You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पंकजा मुंडेंच्या या 5 वक्तव्यांमुळे उडाला होता वादाचा धुरळा
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी
दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे.
"मी भाजपची आहे, पण पक्ष माझा असू शकत नाही. माझं अर्ध लक्ष तर राष्ट्रीय समाज पक्षावर आहे. राष्ट्रीय समाज पक्ष माझं माहेर आहे. इकडे वडिलांशी भांडणं झाली तर भावाच्या घरीसुद्धा जाऊ शकते," असं त्या म्हणाल्या आहेत.
याआधीसुद्धा पंकजा मुंडे यांनी वेगवेगळी वक्तव्य केली होती. ज्यांची चर्चा झाली होती. तर कधी त्यामुळे त्या अडचणीतसुद्धा आल्या होत्या.
"मी जनतेच्या मनात असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील माझं राजकारण संपवू शकत नाहीत," असंसुद्धा वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं होतं.
त्या म्हणाल्या होत्या, "राजकारणामध्ये आपल्याला वेगळेपण आणायचे आहे. आगामी काळात राजकारणात बदल करावा लागणार आहे. राजकारणामध्ये लोकहिताचे निर्णय होतात. परंतु, अलीकडे राजकारण हे करमणुकीचे साधन होत आहे."
"हे राजकारण माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांना अपेक्षित नाही."
हे बोलून त्या थोडं थांबल्या आणि पुढे म्हणाल्या, "नरेंद्र मोदींना यांना वंशवाद संपवायचा आहे. मी ही वंशवादाचं प्रतीक आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन बीडमधील, अंबाजोगाई येथे करण्यात आले होते.
त्याठिकाणी पंकजा मुंडे यांनी हे विधान केलं होतं. त्यानंतर चर्चा झाली आणि या विधानाचा विपर्यास केल्याचं स्पष्टीकरणही पंकजा यांनी दिलं.
पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यानंतर राज्यभर चर्चा झाली. पंकजा यांनी केलेलं हे पहिलं वादग्रस्त विधान नाही. तर याआधी त्यांनी केलेल्या अनेक विधानांची अगदी महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत चर्चा झाली आहे. पंकजा मुंडे यांनी याआधी कोणती वादग्रस्त केली आहेत?
पंकजा मुंडेंची वादग्रस्त आणि चर्चेत राहिलेली वक्तव्यं पाहू..
1. मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री...!
2014 सालच्या विधानसभेत पंकजा मुंडे या परळी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांना थेट मंत्रिमंडळात संधी मिळाली.
पंकजा मुंडे यांच्याकडे ग्रामविकास, जलसंधारण आणि महिला बालकल्याण अशी खाती फडणवीस सरकारच्या काळात सोपवण्यात आली होती. पंकजा मुंडे या मंत्री असताना 2015 साली त्यांनी पुण्यात भारती विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी भाषण करताना मुख्यमंत्री पदाची सुप्त इच्छा बोलून दाखवली.
त्या म्हणाल्या, "मला प्रत्यक्षात मुख्यमंत्री होता आले नसले तरी राज्यातील जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून मीच आहे. आज गोपीनाथ मुंडे असते तर तेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असते.
"यापूर्वीही साहेबांना मुख्यमंत्री होता आले नसले तरी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री तेच होते. मी ज्या ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणचे लोक तुम्ही मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त करत असतात. जनतेच्या मनातील भावना यावेळी मला कळते, ती भावनाच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे," असं पंकजा म्हणाल्या होत्या.
पंकजा मुंडे यांच्या विधानानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्पर्धा करणार्या नेत्या म्हणून पंकजा चर्चेत आल्या. त्यानंतर पंकजा यांना अनेक राजकीय घडामोडींना सामोरं जावं लागल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.
2. लोकांना मारून, त्यांच्यावरच केसेस करून त्यांनाच आम्ही तडीपार करतो....!
2016 साली भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गडावर भाषण करून राजकीय व्यासपीठ करण्याला तीव्र विरोध केला. यावरून पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात वाद झाला.
काहीही झालं तर भगवान गडावर भाषण करणारच असा पवित्रा तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला. त्याचबरोबर दसरा मेळाव्यानंतर नामदेव शास्त्रींचं काय करायचं हे भविष्यात बघून घेऊ. त्यासंदर्भातली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.
या ऑडिओ क्लिपमध्ये पंकजा मुंडे म्हणतात, "नामदेव शास्त्रींचं काय करायचं हे भविष्यात बघू आपण... पण आपल्याला दसरा मेळावा करायचा आहे. त्यामुळे कोणताही गलिच्छपणा होऊ द्यायचा नाही. आपल्याविषयी जर कोणी बोललं तर खपवून घ्यायचं नाही.
"परळीमध्ये लोकांना मारून, त्यांच्याविरुद्ध केस करून, त्यांनाच तडीपार करतो आपण... आम्ही पण काही साधे नाहीये. नालायक लोकांशी लढा द्यायचा तर ते करावं लागतं," या ऑडिओ क्लिपवरून पंकजा मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या.
पण त्यांनी नामदेव शास्त्रींचा विरोध पत्करून भगवान गडावर भाषण केलं.
3. मला कुठलं पद मिळू नये यासाठी सगळं सुरू आहे का?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. या पराभवासाठी भाजपच्या बड्या नेत्यांनी राष्ट्रवादीला रसद पुरवली अशी चर्चा मोठ्या प्रमाणात झाली.
पराभवानंतर पंकजा मुंडे या काही दिवस शांत राहिल्या. त्या पक्ष सोडणार का, याबाबत चर्चा सुरू असताना पंकजा यांनी गोपीनाथ मुंडेंच्या जन्मदिनानिमित्त एक फेसबुक पोस्ट लिहिली होती.
त्या पोस्टमध्ये त्या म्हणतात, "परळीत झालेला पराभव मी स्वीकारला. आता पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी 12 डिसेंबरला बोलणार..."
या पोस्टनंतर नाराज असलेल्या पंकजा पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. भाजपच्या अनेक नेत्यांनी पंकजा यांची भेट घेतली.
त्यानंतर पंकजा मुंडे यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चेवरून माध्यमांवर खापर फोडलं.
त्या म्हणाल्या," मला आत्मचिंतनासाठी वेळ हवा आहे. मी दरवर्षी 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम घेत असते. फेसबुक पोस्टची सर्व मीडियानं योग्य बातमी दिली. पण काही वर्तमानपत्रांनी मी पक्ष सोडणार अशा बातम्या दिल्या. त्यामुळे या चर्चेला वेगळा सूर मिळाला.
"मी यामुळे दुःखी आहे, व्यथित आहे. माझ्यावर असा आरोप केला जात आहे की मी कुठल्या पदासाठी असं करत आहे. पण उलट आता मला कुठलं पद मिळू नये म्हणून हे सगळं सुरू आहे का," असा सवाल पंकजा मुंडे यांनी मीडियाला उद्देशून उपस्थित केला होता.
4. विरोधी पक्षाने विरोधी पक्षासारखं वागा...!
2019 ला अनपेक्षितपणे महाविकास आघाडीचं सरकार बनलं. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्र्यांऐवजी विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी स्वीकारावी लागली.
त्यानंतर तीन चाकांचं सरकार आहे. महाबिघाडी सरकार आहे. त्याचबरोबर हे सरकार स्थिर नाही. कधीही पडू शकतं अशी टीका विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून करण्यात येत होत्या.
हे सरकार काही महिन्यांत पडणार असे अनेक मुहूर्तही भाजपकडून देण्यात येत होते. त्यावर सत्ताधारी म्हणत होते हे सरकार 5 वर्षे टिकणार.
2021 च्या दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी स्वत:च्याच पक्षाला घरचा आहेर दिला.
त्या म्हणाल्या होत्या, "विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतो सरकार पडणार. सरकारी पक्ष म्हणतो नाही पडणार. सरकार पडणार की नाही यातून बाहेर पडा. विरोधी पक्षाने विरोधी पक्षाच्या भूमिकेत लक्ष घाला."
5. पदासाठी कोणासमोर हात पसरणे रक्तात नाही...!
नोव्हेंबर 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या विस्तारात भागवत कराड, भारती पवार, नारायण राणे यांना केंद्रात मंत्री पदं मिळाली.
या विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान मिळेल अशी अपेक्षा मुंडे कुटुंबीयांना होती. या विस्तारानंतर राज्यभर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी पदांचे राजीनामे देण्याचा धडाका सुरू केला.
कार्यकर्त्यांनी निदर्शनेही केली. अनेक कार्यकर्ते पंकजा यांचे परळी येथील निवासस्थानी जमले. पंकजा यांनी समर्थकांना शांत राहण्याचा सल्ला दिला. पंकजा मुंडे यांनाही विधानपरिषदेत संधी दिली नव्हती.
त्यानंतर काही दिवसांनी बुलडाण्याच्या एका सभेत बोलताना पंकजा म्हणाल्या, "मी एका गरीब माणसाच्या पायावर डोकं ठेवून दहा परिक्रमा करेन, एखाद्या गरिबाच्या पायावर नतमस्तक होईन, पण पदासाठी कोणापुढे हात पसरण्याचे संस्कार माझ्या रक्तात नाहीत."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)