे गटाला साथ देण्याचं ठरवलं आहे.

एवढ्या मोठ्या संख्येने आमदार आणि खासदार फुटल्याने शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर शिवसेनेची नव्याने बांधणी करण्याचं आव्हान असतानाच आता महापालिका निवडणुका होणार आहेत.

मुंबई आणि ठाणे ही दोन्ही शहरं शिवसेनेचा बालेकिल्ला मानली जातात. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची 25 वर्षांपासून सत्ता आहे. तर ठाणे महानगरपालिकाही शिवसेनेसाठी महत्त्वाची आहे. करण शिवसेनेची सर्वांत पहिली सत्ता ठाणे महापालिकेतच आली होती. त्यानंतर ठाण्यावर कायम शिवसेनेचचं वर्चस्व राहिलं आहे.

औरंगाबाद महापालिकेवरही शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला नव्याने बळ देण्याचं काम उद्धव ठाकरे यांना करावं लागणार आहे.

पण ही स्थिती जेवढी उद्धव ठाकरे यांच्यासाठी आव्हानात्मक आहे तेवढीच ती एकनाथ शिंदे यांच्यासाठी देखील आहे, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.

ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, "आगामी काळ उद्धव ठाकरे यांच्यासाठी जसा कठीण आहे, तसाच तो एकनाथ शिंदे यांच्यासाठीही आहे. आणखी काही माजी नगरसेवक शिंदे गटात जाऊ शकतात. त्यामुळे नवीन संच घेऊन निवडणूक लढवण्यासाठी संधी उद्धव ठाकरेंना आहे. पूर्णपणे नव्याने बांधणी करून, नवीन चेहऱ्यांना संधी देणे असे काही प्रयोग ते करू शकतात."

39 आमदार फुटल्याने शिवसेनेतील सामान्य कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास निश्चितच कमकुवत झालेला आहे आणि म्हणून गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून आदित्य ठाकरे अगदी रोज मुंबईच्या विविध प्रभागांमध्ये मेळावे घेत आहेत.

शिवसेनेचं मुख्यालय शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनीही दररोज कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे.

23 जुलैपर्यंत आदित्य ठाकरे 'शिव संवाद' यात्रा करणार आहेत. त्यामुळे पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रयत्न सुरू झालेले दिसतात.

कायदेशीर लढाई लढण्याचं आव्हान

ठाकरे पितापुत्रांनी जरी रस्त्यावरच्या लढाईला सुरूवात केली असली तरी कोर्टात एका मोठ्या आणि अत्यंत गुंतागुंतीच्या खटल्याला त्यांना सामोरं जावं लागत आहे. ज्यात त्यांचा खरा कस लागणार आहे.

अशा स्थितीत आमदारांप्रमाणे शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात सामील होणार की उद्धव ठाकरेंना साथ देणार हे सुद्धा पहावं लागणार आहे.

संदीप प्रधान यांच्यामते, "शिवसेना कोणाची हा प्रश्न नगरसेवकांसाठीही तितकाच महत्त्वाचा आहे. निवडणुकीचं चिन्ह 'धनुष्यबाण' मिळवण्यात एकनाथ शिंदे यश येणार का? हा कळीचा मुद्दा आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांनीही याच चिन्हावर दावा केला तर निवडणूक आयोग धनुष्यबाण हे चिन्ह गोठवू शकतं. म्हणजेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांनाही वापरता येणार नाही अशीही परिस्थिती निर्माण होऊ शकते."

ते पुढे म्हणाले, "उद्धव ठाकरे यांच्यासमोर हे दुसरं आव्हान आहे की, त्यांना कायदेशीर लढाई लढावी लागणार आहे. शिवसेना पक्ष स्वत:कडे ठेवण्याची आणि धनुष्यबाण चिन्ह आपल्याकडे कायम राहील यासाठी उद्धव ठाकरे गटाला कायदेशीर लढाई लढावी लागेल."

शिंदे गटाने शिवसेनेवर केलेला दावा असो किंवा निवडणूक चिन्हासाठीचा दावा असो ही प्रक्रिया कायदेशीर असून दीर्घकालीन आहे, त्यामुळे यावर महापालिका निवडणुकांच्या आधी तोडगा निघतो की नंतर यावरसुद्धा शिवसेनेचं भवितव्य अवलंबून आहे.

उद्धव ठाकरेंना सहानुभूतीचा फायदा होईल?

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ चर्चा होताना दिसून येत आहेत. उद्धव ठाकरे गटाकडूनही याची काळजी घेतली गेली की लोकांसमोर शिंदे गटाची प्रतीमा मलीन होईल. शिंदे गटातील आमदारांना गद्दार म्हणणं असेल किंवा पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका असो. शिवसेनेनं सोशल मीडियात तरी त्यांच्या बाजूने वातावरण राहील यांची तसदी घेतलेली दिसून येत आहे.

"ज्या पक्षाने मोठं केलं, मंत्रिपदं दिली, पैसा दिला त्या पक्षाच्या प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच मुलाला दगा दिला," अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून सोशल मीडियात दिसतात.

मग खरा प्रश्न हा उरतो की या परिस्थितीचा राजकीय फायदा उद्धव ठाकरे यांना होईल का?

यासंदर्भात बोलताना संदीप प्रधान सांगतात, "सहानुभूती प्रत्यक्ष मतांमध्ये दिसेल का हे निकलातच कळू शकेल. उद्धव ठाकरे यांना या परिस्थितीचा राजकीय फायदा करून घेण्यात यश येईल का? यासाठी निकालाची वाट पहावी लागेल. यासोबतचं उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेलं काम, मराठी विरुद्ध अमराठीचा मुद्दा, मुंबई गुजरातमध्ये जाणार का? असं चित्र निर्माण करणं, मुंबईचं व्यापारी केंद्र गुजरातला हलवल, बुलेट ट्रेन असे अनेक मुद्दे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाकडे आहेत."

एकनाथ शिंदे यांच्यासाठी काय आव्हानं?

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सप्टेंबर महिन्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात मुंबई, ठाणे, औरंगाबाद आणि कल्याण-डोंबिवलीची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. याचं कारण या चार महापालिका शिवसेनेच्या ताब्यात होत्या.

एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झालेत. पण त्यांची राजकीय कारकीर्द ठाणे जिल्ह्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. मुंबईबाहेर एकनाथ शिंदेंचं तसं फारसं राजकीय वर्चस्व नाही. त्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवलीत वगळता मुंबई महापालिकेत शिंदेंना मोठं आव्हान असणार आहे. पण मुंबई महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत भाजपनं मारलेली मुसंडी विसरून चालणार नाही. मुंबई महापालिकेत शिंदे गट भाजपच्या साथीनं लढेल हे एव्हाना स्पष्ट झालेलं आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाण्यातील शिवसेनेच्या 67 माजी नगरसेवकांपैकी 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केलाय. पण, मुंबई महापालिकेत अशी परिस्थिती नाही.

मुंबईत शिवसेनेच्या एकमेव माजी नगरसेविका शीतल म्हात्रे शिंदे गटात सामील झाल्यात. आमदार सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर शिंदे गटात असले तरी, ठाण्यासारखे मोठ्या संख्येने नगरसेवक किंवा पदाधिकारी उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे गटात सामील झाल्याचं दिसून आलेलं नाही.

मुंबईतले शिवसेनेचे 2 खासदार अरविंद सावंत आणि गजानन किर्तीकर मात्र अजूनही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत.

मुंबईतील आकड्यांचं गणित पहाता मुंबई महापालिका निवडणूक एकनाथ शिंदे यांच्यासाठी अजिबात सोपा पेपर नाही.

राजकीय विश्लेषक दीपक भातुसे सांगतात, "एकनाथ शिंदे महापालिका कोणत्या चिन्हावर लढवणार? हा प्रश्न कायम आहे. कारण या प्रकरणावर पुढे कायदेशीर लढाई सुरू राहील. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासमोर मोठं आव्हान आहे."

ते पुढे म्हणाले, "एकनाथ शिंदे भाजपसोबत जातील अशी चिन्ह दिसून येत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत थेट फायदा भाजपला होईल. आणि शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)