You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे दसरा मेळावा : गर्दी जमली होती की जमवली होती?
- Author, दीपाली जगताप आणि प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठी
एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा बुधवारी 05 ऑक्टोबरला पार पडला. दोन्ही शिवसेना म्हणजेच शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या दोन स्वतंत्र सभा झाल्या.
उद्धव ठाकरेंची सभा शिवाजी पार्क मैदानावर झाली आणि एकनाथ शिंदे यांची सभा बीकेसी मैदानावर झाली.
दोन्ही सभेला तुफान गर्दी होती आणि दोन्ही नेत्यांनी एकमेकांना चिमटे काढले, टीका केली आणि तोफ डागली.
उद्धव ठाकरे म्हणाले, कट करणारा म्हणजेच कटअप्पा तर एकनाथ शिंदे त्यांना उत्तर देताना म्हणाले कटप्पा दुटप्पी तरी नव्हता. दोन्ही बाजूंनी दावे झाले की त्यांचीच शिवसेना ही खरी शिवसेना आहे आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांना गद्दार म्हटलं गेलं.
उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांचा प्रतिसाद होता का?
दसरा मेळाव्याचे मैदानासाठीची चढाओढ, टीझर वॉर, गाड्या, बसेस, सुरक्षा व्यवस्था, प्रत्यक्ष मेळाव्याची तयारी सगळं झालं होतं. आता उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याच्या भाषणात काय बोलणार आणि ते ऐकायला शिवसैनिकांची गर्दी होणार का?
याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. एकनिष्ठतेच्या बॅनर्सने शिवाजी पार्ककडे जाणारा रस्ता भरून गेला होता. यंदा बॅनरवर तेजस ठाकरेंचे आणि रश्मी ठाकरेंचे फोटो झळकत होते.
दुपारपासून शिवसेना भवनच्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी दिसत होती. कार्यकर्ते ठाकरे गटात असलेल्या आमदारांचे फोटो घेऊन एकनाथ शिंदेंच्या विरोधात घोषणाबाजी करत शिवाजी पार्कात दाखल होत होते. काही पालख्या घेऊन, तर काही भजन गात होते.
मैदान भरणार की नाही?
संध्याकाळचे साडेपाच वाजत आले होते. उध्दव ठाकरेंच्या भाषणाची वेळ जवळ येत होती. पण मैदानाचा बराचसा भाग रिकामा दिसत होता. हे मैदान भरणार की नाही ही शंका अनेकांना वाटत होती. पण संध्याकाळी सातच्या सुमारास मैदान भरलेलं दिसायला लागलं. शिवेसेनेचे कार्यकर्ते खाली बसले होते. मैदानात खुर्च्या का नाहीत? यावरूनही तर्कवितर्क लावले जात होते.
एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मेळाव्यासाठी मुंबईतले सर्व डेकोरेटर्स बुक केले आहेत. त्यामुळे ठाकरेंना फारसं कोणी मिळालं नाही. त्यामुळे गरजेपुरती सर्व तयारी केली आहे, असं बोललं जात होतं. अर्थात या चर्चेला शिवसेनेकडून कोणताही दुजोरा देण्यात आला नाही.
नेत्यांच्या भाषणाला सुरवात होणार होती. त्याआधी शिवसेनेचं गाणं लागलं आणि कार्यकर्ते बेभान नाचू लागले. संपूर्ण मैदानातल्या कार्यकर्त्यांमुळे या गाण्यामुळे उत्साह संचारलेला दिसला. काही वेळाने नेत्यांची भाषणं सुरू झाली.
सुषमा अंधारेंसमोर भगवे रूमाल फिरवले
माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार नितिन देशमुख, नेते सुभाष देसाई यांची एकामागोमाग एक भाषणं सुरू होती. सुभाष देसाईंनंतर शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे बोलायला उभ्या राहील्या.
सुषमा अंधारेंच्या भाषणाला सुरुवात झाली आणि कार्यकर्त्यांकडून त्यांना टाळ्या, घोषणांचा प्रतिसाद मिळू लागला. शिवसैनिकांना समजणारी आक्रमक भाषा त्यांना सुषमा अंधारेंच्या भाषणातून ऐकयला मिळत होती. कार्यकर्ते भगवे रुमाल फिरवून अंधारेंना प्रतिसाद देत होते. सात वाजून गेले होते.
आदित्य ठाकरे शिवाजी पार्कवर पोहचले होते. सुषमा अंधारेंना भाषण आटोपतं घेण्यासाठी सतत सांगितलं जात होतं. तरीही त्यांनी 10 मिनिटांनी भाषण आटोपतं घेतलं. मग भास्कर जाधवांचं भाषण सुरू झालं. कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष होता. साधारण 7.35 च्या सुमारास उद्धव ठाकरे व्यासपीठावर दाखल झाले. भास्कर जाधव नारायण राणेंवर जोरदार टीका करत होते. तेव्हा त्यांना समोरून प्रतिसाद मिळत होता. उध्दव ठाकरे आल्यामुळे भास्कर जाधव यांना भाषण आटोपतं घ्यावं लागलं.
...आणि उध्दव ठाकरेंना मिळणारा प्रतिसाद कमी होऊ लागला
उध्दव ठाकरे बोलायला उभे राहीले. तेव्हा स्टेजच्या बाजूला फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्या धुरामुळे ठाकरे उभे असलेल्या जागेवरून मागे सरकले. त्यांना धुराचा त्रास होत होता.
काही मिनिटांनी त्यांनी भाषणाला सुरुवात केली. एकनाथ शिंदेंवर टीका करताना गद्दार आणि 50 खोक्यांचा उल्लेख केला. तेव्हा कार्यकर्ते टाळ्या वाजवू लागले.
उध्दव ठाकरेंच्या आजारपणाच्या काळात काय झालं? भाजपने दिलेलं वचन कसं नाही पाळलं, त्यासाठी बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताईंची शपथ घेतली आणि भावनिक वातावरण तयार केलं.
भाषणाची सुरूवात चांगली झाली होती. पण त्यानंतर उध्दव ठाकरेंनी हिंदुत्वाबाबत खुलासे करायला सुरुवात केली.
'मी हिंदुत्व कसं नाही सोडलं' हे भाजपवर टीका करत, उदाहरण देत ठाकरे सांगू लागले. भाषणाच्या सुरवातीला मिळाणारा प्रतिसाद 10-12 मिनिटांनंतर कमी होताना दिसला.
मुंबईपेक्षा ग्रामीण कार्यकर्ते जास्त?
अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचा समाचार घेत उध्दव ठाकरे भाषणाच्या शेवटच्या टप्यात पोहोचले. मग पुन्हा भावनिक साद घालायला सुरुवात केली. तेव्हा कार्यकर्त्यांचा प्रतिसाद पुन्हा मिळू लागला.
"हे तोतय्ये (एकनाथ शिंदेंवर टीका) आपली शिवसेना घेऊ पाहतायेत. तुम्ही घेऊ देणार का आपली शिवसेना?" यावेळी कार्यकर्ते नाही....! असं ओरडून प्रतिसाद देऊ लागले.
उध्दव ठाकरे म्हणाले, "माझ्याबरोबर चालायचं असेल तर निखाऱ्यावरून चालावं लागेल. आहे तुमची तयारी..? तेव्हा हात करून कार्यकर्ते प्रतिसाद देत होते. "तुमची साथ असेल तर पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन.. " या वाक्यांवर 'कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला' ... ही घोषणाबाजी सुरू झाली. भाषणात पुढे आणखी ठोस आणि नवीन मुद्दे अपेक्षित होते. पण 34 मिनिटात उद्धव ठाकरेंनी भाषण संपवलं.
'50' (खोके) लिहीलेल्या आधुनिक काळातील रावणाचं दहन करण्यात आलं. सभा संपल्यानंतर 'शिवसेना....' गाण्यावर कार्यकर्त्यांनी परत ताल धरला.
कार्यकर्ते बाहेर पडत होते. काही एकनाथ शिंदेंना वाईट बोलत होते, काही उध्दव ठाकरेंसोबत जे झालं ते वाईट केलं असं म्हणून भावनिक झाले होते, काही कार्यकर्ते जेवणाची आणि गावाला परत जाण्याची व्यवस्था शोधत होते. यंदा या गर्दीत मुंबईपेक्षा अधिक ग्रामीण भागातील लोक जास्त दिसत होते.
'आमच्या डोक्यात सगळं' फीट' बसतं...!'
त्या गर्दीतला एक कार्यकर्ता आमच्याशी बोलताना म्हणाला, "ताई आमच्या गावाकडच्या लोकांच्या डोक्यात ईडी, गद्दारी, 50 खोक एकदम 'फीट' बसतं. हे गेले त्यांना महागात पडणार...!" इतकं बोलून "चला येतो. पुन्हा गावाकडे जायचं आहे." म्हणतं तो निघाला. या मैदानात लोकांशी बोलताना लक्षात की ही गर्दी पूर्णपणे जमवलेली नव्हती.
पण सगळेच लोक हे ठाकरेंचं भाषण ऐकायला स्वतःहून आले होते असंही नव्हतं. काही स्वत:हून आले होते. काही आणले होते. पण आपण कोणाच्या सभेला जातोय याचीही माहिती नाही असे कार्यकर्ते मात्र शिवाजी पार्कवर मात्र दिसले नाहीत. पार्कातली सभा झाली, पण तिकडे एकनाथ शिंदे काय बोलतायेत? हे लोक बघू लागले.
दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या सभेदरम्यान काय घडलं हेसुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे.
पक्षप्रमुख की मुख्य नेते?
एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या संपूर्ण सभेत आणखी एक बाब प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केवळ आपल्या भाषणातून आव्हान दिलं नसून शिवसेनेत तुमची जागा आता मी घेतली आहे किंवा मीच नेतृत्त्व आहे ही प्रतिमा तयार करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न स्पष्ट दिसून आला.
शिंदे गटाचे मुख्य नेते म्हणून सध्या त्यांचा उल्लेख त्यांच्या गटाकडून केला जातो. त्यांच्याकडून जारी केल्या जाणाऱ्या पत्रांवरही मुख्य नेते म्हणून ते स्वाक्षरी करतात.
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आहेत. अद्याप जरी एकनाथ शिंदे यांनी किंवा त्यांच्या आमदारांनी पक्ष प्रमुख म्हणून त्यांचा उल्लेख केलेला नसला तरी दसरा मेळाव्यात प्रत्यक्षात त्यांनी हेच दाखवण्याचा प्रयत्न केला की मीच आता तुमचा नेता आहे आणि मीच पक्षाचा प्रमुख आहे.
बाळासाहेबांनी अखेरचं भाषण केलेली खुर्ची
एकनाथ शिंदे यांची देहबोली सुद्धा हेच सांगत होती. ज्याप्रमाणे त्यांनी व्यासपीठाच्या मधोमध पोडियमवर भाषण दिलं आणि इतर सर्वांनी व्यासपीठाच्या एकाबाजूला असलेल्या पोडियमवर भाषण दिलं.
एकनाथ शिंदे यांना ठाकरे कुटुंबातील इतर सदस्यांना आपल्याबाजूने करण्यात यश आलं. शिवाय, त्यांना दसरा मेळाव्यात सर्वांसमोर बोलवण्यातही यश आलं. "बाळासाहेब ठाकरे यांचे इतर वारसदार माझ्यासोबत आहेत आणि 39 आमदार, 12 खासदार शिंदे गटात आहेत मग आम्ही सगळे चुकीचे आणि तुम्हीच बरोबर?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
शिवाय, व्यासपीठाच्या मधोमध शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ठाण्यातील खुर्ची ठेवण्यात आली होती. याच खुर्चीवर बसून बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणे येथील सभेत अखेरचं भाषण केल्याचं सांगितलं जातं.
कार्यक्रमाच्या सुरुवातील त्यांनी या खुर्चीला वंदन केलं. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची आहे.
शिवसेना कोणाची याचा निर्णय आगामी काळात निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात होईलच. पण जनतेच्या मनात मात्र खरी शिवसेना आम्ही आहोत आणि या शिवसेनेचा नेता मी आहे हेच एकप्रकारे पटवून देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केला.
'सभा कोणाची हे माहिती नाही'
मुंबईतील बिझनेस पार्क अशी ओळख असलेल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेस म्हणजेच बीकेसी मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला.
शिवसेनेवर दावा केलेल्या शिंदे गटाचा हा पहिलाच दसरा मेळावा होता. शिवसेनेवर आपलं वर्चस्व असल्याचं सिद्ध करण्यासाठी मोठ्या संख्यने कार्यकर्त्यांना बोलवण्यात आलं होतं.
शिंदे गटाच्या पूर्व नियोजनाप्रमाणे आमदार, खासदार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना आपआपल्या भागातील कार्यकर्त्यांना बीकेसी मैदानात घेऊन येण्याची जबाबदारी दिली होती.
एखाद्या भव्य इव्हेंटप्रमाणेच शिंदे गटाचा पहिला दसरा मेळावा पार पडला. सभेत ज्याप्रमाणे मोठ्या स्क्रिनवर व्हीडिओ दाखवून लोकांपर्यंत आपली भूमिका पोहचवण्याचा प्रयत्न शिंदे गटाने केला त्याचप्रमाणे मैदानाबाहेरही ट्रकवर मोठ्या स्क्रिन लावण्यात आल्या होत्या.
बीकेसीच्या वेगवेगळ्या मार्गांवर रस्त्यावर खाली बसून लोकांनी या स्क्रिनवरच भाषण ऐकलं.
दुपारी साधारण 12 वाजल्यापासूनच राज्यभरातून लोक येण्यास सुरूवात झाली. बीकेसीच्या संपूर्ण परिसरात ग्रामीण भागातून आलेले लोक मोठ्यासंख्येने दिसत होते. काही जण सभेच्या ठिकाणी बसले तर काही मैदानाच्या बाहेर होते.
बिझनेस पार्कमधल्या अनेक इमारतींच्या प्रवेशद्वाराजवळ लोक मांडी घालून बसले. अनेकांनी तिथूनच सभा पाहिली. यात महिला सुद्धा होत्या.
लोकांच्या हातात मोठ्या बॅग होत्या. काहींसोबत लहान मुलं सुद्धा होती. तर अनेकजण सभा सुरू होण्यापूर्वी नुकतेच पोहोचले होते. यापैकी अनेकांनी सभेच्या निमित्ताने मुंबई पाहिली.
बीबीसी मराठीने मैदानाबाहेर बसलेल्या या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. एक महिला म्हणाली, "आम्हाला खासगी बसमध्ये सगळ्यांना इथे आणलं. पण सभा कोणाची आहे ते माहिती नाही."
दुसरी एक महिला म्हणाल्या, "इथे कोणाचं भाषण होणार माहिती नाही, मी पहिल्यांदाच दसरा मेळाव्याला आले आहे."
तर काही जण म्हणाले, "पंडितभाऊ आम्हाला घेऊन आले आहेत. त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आम्ही आलोय."
जालनाहून आलेला एक कार्यकर्ता म्हणाला, "एकनाथ शिंदे यांनी योग्य निर्णय घेतला आहे. मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि त्यांनी हिंदुत्ववादाची योग्य भूमिका घेतली आहे."
महाडहून आलेल्या एका कार्यकर्त्याचही हेच म्हणणं होतं की, "मी दरवर्षी दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कला जातो. पण यावेळेस एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी मी इथे आलोय."
राजकीय सभांना गर्दी जमवली जाणं हे नवीन नाही. पण शिवसेना कोणाची या लढ्यात शिवसैनिक कोणासोबत आहेत याचं चित्र दसरा मेळाव्यात दिसेल याची राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. पण सभांमध्ये उपस्थिती दर्शवलेल्यांमध्ये खरे शिवसैनिक किती आणि जमवलेली गर्दी किती हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)