ते रमेश किणी हत्या प्रकरण, ज्यात राज ठाकरेंचं नाव आलं होतं...

    • Author, नामदेव काटकर
    • Role, बीबीसी मराठी

23 जुलै 1996 रोजी पोलिसांना पुण्यातील अलका टॉकीजमध्ये एक मृतदेह सापडला. हा मृतदेह होता मुंबईतील माटुंग्याचे रहिवासी असलेल्या रमेश किणी यांचा.

दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 24 जुलैला 'सामना' वृत्तपत्रात पहिल्या पानावर एक छोटी बातमी प्रसिद्ध झाली. 'दादरमधील एका छोट्या व्यापाऱ्याचा पुण्यात खून' अशी ती बातमी होती.

फार लक्ष वेधून न घेणाऱ्या या 23 जुलैच्या घटनेनं आणि 24 जुलैच्या बातमीनं त्याच दिवशी म्हणजे 24 जुलैला झालेल्या एका पत्रकार परिषदेतून खळबळ उडवली. ही पत्रकार परिषद होती तत्कालीन विरोधी पक्षनेते छगन भुजबळ यांची.

24 जुलै 1996 रोजी भुजबळांनी पत्रकार परिषद घेतली, तेव्हा भुजबळांसोबत या पत्रकार परिषदेला पुण्यात मृतदेह सापडलेल्या रमेश किणींच्या पत्नी शीला किणी होत्या.

माझ्या पतीचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा आरोप करत शीला किणींनी संशयाची सुई ठाकरे कुटुंबातील व्यक्तीकडे वळवली. भर पत्रकार परिषदेत त्यांनी राज ठाकरेंचं नाव घेतलं आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवलं.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्त्वात शिवसेना-भाजप युतीचं पहिल्यांदाच सरकार येऊन वर्ष लोटलं होतं. तेवढ्यातच रमेश किणी हत्या प्रकरण घडलं आणि सेना-भाजप युती सरकारसमोर पहिलं सर्वात मोठं संकट उभं राहिलं. कारण या हत्या प्रकरणाशी बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष असलेल्या राज ठाकरेंचं नाव जोडलं गेलं होतं.

हे रमेश किणी हत्या प्रकरण महाराष्ट्रातील सर्वाधिक गाजलेल्या प्रकरणांपैकी एक ठरलं. याबद्दल माहिती घेताना रमेश किणींच्या हत्येची पार्श्वभूमी आणि घटनेचा थरार, यापासूनच सुरुवात करावी लागेल आणि तशीच करुया.

रमेश किणी कोण होते?

मुंबईतील माटुंग्यातील सर भालचंद्र रोडवर तीन मजल्याची 'लक्ष्मी निवास' नावाची इमारत होती. ही इमारत पागडी घरांच्या प्रकारातील होती. यात मालक वेगळा असतो, मात्र त्या घरात जागेत भाडेकरू म्हणून राहणाऱ्याचाही घरावर अधिकार असतो.

या 'लक्ष्मी निवास' इमारतीच्या तळमजल्यावर 40 वर्षीय रमेश किणी हे पत्नी (शीला किणी) आणि मुलगा (निखील किणी) यांच्यासोबत राहत होते.

रमेश किणी हे घर चालवण्यासाठी छोटी-मोठी कामं करत. फॅब्रिकेशन वर्कशॉपमध्ये काम करत, फ्रीलान्स फोटोग्राफीही करत.

'लक्ष्मी निवास' इमारतीचे मालक लक्ष्मीकांत शाह आणि त्यांचे पुत्र सुमन शाह होते.

लक्ष्मीकांत शाह हे या इमारतीचा पुनर्विकास करू इच्छित होते. इमारत पागडी प्रकारातील असल्यानं पुनर्विकासासाठी त्यांना इमारतीतल्या भाडेकरूंच्या परवानग्या हव्या होत्या. रमेश किणी वगळता इतरांनी तशा परवानग्या दिल्या होत्या.

'लक्ष्मी निवास'च्या पुनर्विकासाला रमेश किणींचा मात्र विरोध होता.

पुण्यातील टॉकीजमध्ये मृतदेह आणि 'ते' दोन पत्रं

रमेश किणींचा मृतदेह 23 जुलै 1996 रोजी पुण्यातील अलका टॉकीजमध्ये सापडला. पुण्यातील लकडी पुलाशेजारी विद्यार्थी सेनेच्या ऑफिससमोर अलका टॉकीज आहे.

अलका टॉकीजमध्ये जॉन ट्रॅव्होल्टाच्या 'ब्रोकन अॅरो' या इंग्रजी सिनेमाचा नाईट शो सुरू असताना रमेश किणींचा मृतदेह सापडला.

या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलं आणि तपास सुरू केला. पुण्यातील ससून रुग्णालयात झालेल्या शवविच्छेदनात 'इस्चेमिक हार्ट डिसिज'नं रमेश किणींचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं.

रमेश किणींच्या मृतदेहासोबत पोलिसांना एक चिठ्ठी सापडली होती. या चिठ्ठीत लिहिलं होतं की, माझ्या मृत्यूची कारणं त्या दोन पत्रात आहेत, जी पत्रं वकिलाकडे दिली आहेत.

रमेश किणींनी त्या चिठ्ठीत ज्या वकिलाकडे पत्रं दिल्याचा उल्लेख केला, ते वकील म्हणजे अॅड. प्रकाश लाड. हे प्रकाश लाड म्हणजे सांगलीचे स्वातंत्र्यसैनिक बापूसाहेब लाड यांचे पुत्र.

23 जुलै रोजी सकाळी 'सामना' वृत्तपत्राच्या कार्यालयात जाण्यापूर्वी रमेश किणी अॅड. प्रकाश लाड यांना भेटले होते. तिथंच त्यांनी हे पत्र त्यांच्याकडे सुपूर्द केले होते.

अॅड. लाड यांच्याकडे सोपवलेल्या एका पत्रात रमेश किणींनी नमूद केलं होतं की, लक्ष्मीकांत शाह आणि सुमन शाह हे मानसिक त्रास देत आहेत.

तसंच, ज्येष्ठ विचारवंत पुष्पा भावे यांनी या प्रकरणाचा न्यायालयात पाठपुरावा केला. त्यांच्या माहितीनुसार, रमेश तसा साधाच होता, पण त्यानं एक खबरदारी घेतली. 'सामना' कार्यालयात राज ठाकरेंना भेटायला जाण्यापूर्वी वकिलाकडे जाऊन प्रतिज्ञापत्र तयार केलं की, 'मी राज ठाकरेंना भेटायला जात आहे.'

या प्रतिज्ञापत्राची पुढे प्रकरण कोर्टात उभं राहण्यास मोठी मदत झाल्याचं पुष्पा भावे सांगतात.

राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी 'ती' पत्रकार परिषद

इथवर एखाद्या सामान्य घटनेप्रमाणेच रमेश किणींच्या मृत्यूकडे पाहिलं जात होतं. मात्र, 24 जुलै 1996 रोजी म्हणजे मृतदेह सापडल्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईत एक पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेनं महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

ही पत्रकार परिषद घेतली होती महाराष्ट्र विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते छगन भुजबळ यांनी.

एव्हाना दबक्या आवाजात रमेश किणींच्या मृत्यू प्रकरणाचे राजकीय धागेदोरे सर्वसामान्य लोकांच्या चर्चेचा भाग झाले होते. त्यामुळे शीला किणींच्या जीवाला धोका मानला जात होता.

ज्येष्ठ पत्रकार नीता कोल्हटकर सांगतात, छगन भुजबळांनी शीला किणींना त्यांच्या घरातून 'रेस्क्यू' केलं आणि विरोधी पक्षनेत्यांच्या बंगल्यावर नेऊन तिथं पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शीला किणींनी केलेल्या आरोपांनी खळबळ उडाली.

हेच आरोप पुढे शीला किणींनी पोलीस जबाबातही नमूद केले.

या पत्रकार परिषदेत शीला किणींनी सांगितलं की, राज ठाकरेंच्या माणसांकडून 'सामना'च्या कार्यालयात माझे पती रमेश किणींना अनेकदा बोलावलं जायचं आणि माटुंग्यातील फ्लॅट रिकामा करण्यास सांगितलं जायचं.

लक्ष्मीकांत शाह आणि सुमन शाह यांच्याकडून राज ठाकरेंच्या नावानं धमक्या दिल्या जायच्या, त्यांना मानसिक त्रास दिला जायचा, असे गंभीर आरोप शीला किणींनी भर पत्रकार परिषदेत केले. पुढे त्यांनी ही माहिती पोलीस जबाबात आणि नंतर न्यायालयातही सांगितली.

हा तपशील 20 सप्टेंबर 1996 रोजीच्या 'शीला रमेश किणी आणि इतर विरुद्ध भारत सरकार आणि इतर'च्या सुनावणीत मुंबई हायकोर्टानं दिलेल्या निकालात नमूद केलंय.

शीला किणींनी कोर्टाचे दार कधी ठोठावले?

छगन भुजबळांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेनंतर राजकीय धुरळा उडण्यासही सुरुवात झाली.

काँग्रेसनं आरोप केला की, शिवसेना आणि राज ठाकरेंचा यात सहभाग असून, या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी.

राजकीय पातळीवर शिवसेना-भाजप युतीवर टीका होत असताना, या प्रकरणात न्यायालयीन लढाईसाठी शीला किणींना साथ देण्यासाठी मात्र पुढे कुणी येत नव्हतं. अशावेळी एक व्यक्ती पुढे आली आणि प्रकरण सीबीआयकडे सोपवलं जाईपर्यंत न्यायालयात शीला किणींच्या खांद्याला खांदा लावून ती व्यक्ती लढली. ती व्यक्ती म्हणजे, ज्येष्ठ विचारवंत पुष्पा भावे.

'लढे आणि तिढे : चिकित्सक गप्पा... पुष्पाबाईंशी' या पुस्तकात मेधा कुलकर्णींनी मुलाखतीद्वारे पुष्पा भावेंचा जीवनप्रवास उलगडलाय. या पुस्तकात रमेश किणी हत्येवर स्वतंत्र प्रकरण आहे. त्यात शीला किणींच्या त्या संपर्कात कशा आल्या आणि पुढे न्यायालयीन लढाई कशी लढली, याबाबत विस्तृत सांगितलं आहे.

शीला किणींना न्यायालयीन लढाई लढण्यासाठी पुष्पा भावेंनी दिलेली साथ म्हणजे त्यांच्याच भाषेत सांगायचं तर 'शेजारधर्म' होता.

पुष्पा भावे सांगतात, 'रमेश किणींच्या मृत्यूची बातमी वृत्तपत्रांतून वाचनात आल्यानंतर समाजवादी नेत्या मृणाल गोरेंनी फोन केला आणि म्हटलं की, शीला किणींना ओळखतेस का, असा प्रश्न विचारला. शीलाला जाऊन भेटावं म्हणतेय. तू येशील का सोबत?'

शीला किणी या सर्व प्रकरणामुळे मानसिक त्रास झाल्यानं आजारी पडल्या होत्या. त्याच दरम्यान मृणाल गोरे आणि पुष्पा भावे तिथं गेल्या. पुष्पा भावे या लक्ष्मी निवास इमारतीच्या शेजारील इमारतीतच राहायच्या. किणींच्या घरी पोहोचल्यानंतर शीला किणी अंथरुणातून ताडकन उठल्या आणि म्हणाल्या, "ताई (पुष्पा भावे), मी तीन दिवस तुमचीच वाट पाहत होते."

पुष्पा भावेंना वाटलं की, मृणालताईंबद्दल शीला किणी बोलत असाव्यात. कारण त्या त्यांच्या मागेच उभ्या होत्या. मात्र, शीला किणी पुष्पा भावेंनाच उद्देशून बोलत होत्या. पुष्पाबाई मदत करतील, अशी शीला किणींना आशा होती.

या दिवसापासून पुष्पा भावे लढ्याच्या शेवटपर्यंत शीला किणींच्या सोबत राहिल्या.

न्यायालयात केस कशी उभी राहिली?

शीला किणींनी थेट राज ठाकरेंचं नाव घेतल्यानं आणि छगन भुजबळांसह काँग्रेसनं शिवसेना-भाजप युतीवर शरसंधान साधण्यास सुरुवात केल्यानं या प्रकरणाची धग आणखी वाढली होती. अनेकांचं या प्रकरणाकडे लक्ष लागलं होतं खरं, पण न्यायालयात केस उभी करायची म्हणजे अनेक गोष्टींची जुळवाजुळव महत्त्वाची होती. मग हे सर्व कसं केलं, याबाबत पुष्पा भावेंनी सांगितलंय.

पुष्पा भावे सांगतात की, "जुलै महिन्यात मुंबईत नेहमीच पाऊस असतो. त्यात 23 जुलैला अतिवृष्टीच होती. परिणामी एशियाड बस पुण्याला गेल्या नव्हत्या आणि मुंबई-पुणे रेल्वेगाड्याही बद होत्या. याचा अर्थ रमेशला पुण्याला कुणीतरी घेऊन गेलं होतं.

"त्यात रमेशचा मृतदेह पुण्यात सापडल्यानंतर तिथं ससून रुग्णालयात त्याचं पोस्टमार्टेम करण्यात आलं होतं. मात्र, मुंबईत आल्यावर दुसऱ्यांदा पोस्टमार्टेमची मागणी शीला किणींनी डॉ. दीक्षितांच्या मदतीने घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात जाऊन केली होती. या दोन्ही पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये फरक आढळला होता.

"शिवाय, सामना कार्यालयात राज ठाकरेंना भेटायला जाण्याआधी वकिलाकडे जाऊन रमेश किणींनी प्रतिज्ञापत्र केलं होता की, ते राज ठाकरेंना भेटायला जात आहेत."

पुष्पा भावे सांगतात, या सर्व बाबी न्यायालयीन लढाईसाठी जमेच्या ठरल्या.

लक्ष्मी निवासच्या जवळच राहणारे वकील जनार्दन यांचा एक दिवस पुष्पाबाईंना फोन आला की, ते हे प्रकरण लढण्यास तयार आहेत. मात्र, त्यांनी सोबत हेही विचारलं की, तुम्ही सिग्नेटरी होणार का? मग पुष्पा भावेंनी सांगितलं की, शीला तयार असेल तर मी सिग्नेटरी होईन.

आणि अशा पद्धतीने हे प्रकरण न्यायालयाच्या दारात नेण्यात आलं. सेशन कोर्टातून मुंबई हायकोर्टात, हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात असा या प्रकरणाचा प्रवास झाला.

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेतच दिली क्लीन चीट

रमेश किणी प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे म्हणजे सीआयडीकडे देण्यात आला.

त्याचदरम्यान महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींनी 5 ऑगस्ट 1996 रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत या प्रकरणावर भाष्य केलं आणि या भाष्यात राज ठाकरेंना क्लीन चीट दिली.

त्यानंतर विरोधकांकडून टीका करण्यात आली की, राज्याच्या अखत्यारित असणारी सीआयडी या प्रकरणाचा दबावाविना तपास करूच शकत नाही, म्हणून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावं.

अखेर काय झालं?

पुढे मुंबई हायकोर्टानं 21 सप्टेंबर 1996 रोजी हा तपास सीबीआयकडे सोपवला.

पुढे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. पुष्पा भावे म्हणतात की, "हे प्रकरण सुप्रीम कोर्टात ट्रान्सफर झाल्यानं न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, पुढे जेव्हा प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय झाला, त्यावेळी आशा मावळली. कारण सीबीआयकडे प्रकरण गेल्यानंतर फिर्यादी व्यक्तीला अपिलात जाता येत नाही. अपील करायचं असल्यास फक्त राज्य सरकारला करता येतं आणि राज्यात शिवसेना-भाजपचं सरकार होतं, जे हे करणार नव्हते."

पुढे सीबीआयनं तपासाअंती 29 ऑगस्ट 1997 रोजी आरोपपत्र दाखल केलं आणि त्यात राज ठाकरेंचं नाव नव्हतं.

या आरोपपत्रात तिघांना आरोपी करण्यात आलं, ते म्हणजे, लक्ष्मीकांत शाह, सुमन शाह आणि आशुतोष राणे. इंडियन पीनल कोडच्या आत्महत्येस प्रवृत्त करणं (कलम 306) आणि खंडणी (कलम 385) अशी कलमं त्यांच्यावर लावण्यात आली.

सीबीआयनं दाखल केलेल्या आरोपपत्रात राज ठाकरेंचं नाव नव्हतं. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार प्रीतिश नंदी यांनी 'रेडिफ'साठी मुलाखत घेतली. यात त्यांनी रमेश किणी प्रकरणावर प्रश्न विचारले.

प्रीतिश नंदी - अनेक महिन्यांच्या तपासानंतर सीबीआयने आरोपमुक्त केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय?

राज ठाकरे - मला माहीत होतं, हे असंच होणार आहे. मला काहीही आश्चर्य वाटलं नाहीय. हे सर्व सुरू झालं तेव्हापासून, केवळ सीबीआय नव्हे तर अगदी सीआयडीपासून, मला माहित होतं की हे सर्व आरोप चुकीचे आहेत. मी या व्यक्तीला (रमेश किणी) ओळखत सुद्धा नाही. मी आयुष्यात त्याला कधी भेटलो नाही. मग त्याच्या मृत्यूसाठी मी कसा सहभागी असेन? तरी मी निर्दोष सिद्ध करण्यास तयार होतो. त्यामुळेच मी म्हटलं होतं की, तुम्हाला जिथं जायचंय तिथं जा, सीआयडीत जा किंवा सीबीआयमध्ये जा, कुठेही जा. मला कसलीही भीती नाहीय. किंबहुना, तुम्हाला आठवत असेल, मी स्वत: तपास यंत्रणाकडे जाऊन सर्व आरोपांना उत्तरं दिली होती. इतरांसारखं मी तपास यंत्रणांना घरी बोलावलं नव्हतं.

प्रीतिश नंदी - तुम्हाला काय वाटतं, यात राजकीय कारस्थान आहे?

राज ठाकरे - अर्थात, हो. हे सर्व प्रकरण सुरू झालं, तेव्हा वृत्तपत्रांनी आणि विरोधकांनी किती गोंधळ घातला? मोठमोठे मथळे देत वृत्तांकन का केलं गेलं? आता तपासाचे निष्कर्ष जाहीर झाल्यानं, ते कसे सादर करतायेत पाहा.

विरोधकांना मी उत्तरं देईन. पण वृत्तपत्रांकडून या वर्तनाची अपेक्षा नव्हती. आरोप झाले तेव्हा मोठ्या मथळ्यांसह वृत्तपत्रांनी छापलं, आता निर्दोष सुटल्यानंतर छोटीशी बातमी छापली जातेय. तेही आत कुठेतरी. एखाद्या सिनेमाच्या जाहिरातीप्रमाणे. हे बरोबर नाहीय.

प्रीतिश नंदी - कदाचित त्यांचा सीबीआय किंवा सीआयडीवर विश्वास नसेल, कदाचित त्यांना वाटत असेल की, तुम्ही या जाळ्यातून सुटण्यासाठी राजकीय दबाव आणला.

राज ठाकरे - केंद्र सरकार अशा लोकांच्या हातात आहे, जे महाराष्ट्रात आमच्या विरोधात आहे. केंद्र सरकार काँग्रेसप्रणित आहे. हीच काँग्रेस माझ्यावर आरोप करण्यात सर्वात पुढे आहे. हे सर्व असताना, यंत्रणांवर माझ्यामुळे दबाव येईल, असं तुम्ही म्हणताय! हत्येचा गुन्हा हा मूर्खपणा आहे हे कुणीही सांगू शकेल. आणि जर दबाव शक्य असतं, तर आरोप करणाऱ्यांनीच आणला असता.

प्रीतिशनंदी - पण तुम्हाला चांगल्या सहकाऱ्यांची गरज आहे, असं नाही का वाटत? कारण शेवटी, ज्यांच्यावर या प्रकरणात आरोप निश्चित करण्यात आलेत, ते तुमचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे तुमच्याकडे संशयाची सुई वळवली जातेय.

राज ठाकरे - मी राजकारणात आहे. आपल्या सभोवतालच्या प्रत्येकाला ओळखणं शक्य नाही. जे मला पाठिंबा देतात, माझ्यासाठी काम करतात किंवा फक्त माझ्या अवतीभवती असतात अशा सर्वांची जबाबदारी मी कशी घेऊ शकतो? तुम्ही इथे माझ्या घरी बसून माझी मुलाखत घेत आहात. पण या मुलाखतीनंतर तुम्ही बाहेर गेलात आणि काही चुकीचं केलं, तर त्यासाठी मला जबाबदार कसं धरायचं?

पुढे 9 ऑगस्ट 2002 रोजी सेशन्स कोर्टानं या प्रकरणातून लक्ष्मीकांत शाह, त्यांचा मुलगा सुमन शाह आणि आशुतोष राणे यांनाही आरोपमुक्त केलं.

16 मार्च 2011 रोजी शीला किणींचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालं. नंतर त्यांचा मुलगा निखील भारत सोडून अमेरिकेत स्थायिक झाला.

ज्या 'लक्ष्मी निवास' इमारतीवरून हे सर्व घडल्याचं शीला किणींचं म्हणणं होतं, ती जागा पुढे मातोश्री रिअॅलिटर्सनं विकसित केली.

संदर्भ :-

  • लढे आणि तिढे : चिकित्सक गप्पा पुष्पाबाईंशी (मुलाखतपर आत्मचरित्र) - मेधा कुलकर्णी
  • द कझन्स ठाकरे - धवल कुलकर्णी
  • बाळ ठाकरे अँड द राईझ ऑफ द शिवसेना - वैभव पुरंदरे
  • सम्राट : हाऊ द शिवसेना चेंज्ड मुंबई फॉरेव्हर - सुजाता आनंदन
  • रमेश किणी हत्या प्रकरणातील मुंबई हायकोर्टाचा निकाल (दिनांक - 20 सप्टेंबर 1996)
  • पत्रकार नीता कोल्हटकर यांचा शीला किणींवर लेख

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)