You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नातवाबद्दलचे शब्द जाहीरपणे मागे घ्यावेत- फडणवीस
"उद्धव ठाकरे यांच्यासारख्या नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दीड वर्षांच्या नातवाचे नाव घ्यावे, हे अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्र कुठे चालला आहे, याचे चिंतन केले पाहिजे. खरं तर त्यांनी जाहीरपणे आपले शब्द मागे घेतले पाहिजे", असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात श्रीकांत शिंदे यांचा कार्टं असा उल्लेख केला होता. तसेच त्यांचा मुलगा रुद्रांश याचाही उल्लेख केला होता. त्याला कालच एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं होतं. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी ट्वीट करून आपली भूमिका मांडली आहे.
दसऱ्याच्या निमित्ताने बहुचर्चित मेळावे काल 5 ऑक्टोबरला संपले असले तरी त्याचे पडसाद पुढे बरेच दिवस उमटत राहाणार यात शंका नाही.
काल झालेल्या मेळाव्यांवर दोन्ही गटांनी एकमेकांवर नव्याने प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस यांनीही आपापली मतं व्यक्त केली आहेत.
आज श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना एक भावनिक पत्र लिहून उत्तर दिलं आहे. त्यांचं पत्र पुढीलप्रमाणे
काल विजयादशमी झाली. या नवरात्रीच्या निमित्ताने नऊ दिवस सारा महाराष्ट्र आदिशक्तीचा जागर करीत होता.
तिच्या शक्ती आणि भक्तीचे पोवाडे गात होता आणि तिच्याकडेच आशीर्वादही मागत होता. कालचा दिवस म्हणजे नऊ दिवसांच्या आनंदाच्या माळेनंतरची सोन्याची माळ.
हा दिवस सत्याचा असत्यावर विजय मिळवण्याचा आणि आनंद लुटण्याचा. मात्र काल उभ्या महाराष्ट्रानं काय पाहिलं? काय ऐकलं?
महाराष्ट्रानं जे पाहिलं आणि तुमच्या तोंडून जे ऐकलं त्याची दखल घेऊन अत्यंत व्यथित मनानं आज तुम्हाला हे पत्र लिहीत आहे.
हे पत्र माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या 'खासदार मुला'चं नाही; हे पत्र आहे रुद्रांश श्रीकांत शिंदे या दीड वर्षाच्या निरागस, चिमुकल्याच्या 'बापा'चं.
माझं हे पत्र तुम्ही नीट, सहृदयतेनं पूर्णपणे वाचावं, अशी तुम्हाला सुरुवातीलाच हात जोडून विनंती.
काल आमचा - शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसी मैदानात दणक्यात झाला. तुम्हीही तुमचा मेळावा शिवाजी पार्कमध्ये घेतलात.
आपापल्या राजकीय भूमिका मांडणं, प्रतिस्पर्ध्यावर टीका करणं हे राजकारणात होणारच. त्यावर माझा आक्षेप नाहीच. तुम्ही तुमच्या मेळाव्याची जाहिरात काय केली होतीत?
धगधगत्या हिंदुत्वाचे विचार ऐका वगैरे. कालच्या सभेत तुम्ही हिंदुत्वाचे काय विचार ऐकवलेत ते फक्त तुम्हालाच ठाऊक. मला तुम्हाला फक्त इतकंच विचारायचं आहे की, एका दीड वर्षाच्या अजाण बाळाला आपल्या भाषणात खेचणं तुमच्या धगधगत्या हिंदुत्वात बसतं का?
उद्धवजी, तुम्हाला आठवतंय का तुम्ही काल काय बोललात ते? उद्धवजी तुम्हाला आठवतंय का माझ्या मुलाचा - रुद्रांशचा उल्लेख तुम्ही कसा केलात ते? माझा उल्लेख तुम्ही 'कार्टं' असा केलात.
चला, ठीक आहे, तुमच्या कुवतीनुसार तुम्ही बोललात म्हणून सोडून दिलं आम्ही. पण तुम्ही हद्दच केलीच. माझ्या रुद्रांशचा उल्लेख करून, 'त्याचा नगरसेवकपदावर डोळा आहे' असं वक्तव्य केलंत तुम्ही.
उद्धवजी, ज्या डोळ्यांत फक्त आणि फक्त निरागसता भरलेली आहे, ज्या डोळ्यांतून केवळ आणि केवळ निर्मलता ओसंडून वाहाते आहे, असे डोळे खुर्चीकडे लागलेले आहेत, असं वक्तव्य करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही?
मुख्यमंत्री असताना स्वतःला 'कुटुंबप्रमुख' म्हणवत होतात ना? मग कुटुंबप्रमुख असा कोवळ्या जिवांचा बाजार मांडणारा असतो? उद्धवजी, कुठे आदरणीय, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कुठे तुम्ही.
आदरणीय बाळासाहेबही विरोधकांवर जळजळीत टीका करायचे, पण त्यांनी असली हीन व गलिच्छ टिप्पणी कधीही केली नाही.
उद्धवजी, माझे वडील राज्याचे मुख्यमंत्री आहेत, मी खासदार आहे; पण आम्ही शेवटी रक्तामांसाची, भावभावना असलेली माणसंच आहोत हो.
तुम्हाला कल्पना आहे का, कालच्या तुमच्या वक्तव्यानं आमच्या कुटुंबातील लोकांना किती धक्का बसला आहे तो? खरं तर हे खूपच खासगी पातळीवरचं आहे, पण ते सांगणं मला भाग पडत आहे.
तुम्ही काल जे बोललात ते ऐकून बाळाची आई व आजी दोघी कमालीच्या दुखावल्या. धास्तावल्यात. डोळ्यांत अश्रू दाटून आले त्यांच्या…..
ज्या चिमुकल्याचं दुडूदुडू चालणं, त्याचं बोबडं बोलणं, हसणं-खिदळणं हे देवाचं देणं आहे अशी आपली श्रद्धा आहे, त्याच्याविषयी एक राजकारणी माणूस असं कसं काय बोलू शकतो, हा प्रश्न त्यांना पडलेला आहे नि त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. तुमच्याकडे आहे?
एका माजी मुख्यमंत्र्याच्या तोंडी ही असली भाषा? अहो, पद वगैरे जाऊ द्या. कुठलाही सुसंस्कृत माणूस, संवेदनशील माणूस असं बोलू शकतो? बोलणं सोडाच, असा विचार करू शकतो?
मनाला किती वेदना देणारं आहे हे उद्धवजी. आणि या पत्रात जी वेदना मी मांडली आहे तीच भावना राज्यातील प्रत्येक बापाची असणार यात मला तरी शंका नाही.
ज्या परिवारासाठी आम्ही जीवाचं रान केलं. त्याच कुटुंबातली एक प्रमुख व्यक्ती जर आमच्या चिमुकल्याबद्दल असे उद्गार काढत असेल तर आमच्या मनाला किती वेदना होत असतील…
तुम्ही तुमची पातळी सोडलेली असली तरी आम्ही सोडलेली नाही नि सोडणारही नाही. म्हणूनच एक सांगतो. उद्धवजी, तुम्हीही पुढच्या काळात आजोबा व्हाल. तुमच्या लाडक्या नातवाचं, नातीचं कौतुक कराल.
त्यांच्या डोळ्यांतील निरागसता पाहून तुमचंही मन आनंदानं भरून जाईल. कल्पना करा उद्धवजी, त्या तुमच्या नातवाबद्दल, नातीबद्दल तुम्ही जे काल बोललात तसं कुणी बोललं तर काय अवस्था होईल तुमची नि तुमच्या कुटुंबीयांची. देव करो नि तसं त्यांच्याबद्दल कुणीही न बोलो, ही माझी- एका बापाची - मनापासूनची सदिच्छा आहे.
एकच लक्षात ठेवा, पोटच्या बाळावर जिवापाड माया करणाऱ्या आईचा शाप सगळ्यांत धारधार असतो, आणि बाळासाठी वाट्टेल ते करणाऱ्या हिरकणीचा हा महाराष्ट्र आहे.
त्या हिरकणीचा अंश अजूनही सगळीकडे आहे.
भगवद्गीतेत एक श्लोक आहे...
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे॥
हा श्लोक तुम्हाला माहिती आहे का? माहिती असेल अशी आशा करतो. हा श्लोक वाचून एक प्रश्न मनात येतो तो तुम्हाला विचारतो. माझ्या बाळाचा जन्म आणि हा श्लोक यांत काही नातं असेल का हो?
उद्धवजी, काळ लक्षात घ्या, श्लोकाचा अर्थ लक्षात घ्या. वेळ निघून चालली आहे. वेळेसोबतच बरच काही निघून चाललंय तुमच्या हातातून. त्याचा विचार करा!!
असो…
पत्राच्या शेवटी एका बापाची हात जोडून, डोळ्यांत पाणी आणून विनंती. राजकारण होतच राहील हो... टीका टिप्पणी होतच राहील. पण त्यात निरागसतेला ओढू नका हो. पाप आहे हे. आणि तेही कुठेही फेडता येणार नाही असं. त्या पापाचे धनी होऊ नका. कृपा करा.
कळावे.
-डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे
एक दुखावलेला बाप
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)