You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लखीमपूर खिरी: 'मला मेसेज आला तुझ्या बहिणींना मारून लटकवण्यात आलंय'
- Author, विनीत खरे
- Role, बीबीसी प्रतिनिधी, निघासनहून
(उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीमध्ये दोन दलित मुलींची बलात्कार करून हत्या झाल्याचा संशय आहे. 14 सप्टेंबर रोजी त्यांचे मृतदेह सापडले आणि 15 सप्टेंबरला या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. बीबीसीने त्या गावाला भेट देऊन तिथले वातावरण कसे आहे हे पाहिले.)
लखीमपूर जिल्ह्यात ज्या गावात ऊसाच्या शेतात दोन मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेले दिसले. आता त्यांचं कुटुंबीय, प्रसारमाध्यमांचे लोक, पोलीस आणि प्रशासनाच्या लोकांपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे.
जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा तिथे मुसळधार पाऊस सुरू होता. इतका की तुम्ही बाहेर निघू शकत नाहीत आणि घरात लोकांची संख्या वाढत होती.
अशाच एका घरात मुलींची आई हुंदके देत होती.
खाटेवर ती पडून होती आणि रडायला लागली, "तुम्हाला माझ्या हातून हिरावून घेतलं. आता आम्हाला स्वयंपाक कोण करून देणार? आम्हाला चहा दे. आतापर्यंत चहा दिला नाहीस, आमची गुडिया कुठे गेली रे? ती आमची सेवा करत होती. आता आमची सेवा कोण करेल? सेवा करणारी आमची मुलगी कुठे आहे, आमच्या मुली आमच्यापासून हिरावून घेतल्या. हे काय झालं?"
रडता रडता ती स्वत:ला मारायला लागली आणि मग बेशुद्ध झाली. बाजूला बसलेल्या एका बाईने तिला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला सांगितलं की जेव्हापासून त्यांच्या मुली मरण पावल्याचं ऐकलं आहे त्यांनी काहीही खाल्लेलं नाही. त्या फक्त रडताहेत. या घटनेचा या परिसरातील लोकांना प्रचंड धक्का बसला आहे.
पोलिसांनी या प्रकरणात सहा लोकांना अटक केली आहे. अटक केलेल्या लोकांमध्ये पाच दलित आणि पाच मुसलमान व्यक्तींचा समावेश आहे. स्थानिक लोकांच्या मते आतापर्यंत तरी कोणताही धार्मिक मुद्दा उपस्थित झालेला नाही. या घटनेमुळे सध्या इथे भीतीचं वातावरण आहे.
आईची ढासळलेली परिस्थिती तिचा मुलगा पाहत होता. तो उठला आणि पाणी घ्यायला गेल आणि पुन्हा बाजूला येऊन बसला.
थोड्यावेळाने तिथे पोहोचलेले पोलीस अधिकारी एसएन तिवारी यांनी बीबीसीला सांगितलं की कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून साडेआठ लाख रुपये बँकेत जमा करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण 50 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय कुटुंबीयांना नोकरी देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
प्रकरण कसं उजेडात आलं?
मृत बहिणींच्या भावाचं वय 20 वर्षं आहे. तो दिल्लीत पेपर नॅपकिन तयार करणाऱ्या एका कंपनीत काम करतो. मृतदेह सापडल्यावर त्याला गावातून एका व्यक्तीचा फोन आला.
"तुझ्या बहिणींना मारून लटकवण्यात आलं आहे," असा मेसेज होता.
तो क्षण आठवून तो भाऊ म्हणाला, "आम्ही सगळे रडायला लागलो आणि घरी निघालो. अनेक तासाचा प्रवास करून आम्ही गावाला पोहोचलो."
बहिणीची आठवण काढताना तो म्हणतो, "छोटी बहीण अभ्यासात चांगली होती. तिला अजून शिकायचं होतं. ती शिकेल तर तिला नोकरी लागेल असा विचार आम्ही केला. मोठ्या बहिणीला शिवणकामाची आवड होती. दोघी बहिणी अतिशय लाजाळू होत्या त्यामुळे त्या फोनवरही जास्त बोलायच्या नाहीत. फोन केल्यावर त्या फोन आईला द्यायच्या आणि म्हणायच्या की भावाला विचार की तो कसा आहे.?"
दोघी बहिणीपैकी छोटी बहीण शिक्षण घेत होती. मोठीने तब्येतीच्या कारणामुळे शिक्षण सोडलं होतं. काही काळापूर्वी त्यांच्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं.
ते म्हणाले, "कधी त्यांचा रक्तदाब एकदम कमी व्हायचा. कधी ती एकदम बेशुद्ध व्हायची. एक दीड वर्षांपासून तिच्यावर उपचार चालू आहेत. त्याचा महिन्याचा खर्च चार पाच हजार आहे. कधी कधी ती ठीक होते तर औषधं आणायची गरज पडायची नाही."
आई आणि बहिणींमध्ये असलेल्या नातेसंबंधावर ते म्हणाले, "आई दोन्ही बहिणींना तिच्याजवळ ठेवायची. त्यासुद्धा आईची देखभाल करायच्या तिला घराबाहेर जाऊ देत नसत. आईसुद्धा फारशी घराबाहेर जायची नाही. आता तिचं कसं होईल देव जाणे. आमच्याबरोबर अन्याय झाला आहे. त्यांना फाशी द्यायला हवी."
ते आम्हाला एका खोलीत घेऊन गेले. तिथे पावसामुळे अनेक बकऱ्यांना बांधून ठेवलं होतं. तिथे आणखी काही सामान होतं.
छोटी बहीण कुठे शिकत होती असं विचारताच, भावाने बहिणीचं लाल रंगाचं दप्तर आणून मला दाखवलं. "माझ्या बहिणी खूप साध्या होत्या हो." भाऊ सांगत होता.
एकूणच ते कुटुंब बहिणींवर खूपच जास्त अवलंबून होतं असं चित्र आम्हाला दिसलं. कुटुंबातल्या सगळ्यांत मोठ्या बहिणीचं लग्न सात वर्षांपूर्वी झालं आहे.
ती बहीण सांगते, "आमच्या लग्नात त्या दोघीही लहान होत्या. त्यावेळचे फोटो आहेत आमच्याकडे. दोघींशी माझी खूप गट्टी होती. मी त्यांना माझ्या मांडीवर बसून खेळवलं आहे."
"जेव्हा मी सासरहून यायची तेव्हा त्या मला खायला प्यायला देत असत. माझ्या मुलांची सेवा करायची. दोघी अतिशय साध्या होत्या. फारशा बाहेरही कुठे जायच्या नाहीत. आता आईचं पुढे कठीण होणार आहे. तिचं औषधपाणी कोण करणार आहे? ती कामं करू शकत नाही. हळूहळू चालते."
आम्ही हे सगळं बोलत असताना इतर वाहिन्यांचे कॅमेरे तिथे आले. त्यांच्या मनाप्रमाणे तिथे कॅमेरे लावत होते. आपल्याच घरात नक्की काय चालू आहे हे भावा बहिणींना अजिबात उमगत नव्हतं.
मोठी बहीण तिच्या बाळाला खेळवत मला म्हणाली, "खूप आठवण काढतो तो मावशींची त्यांचाही तो लाडका होता. आम्ही त्यांचे कपडे धुवायचो नाही, ना त्यांना अंघोळ घालायचो. सगळे कामं या दोघीच करायच्या."
बोलता बोलता ती रडायला लागली आणि म्हणाली, "मला इतकं दु:ख होतंय की माझे अश्रूसुद्धा निघत नाहीयेत."
घरच्यांना कसं कळलं?
घटना घडल्यानंतर एक दिवसानंतर लखीमपूर खिरी चे पोलीस अधीक्षक संजीव सुमन यांनी पत्रकार परिषदेत सांगिकलं की आरोपी या दोघी बहिणींना जबरदस्तीने घेऊन गेले नव्हते.
पोलिसांच्या मते मुख्य आरोपीने इतर तीन मुलांशी या मुलींशी मैत्री करवून दिली होती.
तिथे कुटुंबीयांच्या मते त्यांच्या मुलींना उचलून घेऊन गेले आहेत.
त्यांचे वडील बोलताना म्हणाले की मुलं मोटरसायकलवर आले होते आणि मुलींना उचलून घेऊन गेले. मोटरसायकलवर तीन लोक होते.
त्यांनी सांगितलं की घटनेच्या वेळी ते शेतावर होते आणि घरात त्यांची बायको होती.
ते म्हणाले, "त्यावेळी ती अंघोळ करत होती. आणि कपडे बदलत होती. मुली बाहेर होत्या. तेव्हाच त्यांना उचलून घेऊन गेले होते. ती मागे ओरडत गेली तेव्हा मुलांनी तिला लाथ मारली."
वडिलांच्या मते ते जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना या घटनेबद्दल माहिती मिळाली. त्यांनी मुलींना शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्या सापडल्या नाहीत. त्यांनी ही गोष्ट गावकऱ्यांना सांगितली. खूप वेळ शोधाशोध केल्यानंतर कोणीतरी उसाच्या शेतात टाकल्याचं सांगितलं. संध्याकाळी पाच वाजता मुलींचा मृतदेह मिळाला.
ते पाहताच त्यांच्या तोंडून कसेतरी शब्द बाहेर पडले. "बलात्कार झाला आणि त्यांना ऊसाच्या शेतात त्यांना मारून लटकवण्यात आलं आहे."
वडील पुढे म्हणाले, "पोलीस जेव्हा मृतदेह घेऊन गेलं तेव्हा त्यांनी कोणालाही बरोबर नेलं नाही म्हणून बॉडी इथे मागवण्यासाठी आम्ही चक्का जाम करण्याचा निर्णय घेतला."
पोलिसांनी नातेवाईकांना विश्वासात न घेता मृतदेह नेल्याचा आरोप केला.
यावर बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी एस.एन.तिवारी म्हणाले, "त्यावेळी मी तिथे नव्हतो. मी बाहेर होतो. मी नंतर तिथे आलो. असं काही झालं असेल तर आम्ही नक्कीच त्याची चौकशी करू."
मुलीच्या भावाच्या मते ते एका आरोपीला ओळखत होते. "त्याचं शेत आमच्या घराच्या समोर आहे. तो तिथे येत जात असायचा. इतरांना आम्ही ओळखत नाही."
आरोपींनी गुन्हा कबूल केल्याचं सांगितलं आहे मात्र 24 तासाच्या आरोपींची ओळख कशी पटली आणि त्यांना कशी अटक करण्यात आली याबद्दल पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.
आरोपीचं कुटुंब
दलित बहुल पीडित कुटुंबाच्या गावाच्या बाजुलाच मुस्लिम बहुल गाव आहे. तिथे काही आरोपी राहतात.
पावसात आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा अन्य दोन आरोपींची आई तिथे बसली होती.
त्यांच्या मुलांचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्याचं सांगितलं. मात्र पोलीस अधिकारी तिवारी यांच्या मते कोणीही अल्पवयीन नाही.
तिथे उपस्थित असलेल्यांपैकी एकाने सांगितलं, "आम्हाला पोलिसांनी 10-11 वाजता उठवलं. जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा पोलिसांनी विचारलं की तुमचा मुलगा कुठे आहे. मी सांगितलं की तो दिल्लीला गेला आहे. ते म्हणाले की त्याला बोलवा. मी त्याला ताबडतोब फोन केला. तो पीलीभित पर्यंत पोहोचला होता. त्याला मी सांगितलं की तिथेच उतर. तो ढाब्यावर उतरला. पोलिसांनी त्याला त्यांच्या गाडीत बसवलं. आम्हाला दुसऱ्या गाडीत ठेवलं होतं. आम्हाला मुलाशी बोलू दिलं नाही. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी पूर्ण दिवस घरी होता. माझी आई आजारी होती. तेव्हा आम्ही इस्पितळात रहायचो."
पोलिसांच्या आरोपांवर ते म्हणाले की आमचा मुलगा हत्या करू शकत नाही. सीबीआयने चौकशी केली तर सगळं समजेल.
लखीमपूर खिरी कायमच चर्चेत
स्थानिक पत्रकार प्रशांत पांडे यांच्या मते लखीमपूर महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या बाबतीत कायमच चर्चेत असतं. मग ते अल्पवयीन मुलींवर बलात्कार असो किंवा महिलांवर अत्याचार असो.
दोन दलित मुलींच्या हत्येमुळे आजूबाजूच्या परिसरातील मुलींच्या शिक्षणावर याचा परिणाम होईल. ते सांगतात, "गावातल्या लोकांची एक मानसिकता असते. चे मुलींच्या शिक्षणाला फारसं उत्तेजन देत नाही. अनेकांना असं वाटतं की मुलींना जास्त शिकवायला नको नाहीतर त्या बिघडतील. काही आर्थिक कारणंही असतात."
ते सांगतात, "मी तिथल्या दलित बहुल भागातल्या एका मुलीशी बोललो. तिने सांगितलं की तिथल्या दलित समाजात आतापर्यंत फक्त तीन मुलींनी बीए केलं आहे किंवा करताहेत. बहुतांश मुली पाचवी किंवा आठवीनंतर शिक्षण सोडून देतात आणि चूल मूल या चक्रात अडकतात."
पीडित मुलींचे भाऊ आणि आरोपी मुलं गावाच्या बाहेर काम करतात.
गरिबी आणि नोकरीसाठी बाहेरच्या गावात पलायन या विषयावर बोलताना ते म्हणतात, "माझ्या बालपणी लखीमपूर असा जिल्हा होता जिथे पूर्वांचल आणि बिहारमधून मजूर येत असत आणि त्यांना काम मिळत होतं. गेल्या 10-15 वर्षांत असा बदल झाला आहे की आता इथे मजूर गुजरात, हरियाणा, पंजाब, आंध्र प्रदेशातले आहेत त्यांना बाहेर जावं लागतं."
"काही साखर कारखान्यात उशिराने पैसे मिळतात. त्यामुळे शेतकरी त्यांच्या शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना पैसा देऊ शकत नाही. त्यामुळे नोकरीसाठी त्यांना बाहेर जावं लागतं." ते सांगतात.
गरिबी, आर्थिक स्थिती बिकट असल्याने महिलांविरुद्ध हिंसाचार वाढीस लागला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)