You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरेंचा टोला, '40 डोक्यांच्या रावणामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवलं गेलं'
"40 डोक्यांच्या रावणाने धनुष्यबाण चिन्ह गोठवलं. गोठलेल्या रक्ताचं काम नाही. उलट्या काळजाचे लोक आहेत. शिवसेना तुमची राजकीय आई आहे. यांच्या मागे महाशक्ती आहे म्हणतात."
"ज्या शिवसेनेनं मराठी मनं पेटवली ते पवित्र नाव गोठवलंत. मराठी माणसाची एकजूट तुम्ही फोडायला निघालात," अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी आज ( 9 ऑक्टोबर) सर्व जनतेला संबोधित केले आणि त्यांनी काही मुद्दे मांडले.
अंधेरी पूर्व या ठिकाणी पोट निवडणूक होणार आहे. त्याआधी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवलं आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. त्यांनी सांगितले की आम्ही मशाल, त्रिशूळ आणि उगवता सूर्य या चिन्हांची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
"जर लवकरात लवकर निवडणूक आयोगाने चिन्ह दिलं तर आम्ही जनतेकडे जाऊ आणि निवडणुकीमध्ये कौल मागू. जनता जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य राहील," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक संवादातील मुद्दे
- कोरोना काळात फेसबुकवरून संवाद साधायचो. शिवसेनाप्रमुखांचा पुत्र मुख्यमंत्री नको, मलाच हवं असं काहींचं म्हणणं होतं. मी वर्षा निवासस्थान सोडलं, मुख्यमंत्रिपदाचा त्याग केला.
- मुख्यमंत्रिपद ज्यांना पाहिजे होतं ते त्यांनी मिळवलं. जे नाराज होते ते गेले. आपण सहन केलं. आता अति व्हायला लागलं आहे. शिवसेनाप्रमुखांचा मुख्यमंत्रिपदी नको, मीच व्हायला पाहिजे हा हट्ट ठीक आहे. शिवसेनाप्रमुख व्हायचं आहे हे अति होतंय. आवाका काय हेही पाहिलं पाहिजे.
- खोकासुरांनी दसरा मेळावा होऊ नये यासाठी प्रयत्न केले. दसरा मेळावा अभूतपूर्व होता. तुम्ही मानता आहात म्हणून आम्ही आहोत. शिवतीर्थावरचा प्रतिसाद भारावून टाकणारा होता.
- उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून मला किंमत आहे. 19 जून 1966 हा शिवसेनेचा स्थापना दिन. माझ्या आजोबांनी (प्रबोधनकार ठाकरे) शिवसेना हे नाव दिलं. सामान्य माणसं शिवसेनेशी जोडली गेली.
- ठाण्याने पहिलं यश शिवसेनेला दिलं. वसंतराव मराठे नगराध्यक्ष झाले. अनेक जण श्रमले. मेहनत केली. त्यातून शिवसेनेचा विजयाचा रथ पुढे निघाला. आपत्ती आल्या, संकटं आली.
- शिवसैनिकांनी जीवाची बाजी लावून पक्षासाठी लढले. काहींनी जीव गमावला, काहींनी तुरुंगावस भोगला. अनेकांनी दमदाट्या सहन केल्यात. मोडेन पण वाकणार नाही अशी भूमिका घेतली.
- मराठी माणसासाठी, भूमिपुत्रांसाठी लढणारी सेना म्हणजे शिवसेना.
- शिवसेना नावाशी आणि चिन्हाशी तुमचा संबंध काय? 'मिंधे गटा'चा भाजपने पुरेपूर वापर केला. गोंधळ घालायचा तो घालून झालेला आहे.
- काँग्रेसने शिवसेनेवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला नाही पण ज्या शिवसेनेबरोबर तुम्ही लढलात ती संपवायला निघाला आहात.
- आत्मविश्वासाने ठासून भरलेले शिवसैनिक माझ्याबरोबर आहेत. मी डगमगत नाही.
- बाळासाहेबांचं नाव न घेता लढून दाखवा. बाळासाहेब हवेत, त्यांचा मुलगा नकोय. ठाकरे वगळून शिवसेना तुम्हाला गोशाळेत बांधायची आहे. शिवसेना वाघ आहे.
- चिन्ह गोठवलं आहे हा अन्याय आहे. 16 जणांच्या अपात्रतेसंदर्भात निकाल प्रलंबित आहे, तेव्हा हा निकाल कसा दिला?
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर आज मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेली बैठक जवळपास दीड तास सुरू होती.
या बैठकीत शिवसेना नेत्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काही सूचना केल्या आहेत. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
त्यामुळे शिवसैनिकांना शांततेचे आवाहन करताना त्यांची समजूत काढावी असे आवाहनही ठाकरे यांनी केले असल्याचं समजतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)