पंकजा मुंडे : धनंजय मुंडेंनी स्वतःहून राजीनामा द्यावा

'धनंजय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा,' असं विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

माध्यमांशी बोलताना पंकजा यांनी हे वक्तव्यं केलं. संजय राठोड प्रकरणी पंकजा यांनी त्यांची भूमिका मांडल्यानंतर पत्रकारांनी त्यांना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.

"'भाजपची तर मागणीच आहे राजीनाम्याची. पण जेव्हा तुमच्याकडे बोट दाखवलं जातं, तेव्हा नैसर्गिक प्रतिक्रिया ही स्वतःहून दूर होणं ही असते. पण सध्या राजकारणात जो पायंडा पडत आहे, तो चुकीचा आहे," असं पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे प्रकरणी म्हटलं आहे.

संजय राठोड यांच्या राजीनाम्याबद्दल बोलताना पंकजा यांनी म्हटलं की, त्यांनी राजीनामा दिला आहे. तो त्यांनी दिला की पक्षाने तो मागितला हा अंतर्गत विषय आहे, पण एक पाऊल त्यांनी निश्चितच पुढे टाकलं आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला होता.पण या महिलेचे आरोप म्हणजे ब्लॅकमेल करण्याचा प्रकार असल्याचं सांगत मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. तसंच आरोप करणाऱ्या महिलेच्या बहिणीशी आपले परस्पर सहमतीने संबंध होते. या संबंधातून दोन मुलं झाली असून त्यांचा सांभाळही आपण करत असल्याचा खुलासा मुंडे यांनी केला.धनंजय मुंडे यांच्या या खुलाशानंतर भाजपनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. भाजप नेते किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील, चित्रा वाघ यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र पंकजा मुंडे यांनी याप्रकरणी कोणतंही भाष्य केलं नव्हतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)