इस्रायल- पॅलेस्टाईन संघर्ष : दिल्लीमध्ये मराठी पताका फडकवत ठेवणारे बेने इस्रायली समुदायाचे इझिकेल मळेकर

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी

ल्यूटेन्स दिल्लीमधला हुमायून रस्ता. सगळं आखिव-रेखिव. सतत धावता रस्ता आणि एका विशिष्ट साच्यातून काढलेल्या वाटाव्या अशा एकाच प्रकारच्या बंगले, कार्यालयांचा हा परिसर. पण याच रस्त्यावर एका कोपऱ्यावरचं गेट ढकलून आत गेलो तर साधारण साठी उलटलेले इझिकेल आयझॅक मळेकर लगबगीनं पुढे येऊन स्वागत करू लागले.

हे होतं दिल्लीच जुडाह हाईम सिनेगॉग. हे सिनेगॉग (ज्यू धर्मियांचे प्रार्थना स्थळ) आणि तिथलं लहानसं स्मशान गेली अनेक दशके मराठी ज्यूंच्या स्मृती जपत या रस्त्यावर उभं आहे.

इझिकेल मळेकर भारतातल्या मोठ्या म्हणजे बेने इस्रायली, कोचिनी, बगदादी, बेने मिनाशी, बेने इफ्राइम ज्यू समुदायांपैकी बेने इस्रायली शाखेचे आहेत.

सिनेगॉगमध्ये गेल्यावर एकदम शांत वाटू लागलं. बाहेरच्या रस्त्याचा आणि या जगाचा काहीच संबंध नव्हता.

आत गेल्यावर समोरच्या भिंतीमध्ये पडद्यामागे धर्मग्रंथ (तोराह) ठेवण्याचा कप्पा, मध्यभागी प्रार्थना करण्याचा लाकडी कठड्याचा चौकोन आणि बाजूनं खुर्च्या, डोक्यावर रंगिबेरंगी हंड्या, दिवे अशी इतर सिनेगॉगप्रमाणेच याची रचना होती.

मी गेलो ती होती शुक्रवारची संध्याकाळ. दुसऱ्यादिवशी शनिवार म्हणजे शब्बाथचा दिवस असल्यामुळे प्रार्थनेला लोक येतील असं वाटलं होतं.

पण मळेकर म्हणाले, "आताशा प्रार्थनेला फारसे लोक येत नाहीत कारण आम्ही फारच कमी लोक शिल्लक राहिलो आहोत."

सुमारे 2000 वर्षांपूर्वी ज्यू भारताच्या किनाऱ्याला लागले. महाराष्ट्रात राहाणाऱ्या ज्यूंना बेने इस्रायली म्हटलं जातं.

कोकणात स्थायिक झाल्यावर त्यांनी स्थानिक संस्कृतीचा स्वीकार केला. त्यामुळं त्यांनी राहायच्या गावावरून आडनावं वापरायला सुरुवात केली.

झिराड, दिवेकर, राजपूरकर, दांडेकर, ठाणेकर, आवासकर, किहिमकर, पेणकर, गडकर, अष्टिमकर अशी रायगड (तेव्हाचा कुलाबा) जिल्ह्यातल्या गावांवरून त्यांची आडनावं आहेत.

कोकणात उतरल्यावर त्यांनी तेल काढण्याचा व्यवसाय सुरू केला. इतकी वर्षें जेरुसलेमपासून दूर राहूनही शनिवारी सुटी घेण्याची त्यांची प्रथा कायम राहिली. शनिवारी सुटी घेणारे तेली म्हणून त्यांना 'शनवार तेली' म्हटलं जाऊ लागलं.

आता भारतात ज्यूंची संख्या 5 हजाराच्या आसपास उरली आहे. त्यात बहुतांश लोक मुंबई-ठाणे आणि उत्तर कोकणात राहातात.

त्यामुळे दिल्लीमध्ये ज्यू अगदीच अल्पसंख्य आहेत. त्यामुळे सिनेगॉगमध्ये प्रार्थनेला येणाऱ्यांची संख्या अगदीच कमी झालेली आहे.

दिल्लीत तर बेने इस्रायली कुटुंबं अगदीच एका हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकी शिल्लक राहिली आहेत. या सिनेगॉगमध्ये फक्त बेने इस्रायली नाही तर बगदादी ज्यूसुद्धा येतात. तसंच कधीकधी बेने मिनाशी आणि बेने इफ्राइम समुदायाचे एखाददुसरे सदस्य येतात.

दिल्लीमध्ये वसंतविहार आणि पहाडगंज इथं दोन खब्बाथ हाऊसही आहेत. परदेशी विद्यार्थी, इस्रायली दुतावासातील लोक किंवा पर्यटक तिकडे जातात.

इझिकेल मळेकर यांनी पुण्यामध्ये कायद्याचं शिक्षण घेतल्यावर 1980 साली दिल्लीला आले. दिल्लीत आले आणि दिल्लीचेच झाले. आधी गृह खात्यात आणि नंतर अल्पसंख्यांक विभागात नोकरी केल्यानंतर ते निवृत्त झाले.

दिल्लीत आल्यावर त्यांनी ज्यू धर्मासह इतर धर्मांचा, धर्मग्रंथांचाही अभ्यास सुरु केला. आंतरधर्मिय विषयांवर व्याख्यान द्यायला ते जाऊ लागले. त्यांनी 16 आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन दिलं आहे.

इतर धर्मांच्या तुलनात्मक अभ्यासाबद्दल बोलताना ते म्हणाले, "इतर धर्मांमध्ये मिसळण्याची, त्यांचं मत जाणून घेण्याची धडपड मी आधीपासूनच करायचो. माझी मुलगी जामिया इस्लामिया विद्यापीठात शिकली. मुस्लीम बहुल विद्यापीठामध्ये ती एकटीच ज्यू मुलगी होती. तिचं तेव्हा कौतुकही होत असे."

मळेकर आता जवळपास 40 वर्षें दिल्लीमध्ये राहात असले तरी ते आणि त्यांची पत्नी व्यवस्थित मराठी बोलतात.

ते म्हणाले, "पुण्यामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृतच्या परिक्षाही मी दिल्या आहेत."

मळेकर अगदी व्यवस्थित मराठी बोलतात, बाहेर एखाद्या पक्क्या दिल्लीकरासारखं पंजाबी ढंगाचं हिंदी बोलतात आणि हिब्रूबरोबर इंग्रजीही सफाईदार बोलतात.

मळेकर म्हणाले, "आम्ही घरी मराठीच बोलतो. मला सगळे लोक अजूनही भारत आवडतो का इस्रायल, असा प्रश्न विचारतात. तेव्हा मी सरळ I am an Indian first, then I am Jew असं उत्तर देतो.

इस्रायलचे माजी राष्ट्राध्यक्ष शिमॉन पेरेस यांनीही मला विचारलं होतं तेव्हा मी Israel is my heart and India is in blood असं सांगितलं होतं."

इतकं झाल्यावर मला मळेकरांनी थेट

अपि स्वर्णमयी लंका, न मे लक्ष्मण रोचते |

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ||

ऐकवलं.

मराठी बोलणारं कोणी सापडलं की किती बोलू किती नको असं त्यांना होऊन जातं. सिनेगॉग दाखवल्यावर त्यांनी आवारातलं वाचनालय दाखवलं आणि नंतर शेजारी असलेलं छोटसं स्मशान 'पाहून ये' म्हणाले.

दिल्लीतलं हे ज्यू समुदायाचं स्मशान 90 वर्षांपूर्वीचं आहे. मुंबई कोकणातली कोलेट, झिराड आडनावाची अनेक मंडळी भर दिल्लीत या मध्यवर्ती जागेत चिरविश्रांती घेत आहेत.

बांगलादेशच्या युद्धात भारतीय लष्कराच्या इस्टर्न कमांडची धुरा सांभाळणाऱ्या ले. ज. जेएफआर जेकब यांची कबरही तिथं दिसली.

ते पाहून पुन्हा सिनेगॉगमध्ये आल्यावर दोनचार मंडळी जमा झालेली दिसली. बोलता बोलता मळेकरांनी आम्हाला कपाटातला 'तोराह' दाखवला. हिब्रू लिपीतला तोराह लांबलचक कागदावर लिहिलेला असतो.

मळेकर म्हणाले, "मी वेगवेगळ्या धर्मातल्या लोकांना या सर्व गोष्टींची ओळख व्हावी यासाठी प्रयत्न करत असतो. जसे इतर धर्मांचा अभ्यास करतो तशी ज्यू धर्माची ओळखही दुसऱ्या धर्मियांना व्हावी असं मला वाटतं."

सात वाजता प्रार्थना सुरू केल्यावर त्यांनी हिब्रू-इंग्रजी पुस्तकातून वेगवेगळ्या प्रार्थना सुरात म्हणायला सुरुवात झाली.

अर्ध्यातासानं आमेन, शब्बाथ शलोमच्या गजरानंतर प्रार्थना संपल्यावर सगळे जायला निघाले. बाहेर पडेपर्यंत अंधार पडला होता.

प्रार्थनेला येणाऱ्यांची संख्या पाहून भविष्यात ही संख्या आणखी कमी होत जाईल असं वाटलं. महाराष्ट्रापासून इकडे पार हजार किलोमीटर दूर मळेकरांसारखा मराठीची पताका कायम फडकत राहील याचा प्रयत्न करणारा माणूस पाहिला की नक्की बरं वाटतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)