मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केवळ 5 रुपयांसाठी जीवे मारण्याची धमकी #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केवळ 5 रुपयांसाठी जीवे मारण्याची धमकी?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे वृत्त प्रसारित झाले आणि एकच खळबळ उडाली. मात्र, तपासादरम्यान मोठा ट्विस्ट समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट नव्हताच अशी माहिती उघडकीस आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर हल्ल्याचा कट असल्याची खोटी माहिती देणाऱ्या एका तरुणाला लोणावळा पोलिसांनी अटक केली आहे.

मूळचा आटपाडीचा रहिवासी असलेला अजय वाघमारे हा मुंबईला जात असताना लोणावळ्यातील एका धाब्यावर जेवण करण्यासाठी थांबला होता. हॉटेल मालकाने त्याला दहा रुपयाची पाण्याची बॉटल पंधरा रुपयाला दिली. यावरून हॉटेल मालकाशी भांडण झाले. यामुळे वाघमारेने हे कृत्य केले असल्याचे समोर आलं आहे.

पोलिसांना खोटी माहिती देऊन यंत्रणेची धावपळ उडवणाऱ्या वाघमारेवर लोणावळा शहर पोलिसात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झी 24 तासने ही बातमी दिली आहे.

2. एकनाथ खडसे-अमित शाह यांच्या 'त्या' भेटीबद्दल गिरीश महाजननांनी म्हटलं...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे काही दिवसांपू्र्वी आपली सून आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांच्यासह दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी गेले होते. पण अमित शाहांनी त्यांना भेट नाकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या प्रकारानंतर एकनाथ खडसे यांनी अमित शाहांशी माझी फोनवरून चर्चा झाल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.

आता एकनाथ खडसे आणि अमित शाह यांच्या भेटीसंदर्भात भाजप नेते गिरीश महाजन यांनी एक विधान केलं आहे. 'एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते. मात्र, त्यांची भेट झाली नाही. मी रक्षाताईंना फोन केल्यानंतर त्यांनीच मला ही माहिती दिली,' असं गिरीश महाजनांनी म्हटलं.

ते जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत असल्याचं लोकसत्तानं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

3. राहुल गांधींचं भर पावसातलं भाषण, सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा रविवारी (2 ऑक्टोबर) कर्नाटक राज्यातला तिसरा दिवस होता.

राहुल गांधी यांनी या दिवशी नंजनुगड इथल्या श्रीकांतेश्वर मंदिरात दर्शन घेतलं. संध्याकाळी त्यांनी मैसुरूमधील एपीएमसी मैदानावर एका सभेला संबोधित केलं. या सभेच्यावेळी प्रचंड पाऊस सुरू झाला, तरीही राहुल गांधी यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं.

आपल्या भाषणात त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर मोठ्या प्रमाणावर टीका केली.

राहुल गांधी यांच्या भर पावसातील भाषणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

स्वतः राहुल गांधी यांनीही आपल्या ट्विटर हँडलवरूनही हा व्हीडिओ शेअर केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "भारताला एक करण्यापासून आम्हाला कोणी अडवू शकत नाही. भारताचा आवाज उठविण्यापासून आम्हाला कोणी उडवू शकत नाही. कन्याकुमारीपासून काश्मिरपर्यंत जाणाऱ्या भारत जोडो यात्रेला कोणी अडवू शकत नाही."

लोकमतनं ही बातमी दिली आहे.

4. ऑन ड्युटी असताना व्हीडिओ केल्याप्रकरणी लेडी कंडक्टरचं निलंबन

उस्मानाबाद जिल्ह्यातील मंगल सागर पुरी या लेडी कंडक्टरवर ऑन ड्यूटी असता स्वतःचे व्हीडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत या लेडी कंडक्टर ही कारवाई करण्यात आली आहे.

मंगल सागर पुरी या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारामध्ये लेडी कंडक्टर आहेत. त्या वेगवेगळ्या गाण्यावर व्हीडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्सदेखील आहेत.

दरम्यान एसटी महामंडळाचा ड्रेस घालून तुळजाभवानी देवीच्या गाण्यावरचा मंगल पुरी यांनी एक व्हीडिओ बनवला होता. हा व्हीडिओ त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केला होता.

झी 24 तासनं ही बातमी दिली आहे.

5. मुंबईत गरबा खेळताना तरुणाचा मृत्यू

मुलुंडमध्ये एका नवरात्र उत्सवात गरबा खेळत असताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ऋषभ लहरी मंगे असं या तरुणाचं नाव असून तो डोंबिवली पश्चिम येथे राहणारा होता. ऋषभ हा बोरिवली येथे एका खाजगी कंपनीत काम करत होता.

गरबा खेळत असताना छातीत दुखू लागल्याने त्याला आदिती हॉस्पिटल पिके रोड मुलुंड पश्चिम या ठिकाणी दाखल केले असता डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वी त्याला मृत घोषित केलं.

न्यूज18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)