नाना फडणवीस कोण होते? पेशवाईत त्यांना महत्त्वाचं स्थान का मिळालं होतं?

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

14 जानेवारी 1761ला पानिपतावर झालेली निर्णायक लढाई. पेशवे घराण्याचे दोन महत्त्वाचे वंशज त्यादिवशी कामी आले होते. अनेक सरदारांनी, सैनिकांनी आता अंत जवळ येतोय हे दिसल्यावर आपापल्या वाटा धरल्या होत्या. खरंतर वाट दिसेल तिकडून पानिपत सोडायला सुरुवात केली. त्या परमुलखाच्या वाटाही अनेकांना माहिती नव्हत्या.

तिथून बाहेर पडणाऱ्यांमध्ये एक विशीच्या आतबाहेर वय असणारा तरुणही होता. या धामधुमीत त्याच्या आईशी आणि पत्नीशीही त्याची ताटातूट झाली होती.

कसाबसा लपत-छपत जीव वाचवून या तरुणानं पेशव्यांची बुऱ्हाणपूर येथे भेट घेतली. पेशव्यांना सगळा वृत्तांत सांगितला. काही काळानंतर या तरुणाला आपल्या आईचा पानिपत युद्धात मृत्यू झाल्याचं समजलं. पुढच्या काळात हा तरुण मराठा साम्राज्यात महत्त्वाचं स्थान मिळवणार होता. हा तरुण म्हणजेच बाळाजी जनार्दन भानू...अर्थात नाना फडणवीस.

नाना फडणवीस हे नाव गेल्या तीनशे वर्षांमध्ये अनेकवेळा अनेक कारणांनी वापरलं गेलं आहे. एखाद्या व्यक्तिमत्वाची ओळख त्याच्या मृत्यूनंतरही इतकी वर्षे वापरलं जाण्याची उदाहरणं फार कमी असतात.

त्यांच्या अनेक चढ-उतारांनी भरलेल्या आयुष्याची कहाणी एखाद्या सिनेमासारखी नाट्यमय वाटते. त्यांच्या कारकिर्दीकडे पाहिल्यानंतर मराठा साम्राज्यातलं त्यांचं महत्त्वाचं स्थान उमगतं.

नानांच्या घराण्याचा आणि पेशव्यांच्या घराण्याचा संबंध कसा आला?

नाना फडणवीसाचं भानू घराणं आणि पेशव्याचं भट घराणं यांचा संबंध अनेक वर्षांपासूनचा आणि पिढ्यांचा होता. बाणकोटच्या खाडी या दोन्ही घराण्यांशी संबंधित आहे. खाडीच्या उत्तरेस भट घराण्याचं श्रीवर्धन आणि दक्षिणेस भानू घराण्याचं वेळास.

भट घराण्यात बाळाजी विश्वनाथ आणि जानोजी विश्वनाथ हे दोघे भाऊ होते तर भानू घराण्यात नारायण, हरी, रामचंद्र, बळवंत हे चार भाऊ होते. त्यापैकी नारायण वगळता इतर तीन भावांबरोबर घाटावर जाऊ नाव कमवावे अशी भट बंधूंची इच्छा होती.

त्याप्रमाणे त्यांनी घाटाच्या दिशेने कूच करण्याचा निर्णय घेतला. वाटेत अंजनवेल इथं सिद्दीने भट बंधूंना पकडून ठेवले. मोठ्या हिकमतीने भानू बंधूंनी त्यांची सुटका केली.

ही सुटका केल्यानंतर 'आम्हास जी भाकर मिळेल तीत तुम्हाला चतकोर मिळेल' असं आश्वासन बाळाजी विश्वनाथांनी भानू बंधूंना दिलं. या भानूंच्या घराण्याला दिलेलं आश्वासन भट घराण्यानं पाळलंही. वासुदेवशास्त्री खरे यांनी नाना फडणवीसांचे जे चरित्र लिहिले आहे यात या घटनेचा उल्लेख आहे.

पेशवाई आणि फडणवीशी

कोकणातून साताऱ्यात आल्यावर 1714 साली सातारच्या शाहु महाराजांनी बाळाजी विश्वनाथांना पेशवेपदी नेमलं. बाळाजी विश्वनाथांनी शाहु महाराजांकडे शब्द टाकून हरी भानू यांना फडणवीशी दिली. मात्र हरी भानू यांचे चार-पाच महिन्यात निधन झालं. त्यांच्यानंतर बाळाजी (बळवंत) यांच्याकडे फडणवीशी आली. ते दिल्लीच्या स्वारी असताना त्यांना दिल्लीत मारण्यात आले.

त्यांच्य़ानंतर रामचंद्र फडणवीस झाले. त्यांचे 1724 साली निधन झाले. त्यानंतर बाळाजी यांचे पुत्र जनार्दन यांच्याकडे फडणवीशी आली.

नाना फडणवीसांचा जन्म

जनार्दन फडणवीस आणि रखमाबाई यांच्यापोटी जन्मास आलेले बाळाजी जनार्दन म्हणजेच नाना फडणवीस होय. नाना फडणवीस यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1742 रोजी सातारा येथे झाला. राघोबा दादांबरोबर उत्तर हिंदुस्थानाच्या मोहिमेच जनार्दन फडणवीस यांचं निधन झालंय.

अत्यंत हुशार तल्लखबुद्धीच्या नाना फडणवीसांना त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर 1756 साली फडणवीशी मिळाली. ते नानासाहेब पेशव्यांबरोबर स्वारीवरही जाऊ लागले. 1757 साली त्यांनी श्रीरंगपट्टणमच्या मोहिमेत भाग घेतला त्यानंतर पानपताच्या मोहिमेत ते सदाशिवरावभाऊ आणि विश्वासरावांसह सहभागी झाले.

वाढता दबदबा

पानिपतच्या युद्धानंतर नानासाहेब पेशवे फार काळ जगले नाहीत. सहा महिन्यांतच त्यांचा 23 जून 1761 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर थोरले माधवराव पेशव्यांची वस्त्रं स्वीकारली. नाना फडणवीस आता माधवरावांबरोबर काम करू लागले.

पेशवे मोहिमेवर जाताना कारभाराची जबाबदारी, किल्लेकोट नानांच्या भरवशावर टाकून जात. पराक्रमापोटी ते मोहिमांमध्ये विजयी होत असले तरी त्याचं थोडं श्रेय नाना फडणवीसांनाही दिलं पाहिजे असं मत वासुदेवशास्त्री खरे नोंदवतात. मोहिमांना लागणारा पैसा, दारुगोळा वेळेच्यावेळेस नाना पाठवत आणि राज्याची काळजी घेत म्हणूनच या मोहिमा पेशव्यांना निर्धोकपणे पार पाडता येत असं ते खऱ्यांनी लिहून ठेवलं आहे.

माधवरावांच्या कार्यकाळामध्ये नाना फडणवीसांकडे फडणीशीबरोबर अनेक जबाबदाऱ्या आल्या असं 'नाना फडणवीस अँड द एक्स्टर्नल अफेअर्स ऑफ द मराठा एंपायर' या पुस्तकाचे लेखक वाय. एन. देवधर यांनी लिहून ठेवलं आहे.

फडणीशी म्हणजे बजेटची आखणी, हिशेब ठेवणे, ऑडिट आणि पेशव्यांच्या राजधानी जबाबदारी पाहाणे हे काम नानांकडे आलं. तसेच मोहिमांच्यावेळेचीही व्यवस्था त्यांच्याकडे आली. देवधरांच्या या शब्दांमधून नानांच्या वाढत्या दबदब्याचा अंदाज येतो.

राघोबादादांची कैद आणि माधवरावांचा मृत्यू

राघोबादादा आणि माधवराव यांच्यात बेदिली होतीच. माधवरावांनी राघोबादादांना शनिवारवाड्यात कैद करून ठेवलं होतं. त्यांच्यावर देखरेखीसाठी नाना फडणवीसांना नेमण्यात आलं. 2 एप्रिल 1769 रोजी राघोबादादांनी शनिवारवाड्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नानांनी त्यांना पुन्हा पकडून बंदोबस्तात ठेवले.

माधवरावांचा 1772 साली क्षयामुळे मृत्यू झाला. मृत्यूपर्यंत नाना फडणवीस आणि हरिपंत फडके त्यांच्याबरोबर होते.

नारायणराव पेशवे आणि नानांची कारकीर्द

माधवरावांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशव्यांचे कनिष्ठ पुत्र नारायणराव पेशवेपदावर आले. नारायणराव आणि राघोबादादा यांच्यात आजिबात सख्य नव्हते. नारायणरावांविरोधात कारस्थान सुरू असल्याची कुणकुण नानांच्या कानावर गेली होती असं सांगितलं जातं. मात्र नारायणरावांना मारलं जाईल हे काही कोणाच्याही कल्पनेतही नव्हतं. नारायणरावांचा खून झाल्यावर मात्र पुण्यात मोठा गजहब उडाला.

नारायणरावांच्या हत्येनंतर अल्पकाळासाठी रघुनाथराव म्हणजे राघोबादादा यांच्याकडे 31 ऑक्टोबर 1773 रोजी सूत्रे आली. मात्र सखारामबापू, नाना फडणवीस, त्रिंबकराव पेठे, हरिपंत फडके यांच्या बारभाई कारभारामुळे सात महिन्यांमध्येच राघोबांची कारकीर्द संपली.

सवाई माधवराव आणि चौकडीचं राज्य

नारायणरावांच्या पत्नी गंगाबाई गरोदर होत्या. त्यांना पुरंदर किल्ल्यावर सुरक्षित ठेवण्यात आलं. त्यांना जो मुलगा झाला त्याला वयाच्या 40 व्या दिवशी पेशवे म्हणून नेमण्यात आलं. त्यालाच सवाई माधवराव म्हणून ओळखलं जातं.

सवाई माधवरावांच्या काळात आधी सखारामबापू नंतर नाना फडणीस, महादजी शिंदे आणि होळकर यांच्या हातात सारी सत्ता होती. त्यामुळे त्याला 'चौकडीचं राज्य' म्हणत असं अ. रा. कुलकर्णी यांनी 'पुण्याचे पेशवे' पूर्वरंग भाग-2 पुस्तकात लिहून ठेवलं आहे. 1775 साली पेशवे आणि इंग्रजांमध्ये पुरंदरचा तह झाला. त्यानंतर नानांनी शिंदे, होळकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

बारभाई कारस्थान

नारायणरावांच्या हत्येनंतर मात्र रघुनाथरावांना सखारामबापू बोकिलांनी वरवर आपला पाठिंबा आहे असं भासवलं आणि नारायणरावांना न्याय मिळण्यासाठी बारभाईंमध्ये सहभागी झाले. रघुनाथरावांच्या पक्षाऐवजी आपण नारायणरावांच्या वंशजाबरोबर राहायचे असं या बारभाईंनी ठरवलं. बारभाईंमध्ये शिंदे, होळकरांसह, त्रिंबकजी पेठे, हरिपंत फडके यांचाही समावेश होता.

नारायणरावांच्या मृत्यूनंतर रघुनाथरावांनी कर्नाटक मोहीम आखली होती. त्या मोहिमेतून सखारामबापूंनी स्वतःची सुटका करुन पुणे गाठलं होतं.

नारायणराव पेशव्यांच्या हत्येवेळी त्यांची पत्नी गंगाबाई गरोदर होती. त्यांना झालेल्या मुलाला म्हणजे सवाई माधवरांवाना पेशवाईची वस्त्रं देऊन त्यांच्यानावे हे बारभाई कारभार पाहू लागले. त्या बारभाईत सखारामबापू अग्रेसर होते.

सवाई माधवरावांच्या काळात रघुनाथरावांना पेशवाईपासून लांब राहावे लागले होते. त्यांना पुन्हा पुण्यात घेऊन यावे यासाठी मोरोबादादा फडणीसांनी इंग्रजांकडे प्रयत्न केले होते. त्यातही सखारामबापूंचा समावेश होता.

इंग्रज व रघुनाथराव यांजबरोबर बारभाईंनी वडगावचा तह केला. तेव्हा बापूचा शत्रूपक्षाशी झालेला पत्रव्यवहार उघडकीस आला, तेव्हा नानांनी त्यांना कैदेत टाकले. रायगडावर कैदेत असतानाच सखारामबापूंचा मृत्यू झाला. त्यानंतर जवळपास सर्व कारभार नाना फडणवीसांकडे एकवटला.

मराठी विश्वकोश या कारस्थानाबद्दल सांगतो, "बारभाई म्हणजे बारा माणसांचे मंडळ असे नसून काही एका हेतूने एकत्र जमलेला समूह होता. बारभाई मंडळ स्थापन झाले, तेव्हा त्यात सखाराम बापू, भगवंत बोकील, बाळाजी जनार्दन उर्फ नाना फडणीस, त्रिंबकराव पेठे, हरिपंत फडके, मालोजी घोरपडे, महादजी शिंदे, तुकोजी होळकर ही प्रमुख मंडळी होती. रघुनाथरावाला पदच्युत करून नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हिच्या नावाने कारभार करावा तिला मुलगा झाला तर त्यास, नाही तर दत्तक घेऊन त्याच्या नावाने कारभार करावा, असे सुरुवातीस कारस्थान ठरले. यालाच बारभाई कारस्थान म्हणतात."

इंग्रजांना दमवले

नाना फडणवीसांनी आपल्या बुद्धीकौशल्याच्या जोरावर अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांच्या राजकारणाबद्दल इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "राजकारणात कोणी शत्रू-मित्र नसतो, आपल्याला उपयोग होईल तसं समोरच्याला शत्रू की मित्र म्हणायचं हे ठरतं. नानांनी इ.स.1779च्या सुमारास पहिल्या इंग्रज मराठा युद्धात इंग्रजांविरुद्ध नागपूरकर भोसले आणि पेशव्यांचे पिढीजात शत्रू असलेले निजाम-हैदर यांची युती घडवून आणली."

ते पुढे म्हणतात, " एकंदर कर्नाटकात हैदर, आंध्र-तेलंगणात निजाम आणि पूर्वेकडे उडीसा बंगालच्या बाजूला नागपूरकर भोसल्यांच्या फौजांनी इंग्रजांना त्रस्त करण्याचं हे राजकारण होतं. हैदराच्या मृत्यूनंतर टिपूने धर्मांध राजकारण करून दक्षिणेत हैदोस घातला तेव्हा निजामालाही त्याला आवरणं अशक्य होतं.

1786 मधल्या बदामीच्या स्वारीनंतर 1790 मध्ये नानांनी निजाम आणि इंग्रजांना एकत्र आपल्या बाजूने आणून टिपूवर स्वारी केली, अन श्रीरंगपट्टणच्या या प्रसिद्ध मोहिमेअंती टिपू शरण आला. माधवराव गेल्यावर मराठी सत्ता आपल्या हाती आरामात पडेल असा इंग्रजादी लोकांचा होरा असताना पुढे जवळपास तीस वर्षे हे स्वप्नं स्वप्नंच राहिलं ते नाना-महादजी या जोडगोळीमुळे."

राज्यकारभारातील सुधारणा

पेशवाईतील बहुतांश जबाबदारी अंगावर घेणाऱ्या नानांनी राज्यकारभारात अनेक सुधारणा केल्या होत्या. पडजमिनी लागवडीखाली आणल्या. नवीन वसाहतींची निर्मिती, पाटबंधाऱ्याची अनेक कामं त्यांनी केल्याचं त्यांचे चरित्रकार वासुदेवशास्त्री खरे लिहितात.

सरकारी कामात दक्षता आणि टापटिपपणा हे नानांचे विशेष गुण होते. सरकारी कामाला ते प्राणापलिकडे जपत असत असे खरे लिहितात. गावातून पिकाऊ जमिनीचाच सारा गोळा करावा असा आदेश त्यांनी काढला होता. दरवर्षाला मामलेदार बदललाच पाहिजे असा त्यांचा नियम होता.

तोतयाचं बंड आणि करारी नाना

माधवरावांच्या काळात सदाशिवराव भाऊंसारखा दिसणारा एक माणूस पुण्यात उगवला. मीच सदाशिवरावभाऊ असल्याची आवई त्यानं उठवली. त्यावर काही लोकांचा विश्वासही बसला. अखेर चौकशीअंती तो सुखलाल नावाचा कनोजी ब्राह्मण असल्याचं सिद्ध झालं होतं. त्याला उचलून थेट रत्नागिरी किल्ल्यावर डांबण्यात आलं होतं.

याच तोतयानं सवाई माधवरावांच्या काळात पुन्हा तोंड वर काढलं. रत्नागिरीच्या किल्लेदार रामचंद्र नाईक परांजप्यांनी त्याची मुक्तता केली. तोतया सुखलालला पाठिंबा द्यायला स्वराज्याचे अनेक शत्रू तयार झाले. तसेच पेशव्यांचे अनेक नातेवाईक, सरदार मंडळी आणि आरमारातील लोकही सामील झाले.

शक्ती वाढवत तो पुण्याच्या दिशेने कूच करु लागला. हे पाहून त्याच्याशी लढाई करण्यात आली. त्यातून पळून जाताना आंग्र्यांनी त्याला पकडून पेशव्यांच्या स्वाधिन केलं. पुण्यात त्याची पुन्हा चौकशी करुन त्याला देहांत प्रायश्चित्त देण्यात आलं. त्याला एकदा शिक्षा दिल्यावर मात्र नानांनी बंडात सामील असणाऱ्या सर्वांची हजेरी घेतली. सर्वांना प्रायश्चित्त दिलं. दंड केले अनेकांना अटकही केली.

इंग्रज-होळकर-शिंदे-मोरोबा

नाना फडणवीसांनी सवाई माधवरावांच्या काळात कधी युद्ध, कधी मैत्री, कधी तह, कधी रुजवात काढणे अशी कामं केली. इंग्रजांची सगळी ताकद व्यापारात आहे हे दिसल्यावर त्यांनी काही काळ इंग्रजांचा पुणे मुंबईचा व्यापार तोडून आपली ताकद दाखवली. फ्रेंच आणि इंग्रज यांच्यातलं वैर जाणून घेऊन मुद्दाम फ्रेंचांचं स्वागत, आदरातिथ्य करण्याचं नाटक वठवलं.

नानांचे चुलत आजोबा रामचंद्र यांचा नातू मोरोबा हा होता. त्याने राघोबांचा पक्ष घेऊन जमवाजमव करण्याचा निर्णय घेतला. सखारामबापू, मोरोबा फडणवीस, तुकोजी होळकर यांनी राघोबादादांना मुंबईतून पुण्यात घेऊन येण्यास इंग्रजांना सांगितले. मात्र इंग्रजांनी वडगाव येथे माघार घेतली. त्यावेळेस राघोबादादांना 12 लाखांची जहागिरी देऊन शांत बसवण्यात आलं आणि सखारामबापूंना सिंहगडावर अटकेत ठेवलं गेलं.

सखारामबापूंनंतर महादजी शिंदे आणि नाना फडणीस राज्यकारभार पाहू लागले. टिपूविरुद्धच्या लढाया, खर्ड्याची लढाई, घाशीराम कोतवालाचं प्रकरण याच काळात झालं.

सवाई माधवरावांचा अंत

राज्यकारभाराची सगळी घडी बसल्यानंतर आता काही हितशत्रूंनी नानांविरोधात दुसऱ्या बाजीरावाला म्हणजे राघोबादादांच्या मुलाला तयार केले. तसेच सवाई माधवरावांच्या मनातही त्याच्याबद्दल आपुलकी निर्माण होईल अशी व्यवस्था केली.

सवाई माधवराव आणि दुसरे बाजीराव यांच्यामध्ये पत्रव्यवहार सुरू झाला. पण नानांच्या तात्काळ लक्षात आल्यावर त्यांनी पेशव्यांना खडसावलं आणि बाजीरावाला कैदेत ठेवलं. ही गोष्ट पेशव्यांच्या मनाला लागली असं मानलं जातं.

ढासळललेली तब्येत आणि तापाच्या भरात त्यांनी कवाड उघडून शनिवारवाड्यातल्या कारंजावर उडी मारली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या मृत्यूलाही काही लोक नानांना जबाबदार धरतात.

दुसरे बाजीराव

सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर राघोबांच्या दुसऱ्या बाजीरावाला पेशवेपद मिळू नये यासाठी नानांनी आटोकाट प्रयत्न केले. सर्वांना एकत्र करुन दुसऱ्या बाजीरावाऐवजी पेशवेपदावर पेशव्यांच्या नातलगांमधील कोणी मुलगा दत्तक घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू केले. पण त्याला यश आले नाही.

शेवटी त्यांनी राघोबांचा दुसरा मुलगा चिमणाजीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतले. पण अनेक हिकमतीने दुसऱ्या बाजीरावाने पेशवेपद मिळवलेच. चिमणाजीचं दत्तक विधान रद्द करवलं. दुसऱ्या बाजीरावाला नानांनी नाईलाजानं परवानगी दिली. दुसऱ्या बाजीरावानं पेशवा होताच वर्षभरासाठी नाना फडणवीसांनाच नगरला कारागृहात टाकलं.

दुसऱ्या बाजीरावांच्या काळात नाना फडणवीस यांच्या कारकिर्दीचा अस्त झाला. अनेक दशकं राजकारणावर प्रभाव असणाऱ्या नानांना बाजूला करायला दुसरे बाजीराव प्रयत्न करत होते.

'कंपनी सरकार' या पुस्तकात लेखक अ. रा. कुलकर्णी लिहितात, "नाना फडणीस, पेशवा आणि शिंदे यांना इंग्रजांबरोबर भांडण उकरून काढण्याच्या त्यांच्या प्रयत्नापासून त्यांना परावृत्त करीत होता. पण नव्या पेशव्याच्या काळात नाना कवडी किमतीचा झाला होता. त्यांना नानाचा शहाणपणाचा सल्ला नको होता, तर नानाच्या गाठी असलेला पैसा हवा होता. बाजीराव 22 वर्षांचा आणि त्याचा मित्र दौलतराव 18 वर्षांचा. दोघेही अपरिपक्व आणि राजकारणात नवखे होते. अशा परिस्थितीत ते सापडले असताना त्यांना नानाचा सल्ला नकोसा झाला होता."

नगरवरून सुटका झाल्यावर काही काळातच 13 मार्च 1800 रोजी नानांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंतिम संस्काराच्यावेळेस हजारो लोक उपस्थित होते, असं अ. रा. कुलकर्णी यांनी लिहून ठेवलं आहे. त्यांच्या मृत्यूनंतर कर्नल विल्यम पामर म्हणाला, "नाना मेले, आणि त्यांबरोबरच मराठी राष्ट्रांतील शहाणपणा व नेमस्तपणाही लयाला गेला."

नाना फडणवीसांचा पुण्यातला वाडा नाना वाडा या नावाने ओळखला जातो. तेथे अनेक वर्षे शाळा भरत असे. आता तेथे स्वातंत्र्यसैनिक संग्रहालय तयार करण्यात आले आहे.

नाना वाड्यातील संग्रहालयाबद्दल पुण्यातील इतिहास प्रेमी आणि हेरिटेज वॉक आयोजित करणारे संदीप गोडबोले यांनी बीबीसी मराठीकडे आपलं मत मांडलं.

ते म्हणाले, "नाना वाडा ही वास्तू इतिहास व स्थापत्य या दोन्ही कारणांमुळे महत्त्वाची आहे. साधारण दीड वर्षापूर्वी याच वाड्यात महानगरपालिकेने स्वातंत्र्यसेनानींची स्मृती जतन करण्यासाठीचा संग्रहालयाची घोषणा केली. दुर्दैव असे आहे की नागरिकांना वाडा व संग्रहालय पाहण्यासाठी खुले नाही. जिज्ञासू नागरीक व पर्यटक यांनी आवर्जून पहावी असे वारसा स्थळ (heritage building) बहुदा लाल फितीमुळेच बंद आहे."

नाना वाड्याप्रमाणेच पुण्यातील बेलबाग आणि नातूबाग या बागाही नाना फडणवीसांच्या मालमत्तेमध्ये होत्या. बेलबागेतल्या देवळांचं काम 1769 साली पूर्ण झालं. बेलबागेसाठी 25 हजार रुपयांचा खर्च झाला होता. 1818 साली नानांच्या विधवा पत्नी जिऊबाई यांच्याकडे मंदिराचा कारभार आला आणि तो पुढे वंशजांकडे सुरू राहिला.

नाना फडणवीसांनी नाना पेठ ही पुण्यात विकसित केलेली पेठ होय. नाना पेठेचे पूर्वीचे नाव हनुमंत पेठ असे होते. गणेश पेठेच्या शेजारी आणि नागझरी पलिकडे ही पेठ वसवली होती असं अ. रा. कुलकर्णी लिहितात. मेणवली येथे असणारा त्यांचा वाडा आजही पाहायला मिळतो.

याशिवाय मूळगाव वेळासचे काळभैरव मंदिर त्यांनी बांधले. त्याचप्रमाणे देशावर येणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी खोपोलीला पाण्याचा तलाव, मंदिर, धर्मशाळा आणि अन्नाची सोय केली होती. तसेच कोपरगाव, वेरुळ येथे वाडे बांधले. भीमाशंकराचे मंदिर त्यांनी बांधायला घेतले मात्र ते त्यांच्या हयातीमध्ये पूर्ण झाले नाही. त्यांच्या पत्नीने ते पूर्ण केले.

नानांची एकूण नऊ लग्नं झाली होतील. त्यातील सात बायका त्यांच्या हयातीतच निधन पावल्या होत्या. एक पत्नी त्यांच्या मृत्यूनंतर पंधरा दिवसांमध्येच वारली. नानांना एकूण दोन मुली आणि एक मुलगा अशी अपत्यं झाली मात्र ती सर्व मुलं त्यांच्या बालपणातच देवाघरी गेली. नानांच्या पश्चात त्यांची सगळी संपत्ती दुसऱ्या बाजीरावांनी जप्त केली.

नानांच्या मृत्यूच्यावेळेस त्यांची पत्नी जिऊबाई फक्त 9 वर्षांच्या होत्या. सुरुवातीला काही काळ शनिवारवाड्यात गेल्यावर त्यांना लोहगडला ठेवण्यात आलं. तिथं दोन वर्ष काढल्यावर इंग्रजांमुळे पेशवे त्यांना दरवर्षी 12 हजार पेन्शन देऊ लागले.

लोहगडावरुन जिऊबाई पनवेलला गेल्या. तिथं 16 वर्षं राहिल्या. बाजीरावांची बिठूरला रवानगी झाल्यावर त्या पुण्यात आल्या. पुण्यात आल्यावर त्यांना बेलबाग आणि मेणवली गाव पुन्हा देण्यात आला. त्यानंतर त्या मेणवलीला राहायला गेल्या.

मृत्यूपुर्वी त्यांनी एक मुलगा दत्तक घेतला होता. त्या मुलाचे माधवराव असे ठेवण्यात आले. ते माधवरावही निःसंतान मरण पावले. त्यांच्यापश्चात त्यांच्या पत्नीने मुलगा दत्तक घेऊन त्यास बाळाजी माधव असे नाव दिले. अशा तऱ्हेने बेलबाग आणि मेणवली फडणवीस घराण्याकडे वंशपरंपरागत सुरू राहिले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)