5G सेवा सुरू, पण तुमचं-आमचं आयुष्य किती वेगाने धावणार?

फोटो स्रोत, @ASHWINIVAISHNAW
- Author, दिलनवाझ पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात भारतात 5G मोबाइल इंटरनेट सेवा सुरू केली. यासोबतच भारतात आता वेगवान असं मोबाईल इंटरनेटचं युग सुरू झालं असल्याचं म्हटलं.
सर्व भारतीयांना इंटरनेट सेवा उपलब्ध करून देणं हे भारत सरकारचं उद्दिष्ट आहे, असं 5G सेवेचा शुभारंभ करताना पंतप्रधान मोदी म्हणाले.
"आता भारतात ही सेवा सुरू झाली असून प्रत्येक भारतीयापर्यंत हायस्पीड इंटरनेट पोहोचण्यास वेळ लागणार नाही," असंही मोदी म्हणाले.
"हे तंत्रज्ञान केवळ व्हॉईस कॉल्स किंवा व्हीडिओ पाहण्यापुरते मर्यादित न राहता त्यातून एक नवीन क्रांती घडली पाहिजे," असंही ते म्हणाले.
"रिलायन्स जिओची 5G सेवा डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण भारतात उपलब्ध होईल," असं उद्योगपती मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे.
भारती एअरटेलचे सुनील मित्तल यांनी म्हटलंय की, "एअरटेल 1 ऑक्टोबर 2022 पासून 5G सेवा सुरू करत आहे आणि मार्च 2024 पर्यंत ती संपूर्ण भारतात उपलब्ध होतील."
10 कोटी वापरकर्ते
पहिल्या टप्प्यात अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम आणि हैदराबाद या भारतातील आठ शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्यात येणार आहे.
मार्च 2023 पर्यंत देशातील सर्व शहरी भागात 5G सेवा सुरू होईल, असं भारती एअरटेलचं म्हणणं आहे.
भारताच्या माहिती मंत्रालयानुसार, 2035 पर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेवर 5G चा प्रभाव 450 अरब डॉलर पर्यंत असेल.

फोटो स्रोत, PACIFIC PRESS
5G कनेक्टिव्हिटीसह डिव्हाइसेस 10 GB प्रति सेकंद इंटरनेट स्पीड प्राप्त करण्यास सक्षम होतील. सध्या 4G नेटवर्कमध्ये हा स्पीड जास्तीत जास्त 100 Mbps प्रति सेकंद आहे.
'एरिक्सन कन्झ्युमर लॅब'नुसार, भारतात 5G सेवेत सहभागी व्हायची इच्छा असेलेले जवळपास 10 कोटी वापरकर्ते आहेत. या ग्राहकांकडे 5G स्मार्टफोन आहेत आणि ते पुढील 12 महिन्यांत वेगवान इंटरनेट स्पीडशी कनेक्ट होऊ इच्छित आहेत.
या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत केलेल्या या संशोधनात शहरी ग्राहकांची मतं नोंदवण्यात आली आहेत. त्यानुसार, 5G ची तयारी जगात सर्वांत जास्त वेगानं भारतात दिसून आली आहे. भारतातील 5G नेटवर्ककडे जाण्याची ग्राहकांची इच्छा यूके किंवा यूएस सारख्या प्रगत बाजारपेठांच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट आहे, असंही या अहवालात म्टलंय.
5G ची वैशिष्ट्ये
- 5G म्हणजे पाचव्या पिढीचं मोबाइल इंटरनेट. मोबाइल नेटवर्कची पाचवी पिढी म्हणजेच 5G नेटवर्क विकसित करण्याचे प्रयत्न 2013 सालीच सुरू झाले आणि 2019 पासून ते जगभरात सुरू केले जात आहेत.
- सॅमसंगनं 2013 मध्ये 5G साठीची चाचणी केली तेव्हा त्यांचा स्पीड 1 Gbps होता. आता 5G नेटवर्क 70 देशांमध्ये कार्यरत आहे आणि सरासरी डाउनलोड स्पीड 700 Mbps आहे.
- 5G स्पेक्ट्रममध्ये, डेटा हा रेडिओ लहरींमधून खूप वेगानं प्रवास करेल आणि रेडिओ लहरी वेगवेगळ्या बँड आणि फ्रिक्वेन्सीमध्ये विभागल्या जातील.
- सोप्या शब्दांत याला सुपरफास्ट इंटरनेट म्हणता येईल. जे आताच्या 4G इंटरनेट स्पीडपेक्षा शंभरपट अधिक वेगवान असेल.
- 5G इंटरनेटनंतर अॅप्स बंद होणार नाहीत, असं अनेकांना वाटतं. व्हीडिओ बफर होणार नाहीत आणि मोबाइल स्क्रीनवर न संपणारे डाउनलोड चिन्ह दिसणार नाही, असंही अनेकांना वाटतं.
मोठा बदल
पण 5G ची कहाणी इथपर्यंतच मर्यादित नाहीये. यामुळे आणखी बरेच बदलेल. विशेषतः वैद्यकीय, शिक्षण, उत्पादन आणि विज्ञान क्षेत्रात.
2014 मध्ये जेव्हा 5G विकसित करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते, तेव्हा युकेच्या सरे विद्यापीठातील 5G इनोव्हेशन सेंटरमधील संशोधन संघाचे प्रमुख प्राध्यापक रहीम तफाझोली यांनी बीबीसीला सांगितलं होतं, "5G मुळे सर्वकाही नाट्यमयरीत्या बदलेल."

फोटो स्रोत, AVISHEK DAS/SOPA IMAGES/LIGHTROCKET VIA GETTY IMAG
दूरसंचार प्रकरणांचे सल्लागार महेश उप्पल सांगतात, "5G नेटवर्कचा सर्वात मोठा फायदा उत्पादन क्षेत्रात होईल. स्मार्ट शहरं एकमेकांशी जोडली जातील. डॉक्टर दूरस्थ शस्त्रक्रिया करू शकतील आणि चालकाशिवाय वाहनं रस्त्यावर धावू शकतील."
5G समोर आव्हानं
5G नेटवर्क दोन प्रकारे काम करू शकतं. सर्वप्रथम यासाठी स्वतंत्र नेटवर्क स्थापन करावं लागतं, ज्याला स्टँड अलोन नेटवर्क असं म्हणतात. दुसरं म्हणजे आधीच स्थापन केलेलं नेटवर्क वापरलं जातं, ज्याला नॉन स्टँड अलोन नेटवर्क म्हणतात.
असं असलं तरी जगात जिथेही नॉन-स्टँड अलोन नेटवर्कवर 5G सुरू करण्यात आलं आहे, तिथंही स्टँड अलोन नेटवर्कचीही गरज पडली आहे.
5G स्पीडचा मार्ग खुला करण्यासाठी रेडिओ नेटवर्कच्या पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी करावी लागेल. तसंच 3G आणि 4G नेटवर्क पूर्वीप्रमाणेच चालू राहील, हेसुद्धा नेटवर्क पुरवठादार कंपन्यांना सुनिश्चित करावं लागेल.
महेश उप्पल सांगतात, "5G तंत्रज्ञान हे नवीन तंत्रज्ञान आहे. ते महाग आहे. त्यासाठी अधिक गुंतवणूक आवश्यक आहे आणि त्याचे नेटवर्क उभारण्यासाठी अधिक संख्येने टॉवर्स लागतील. हे नेटवर्क रोलआउट करण्यासाठी अधिक खर्च आणि वेळ लागेल. साहजिकच 5G नेटवर्क स्थापन करण्यात अनेक आव्हानं असतील. "

फोटो स्रोत, DEBARCHAN CHATTERJEE/NURPHOTO VIA GETTY IMAGES
उप्पल पुढे सांगतात, "5G नेटवर्कच्या विस्ताराचे दोन पैलू आहेत. पहिला म्हणजे वायरलेस तंत्रज्ञानाचा भौगोलिकदृष्ट्या विस्तार करणं आणि दुसरा म्हणजे त्याचा वापर वाढवणं. नेटवर्कचा विस्तार करताना अडचणी येतील. यासाठीअनेक प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतील. भारतात याचा प्रयोग विस्तारण्यास वेळ लागू शकतो."
पण, देशात एक मोठा ग्राहक वर्ग आहे जो 5G मोबाईल खरेदी करू शकत नाही किंवा त्यासाठीच्या महागड्या डेटाची किंमतही देऊ शकत नाही, हेसुद्धा भारतातील 5G समोरचं एक आव्हान आहे.
महेश उप्पल सांगतात, "वापरकर्त्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर त्यांना 5G ला सपोर्ट करणारं साधनं आवश्यक आहे. 5G फोन साधारपणे वीस हजार रुपयांपर्यंत येतात जे प्रत्येकजण विकत घेऊ शकत नाही. कदाचित 5G मोबाईलच्या किंमती नंतर खाली येतील."
सामान्य लोकांसाठी नेमकं काय बदलणार?
देशात सध्या 4जी नेटवर्क आहे. यावरून तुम्ही अगदी सहज व्हीडिओ कॉल करू शकता, इंटरनेटवर चित्रपट पाहता येतात. मग 5जी मुळे सामान्य लोकांसाठी नेमकं काय बदलणार, हा प्रश्नही विचारला जात आहे.
महेश उप्पल सांगतात, "जर आपण अगदीच जवळचा फायदा पाहिला तर 5जी मुळे सर्वसामान्य ग्राहकासाठी इंटरनेट सर्फिंगचा वेग वाढण्याव्यतिरिक्त काही होणार नाही."

फोटो स्रोत, Thinkstock
पण भविष्यात 5जीचे अनेक फायदे आहेत, ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. या तंत्रज्ञानाचा सर्वांत मोठा फायदा हा ऑटोमेशन आणि टेक्नॉलॉजी क्षेत्राला होईल.
महेश उप्पल म्हणतात की, "दीर्घकालीन विचार करता या तंत्रज्ञानाचे फायदे व्यापक आहेत. उत्पादन क्षेत्र, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात यांमुळे क्रांती येईल. उत्पादन क्षेत्रात ऑटोमोटेड वाहनं चालवली जाऊ शकतील. डॉक्टर दूरस्थ सर्जरी पण करू शकतील.
"आतापर्यंत केवळ आंतर-मानवी संवाद होता. मात्र आता इंटरनेट ऑफ थिंग्जमुळे उपकरणं आणि मशीन एकमेकांसोबत कनेक्ट होतील आणि अत्यंत वेगाने रिअल टाइममध्ये डाटा शेअरिंग होऊ शकेल. याचा फायदा जवळपास सगळ्याच क्षेत्रांना होईल."
सगळ्या लोकांपर्यंत 5जी पोहोचणार का?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे की, प्रत्येक नागरिकापर्यंत वेगवान इंटरनेट सेवा पोहोचवण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे.
भारतीय टेलिकॉम क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी जिओचा दावा आहे की, ते 2023 पर्यंत संपूर्ण देशामध्ये 5 जी नेटवर्क पोहोचवतील. तर दुसरीकडे भारती एअरटेलने मार्च 2024 पर्यंत देशभरात 5 जी नेटवर्क पोहोचवण्याची घोषणा केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पण, सध्या भारतात उपलब्ध असलेल्या 4जी नेटवर्कमध्येच अनेकदा अडचणी येतात. त्यामुळे देशात सगळ्या लोकांपर्यंत 5जी पोहोचणार का? हा प्रश्न आहेच.
महेश उप्पल सांगतात की, "जर 4जीमध्ये अडचणी येत आहेत, तर 5जी मध्येही येणार. कारण 5जीसाठी अजूनच दाट नेटवर्कचं जाळ हवं. त्यामुळेच माझ्या मते ऑपरेटर्स सुरुवातीला अशा जागी 5जी नेटवर्क सुरू करण्यावर भर देतील, जिथे त्यांना या सेवेसाठी जास्त पैसे मोजणारे ग्राहक मिळू शकतात. त्यांचा सुरूवातीचा कल हा उद्योग-व्यवसायांकडे असेल. त्यामुळे 5जी सेवा सामान्य लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागेल."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








