पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा राजकीय अर्थ काय?

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यानिमित्त भव्य जनसमुदायासमोर बीडमधील भगवानगडावर भाषण केले. पंकजा मुंडे म्हणाल्या की मी 2024 ची तयारी सुरू करत आहे. पक्षाने तिकीट दिलं तर मी परळी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात ही चर्चा रंगली आहे की 2024 च्या निवडणुकीबाबत पंकजा यांनी आताच घोषणा करण्याचे प्रयोजन काय?

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात घोषणा केली की, मी आता 2024 च्या तयारीला लागणार आहे. पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात अनेक गोष्टींवर भाष्य केले.

"जर पक्षाने मला तिकीट दिलं तर मी परळी मतदारसंघातून 2024 ला निवडणूक लढवणार आहे आणि त्याची तयारी आतापासूनच सुरू करणार आहे," असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

"आपल्या नेत्याकडे पद असावे अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते त्यात गैर काय आहे," असा सवाल त्यांनी यावेळी केला.

संघर्षाचा नारा

"संघर्षाला मी घाबरत नाही असे पंकजा मुंडेंनी सुरुवातीला म्हटले. शिवरायांचा पराक्रम, भगवान बाबांची सात्विकता आणि गोपीनाथ मुंडे यांचा संघर्ष हीच माझी ओळख आहे."

"मी झुकणार नाही, मी थकणार नाही, मी रुकणार नाही," असे म्हणत त्यांनी संघर्षाचा नारा दिला.

"संघर्ष कुणालाही चुकला नाही. जे जोडे उचलतात ते कधीही इतिहास लिहित नाहीत," असे पंकजा म्हणाल्या.

"शिवाजी महाराज असो की भगवान बाबा यांना कुणालाच संघर्ष चुकला नाही. मुंडे साहेबांना देखील संघर्ष चुकला नाही. ज्या पक्षात कुणीही जात नव्हतं त्या पक्षाचं कमळ घेऊन त्यांनी पक्ष वाढवला. 40 वर्षांच्या आयुष्यात केवळ त्यांना साडेचार वर्षांचीच सत्ता मिळाली."

"माझ्यावर काही जण आरोप करतात की मी गर्दी करते. मी जिथे जाते तिथे गर्दी होते. माझ्या राष्ट्रीय नेत्यांनी मला सांगितलं की हीच गर्दी तुमची ताकद आहे. ही गर्दी माझ्यासाठी चांगली आहे आणि पक्षासाठी देखील चांगली आहे."

"दोन वेळा माझ्या सभेला अमितभाई शाह आले होते. त्यांनी आपली गर्दी पाहिली, रानावनातून लोक जमा झालेले त्यांनी पाहिले. त्यामुळे मी गर्दी जमवते हा आरोप मला मान्य नाही," असे पंकजा यांनी म्हटले.

मी अटलबिहारी वाजपेयी, उपाध्याय यांचा वारसा चालवते

घराणेशाहीवर त्या बोलल्या. "मी काही कुणाचा वारसा चालवत नाही. मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत नाही. गोपीनाथ मुंडेंनी ज्या दीनदयाल उपाध्याय यांच्या विचार आणि ज्या पक्षाचा ध्वज हाती घेतला तो वारसा मी चालवत आहे," असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

"मी अटल बिहारी वाजपेयी, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि नरेंद्र मोदी यांचा वारसा चालवत आहे. त्यांच्याकडे पाहूनच गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन राजकारणात आले. त्यांचाच वारसा मी चालवत आहे," असे पंकजा यांनी म्हटले.

नरेंद्र मोदी यांच्याबाबतच्या वक्तव्याबाबतचे स्पष्टीकरण

पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की जर मी जनतेच्या मनात असेल तर माझं राजकारण मोदी देखील संपवू शकणार नाहीत. त्यावर पंकजा मुंडेंनी स्पष्टीकरण दिले.

त्या म्हणाल्या काही लोकांनी माझी क्लिप एडिट करून पसरवली आणि मी मोदींबद्दल बोलले असं चित्र निर्माण केलं, मी कधी माझ्या शत्रूवर सुद्धा टीका करत नाही तेव्हा ज्यांच्या विचारांवर चालते त्यांच्याविरोधात मी कसं बोलेन असं त्या म्हणाल्या.

मी कुणावरही नाराज नाही पण..

"दरवेळी असं म्हटलं जातं की मी नेतृत्वावर नाराज आहे. अमक्यावर नाराज आहे. मी कुणावरही नाराज नाही. पण जर तुम्ही दसरा मेळाव्याला आला नाहीत तर मात्र मी नाराज होईन. तेव्हा कृपया मीडियावाल्यांना माझी ही विनंती आहे की मी नाराज असल्याच्या बातम्या देऊ नका. मी गेल्या 17 वर्षांपासून राजकारणात आहे. मी काही काल आले नाही.

"मी कुणावर नाराज असायला हे काही घरगुती भांडण नाही," असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

मी पदर पसरणार नाही

"मी कुणाकडे पदर पसरून मागायला जाणार नाही. मला खुर्चीची हाव नाही," असे पंकजा यांनी म्हटले. भाषणाच्या शेवटीला पंकजा म्हणाल्या मी उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.

पंकजा मुंडेंच्या भाषणाचा राजकीय अर्थ काय?

दसऱ्याच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणेच पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील भगवानगडावर आज मेळावा घेतला.

या मेळाव्यात केलेल्या भाषणात त्या म्हणाल्या माझा संघर्ष सुरूच राहील. एकाबाजूला त्यांनी संघर्षाची हाक दिली तर दुसऱ्या बाजूला आपण कुणावरही नाराज नसल्याचे म्हणत अटल बिहारी वाजपेयी, पं. दीनदयाल उपाध्याय यांची नावे त्यांनी घेतली. तेव्हा या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या भाषणाचा राजकीय अर्थ काय हे पाहणं आवश्यक आहे.

हे समजून घेण्यासाठी बीबीसी मराठीने ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्याशी संपर्क साधला ते म्हणाले.

"पंकजा मुंडे यांनी अटल बिहारी वाजपेयी आणि दीनदयाल उपाध्याय यांची नावे घेतली. या दोघांचेही नेतृत्व हे कट्टर हिंदुत्ववादी समजले जात नाही. दीनदयाल उपाध्याय हे एकात्म मानवतावादी होते तर वाजपेयी हे भाजपमधील एक प्रगतीशील राजकारणाचा चेहरा मानले जात होते. गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व देखील हे सर्वसमावेशकच होते आपणही त्याच मार्गावर चालत आहोत असे दाखवण्यासाठीच त्यांनी वाजपेयी आणि उपाध्याय यांची नावे घेतली," देसाई यांनी म्हटलं.

आजच्या भाषणातून त्यांनी आपली थेट नाराजी जाहीर केली नसल्याचेही देसाई यांना वाटते.

"काही दिवसांपूर्वी किंवा महिन्यापूर्वी त्यांनी आपली नाराजी समाजमाध्यमातून आणि माध्यमातून त्यांनी प्रकट केली होती. जेव्हा त्यांना विधान परिषदेत पाठवले नाही तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की माझी पात्रता नसेल म्हणून मला विधान परिषदेत पाठवलं नाही."

"नंतर भाजपने पंकजा मुंडे आणि विनोद तावडेंना राष्ट्रीय कार्यकारिणीत घेतले. विनोद तावडे हे आता राष्ट्रीय राजकारणात रमलेले दिसतात किमान ते आपली नाराजी जाहीरपणे प्रकट करत नाहीत पण पंकजा मुंडेंनी अद्यापही हे स्वीकारलेलं दिसत नाही," असं देसाई यांना वाटतं.

"त्या संघर्षाची भाषा करतात, आक्रमकपणा दाखवतात पण त्यातून अद्याप काही साध्य झाल्याचं दिसत नाही. अशा वेळी त्यांच्याजवळ राज्याच्या नेतृत्वाशी जुळवून घेणं हाच पर्याय उरतो," देसाई सांगतात.

मला जर पक्षाने तिकीट दिले तर मी 2024 ची निवडणूक परळीतून लढवणार असे पंकजा यांनी म्हटले. पंकजा यांना असे विधान का करावे लागले असे विचारले असता देसाई सांगतात की, "त्यांना विधान परिषदेवर पक्षाने पाठवले नव्हते. तेव्हा भविष्यातही आपल्यासोबत असं होऊ शकतं असं त्यांना वाटू शकतं. जर यदाकदाचित तिकीट दिलेच नाही तर 2024 ची तयारी सुरू करतोय हे त्यांनी आजच्या भाषणातून सांगितले आहे."

'पंकजा मुंडे यांचा संघर्ष विविध स्तरावर आहे'

पंकजा मुंडे यांचे भाषण समजून घ्यायचे असेल तर त्यांच्या परळी मतदारसंघाची माहिती घेणे आवश्यक आहे.

पंकजा मुंडेंचे चुलत भाऊ धनंजय मुंडे हे परळी मतदारसंघाचे आमदार आहेत. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. पंकजा मुंडे यांना हरवून ते आमदार बनले आणि महाविकास आघाडीत मंत्रीदेखील झाले.

परळी मतदारसंघाचे स्वरूप कसे आहे याबाबत लोकसत्ताचे प्रतिनिधी बिपिन देशपांडे यांनी सांगितले.

"या मतदारसंघात मराठा, वंजारी, लिंगायत, ब्राह्मण, मुस्लीम, दलित असे सर्वच मतदार आहेत. वंजारी समाज हा सुरुवातीपासूनच गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत आहे. गोपीनाथ मुंडे जेव्हा होते तेव्हापासूनच धनंजय मुंडे यांनी आपली एक स्वतंत्र फळी तयार करण्याचे काम सुरू केले आणि ते गेल्यानंतर तर त्यांनी अधिक प्रभावीपणे ते केल्याचे दिसते, असं देशपांडे यांना वाटतं.

"धनंजय मुंडे हे जास्त काळ आपल्याच मतदारसंघात घालवतात. प्रत्येक समाजातील अशा कार्यकर्त्यांना त्यांनी पुढे आणले आहे ज्यांच्या मागे त्यांचा त्यांचा समाज आहे आणि त्यांच्या बारीक सारीक समस्या देखील ते सोडवतात. धनंजय यांच्याप्रमाणेच पंकजा यांना मतदारसंघासाठी स्वतःला उपलब्ध ठेवावे लागेल, त्यांच्याप्रमाणेच काम करण्याचे आव्हान पंकजा मुंडे यांच्यासमोर आहे," देशपांडे सांगतात.

पंकजा मुंडेंचा संघर्ष आता अनेक स्तरावरचा आहे, असे मत लोकसत्ताचे प्रतिनिधी बिपिन देशपांडे यांनी व्यक्त केले. ते सांगतात की "ज्याप्रमाणे कुठल्याही राजकीय नेत्याला आतील आणि बाहेरील लोकांशी लढावं लागतं तसंच पंकजा मुंडे यांचे देखील आहे. एका बाजूला त्यांना आपला पारंपरिक मतदारसंघ आपल्यासोबत ठेवण्याचे आव्हान आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)