सेक्स लाईफ : ‘एका क्षणाला वाटलं की तो दाताने माझ्या शरीराचा लचकाच तोडेल'

    • Author, मायल्स बोन्नर
    • Role, बीबीसी डिस्क्लोजर

लिसा ही अशा अनेक तरुणींपैकी एक आहे जिने बीबीसीशी बोलताना सांगितलं की तिच्यावर बेडरूममध्ये हिंसाचार करण्यासाठी दबाव टाकण्यात आला आहे.

ती सांगते की, एका घरगुती पार्टीत ती ओळखीच्या एका मुलासोबत स्वेच्छेने एकत्र झाली. पण जेव्हा तो तिच्या शरीरावर वारंवार चावा घेऊ लागला तेव्हा तिला धक्का बसला.

"जेव्हा त्याने तोंड बाजूला केले तेव्हा त्याच्या दाताचे वण त्वचेवर स्पष्टपणे दिसत होते. मला वाटलं की तो माझ्या त्वचेचा लचकाच तोडेल," ती सांगते.

लिसा हे तिचे खरे नाव नाही. तिने सांगितले की शरीरावर चावा घ्यायचा की नाही, याबद्दल तिच्याशी कोणतेही संभाषण झाले नव्हते आणि त्यामुळे तिला शारीरिक धक्का बसला होता.

"मी रडत होती आणि त्याला थांबण्यास सांगितले. पण जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यापेक्षा खूप मोठी आणि बलवान असते तेव्हा तुम्ही खूप काही करू शकत नाही," असं ती पुढे सांगते.

ऑनलाईन संस्कृतीमुळे बेडरुममधील सवयी बदलत आहेत. ज्याला एकेकाळी रानटी मानले जात होते तेच आता वेगाने रूढ होत आहे.

बीबीसी डिस्क्लोजर आणि बीबीसी 5 लाईव्हने तथाकथित 'रफ सेक्स' कसे पूर्णत्वास नेले जात आहेत याचे मूल्यांकन करण्यासाठी यूकेमधल्या 18 ते 39 वयोगटातील 2,049 पुरुषांचे सर्वेक्षण केले.

सर्वेक्षणात भाग घेतलेल्या 71% पुरुषांनी सांगितले की, संमतीने सेक्स करताना त्यांनी त्यांच्या जोडीदाराला थप्पड लगावली, बांधून ठेवले, गुदमरवले किंवा तिच्या अंगावर थुंकले देखील आहेत.

ज्या पुरुषांनी असे कृत्य केले त्यांच्यापैकी एक तृतीयांश (33%) लोक म्हणाले की, त्यांनी त्यांच्या जोडीदाराला सेक्स करण्यापूर्वी किंवा त्यादरम्यान तिला हे करायला आवडेल की नाही हे तोंडी विचारलं नाही.

तथाकथित 'रफ सेक्स' मध्ये स्वारस्य का वाढत आहे? याकडे तरुण पुरुषांच्या सर्वेक्षणाने एका मोठ्या घटकाकडे लक्ष वेधले ते म्हणजे पोर्नोग्राफी.

अर्ध्याहून अधिक पुरुषांनी (57%) सांगितले होते की आपण जोडीदाराला थप्पड मारली, गुदमरवले, बांधून ठेवले आणि ते पोर्नोग्राफीमुळे असं करण्यासाठी प्रवृत्त झाले.

पाच पैकी एकाने (20%) सांगितले की याचा त्यांच्यावर मोठा परिणाम झाला आहे.

जॉर्ज (नाव बदललेलं) नावाच्या एका व्यक्तीने 'बीबीसी डिस्क्लोजर प्रोग्राम ए क्वेश्चन ऑफ कन्सेंट'ला सांगितले की, त्याने सेक्स करताना गुदमरवण्याचा आणि थप्पड मारण्याचा प्रयत्न केला होता.

"तुम्ही ते पॉर्नमध्ये पाहता आणि विचार करता, 'अरे, ते भारी दिसते' आणि मग तुम्ही तसा प्रयत्न करता," असं त्यानं सांगितलं.

पण, आपण पोर्नोग्राफी साइटवर विनामूल्य जे पाहतो ते प्रत्यक्षात करताना निराशाजनक असू शकते, असंही तो सांगतो.

"पॉर्नमध्ये जसं दाखवलं जातं तसा सेक्स प्रत्यक्षात कधीच होत नाही. पॉर्नमधील ते लोक अभिनेते आहेत. तुम्ही त्यांना पाहता आणि तुम्हाला ते आवडतात. पण जेव्हा तुम्ही वास्तविक जीवनात प्रयत्न करता तेव्हा तुमची खूप निराशा होते."

डरहॅम विद्यापीठातील डॉ. फिओना वेरा-ग्रे या जगातील सर्वांत लोकप्रिय विनामूल्य पोर्नोग्राफी संकेतस्थळांच्या पहिल्या पानांवरील क्लिप, शीर्षके आणि थंबनेलचे संशोधन करतात.

या वेबसाईटनं नमूद केलेल्या अटी आणि शर्थी बघितल्यास, पहिल्या पानावर जे व्हिडीओ अपलोड केले गेले आहेत, ते करता येऊ शकत नाहीत, असं त्या सांगतात.

डॉ. वेरा-ग्रे म्हणतात की, "बलात्कारासारख्या लैंगिक हिंसाचाराचा प्रचार, समर्थन किंवा गौरव करणारे व्हीडिओचे पुरावे देखील सापडले आहेत."

"मुलांसाठी ते हे खूपच चिंताजनक आहे. तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या 12 वर्षांच्या मुलाने पोर्नोग्राफी पाहिली नाही, तर याबद्दल मला मुळात शंका आहे," असंही त्या पुढे सांगतात.

बीबीसी डिस्क्लोजरने मुलाखतीसाठी सर्वांत लोकप्रिय विनामूल्य पोर्नोग्राफी साईटसोबत संपर्क साधला. पण, ते मुलाखतीसाठी तयार झाले नाही.

या पुरुषासोबतच्या भेटीनंतर कसं वाटलं, या प्रश्नावर 20 वर्षांच्या असलेल्या लिसाने सांगितले की, "मला फक्त धक्का बसला होता."

मला अपराधीपणाची भावना जाणवली, कारण मी त्याच्याबरोबर सेक्स केला होता, असं ती सांगते.

"मी आणखी काही करू शकले असते का? मी आणखी बोलू शकले असते का? मी यातून सुटका करू शकले असते का?" असे प्रश्न तिच्या मनात येतात.

"तो प्रकार थांबवण्यासाठी तिने पुरेसे प्रयत्न केले का?" असा सवाल आजही तिच्या मनात आहे.

अत्याचाराला बळी पडलेल्यांमध्ये अपराधीपणाची भावना खरोखरच सामान्य आहे, असं रेप क्रायसिस स्कॉटलंडमधील ब्रेना जेसी म्हणतात.

त्यांच्या मते, "मला वाटते की अशा अनेक स्त्रिया असतील ज्यांनी सेक्ससाठी संमती दिली, पण सेक्सदरम्यानच्या हिंसाचाराला संमती दिली नसेल.

"आम्ही अशा समाजात राहतो जिथं पीडितांनाच गुन्हेगारासारखी वागणूक दिली जाते. पण, ज्या लोकांनी ही कृत्ये केली आहेत त्यांनी ते तसे का केले? असा प्रश्न विचारला जात नाही. उलट स्वत: ला सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेसे प्रयत्न न केल्याबद्दल पीडितांना दोष दिला जातो."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)