उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मुस्लिमांबद्दलची भूमिका बदलत आहे का?

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"माझा त्यांना प्रश्न आहे. तुमचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय? इतर सर्व धर्मीय हे देशद्रोही, असं तुमचं हिंदुत्व आहे? की देशप्रेमी कोणीही असला तरी तो माझा आहे, हे तुमचं हिंदुत्व आहे?" दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी विचारलं. प्रश्न त्यांच्या राजकीय विरोधकांना होता.

प्रश्न हिंदुत्वाच्या संकल्पनेबद्दल होता. त्याच्या उत्तरादाखल उद्धव यांनी भारतीय राजकारणात या संकल्पनेशी जुळल्या गेलेल्या मुस्लिमांबद्दलच्या भूमिकेला हात घातला. त्यात त्यांच्या विरोधकांना उलटप्रश्नच होते, पण त्या प्रश्नांमध्येच ठाकरेंची भूमिकाच होती.

"काश्मीरमध्ये औरंगजेब नावाचा एक सैनिक लष्करामध्ये होता. दोनचार वर्षांपूर्वी घरी जात असतांना त्याचं अपहरण करण्यात आलं आणि काही दिवसांनी त्याचं शव सैन्याला मिळालं. हालहाल करून मारलं आहे हे स्पष्ट दिसत होतं. कोणी मारलं होतं? अतिरेक्यांनी. धर्मानं कोण होता? मुसलमान. पळवणारे अतिरेकी कोण होते? मुसलमान," ठाकरे पुढे बोलू लागले.

"पण तरीदेखील त्याला मारलं कारण तो भारताकडून अतिरेक्यांना टिपत होता. मुसलमान असला तरी सोडलं नाही. तो औरंगजेब मुसलमान असला तरीही आमचा भाऊ आहे, हे हिंदुत्व उघड आहे. हे जाऊन कोणाला सांगायचं त्यांना सांगा. नंतर मी ऐकलं की त्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ सैन्यात जाणार होता. त्याचे वडील भाजपात जाणार होते. त्यांना काय तुम्ही नाकारणार आहात ते मुसलमान आहेत म्हणून?," शेवटच्या वाक्यातला प्रश्न समोर नसलेल्या विरोधकांनाही आणि समोर बसलेल्या शिवसैनिकांनाही होता.

पण राजकीय अनुमान हेसुद्धा आहे, तो प्रश्न संदेशही होता एका समुदायासाठी, एका मतदारवर्गासाठी जो अद्याप शिवसेनेशी कधी जोडला गेला नाही. उलट त्यानं कायम शिवसेनेशी फारकतच घेतली आहे. मुस्लिम समुदाय. असं नाही की उद्धव ठाकरे यांनी या काश्मीरच्या औरंगजेबची कहाणी पहिल्यांदा सांगितली आहे. जून महिन्यात औरंगाबादच्या सभेतही त्यांनी ती सांगितली होती आणि तेव्हा तर मुघल बादशाह औरंगजेबच्या कबरीचा वाद महाराष्ट्रात ताजा होता.

गेल्या काही काळात, पहिल्यांदा भाजपासोबत संबंध तोडल्यानंतर आणि नंतर एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर, उद्धव ठाकरेंचे प्रयत्न शिवसेनेचा विस्तार अशाही प्रांतात, विचारधारेच्या आणि मतदारांच्या, व्हावा असेही होताना दिसत आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी त्यांनी राजकीय युती केलीच, पण नंतरही असे प्रयोग केले. वैचारिक मतभेद असलेल्या संभाजी ब्रिगेडशी युती केली. सुषमा अंधारेंसारख्या रिपब्लिकन चळवळीतल्या आक्रमक आणि पूर्वी विरोध केलेल्या टीकाकारांना पक्षात आणून उपनेत्या केलं.

अशाच विस्ताराच्या प्रयोगांमध्ये मुस्लिम मतदारांनाही आपल्याशी जोडण्याचा सेना प्रयत्न करते आहे असं दिसतं आहे. केवळ यंदाचा दसरा मेळावाच नाही तर त्या अगोदरच्या भाषणांमध्येही तसे संकेत उद्धव यांनी दिले आहेत. जेव्हा ते यामुळे हिंदुत्वापासून दूर जात आहेत अशी टीका होते तेव्हा हिंदुत्वाच्या त्यांच्या संकल्पनेविषयी बोलत आहेत. त्यासाठी प्रबोधनकार आणि बाळासाहेब यांचे दाखले देत आहेत.

शिवाजी पार्कवरच्या दसरा मेळाव्या अगोदर काहीच दिवस 21 सप्टेंबरला गोरेगावमध्ये मुंबईतल्या गटप्रमुखांचा मेळावा झाला. त्यातही ते शिवसेनेच्या हिंदुत्वाविषयी आणि त्यातल्या मुस्लिमांच्या स्थानाविषयी आक्रमक बोलले. मुस्लिम शिवसेनेसोबत असल्याचा दावा त्यांनी केला.

"तुमचे कोणतेही डावपेच आता यशस्वी होणार नाहीत. तुम्ही हिंदू मुसलमान करून बघा. पण आज मुस्लिम लोकसुद्धा शिवसेनेसोबत आहेत. 1992-93 मध्ये दंगलींनी मुंबईत थैमान घातलं होतं. त्यावेळेसही माझ्या कित्येक शिवसैनिकांनी दर्ग्याचंसुद्धा रक्षण केलं आहे. हीच शिवाजी महाराजांची शिकवण आहे. हीच माझ्या आजोबांची आणि वडिलांची शिकवण आहे. केवळ मतं मिळावीत म्हणून नाही, पण कधीही शिवसेनाप्रमुखांनी सगळे मुसलमान देशद्रोही आहे, गद्दार आहेत असं म्हटलेलं नाही. आज शिवसेना म्हणजे काय, हिंदुत्व म्हणजे काय हे मुसलमानांनाही समजतं आहे. म्हणून तेसुद्धा आमच्यासोबत आहेत," उद्धव गोरेगांव मध्ये म्हणाले होते.

शिवसेना आणि मुस्लीम

हे समीकरण कधीही सख्याचं राहिलं नाही आहे. शिवसेनेच्या स्थापनेनंतर पहिली दोन दशकं ती मराठी आणि स्थानिकांच्या आर्थिक प्रश्नांवर कार्यरत होती. वैचारिक विरोधक हे डावे पक्ष होते आणि तत्कालीन गिरण्यांच्या मुंबईच्या कामगारविश्वात त्यांच्यात संघर्षही झाला. त्यातून सेना कामगारपट्ट्यामध्ये वाढली. 1985 मध्ये, जेव्हा रामजन्मभूमी आंदोलन सुरू झालं होतं, बाळासाहेबांनी हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली.

या हिंदुत्वाला मुस्लिमविरोधाची किनार होती. बाळासाहेबांची मुस्लिमांबाबतची वक्तव्यं कायमच वादग्रस्त ठरली. कधी प्रक्षोभक ठरली. आक्रमकता भिनलेल्या शिवसैनिकांमध्ये ती भूमिकाही उतरली. त्यामुळे मुस्लिमविरोध आणि शिवसेना हे समीकरण बनत गेलं.

शिवसेनेनं हिंदुत्वाची भूमिका घेतल्यावर 1987 मध्ये जी मुंबईत विलेपार्ल्याची पोटनिवडणूक झाली होती, तेव्हा बाळासाहेबांची अशा वक्तव्यांवरुन वाद झाला. सेनेचे उमेदवार रमेश प्रभू निवडून आले, पण ते प्रक्षोभक वक्तव्यांमुळे विजयी झाले असं म्हणत प्रकरण न्यायालयात गेलं. मुंबई उच्च न्यायालयानं त्यासाठी बाळासाहेब आणि रमेश प्रभू दोघांनाही दोषी ठरवलं, निकाल रद्द केला. 1995 मध्ये सुप्रीम कोर्टानंही हा निकाल कायम ठेवला.

या प्रकरणावर निकाल देताना सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जगदीश सरन वर्मा यांनी प्रभू आणि बाळासाहेब ठाकरे यांची 29 नोव्हेंबर, 9 डिसेंबर आणि 10 डिसेंबर 1987 रोजीची भाषणं तपासली. त्यात एका सभेत बाळ ठाकरे यांनी म्हटलं होतं, "आम्ही हिंदूंच्या रक्षणासाठी ही निवडणूक लढत आहोत. आम्हाला मुस्लीम मतांची पर्वा नाहीये. हा देश हिंदूंचा आहे आणि तो त्यांचाच राहणार." शिक्षा म्हणून 1995 ते 2001 पर्यंत बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात आला होता.

हे एक उदाहरण, पण तेव्हापासून घेतलेली ही भूमिका त्यांनी बदलली नाही. ती अधिक आक्रमक होत गेली. बाबरी मशिदीबद्दल भूमिका, त्या आंदोलनातला सहभाग, त्यानंतर मुंबईत उसळलेल्या दंगली, त्यातली शिवसेनेची भूमिका, काश्मीर प्रश्न या विषयांवरच्या भूमिका आणि मुस्लिमांबद्दलची जाहीर सभांमधली त्यांची वक्तव्य यामुळं शिवसेनेचा हिंदुत्ववादी बेस वाढत गेला. हिंदुत्वाच्याच मुद्द्यावर भाजपासोबत झालेली त्यांच्या युतीला राजकीय यश मिळत गेलं. शिवसेना मुंबईबाहेर महाराष्ट्रात विस्तारली. त्यात मतांच्या ध्रुवीकरणाचा वाटा होता.

साहजिक होतं या सगळ्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातला मुस्लिम वर्गासाठी शिवसेना हा कधी राजकीय पर्याय बनला नाही. पण बाळासाहेब आणि शिवसेना हे देशावर प्रेम असलेल्या मुस्लिमांबद्दल उल्लेख करत. साबीर शेख हे शिवसेनेचे मुस्लिम आमदार युतीच्या पहिल्या सरकारमध्ये कामगारमंत्री होते. बाळासाहेबांचे अनेक सहकारी आणि स्नेही मुस्लिम समुदायातून होते.

पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदादची 'मातोश्री' भेट गाजली होती.

त्यातूनच 'शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्व सांगतांना इतर धर्मांचा द्वेष करा असं सांगितलं नाही' असं म्हणत उद्धव ठाकरे त्यांच्या शिवसेनेची हिंदुत्वाची संकल्पना सांगत आहेत. ते करतांना मुस्लिम समुदाय सोबत येत आहे असं म्हणत आहेत.

9 जूनला जेव्हा औरंगाबादला सभा झाली तेव्हा उद्धव ठाकरे अजून मुख्यमंत्री होते. आता भाजपातून काढून टाकण्यात आलेल्या तत्कालीन पक्षप्रवक्त्या नुपूर शर्मा यांचं प्रेषित महंमद पैगंबरांबद्दलच्या विधानावरुन गदारोळ उठला होता. उद्धव ठाकरेंनी त्यावरुन भाजपावर टीकेचे बाण सोडलेच, पण तसं करतांना इतर धर्मियांना का दुखावायचं आणि तसं बाळासाहेबांनी सांगितलं नसल्याचं म्हटलं.

"शिवसेनाप्रमुखांनी मुसलमानांचा, इस्लामचा द्वेष करा, त्यांना तोडा फोडा झोडा असं आपल्याला सांगितलं नाही. ते तसं सांगूच शकत नाहीत. कारण जे छत्रपती शिवाजी महाराज कुराण सापडल्यावर त्याचा मान ठेवत होते, त्यांचे संस्कार आमच्यावर झाले आहेत. आम्ही दुस-या धर्माचा द्वेष करत नाही. अनेकदा शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं आहे की धर्म घरातच ठेवायचा आणि घराबाहेर पडलं की केवळ देश हाच आमचा धर्म. पण भाजपाच्या एका प्रवक्त्यांनी प्रेषिताचा अपमान केला. काय संबंध काय तुमचा? आपल्या देवदेवतांचा अपमान कोणी करायचा नाही तसं त्यांच्याही प्रेषिताचा अपमान करण्याची तुम्हाला काही गरज नाही. पण तो अपमान केल्यावर सगळे अरब देश एकत्र झाले आणि त्यांनी आपल्या देशाला गुडघ्यावरती आणलं," उद्धव त्यांच्या भाषणात म्हणाले.

नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ठाकरे हे त्या औरंगाबादमध्ये म्हणाले जिथे मुस्लिम लोकसंख्या मोठी आहे आणि पूर्वी आक्रमक हिंदुत्वाच्या भूमिकेनं भोवताच्या मराठवाड्यात शिवसेनेचा विस्तार झाला आहे. अर्थात तसं करतांना 'हिंदुत्व सोडलं' या टीकेला त्यांना उत्तर द्यावं लागलं आणि सध्या ते सतत द्यावं लागतं आहे.

'मोहन भागवत मशिदीत का गेले?'

हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी सोडलं अशी राजकीय टीका भाजपा सातत्यानं करतं. तीच टीका आता बाहेर पडलेला शिंदे गटही करतो आणि तेच बंडाचं मुख्य कारण सांगतो. पण उद्धव यांनी त्याला जोरात उत्तर देण्याचं ठरवलेलं दिसतं आहे. ते करतांना त्यांनी दसरा मेळाव्याच्या रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाही आणलं. भागवतांनी नुकतीच मुस्लिम समुदायाच्या काही प्रतिनिधींशी दिल्लीत चर्चा केली. संघ आणि मुस्लिम समाज यांचा संवाद पहिल्यापासूनच सुरु आहे असंही भागवत यांनी दस-याच्या कार्यक्रमात सांगितलं. उद्धव यांनी तोच धागा पकडला.

"मोहन भागवतांबद्दल मला आदर आहे. मधल्या काळात भागवतही मशीदीत जाऊन आले. मशीदीत? काय त्यांनी हिंदुत्व सोडलं? की मिंधे गटानं नमाज पढायला सुरुवात केली? कशासाठी गेले होते मोहन भागवत? ते गेले होते संवाद करायला. मग ते तिथे गेल्यावर मुसलमानांनी सांगितलं की मोहन भागवत हे राष्ट्रपिता आहेत. त्यांचं काय सुरू आहे माहीत नाही. पण मुसलमानांबरोबर ते बोलल्यावर तो संवाद चालू आहे, राष्ट्रीय कार्य चालू आहे. पण आम्ही कॉंग्रेससोबत गेलो तर हिंदुत्व सोडलं? कुठले धागे-दोरे कशाला लावून कसला आभास निर्माण करता आहात?," उद्धव यांनी विचारलं. रोख भाजपाकडे होता.

पण उद्धव इथेच थांबत नाहीत. दस-याच्या मेळाव्यात त्यांनी गुजरातचं बिल्किस बानो प्रकरणही काढलं. त्यावरुन कठोर सवाल भाजपाला विचारले. पण प्रश्न केवळ टीकेचा नव्हता. हे उदाहरण देऊन ते त्यांची हिंदुत्वाची भूमिकाही सांगायचा प्रयत्न करत होते.

"बिल्किस बानो माहिती आहे तुम्हाला. ती गुजरातच्या दंगलीमध्ये गर्भवती होती. तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्यासमोर तिच्या साडेतीन वर्षांच्या मुलीचा आपटून खून करण्यात आला. आजूबाजूच्या सर्वांवर सपासप वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपी पकडले. गुन्हे शाबित झाले. शिक्षा भोगत होते. गुजरात सरकारनं त्यांना सोडून दिलं. एवढंच नाही तर गावी गेल्यानंतर त्या सगळ्या गुन्हेगारांचा सत्कार करून स्वागत करण्यात आलं. या गोष्टी जर आपल्या पक्षातल्या लोकांकडून होत असतील, आपल्या अनुयायांकडून होत असतील, तर इतर लोक महिला शक्तीचा काय मान राखणार? शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवण दिली जेव्हा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला त्यांनी खणानारळानं ओटी भरुन परत पाठवलं होतं. हे आमचं हिंदुत्व आहे," उद्धव ठाकरे म्हणाले.

दस-याच्या मेळाव्यात काही मुस्लिम शिवसैनिकही मैदानात होते. त्यात महिलाही होत्या. अलीकडच्या सेनेच्या सभा, मेळाव्यांमध्ये मुस्लिम समाजातल्या व्यक्तींची हजेरी जाणवते आहे. 'बीकेसी'च्या 15 मे च्या सभेतही ती होती, औरंगाबादमध्ये होती.

उद्धव बिल्किस प्रकरणावर बोलतांना शिवाजी पार्कवर शांतता पसरली होती. शिंदे आणि बंडखोरांवर टीका करतांना जशा श्रोत्यांकडून जोरात प्रतिक्रिया येत होत्या, तशा नव्हत्या. पण तिथं हजर असणा-या राजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांना वाटतं की हा मुद्दा घेऊन ठाकरेंनी मुस्लिम समुदायातल्या अस्वस्थेतेला हात घातला.

"बिल्किस बानो हा विषय जाहीर मंचावर इतक्या ताकदीनं कोणत्याही राजकीय नेत्यानं आजवर घेतला नव्हता. बिल्किस प्रकरणामुळे मुस्लिम समाजात मोठी अवस्थता आहे. सुटून आलेल्या दोषींचा तुम्ही सत्कार कसं काय करू शकता? यावर भाजपाचे लोक सत्कार करणारे लोक आमचे नाहीत एवढंच म्हणाले आहेत. खरं तर उद्धव यांनी या विषयावर आधीच बोलायला हरकत नव्हती. कारण कोणतीही संवेदनशील व्यक्ती असेल तिला हा सत्कार करण्याचा प्रकार अजिबात आवडलेला नाही. म्हणजे अगदी कट्टर मोदीसमर्थक जरी असेल, तरी त्यांनाही ते नाही आवडलेलं. त्यामुळे दसरा मेळाव्यात ठाकरे त्याविषयी बोलून मुस्लिम समुदायाच्या जवळ पोहोचू इच्छितात. आणि मला असं वाटतं की मुस्लिम समुदायही मोठ्या प्रमाणात हा विचार करण्याची शक्यता आहे की मत देऊन बघूया," नानिवडेकर म्हणतात.

उद्धव ठाकरे नेमकं काय करू पाहताहेत?

एका बाजूला हिंदुत्वाची लाट आहे आणि दुस-या बाजूला हिंदुत्व सोडल्याची टीका. पण पक्ष फुटलेल्या, अडचणीच्या अवस्थेत असतांनाही शिवसेनेच्या मुख्य प्रतिमेपेक्षा वेगळी, कधी विसंगत वाटणारी भूमिका उद्धव का घेत आहेत? शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळापासून आजपर्यंत तिचा अभ्यास करणा-या आणि 'जय महाराष्ट्र' हे शिवसेनेचं चरित्र लिहिणा-या ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकरांना वाटतं की केवळ उद्धव शिवसेनेला पूर्णपणे नव्या मार्गावर नेत आहेत.

"2019 मध्ये भाजपाची साथ सोडून उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा प्रयोग केला, तेव्हापासून त्यांनी शिवसेनेला पूर्णपणे वेगळ्या मार्गावर नेण्याचा निर्णय घेतलेला दिसतो आहे. कारण सरकार स्थापन झाल्याच काहीच दिवसांत जेव्हा नागपूरला विधिमंडळ अधिवेशन झालं, त्यात त्यांन 'आम्ही धर्माची राजकारणाशी सांगड घातली ही आमची चूक झाली' अशी जाहीर कबुली दिली होती," अकोलकर म्हणतात. ते स्वत:सुद्धा बुधवारच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर हजर होते.

"आता मुस्लिम मतांसाठी काही ते प्रयत्न करत आहेत हे खरं आहे, पण धर्मापासून फारकत घेऊन, बाळासाहेबांच्या राजकारणाच्या पूर्णपणे 180 डिग्री विरुद्ध जाऊन नव्यानं शिवसेनेची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला असं मला वाटतं. म्हणूनच बिल्किस बानोचा उल्लेख करणं हा भाजपावर हल्ला आहे. मला वाटतं की त्यांनी केवळ मुस्लिम मतांसाठीच ते केलं असं नाही तर ते शिवसेनेला पूर्णत: नव्या मार्गानं नेत आहेत," अकोलकर पुढे म्हणतात.

पण असे प्रयोग उद्धव यांनी अगोदर केले नाहीत असे नाहीत. जिथं झाली नाही अशा अनेक दिशांना सेनेची वाढ करण्याचे त्यांनी प्रयत्न केले असं सांगतांना अकोलकर आठवण करून देतात की,"उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसेनेची सूत्रं जेव्हा आली 2003-04 साली तेव्हाच त्यांनी 'मी मुंबईकर' अशी घोषणा केली होती. त्यांनी सर्वधर्मीय, सर्वभाषिक मेळावे घ्यायला सुरुवात केली. पण तेव्हा राज ठाकरेंनी कल्याण इथं उतर भारतीयांविरोधात आंदोलन केलं आणि मराठीचा गजर केला तेव्हा उद्धव यांना परत मराठीसाठी थोडं मागं जावं लागलं होतं."

आताचाही हा प्रयोग तशाच एका प्रयत्नांमधला "शिवसेना आपली प्रतिमा कट्टर हिंदुत्ववादापासून अधिक उदारमतवादी आणि सर्वसमावेशक करु पाहत आहे", असा आहे असं अकोलकरांना वाटतं.

पण शिवसेनेला मुस्लिम मतदार मतदान करतील का?

विचारधारांबद्दल चर्चा केली तरीही कोणताही पक्ष अशा प्रकारचे प्रयोग आणि रणनीति ही मतांची गणितं नजरेसमोर ठेवून करत असतो. विशेषत: जेव्हा निवडणूक समोर दिसत असते तेव्हा. मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आहे. सेना फुटली आहे. मराठी मतांची विभागणी अटळ आहे. अशा वेळेस नवे मतदार जोडणं आवश्यक आहे. मुंबई शहरांत आणि उपनगरांमध्ये मुस्लिममबहुल अनेक भाग आहेत. महापालिका वॉर्डांमध्ये शंभर-दोनशे मतांचं अंतरही निर्णायक ठरु शकतं. तिथं शिवसेनेला मुस्लिमांबद्दलची ही भूमिका फायद्याची ठरेल का?

"माझ्या मते यंदाच्या मुंबईच्या निवडणुकीत गुजराती मतदान शिवसेनेला कमी होणार आहे आणि ते भाजपाकडे जाण्याची ठाम शक्यता आहे, ते नुकसान भरुन काढण्यासाठी उद्धव ठाकरे मुस्लिम मतदान आपल्याला व्हावं यासाठी मतदान करत आहेत. शिवाय त्यांनी महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केल्यापासून शिवसेना ही काही आपला शत्रू नाही असं मुस्लिम समाजातल्या छोट्या-मोठ्या नेत्यांनाही वाटायला लागलं आहे," मृणालिनी नानिवडेकर म्हणतात.

"मुंबईमध्ये साधारणत: 7 ते 9 टक्के मुस्लिम मतदार असावेत. नेहमी मुस्लिम मतदान हे जिंकणा-या माणसाला देण्याकडे कल असतो असं आपल्याला पहायला मिळालं आहे. जेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसला मुंबईत काही स्थान नाही आणि कॉंग्रेस जिंकण्याची काही शक्यता नाही, अशा वेळेला मुस्लिम जनतेला उद्धव यांचा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न आहे तो आवडू शकेल," नानिवडेकर पुढे म्हणतात.

प्रश्न फक्त अशा गृहितकांचाच नसतो. शिवाय मांडलेली गृहितकं निवडणुकांमध्ये खरी ठरतातच असं नाही. शिवाय मत पक्षाकडे येणं ही एक मोठी प्रक्रिया जमिनीवर घडून येते. वक्तव्यांमुळे तिला वेग मिळतो, पण लगेच घडून येईल असं नाही. शिवसेनेचा मुंबईतला इतिहासही पाहिलेल्या पिढ्या आहेतच.

"आजवर मुंबईत शिवसेनेकडे मुस्लिम मतं गेली असं झालेलं नाही. मनसेकडे मध्ये ती गेली होती. बाबरीनंतर मुंबईत जी दंगल झाली, त्यात आपल्याला वाचवलं म्हणून अमराठी लोक शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात वळले. पण त्या घटनेला आता एवढी वर्षं लोटली आहेत की ते सोसलेला मुस्लिम समाज आता वयानं ब-यापैकी मोठा झाला आहे. नवी पिढी वेगळा विचार करायला तयार आहे. आघाडीकडे आल्याने उद्धव ठाकरे भाजपाविरुद्ध उभे राहू शकतात असं त्यांना वाटू लागलं आहे," नानिवडेकर त्यांचं निरिक्षण नोंदवतात.

महाराष्ट्राचं राजकारण सध्या ऐतिहासिक टप्प्यातून जातं आहे. जे अगोदर कधीही पहायला मिळालं नव्हतं ते पहायला मिळतं आहे. मुस्लिम मतं शिवसेनेकडे जातील का हा प्रश्न असाच कल्पनेच्या परिघाबाहेरचा होता. पण सध्या परिस्थितीमध्ये, घेतल्या जाणा-या भूमिकांमध्ये ती शक्यता पहायला मिळते आहे. ते खरंच होईल का हे पहायला थांबावं लागेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)