इस्रायल आणि पॅलेस्टिन संघर्ष : एका मुसलमान राज्याचा मराठी ज्यू पंतप्रधान होतो तेव्हा..

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

अलिबाग गावाच्या दक्षिणेला ज्या एकदम सुशेगाद वाड्या आहेत तिथं फिरताना सिनेगॉग कुठे आहे? असा प्रश्न विचारलात तर कदाचित तुम्हाला उत्तर मिळणार नाही.

'मागन अॅबोथ' नावाचं इतकं प्रसिद्ध सिनेगॉग लोकांना कसं माहिती नाही? असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. माझंही तेच झालं. पण तेवढ्यात एक बाई म्हणाल्या, 'अहो सिनेगॉग नाही मशीद म्हणा..' मशीद म्हटल्यावर लोकांचे डोळे चमकले.

'अच्छा मशीद होय', असं म्हणून एखादा लहान मुलगा तुम्हाला सिनेगॉगपर्यंत घेऊन जातो. तुम्ही मात्र कोड्यात पडता. ज्या मुसलमानांशी तुमचं जगभरात वैर आहे तेव्हा तुम्ही तुमच्या मंदिराला मशीद काय म्हणता? असा प्रश्न विचारावासा वाटतो.

परंतु त्यानंतर असेच एकेक धक्के बसले की तुम्हाला हळूहळू 'बेने इस्रायली' प्रकरण उलगडत जातं. आज जगभरात यूएई, बाहरिन आणि इस्रायल यांच्यात शांतता करार झाल्यावर सर्वांचे डोळे विस्फारले आहेत. साक्षात जेरुसलेम, वॉशिंग्टन आणि दुबईत बसलेले राज्यकर्ते अजूनसुद्धा ताक फुंकून पित असतील.

या दोन धर्माचे शांतता करार कसे होऊ शकतात? इस्रायलला मुस्लीम देश अशी स्पष्ट मान्यता कशी देतो याचा लोकांना धक्का बसला आहे. पण भारतीय मुस्लीम आणि ज्यूंनी (त्यातही मराठी बेने इस्रायलींनी) गेल्या 2 हजार वर्षांपासून एक आदर्श सहजीवनाचा वस्तूपाठ घालून दिला आहे.

इस्रायलची स्थापना 1948 साली झाल्यापासून इस्रायल आणि सध्या उरलेल्या गाझा, वेस्ट बँकमध्ये एकही वर्ष शांततेत गेलं नसेल मात्र महाराष्ट्रात या दोन धर्मांनी नव्हे त्यांच्याबरोबर हिंदू धर्मानेही शांततेत एकत्र राहून दाखवलं आहे. इतकंच नव्हे तर मुस्लीम संस्थानाचं आजच्या पंतप्रधानासारख्या दर्जाचे दिवाणपद (कारभारी) ज्यू व्यक्तीने सांभाळलं आहे.

मुरुड-जंजिरा संस्थान

मुरुड-जंजिरा हे महाराष्ट्राच्या पश्चिमेचं एक संस्थान होतं. भारतातल्या सिद्दी समुदायाच्या ताब्यातलं ते एक महत्त्वाचं संस्थान होतं. अरबी भाषेत 'जझीरा' म्हणजे बेट. त्याचाच अपभ्रंश होऊन बेटावर उभ्या असलेल्या या किल्ल्याला जंजिरा असं नाव मिळालं. बॉम्बे अँड द सिदीज या दादी रुस्तमजी बनाजी यांच्या पुस्तकात सिद्दी संस्थानाची विस्तृत माहिती मिळते.

सिद्दीच्या ताब्यात असलेला हा जंजिरा किल्ला कोणत्याही मराठी राजाला, पेशव्यांना जिंकता आला नाही. 1948 साली हे संस्थान भारतात विलीन होईपर्यंत जंजिरा किल्ला मराठी मुलखात येऊ शकला नाही. गोविंद सखाराम सरदेसाई यांच्या 'मराठी रियासत खंड-3' मध्येही सिद्दी आणि सातारचे शाहू, पेशवे यांच्यातील संबंधांची माहिती मिळते.

मुरुड जंजिरा संस्थानाच्या प्रदेशाला ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आणि जुन्या पुस्तकांत 'हबसाण' असा शब्द वापरल्याचा दिसून येतो.

अॅबेसिनिया शब्दाचा अपभ्रंश होऊन हबसाण झाला असावा असं म्हटलं जातं. सिद्दी समुदायाला हबशी असं म्हटलं जातं. या संस्थानचं दिवाणपद (पंतप्रधान) 1891 ते 1896 शलोम बापूजी इस्राएल वारघरकर यांच्याकडे होतं. या पदाला 'स्टेट कारभारी' असंही म्हटलं जाई.

शलोम बापूजी इस्राएल वारघरकर

शलोम बापूजी इस्राएल वारघरकर यांचा जन्म 7 ऑगस्ट 1853 रोजी बेळगावमध्ये झाला. व्यावहारिक शिक्षणातल्या फारच कमी इयत्ता त्यांनी पार केल्या असल्या तरी बुद्धीच्या जोरावर त्यांनी कारकूनपदाची नोकरी मिळवली. त्यानंतर ते लगेचच 'मामलतदार'ही झाले.

1872 पासून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. 1888 साली जंजिऱ्याच्या नवाबांनी त्यांना खानसाहेब ही पदवी दिली तर त्यानंतर लगेचच त्यांना खानबहादूर पदवी मिळाली. 1891 ते 1896 या कालावधीत ते जंजिरा संस्थानचे दिवाण झाले. या काळामध्ये सर अहमदखान सिद्दी इब्राहिम खान हे जंजिऱ्याचे नवाब होते.

तेल अविवमधील इतिहास अभ्यासक एलियाझ दांडेकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "मुरुड-जंजिरा संस्थानात मुस्लीम आणि हिंदू दोन्ही धर्माचे लोक होते. या दोन्ही समुदायांना एखादी गोष्ट समजावून देण्यासाठी त्रयस्थ अशा ज्यू धर्माच्या शलोम यांचा उपयोग होई. दोन्ही धर्माचे लोक त्यांचं ऐकत. त्यांनी मुरुड-जंजिरा संस्थानात सामाजिक ऐक्य स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले."

नवाबाने दिली स्मशानाला जागा

1894 साली शलोम बापूजी यांच्या मिल्का या मुलीचं मुरुडमध्ये निधन झालं. आपल्या समुदायातल्या लोकांचे मृत्यू झाल्यावर दफन करण्यासाठी जागा नाही हे शलोम यांनी नवाबांना लक्षात आणून दिलं. त्यानंतर नवाबांनी दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली. आज ही हे स्मशान मुरुडमध्ये आहे.

जंजिरा संस्थानचे वार्षिक अहवाल पाहिल्यास नवाबांनी सर्व धर्माच्या लोकांना 'स्टेट कारभारी' पदावर काम करायला दिल्याचं दिसतं. शलोम यांच्याआधी विनायक सखाराम कर्णिक, मिर्झा अब्बास बेग आणि शलोम यांच्यानंतर रावबहादूर व्यंकटराव सुब्बराव कोप्पीकर हे 'स्टेट कारभारी' झाल्याचं दिसतं.

शलोम बापूजी म्हणजे ज्यू व्यक्तीला मुसलमान नागरिकांना ज्या खानबहादूर, खानसाहेब पदव्या दिल्या जात त्याच पदव्या दिलेल्या दिसून येतात. तर कोप्पीकरांसारख्या हिंदू व्यक्तीला हिंदूपद्धतीची पदवी दिलेली दिसते.

जंजिरा संस्थानच्या 1896-97 या वर्षीच्या अहवालात सरन्यायाधीश रघुनाथ दामोदर यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी कर्सेटजी जीवनजी मिस्त्री म्हणजे एका पारशी व्यक्तीची नेमणूक केल्याचंही दिसून येतं. यावरून संस्थानात विविध धर्माच्या लोकांना उच्चपदावर काम करण्याची संधी मिळाल्याचं दिसतं. जंजिरा संस्थानच्या शेवटच्या काही अहवालांमध्ये 'कारभारी' ऐवजी 'दिवाण' असा शब्द वापरला आहे. 1890-1898 या कालावधीतले जंजिरा स्टेट अहवाल इंटरनेटवर उपलब्ध आहेत.

शलोम यांच्याबरोबर एलियाझ दांडेकर यांचे पणजोबा एलिझरही मुरुड संस्थानात काम करत असत. एलिझर मुरुड संस्थानाचे मुख्य जल अभियंता होते.

त्यांनी तिथल्या पाण्याचं नियोजन ज्या पद्धतीने केलं ती पद्धत आजपर्यंत वापरली जात होती असं एलियाझ सांगतात.

एलियाझ यांच्या पणजोबांचा दफनविधी याच स्मशानात झाला आहे. तर शलोम यांचा 1942 साली पुण्यात मृत्यू झाला. तिथंच त्यांना दफन करण्यात आलं.

जेकब बापूजी आणि हाईम शलोम

शलोम यांचे भाऊ जेकब बापूजी औंध संस्थानाचे कारभारी म्हणून नेमले गेले. त्यांचा जन्म 1865 साली झाला. त्यांनाही खानबहादूर ही पदवी मिळाली होती.

औंधचे संस्थानिक भवानराव पंतप्रतिनिधी यांनी जेकब यांच्या कारभाराच्या कडू-गोड आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्या वाचण्यासारख्या आहेत. संस्थानिक आणि सरकारी नोकर यांचं नातं कसं असायचं हे त्यातून समजून येते.

जेकब बापूजी यांचा मृत्यू 1933 साली झाला. औंध संस्थानाच्या 1908 च्या वार्षिक अहवालात त्यांचं नाव जेकब बी. इस्रायल असं नोंदवलेलं असून त्या खाली 'कारभारी, औंध स्टेट' असं लिहिलं आहे.

त्यानंतर शलोम बापूजी यांचा मुलगा हाईम यांची अक्कलकोटच्या दिवाणपदी नेमणूक झाली. हे वारघरकर कुटुंबीय मुस्लीम आणि हिंदू दोन्ही धर्मियांशी चांगले संबंध ठेवून असल्याचं दिसतं.

जेकब बापूजी यांनी 1926 सालच्या 'द इजरलाईट' या अंकामध्ये आपल्या आई आणि आजीबद्दल लेख लिहिला होता.

हा लेख नीना हाईम्स आणि आल्याशा हाईम्स यांनी संपादित केलेल्या 'इंडियन ज्युईश वूमन' पुस्तकात वाचायला मिळतो. या लेखामध्ये जेकब यांनी आपली आई मुस्लीम धर्मियांशी विशेष चांगल्या पद्धतीने वागत असे असं लिहिलं आहे.

औंध संस्थानात काम करत असताना एक मुस्लीम महिला आपल्याला भेटली तेव्हा तिने आपल्या आईची आठवण सांगितली असं ते लिहितात.

त्या महिलेने आपल्या आईची आठवण सांगितल्यावर माझे डोळे भरून आले असं ते लिहितात. आपली आई हिंदू धर्मातले गोसावी किंवा मुस्लीम धर्मातले फकीर दारावर आले तर दोघांनाही भिक्षा घालत असे. लग्नसमारंभात मुस्लीम महिलाही घरी गाणी म्हणायला यायच्या असं ते लिहितात.

शलोम यांच्या मुलाचं नाव म्हणजे हाईम हे नाव आपल्या आजीने (आईची आई) ठेवलं होतं. तिला आपल्या नातवाचं नामकरण करण्याचं भाग्य मिळालं हे जेकब यांनी लेखामध्ये दोनवेळा लिहून ठेवलं आहे.

ज्यू भारतीयांमध्ये कसे मिसळले?

भारतामध्ये ज्यू सुमारे 2000 वर्षांपूर्वी आल्याचं मानलं जातं. अलिबागजवळ नौगावमध्ये जहाज फुटल्यानंतर हे लोक किनाऱ्यावर आले आणि स्थायिक झाले. या लोकांनी आपला पूर्वापारचा तेल गाळण्याचा व्यवसाय सुरू ठेवला.

शनिवारी सुटी (शब्बाथ) घेण्याच्या त्यांच्या सवयीवरून त्यांना 'शनवार तेली' म्हटलं जाऊ लागलं. हिंदू तेली सोमवारी सुटी घेत (कारण शंकराचं वाहन नंदी म्हणजे बैलाकडून या दिवशी काम करून घेतलं जाऊ नये म्हणून). बेने इस्रायलींप्रमाणे भारतात बगदादी, बेने मनाशे आणि कोचीनचे ज्यू असे ज्यूंचे समूह आहेत.

या शनवार तेलींनी हळूहळू स्थानिक संस्कृतीशी मिसळून राहायला सुरुवात केली. ते ज्या गावात राहिले त्या गावच्या नावावरून आडनावं घेतली.

राजपूरकर (राजापूरकर नव्हे), तळकर, नौगावकर, दांडेकर, दिवेकर, रोहेकर, पेणकर, पेझारकर, झिराडकर, चेऊलकर, अष्टमकर, आपटेकर, आवासकर, चिंचोलकर, चांडगावकर अशी साधारण 350 आडनावं मराठी ज्यूंमध्ये आढळतात. या लोकांनी स्वतःला बेने इस्रायली म्हणजे 'इस्रायलची लेकरे' म्हणवून घ्यायला सुरुवात केली.

बरीच वर्षं हे लोक कोण असावेत याचा अंदाज स्थानिक लोकांना नव्हता. एके दिवशी डेव्हिड रहाबी नावाचे गृहस्थ कोकणात आले. त्यांचा कोकणात येण्याचा काळ काही ठिकाणी इ.स. 1000, काही ठिकाणी 1400 तर काही ठिकाणी इ.स.1600 असावा असं मानलं जातं.

'इवोल्युशन ऑफ द बेने इस्रायल्स अँड देअर सिनगॉग्स इन द कोकण' पुस्तकाच्या लेखिका डॉ. इरेन ज्युडा यांनी डेव्हिड रहाबी यांच्या कामाबद्दल लिहून ठेवलं आहे.

डेव्हिड रहाबी यांनी या लोकांचे वर्तन आणि चालीरिती ज्यू लोकांच्याच असल्याचं ओळखलं. त्यांनी शापूरकर, झिराडकर आणि राजपूरकर कुटुंबातल्या तीन लोकांना प्रशिक्षण दिलं आणि सर्व समुदायाला ज्यू धर्माच्या शिकवणीची माहिती दिली. या तिघांना 'काझी' असा शब्द त्यांनी वापरला आहे. हळूहळू या कुटुंबांनी हिब्रू शिकून धर्मग्रंथांचं वाचन सुरू केलं.

शिक्षण आणि नोकऱ्या

मुंबईचा विकास ज्या काळात होत होता त्याच काळाच तत्कालीन पश्चिम भारतात नव्या इंग्रजी पद्धतीच्या शिक्षणाचं वारं वाहात होतं. हे वारं ज्या समुदायांनी लवकर ओळखलं त्यांना तात्काळ नोकऱ्या आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत झाली.

पारशी, बेने इस्रायली, गौड सारस्वत ब्राह्मण अशा काही समुदायांनी अगदी 18 व्या शतकापासून व्यापार किंवा इतर व्यवसायांचे ठेके मिळवल्याचे दिसून येतं. अनेकांना ईस्ट इंडिया कंपनीच्या पोलीस, लष्कर आणि इतर खात्यात नोकऱ्या मिळाल्या.

'मुंबईचे वर्णन' हे प्रसिद्ध पुस्तक लिहिणाऱ्या गोविंद नारायण माडगावकर यांच्या मते बेने इस्रायली लोक 1750 साली कोकणातून मुंबई बेटात आले. त्यानंतर त्यांनी कमांडंट, मेजर सुभेदार, नाईक, हवालदार अशी पदं पलटणीत मिळवली असं ते लिहितात.

बेने इस्रायली लोक इंग्रजी शिकून ऑफिसात काम मिळवतात किंवा शिक्षकही होतात, असं ते या पुस्तकात सांगतात. या बेने इस्रायलींमध्ये शिक्षणाचा वेगाने प्रसार होत असल्याचा उल्लेख ते आवर्जून करतात. त्यानंतर ते भारतभर पसरत गेले, काही परदेशात गेले. इस्रायलची स्थापना झाल्यावर बहुतांश बेने इस्रायली इस्रायलला निघून गेले.

मशीद बंदरची 'मशीद' आली कुठून?

अलिबागच्या मशिदीप्रमाणे मुंबईतही सिनेगॉगला 'मशीद' असंच म्हटलं जाई. आज मुंबईतलं 'मशीद बंदर' (मस्जीद बंदर स्टेशनचं नाव ज्यामुळे आले ते) नावामधली मशीद ही मुसलमानांची नसून ज्यूंची आहे असं म्हटलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल ना... त्यातही हे सिनेगॉग बांधण्यामागे टिपू सुलतानाचा दूरचा का होईना संबंध आहे असं म्हटलं तर? हो! हे सगळं असंच झालं आहे. भारतातील ज्यू आणि मुस्लीम यांचं नातं असंच आहे.

मुंबईतलं हे सिनेगॉग 'गेट ऑफ मर्सी', दयेचे द्वार किंवा 'शार हाराहमीम' नावानं ओळखलं जात असलं तरी या परिसरातले लोक त्याला 'जुनी मशीद' नावानेच ओळखतात. 1796 साली हे सिनेगॉग सॅम्युएल इझिकेल दिवेकर (सामाजी हासाजी दिवेकर) यांनी बांधलं.

सॅम्युएल दिवेकर आणि त्यांचे भाऊ टिपू सुलतानाविरोधात इंग्रजांच्या बाजूने लढत असताना त्यांना पकडण्यात आले. टिपूच्या दरबारात सर्वांना शिक्षा देत असताना हे दोघे कोणीतरी वेगळे आहे असं टिपूच्या आईने टिपूला सांगितलं.

'जर माझी सुटका झाली तर मी मुंबईत सिनेगॉग बांधेन', असा नवस सॅम्युएल यांनी मनोमन केला होता असं सांगितलं जातं आणि त्यानंतर त्यांनी सिनगॉग बांधलंही. हेच मुंबईतलं पहिलं सिनेगॉग.

इतिहास अभ्यासक एलियाझ दांडेकर यांनी 'मदर इंडिया, फादर इस्रायल' या पुस्तकात या घटनेचं वर्णन केलं आहे. दिवेकर बंधूंनी टिपूची गुप्त माहिती इंग्रजांना पुरवली, तिचा उपयोग इंग्रजांना पुढच्या युद्धात झाला.

त्यामुळे टिपूची आई फातिमा फक्रून्निसाने दिवेकरांना सात पिढ्या पुरेल असा शाप दिल्याची आख्यायिका असल्याचंही हे दांडेकर पुस्तकात सांगतात.

बेने इस्रायली लोकांमध्ये प्रार्थनेला नमाज, स्मशानाला कब्रस्तान, उपवासाला रोजा, कौन्सील किंवा समुहाला जमत (जमातचा अपभ्रंश) अशीच नावं असल्याचंही ते सांगतात. आता हे उर्दू शब्द भारतीय मुस्लिमांमधून बेने इस्रायलींकडे गेले असणार यात शंका नाही.

बेने इस्रायली ब्रिटिशांच्या नोकरीच्या निमित्ताने तसेच व्यापाऱ्याच्या निमित्ताने ब्रिटिश साम्राज्यात अनेक ठिकाणी पसरत गेले. त्यामुळे कराचीमध्ये मराठी ज्यू लोकांच्या कबरी दफनभूमीत दिसतात. या कबरींवर हिब्रू आणि देवनागरीत मराठी नावं कोरल्याचं दिसतं.

पाकिस्तान आणि इस्रायल यांच्यात आज अजूनही मुत्सद्दी पातळीवरचे संबंध प्रस्थापित झालेले नाहीत. पण मराठी ज्यूंच्या निमित्ताने ज्यू तेथे पोहोचले आहेत. तेथेच चिरनिद्रा घेत आहेत. अशीच स्थिती येमेनमध्ये आहे. येमेनमध्ये एडन इथं ज्यू कबरस्तानात हिब्रू अक्षरांबरोबर देवनागरी मराठी कोरलेली दिसते.

मुस्लीम आणि ज्यू ऐक्य असं मराठी संबंधांमुळे घडून आलं. हा इतिहास पुसता येणारच नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)