इराण : ‘पैशांसाठी एखाद्या अनोळखी महिलेबरोबर झोपणं हे माझं स्वप्न कधीच नव्हतं’

    • Author, आमिर नातेग
    • Role, बीबीसी न्यूज

'मी जे करतेय, ते लाजिरवाणं आहे पण माझा नाईलाज आहे', हे म्हणणं आहे तेहरानमधल्या घटस्फोटित महिला निदाचं.

दिवसा ती हेअरड्रेसर म्हणून काम करते, परंतु उपजीविकेसाठी रात्रीच्या अंधारात सेक्सवर्करचं काम करते.

निदा सांगते, "मी अशा भागात राहते जिथे महिलांना सन्मान दिला जात नाही. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. दैनंदिन जीवनातल्या वस्तू प्रचंड महाग होत चालल्या आहेत. मला एक मुलगाही आहे. मुलाच्या संगोपनाची जबाबदारी माझ्यावर आहे. सेक्सवर्कर म्हणून काम केलं तर चांगले पैसे मिळतात. डाऊन टाऊनमध्ये एक छोटं घर खरेदी करण्याचा माझा विचार आहे. ही माझ्या आयुष्याची दु:खद कहाणी आहे. दररोज मी माझा आत्माच विकते."

2012 मध्ये इराणने देशातला वेश्या व्यवसाय आटोक्यात आणण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रमाची घोषणा केली होती. बिगरसरकारी यंत्रणा आणि स्वतंत्रपणे काम करणाऱ्या संस्थांच्या मते इराणध्ये सातत्याने सेक्स उद्योग वाढतो आहे.

इराणच्या पारंपरिक धार्मिक सत्तेने अधिकृत पातळीवर प्रदीर्घ काळ देशात सेक्स वर्कर कार्यरत असल्याचं वास्तव नाकारलं आहे.

पाश्चिमात्य देशांचं कारस्थान

इराणच्या अधिकाऱ्यांच्या मते पाश्चिमात्य देशांनी इथल्या युवा वर्गाचं लक्ष विचलित करण्यासाठी वेश्या व्यवसाय आणला. अधिकृत आकडेवारी नसली तरी इराणमध्ये कमी वयाच्या महिला सेक्स वर्कर्स म्हणून काम करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. बिगरसरकारी संघटनांच्या मते 2016 मध्ये इराणमध्ये 12 वर्षाच्या मुली सेक्स वर्कर म्हणून काम करत होत्या.

इराणमध्ये ड्रग्जसेवन करणाऱ्या महिलांवर उपचार करणारी स्वयंसेवा संस्था आफताब सोसायटीने 2019 मध्ये अनुमान जाहीर केलं होतं. त्यानुसार तेहरानमध्ये 10,000 सेक्स वर्कर्स कार्यरत आहेत. यापैकी 35 टक्के महिलांचं लग्न झालेलं आहे.

तेहरान विद्यापीठातील सोशल वेल्फेअरचे प्राध्यापक आमिर महमूद हारिकी यांच्या मते तेहरानमध्ये 20,000 महिला सेक्स वर्कर म्हणून काम करत आहेत.

इराणमध्ये महिलांना काम करण्याच्या संधी मर्यादित आहेत. लैंगिक भेदभाव असल्याने अनेक महिलांना गरिबीमध्येच जीणं जगावं लागतं. या महिलांना रोजीरोटीसाठी सेक्स वर्कर म्हणून काम करावं लागतं. या क्षेत्रात काम करणं जोखीमभरं आहे.

तेहरान विद्यापीठात विद्यार्थी आणि हंगामी सेक्स वर्कर म्हणून काम करणाऱ्या मेहनाजने सांगितले, "पुरुषांना माहितेय की इराणमध्ये वेश्या व्यवसाय बेकायदेशीर आहे. सेक्स वर्कर म्हणून काम करणाऱ्या महिलांसाठी कठोर दंड आहे. याचा पुरुष आपल्या फायद्यासाठी वापर करुन घेतात."

अनेकदा हे माझ्याबरोबरही घडलं आहे. सेक्स केल्यानंतरही मला पैसे मिळालेले नाहीत. मी अधिकाऱ्यांकडे याची तक्रारही करू शकत नाही.

मेहनाज सांगतात की, "तेहरानमध्ये राहणं खूप खर्चिक आहे. अन्य काही काम करून या महागड्या शहरात गुजराण होत नाही."

आनंदासाठी लग्न

इराणमध्ये 1979 मध्ये इस्लामी क्रांतीनंतर नव्या शासन काळात अनेक सेक्स वर्कर्सना फाशी देण्यात आली. अनेक वेश्या व्यवसाय केंद्र बंद झाली. या काळात सेक्ससाठी महिलांना कायदेशीर मान्यता मिळण्यासाठी आनंदासाठी लग्न करण्याची पद्धत रुळली.

यानुसार महिलांना एका ठराविक काळासाठी पैसे मिळत असत. त्याबदल्यात त्यांचं कोणत्याशी पुरुषाशी लग्न लावून दिलं जात असे.

इराणमधल्या शिया मुस्लिमांच्या रीतीरिवाजानुसार सेक्सच्या बदल्यात लग्न केलं जातं आणि त्याला वेश्या व्यवसाय मानलं जात नाही. ही पद्धत मशहाद आणि क्योमसारख्या धार्मिक शहरांमध्येही प्रचलित आहे. जगभरातील शिया पंथीय मुस्लीम या शहरांमध्ये येतात.

सोशल मीडियावर अनेक व्हीडिओ आजही आहेत ज्यामध्ये दिसतं की इराणी पुरुष मशहादमध्ये सेक्सची मागणी करत आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार लोक केवळ हंगामी लग्नच करू शकतात.

आता असंख्य ऑनलाईन सर्व्हिस आहेत ज्याद्वारे इराणमध्ये मुता विवाहाची सोय उपलब्ध करून देतात. टेलिग्राम आणि व्हॉट्सअपवरही ही सुविधा उपलब्ध करून देणाऱ्यांचा दावा आहे की त्यांना सरकारची परवानगी मिळाली आहे.

इराणमध्ये खाण्यापिण्याच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. यामुळेही वेश्या वृत्तीला खतपाणी मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. इराणमधल्या आण्विक प्रकल्पामुळे अमेरिकने आर्थिक निर्बंध लादले आहेत. गेल्या वर्षभरात इराणमध्ये महागाईचा दर 48.6 टक्के एवढा झाला आहे.

इराणमध्ये बेरोजगारी सातत्याने वाढतेच आहे आणि ज्या लोकांना नोकरी आहे त्यांना पुरेसा पगार नाही.

इराणमधली परिस्थिती लक्षात घेता 20 ते 35 वयोगटातील पुरुषांची संख्याही वाढते आहे. ही माणसं पैसे देऊन सेक्स करण्यासाठी तयार आहेत. इराणमधल्या प्रमुख शहरांमध्ये पुरुष सेक्स वर्कर्सची संख्याही वाढते आहे.

28 वर्षीय कामयार असाच एक तरुण आहे. तो सुपरमार्केटमध्ये कॅशियर म्हणून काम करतो. गेल्या वर्षीपर्यंत कामयार आईवडिलांबरोबर काम करत होता कारण तो स्वत:चा खर्च भागवू शकत नव्हता. आता तो तेहरानच्या मध्यवर्ती भागात अपार्टमेंटमध्ये राहतो. त्यांना खात्री आहे की लवकरच परदेशात जायला मिळेल.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मला ग्राहक मिळतात. या महिला 30 ते 40 वयोगटातील आहेत. एकदा 54 वर्षांची महिला माझी ग्राहक होती. ही माणसं माझी चांगली काळजी घेतात. चांगले पैसे देतात आणि रात्री त्यांच्या घरी झोपू देतात. मौखिक प्रसिद्धी माझ्यासाठी महत्त्वाची आहे.

कामयारने अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. पण ज्या क्षेत्राविषयी त्यांना मनापासून प्रेम वाटतं त्यात त्याला भविष्य दिसत नाही.

तो सांगतो, "मला नेहमीच इंजिनियर व्हायचं होतं. पण माझ्यासाठी नोकरीच नाहीये. माझं एका मुलीवर प्रेम होतं. पण मी तिच्याशी लग्न करू शकलो नाही कारण माझ्याकडे पैसे नव्हते. आता मी जे करतोय त्याचा मला अभिमान नाही. पैशांसाठी एखाद्या अनोळखी महिलेबरोबर झोपणं हे माझं स्वप्न कधीच नव्हतं. मला खजील वाटतं. पण मला घरही चालवायचं आहे, खर्चही आहेत. मी अशा एका देशात आहे जिथे भविष्यात दु:खच वाढून ठेवलं आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)