You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बलात्काराच्या 28 वर्षांनंतर पीडितेनं आरोपीचा असा लावला शोध
- Author, अनंत झणाणे
- Role, बीबीसी हिंदीसाठी
28 वर्षांपूर्वी एका 12 वर्षीय मुलीवर तिच्या वस्तीतल्याच लोकांनी 6 महिने सतत बलात्कार केला. परिणामी ती गरोदर राहिली आणि तिला मुलगा झाला.
मुलाच्या जन्मानंतर तिच्या आयुष्यात अनेक वादळं आली आणि समाजानेही तिची साथ सोडली. पण जेव्हा तिचा मुलगा 13 वर्षांचा झाला, तेव्हा त्याने आईला विचारलं की त्याचे वडील कोण आहेत?
मुलाच्या या आग्रहाचं फलित म्हणजे आता तब्बल 28 वर्षांनंतर आईवर बलात्कार करणाऱ्यांची ओळख पटली असून त्याला अटकही करण्यात आली आहे.
एका आई आणि मुलानं समाज आणि कायद्यासोबत नेमका कसा संघर्ष केला, त्याची ही गोष्ट.
1994: 12 वर्षांच्या मुलीवर 6 महिने बलात्कार
28 वर्षांची ही वेदनादायक घटना जाणून घेण्यासाठी बीबीसीनं बलात्कार पीडितेच्या घरी भेट दिली. ती साध्या भाड्याच्या घरात आपली दोन मुलं आणि सून यांच्यासोबत राहत आहे.
1994 मध्ये ती फक्त 12 वर्षांची होती. या घटनेविषयी विचारलं त्यांनी सांगितलं, "ही (बलात्काराची) मालिका सहा महिने चालली. ते (नकी आणि रझी) त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कुंपणावरून उड्या मारून येत असे. हे सर्व काय आहे आणि ते का होत आहे, याची मला काहीच कल्पना नव्हती."
पण तब्येत ढासळू लागल्यावर बहिणीने त्यांना डॉक्टरांकडे नेलं. तपासणी दरम्यान त्या गर्भवती असल्याचं समोर आलं. त्या सांगतात, "माझ्यासोबत हे कुणी केलं? असं डॉक्टरांनी विचारलं. मी म्हणाले मला नाव माहिती नाही, पण दोन लोक येतात आणि माझ्याशी असे करतात. माझी बहीण म्हणाली की गर्भपात करूया. पण गर्भपात होऊ शकला नाही, कारण मी खूप लहान होते. डॉक्टर म्हणाले यात या मुलीचा मृत्यू होईल आणि गर्भपात देखील होणार नाही."
बलात्कार पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवायचा होता. पण गेल्या 27 वर्षांपासून ते दहशतीच्या सावटाखाली होते.
पीडिता सांगते, "त्यांनी माझ्या मनात दहशत निर्माण केली होती. मला मारहाण केली होती, धमक्या दिल्या होत्या. त्यांची इतकी दहशत होती की, मला इतक्या वर्षांनंतर शाहजहांपूरला जावंसं सुद्धा वाटत नव्हतं. त्यांनी माझ्या बहिणीला आणि तिच्या नवऱ्याला मारण्याची धमकी दिल्यामुळे मी घाबरले होते.
"तोंड उघडले तर संपूर्ण घर पेटवून देऊ आणि सगळे त्यात मरतील असं ते म्हणाले होते. लहान वयातच जर कुणी अशी भीती मुलाच्या मनात घालत असेल तर ते मूलही त्यांचं ऐकेलच ना? याविषयी तोंडातून शब्द जरी काढला, तरी संपवून टाकू, अशी धमकी ते देत असत. ते देसी कट्टा घेऊन हिंडत असे."
पोलिसात जाऊन देशसेवा करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. पण महिनाभर चाललेल्या बलात्काराच्या घटनेनंतर ते स्वप्न केवळ स्वप्नच राहिलं. त्या सांगतात, "मी घाबरलेली आणि लहान, हाडकुळी मुलगी होते. तेव्हा मी सातवीच्या वर्गात शिकत होते. जेव्हा मी माझ्या बहिणीसोबत शाहजहांपूरला राहायला गेले तेव्हा माझी अनेक स्वप्नं होती. माझं स्वप्न होतं की मी मोठी होऊन पोलीस होईन आणि देशाची सेवा करेन. पण त्या दोन लोकांमुळे आमची सर्व स्वप्नं संपुष्टात आली. माझी शाळाही सुटली."
दहशतीच्या या वातावरणापासून सुटका करण्यासाठी पीडिता आपली बहीण आणि मेव्हण्यासोबत रामपूरला स्थायिक झाली. रामपूरमध्येच वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी मुलाला जन्म दिला.
त्या सांगतात, "ज्या मुलासाठी मी एवढा त्रास सहन केला त्याचा चेहरासुद्धा पाहिला नाही. जेव्हा मी शुद्धीवर आले आणि मुलगा कुठे आहे असं विचारलं, तेव्हा आई म्हणाली की आता ते बाळ तुला कधीच मिळणार नाही."
त्यानंतर 2000 मध्ये त्यांच्या आयुष्यात एक नवं वळण आलं. त्यांचं लग्न झालं आणि तिला दुसरा मुलगा झाला. त्या सांगतात, "लग्न झाल्यानंतर मी माझ्या सासरच्या घरी गेले. माझ्या आयुष्यात सर्व काही ठीक चाललं होतं. मला ती घटना पूर्णपणे विसरायची होती. जे घडले त्याची पुनरावृत्ती व्हावी, असं मला वाटत नव्हतं."
पण लग्नानंतर 6 वर्षांनी त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेनं पुन्हा एकदा त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्या सांगतात, "माझ्यासोबत असं काही घडलं आहे हे माझ्या पतीला कसं कळलं हे मला समजलं नाही. त्यानं सर्व दोष माझ्यावर टाकून भांडण सुरू केलं. माझं काहीच ऐकलं नाही. एकेदिवशी त्यानं मला घरातून काढून दिलं आणि मी माझ्या दुसऱ्या मुलासह माझ्या बहिणीकडे परत आले."
2010: आई आणि मुलगा 13 वर्षांनंतर पहिल्यांदा भेटले
दरम्यान, त्यांच्या पहिल्या मुलाला एका कुटुंबानं दत्तक घेतलं होतं. पण तो त्याच्या दत्तक पालकांचा मुलगा नाही ही गोष्ट बाहेर आली.
मुलाबद्दल त्या सांगतात, "गावात लोक त्याला म्हणायचे की, तू ज्यांना आई-बाबा म्हणतोस, ते तुझे खरे आई-बाबा नाहीयेत. त्यांना असं कळलं की तो एका मुस्लिमाचा मुलगा आहे. त्यामुळे ते लोकही त्याच्याशी गैरवर्तन करू लागले."
13 वर्षांनंतर एके दिवशी विभक्त झालेल्या या आई आणि मुलाची पुन्हा हॉस्पिटलमध्ये भेट झाली.
मुलाला दत्तक घेतलेल्या कुटुंबानं त्याला त्याच्या आईकडे परत केलं.
आपल्या मुलाच्या पुन्हा चांगल्या आयुष्यात परतल्याचा तो क्षण आठवून त्या सांगतात, "जेव्हा माझं मूल माझ्याकडे परतलं, तेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिलं. त्यानंतर तो माझ्यासोबत राहू लागला."
'तो म्हणतो, मी या जगात अशापद्धतीनं आलोय?'
आई आणि मुलगा या दोघांनी एकत्र राहण्यास सुरुवात केल्यानंतरही मुलगा निराश आणि अस्वस्थ असायचा.
याविषयी त्या सांगतात, "तो मुलगा खूप उदास असायचा. मुलं चिडवत असल्यामुळे तो शाळेत गेला नाही. ज्यांना आम्ही मुलाला दत्तक दिलं होतं ते वडिलांचं नाव द्यायला तयार नव्हते. मी माझं नाव का देऊ? असं म्हणत त्यांनी नकार दिला. शाळेत प्रवेश मिळाला तर त्याला वडिलांचं नाव विचारत असत आणि आम्ही ते सांगू शकत नव्हतो. आम्ही दोघांनी किती अपमान सहन केला हे सांगू शकत नाही."
पण, मुलाला आपले वडील कोण हे जाणून घ्यायचं होतं. त्याच्या प्रश्नांचा पुनरुच्चार करताना त्या म्हणतात, "मी या जगात अशापद्धतीनं आलो आहे? जबरदस्तीनं माझा जन्म झालाय? असं तो विचारतो. मला वडील नाहीत, माझी काही ओळख नाही. अशा ओळखीचे मी काय करू? असे प्रश्न त्याला पडतात."
या आई-मुलाला समाजात वावरणंही मुश्किल होऊन बसलं होतं.
निराशेतून आशा
आईसोबत राहूनही तो सतत आईला त्याच्या वडिलांबद्दल आणि त्याच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न करत होता. मुलाच्या वर्तनाविषयी त्यासांगतात, "तो मला म्हणायचा, प्रत्येकाला वडील आहेत, पण मला माझा बाप नाहीये. तू माझी आई आहेस, तर तू फक्त मला हे सांग की माझे आडनाव काय आहे?"
पुढे त्यांना इतकं नैराश्य आलं की त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला.
त्या सांगतात, "लहानपणी मी त्याला खडसवायचे. पण तो जसजसा मोठा होऊ लागला, तसतसा तो डिप्रेशनमध्ये जाऊ लागला. हे बिनानावाचं आयुष्य मी जगू शकत नाही, असं तो म्हणायाचा. मी आत्महत्या करेन, असंही म्हणायचा. तू मला स्पष्ट सांग की प्रकरण काय आहे, असा प्रश्न विचारायचा. जेव्हा तो आत्महत्येचा प्रयत्न करू लागला तेव्हा आम्ही त्याला वाचवलं आणि संपूर्ण प्रकरण समजावून सांगितलं."
सगळा प्रकार कळल्यावर तो म्हणाला, "यात माझी चुक कुठे आहे? तुझी चुक काय आहे? तू इतकी वर्षे कलंकित आयुष्य जगत आहेस, पण तू माझेही आयुष्य उद्ध्वस्त केले आहेस. ज्याने असे केले त्याला आधी शिक्षा झाली पाहिजे. त्याच्या या चुकीमुळे आपण जगापासून इतकं दूर का राहावं?"
मुलाकडून प्रोत्साहन
त्या सांगतात, "मुलानं मला सांगितलं की काहीही झाले तरी आई आपल्याला ही लढाई लढायची आहे. मला त्यांना धडा शिकवायचा आहे. त्यांनी दुसऱ्या कोणासोबतही असेच वर्तन केले असेल, असंही असू शकतं. जर तू समोर आलीस तर कदाचित आणखी लोक पुढे येतील. त्यामुळे आपली केस बळकट होईल आणि त्यांना शिक्षा होईल. गुन्हा केल्यावर कोणीही वाचू शकत नाही, असा मेसेज यातून समाजात जाईल."
मुलाचे प्रोत्साहन मिळाल्यानंतर त्यांनी 2020 पासून शाहजहांपूरला जाण्यास सुरुवात केली. पण तिथून परतणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. त्या सांगतात,"मी रिपोर्ट लिहिण्यासाठी 20 ते 25 वर्षांनी शाहजहांपूरला गेले होते. मी खूप घाबरले होते. ते पुन्हा आम्हाला भेटतील आणि तसंच वागतील की काय, अशी भीती मला वाटत होती."
एफआयआरसाठीची धडपड
2020 मध्ये जेव्हा त्या शाहजहांपूरला पोहचल्या तेव्हा त्यांना माहित नव्हते की आता एक नवीन कायदेशीर संघर्ष सुरू होणार आहे.
त्या सांगतात, "एफआयआर करण्यासाठी खूप प्रयत्न केले. थेट पोलिस स्टेशनमधून ते होऊ शकले नाही. कोर्टात जाण्यासाठी वकिलाला भेटले तेव्हा वकिल म्हणाले, हे खूप जुनं प्रकरण आहे. आपण आरोपींना कुठं शोधणार? आणि तेव्हा तुम्ही जिथं राहत होता, हे कसं सिद्ध करणार? मी ज्या घरात राहत होते ते घरही मला सापडत नव्हतं.
"मी ते शोधूही शकले नाही. मला आरोपींचीही ओळख नव्हती. त्या भागात सर्व काही बदललं होतं. जेव्हा आम्ही एफआयआर नोंदवण्यासाठी पुन्हा-पुन्हा जायचो तेव्हा वकील म्हणायचे की मॅडम, यात काही नाही, तुम्ही परत जा. पण मी म्हणायचे, माझी पावलं आता बाहेर पडली आहेत आणि मी न्याय मिळवल्याशिवाय थांबणार नाही."
"आम्ही तुमच्याकडे पुरावे आणून देऊ. तुम्ही आमची केस घ्या," असं माझा मुलगा वकिलांना म्हणाला.
त्यानंतर त्यांनी न्यायालयात अर्ज केला आणि शाहजहांपूरच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानुसार मार्च 2021 मध्ये सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यामध्ये हसन उर्फ ब्लेडी ड्रायव्हर आणि त्याचा भाऊ गुड्डू या दोघांना आरोपी करण्यात आलं.
पण तरीही 28 वर्षं जुन्या प्रकरणाचा नव्यानं तपास सुरू करणं सोपं नव्हतं.
"पोलिसांनी आम्हाला आरोपींना शोधून आणण्यास सांगितलं. आम्ही स्वतः त्यांना शोधायला गेलो. मी त्याला शोधून काढले आणि त्याच्याशी फोनवर बोलले. त्यानेही मला ओळखलं. तो म्हणाला, तूच बोलत आहेस ना? मी म्हणाले, हो मीच बोलत आहे. माझं दोन्ही भावांशी माझं बोलणं झालं. ते म्हणाले, तू अजून जिवंत आहेस? मेला नाहीस? मी म्हणाले, नाही मी अजून जिवंत आहे आणि आता तुमची मरायची पाळी आहे."
त्या पुढे म्हणतात, "सत्य कधीच लपवता येत नाही. जे सत्य असेल ते नेहमी समोर येतं आणि याच मार्गाने मी आज इथपर्यंत पोहचले आहे."
डीएनए चाचणी करून आरोपी पकडला
पोलिस आणि पीडितेने आरोपींचा शोध घेतला. पण त्यांना चौकशीच्या कक्षेत आणण्यासाठी डीएनए चाचणी आवश्यक होती.
त्या सांगतात, "एफआयआर नोंदवत असताना मी पोलिसांना आरोपींचे संपर्क क्रमांक दिले आणि त्यानंतर त्यांना डीएनए चाचणीसाठी बोलावण्यात आलं. मग नकी हसनचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तरीही माझा मुलगा हा नक्की कुणाचा (मुलगा) आहे हे मला समजत नव्हते. कारण दोघेही आळीपाळीनं माझ्यावर (बलात्कार) करायचे."
या संपूर्ण प्रकरणाबद्दल बीबीसीशी बोलताना शाहजहांपूरचे एसएसपी एस. आनंद म्हणाले, "हे प्रकरण अगदीच अनपेक्षित होतं. जेव्हा महिलेनं पुढे येऊन गुन्हा दाखल केला तेव्हा आम्हाला खूप आश्चर्य वाटलं. पण तरीही आम्ही याचा शोध सुरू केला. मुलाच्या डीएनएपासून यासाठी सुरुवात केली."
गेल्या वर्षभरापासून या प्रकरणाचा तपास करत असलेले पोलिस निरीक्षक धर्मेंद्र कुमार गुप्ता म्हणाले, "आधी आरोपींना नोटीस दिल्यानंतर पोलिस ठाण्यात बोलावण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या डीएनएचे नमुना घेण्यात आले. नमुना घेतल्यानंतर ते डीएनए मॅचिंगसाठी पाठवण्यात आले. फेब्रुवारी 2022 मध्ये डीएनएचा नमुना जुळत असल्याचा अहवाल आला. एवढ्या जुन्या घटनेत आरोपींना थेट तुरुंगात पाठवता आलं नसतं. महिलेनं मेडिकललाही नकार दिला होता, कारण 20-25 वर्षांनी त्यातून काही निष्पन्न झालं नसतं."
अखेर 31 जुलै 2021 रोजी पोलिसांनी आरोपी रझीला अटक केली.
एसएसपी एस. आनंद म्हणतात, "रझीला अटक करण्यात आली, तेव्हा आमच्याप्रमाणेच त्यालाही आश्चर्य वाटलं की, हे इतकं जुनं प्रकरण कुठून समोर आलं?"
त्यानं गुन्ह्याची कबुली दिली का? यावर एसएसपी एस. आनंद यांनी "होय" असं उत्तर दिलं.
पहिल्या आरोपीच्या अटकेनंतर मुलगा आईला म्हणाला, "मला खूप आनंद झाला आहे. तो दुसरा आरोपी (नकी) पकडला जाईल तेव्हा मला दुप्पट आनंद होईल."
कदाचित आगामी काळात पीडिता आणि आरोपींची न्यायालयात आमनेसामने भेट होईल.
त्या सांगतात, "कोर्टात ते माझ्यासमोर आले, तर मी त्या दोघांच्याही दोन गालफाडात लगावेन. त्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. यासाठी त्यांना जी शिक्षा मिळेल ती कमीच असेल. तरीही त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे."
हे प्रकरण मीडियात कसं आलं?
बरेली येथील इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाचे वार्ताहर कंवरदीप सिंह सांगतात की, 2021 मध्ये पीडितेच्या अर्जावरून पोलिसांनी एफआयआर नोंदवला तेव्हा त्यांना या प्रकरणाची माहिती मिळाली.
एक वर्षांहून अधिक काळ या प्रकरणावर रिपोर्टिंग करणारे कंवरदीप सांगतात "मी जेव्हा एफआयआर वाचला तेव्हा मला ही तक्रार खरी वाटली. दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक तक्रारी दिसतात. त्यामुळे ही तक्रार वाचून मला मनातून वाटलं की ही खरी केस आहे. त्यामुळे मग मी एसएसपी आणि स्थानिक एसएचओला हे प्रकरण गांभीर्याला घेण्याची विनंती केली."
कंवरदीप पुढे सांगतात, "त्यानंतर मी बलात्कार पीडिता आणि तिच्या मुलाशी बोललो आणि मीडियामध्ये जमेल तितकं हे प्रकरण कव्हर केलं. अशा प्रकरणांमध्ये एफआयआरही नोंदवला जाईल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. पण इथं तर पीडितेला न्याय मिळत आहे."
कंवरदीप सांगतात की, "पीडितेला न्याय मिळवून देण्यात तिच्या मुलाची महत्त्वाची भूमिका होती, असं मी म्हणेन. बाकी आम्ही आमचं रिपोर्टिंग करत होतो. यापेक्षा आम्ही आणखी काय करू शकलो असतो?"
कुटुंब कसं जगतंय?
आता आरोपीला अटक होत असताना आणि न्याय मिळत असताना पीडिता म्हणते, "मी काम करत आहे. माझा मुलगाही काम करतोय. धाकटा आता शिकत आहे. मला त्याला आयएएस बनवायचे आहे. मोठा मुलगा शिकू शकला नाही. कारण लहानपणी शाळेत गेला तर त्याला तिथं चिडवलं जायचं. त्याची ओळख विचारली जायची.
"त्यामुळे त्याला काही शिकता आले नाही. कुटुंबाचं विचाराल तर मी माझ्या कुटुंबात आनंदी आहे. दोन्ही मुलांसह आनंदी आहे. आम्ही काम करत करतो आणि त्यातच घरखर्च निघतो."
आपल्या मुलाकडून मिळालेल्या पाठिंब्याचा त्या पुनरुच्चार करतात. "माझ्या मोठ्या मुलाने मला खूप प्रोत्साहन दिलं. त्यानं मला खूप साथ दिली आणि सांगितलं की, आई तू लढ, आम्ही तुझ्यासोबत आहोत."
असं असलं तरी हे कुटुंब या घटनेतून आणि त्यामुळे झालेल्या छळातून कधी सावरेल का?
या प्रश्नावर त्या उत्तर देताना म्हणतात, "घटना तर खूप जुनी आहे, पण त्यांनी दिलेल्या जखमा कायम राहतील. आजही आमचं आयुष्य ठप्प झालंय आणि तो क्षण पुन्हा पुन्हा आठवतो. तेव्हा विचार येतो की, असेही लांडगे आहेत जे आपल्या स्वार्थासाठी दुसर्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करतात. प्रत्येकाचं स्वतःचं आयुष्य आहे, देवानं प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आहे. यातून लोकांना धडा मिळावा यासाठीच मी पुन्हा समोर आले आहे."
त्या पुढे सांगतात, "28 वर्षांपूर्वी जेव्हा माझ्यासोबत हे सर्व घडलं तेव्हा मीडिया, मोबाईल काहीच नव्हतं. तुम्हाला स्वतः पोलिस स्टेशनला जावं लागत होतं. आता तुम्ही पोलिसांना घरी बसून फोन करू शकता."
त्या पुढे म्हणतात, "तुम्ही लैंगिक छळाविरोधात लढा. त्याविरोधात एफआयआर दाखल करा. जेणेकरून दुसऱ्याच्या आई-बहिणींवर बळजबरी करण्याची कुणाची हिंमत होणार नाही. लोक गप्प बसतात. मीही गप्प बसले होते. कदाचित हेच माझ्या नशिबात लिहिले आहे, असंही मला वाटलं होतं. पण तसं काही नाही.
"जर कुणी तुमच्यासोबत जाणूनबुजून असं केलं असेल तर ते नशिबात लिहिलेलं नसतं. पोलिसांकडे जा. जेणेकरून तो भविष्यात दुसऱ्या महिलेसोबत असं करण्यास धजावणार नाही."
"पोलिस प्रशासनाचं पूर्ण सहकार्य मला मिळालं. एक पकडला गेला आहे, दुसरा आरोपीही नक्कीच पकडला जाईल," असा विश्वास त्या व्यक्त करतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)