You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास मोदी-शहा यांना किती आव्हान देऊ शकतील?
- Author, इम्रान कुरैशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
"दिल मिले ना मिले, हाथ मिला के चलो."
30 सप्टेंबरच्या रात्री उशिरा मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्याचा प्रस्ताव देण्यात आला, तेव्हा त्यांच्या मनात हा वाक्प्रचार आला असण्याची दाट शक्यता आहे.
कदाचित गांधी परिवाराच्या आशीर्वादानेच खर्गे यांना ही जबाबदारी मिळत असल्याचं जाणकारांचं मत आहे.
24 मे 2004 रोजी खर्गे यांनी मला हाच वाक्प्रचार ऐकवला होता. त्यावेळी त्यांचे जवळचे मित्र दिवंगत धरमसिंग यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
काँग्रेस-जनता दल सेक्युलर (जेडीएस) च्या पहिल्या युती सरकारमध्ये धरमसिंग यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचं नेतृत्व केलं होतं.
त्यावेळी काँग्रेस कार्यकारिणीचे (CWC) सदस्य असलेले धरमसिंग, खर्गे आणि एच.के. पाटील हे बंगळुरूमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांच्या चेंबरमधून दुसऱ्या खोलीत जात होते. तिथं ते काँग्रेसचे तत्कालीन निरीक्षक विलासराव देशमुख यांच्याशी अंतिम चर्चा करणार होते.
खर्गे यांच्याऐवजी अजातशत्रू म्हणून प्रसिद्ध असलेले धरमसिंग काँग्रेसचं नेतृत्व करणार असतील, तरच आघाडी सरकारला जेडीएस नेते एच.डी. देवेगौडा पाठिंबा देतील, असा सरळ मेसेज या चर्चेत देण्यात आला होता.
या वाक्प्रचाराचे अनेक अर्थ आहेत जे खर्गे यांच्या व्यक्तिमत्त्वाची व्याख्या करण्यास मदत करतात. याचा अर्थ असा आहे की, तुमचे हृदय संबंधित निर्णय स्वीकारत नसले, तरी तुम्ही तो स्वीकारा आणि पुढे जा.
ज्या वेळी काँग्रेस पक्षाला केवळ संस्थात्मक किंवा संरचनात्मक पातळीवरच नव्हे तर वैचारिक पातळीवरही नेतृत्वाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे, अशावेळी खर्गे यांच्यासारख्या निष्ठावंतांवर विसंबून राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे खर्गे यांना माहिती आहे.
खर्गे हे मुळात एक व्यावहारिक व्यक्ती आहेत. ज्यांना त्यांची बलस्थाने आणि कमकुवत बाजू दोन्ही चांगल्या प्रकारे माहित आहेत.
राज्याच्या राजकारणातून लोकसभेत आणि नंतर राज्यसभेत गेलेल्या खर्गे यांना त्यांच्यासमोरील आव्हानं चांगलीच ठाऊक आहेत. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपची मजबूत पक्ष यंत्रणा त्यांना माहीत आहे.
80 वर्षीय खर्गे यांची अध्यक्षपदी निवड झाली, तर जगजीवन राम (1969) अध्यक्ष झाल्यानंतर ते काँग्रेस पक्षाचे पहिले पूर्णवेळ दलित अध्यक्ष असतील.
काँग्रेस अध्यक्षपदाची शर्यत
- मल्लिकार्जुन खर्गे, शशी थरूर आणि के.एन. त्रिपाठी
- 30 सप्टेंबर उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख - 8 ऑक्टोबर
- निवडणुकीची तारीख - 17 ऑक्टोबर
- मतमोजणीची तारीख - 19 ऑक्टोबर
सामान्य कार्यकर्ते ते अध्यक्षपदाचे दावेदार
खर्गे हे कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील पक्षाचे एक सामान्य कार्यकर्ते होते. तिथून आता अध्यक्षपदाच्या दावेदारीमुळे 'सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान' म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. यातून देशभरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांपर्यंत एक मजबूत मेसेज पोहोचेल, असा विश्वास पक्षाशी संबंधित अनेकांना आहे.
कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष रमेश कुमार बीबीसीला सांगतात, "खर्गे काँग्रेस पक्षातील दर्जेदार व्यक्ती आहेत आणि पक्षाचं अस्तित्व वाचवण्यासाठी ते नक्कीच भूमिका बजावू शकतात. त्यांची विचारधारा खूप मजबूत आहे आणि ते मोदी-अमित शहा यांच्या भाजपला आव्हान देऊ शकतात."
रमेश कुमार आणि खर्गे यांची ओळख 1970 च्या दशकापासून आहे. तेव्हा देवराज अर्स यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी या दोघांची निवड केली होती. त्यावेळी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पक्ष 'इंदिरा काँग्रेस' या नावानं ओळखला जात होता.
खर्गे हे कलबुर्गीमध्ये स्थायिक झाले होते आणि एका गिरणी कामगार संघटनेशी संबंधित होते. देवराज अर्स यांनी त्यांना सवर्ण मतांचं प्राबल्य असलेल्या गुरुमितकालमधून तिकीट दिलं होते.
1972 पासून सलग नऊ वेळा खर्गे यांनी या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. त्यांनी एकूण दहावेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे आणि त्यांना कन्नड भाषेत 'सोल इलादे सरदार' असंही म्हटलं जातं. याचा अर्थ कधीही पराभव न मानणारा सरदार असा होतो.
एका उच्च निवृत्त अधिकार्यानं बीबीसी हिंदीला सांगितलं, "खर्गे एक चतुर प्रशासक आहेत. त्यांनी देवराज अर्स यांच्यापासून ते एस.एम. कृष्णा यांच्यापर्यंतच्या सरकारमध्ये वेगवेगळी मंत्रीपदं भूषवली आहेत. ते अधिकाऱ्यांशी नेहमी नम्रतेनं बोलत असत. पण त्यांना त्यांचे स्वतःचे विचार देखील होते. ते नेहमीच त्यांच्या प्राधान्यक्रमांबद्दल स्पष्ट होते. कोणताही अधिकारी त्यांना मूर्ख बनवू शकत नव्हता. ते खरोखरच मुख्यमंत्रिपदाच्या पात्रतेचे होते, पण ही संधी त्यांना तीनदा गमावावी लागली."
2009 मध्ये खर्गे पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले आणि मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीएच्या केंद्र सरकारमध्ये मंत्री झाले. त्यांच्या या कार्यकाळातच त्यांनी घटनेतील कलम (371 (जे)) दुरुस्तीसाठी मोहीम चालवली होती.
यामुळे हैदराबाद आणि कर्नाटक भागातील लोकांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळाले. 2014 मध्ये ते लोकसभेचे विरोधी पक्षनेते होते, पण 2019 मध्ये ते लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.एच. रंगनाथन यांनी मला अनेक दशकांपूर्वी खर्गे यांच्याबद्दल सांगितलं होतं, "कर्नाटकच्या संपूर्ण राजकीय क्षेत्रात खर्गे हे शोषित वर्गातील नेत्यांमध्ये पुढे जाण्याची क्षमता बाळगून असलेले सर्वांत आघाडीचे चतूर नेते आहेत."
मोदी-शहा यांना खर्गे आव्हान देऊ शकतील?
राजकीय विश्लेषक इंदुधारा होन्नापुरा बीबीसीला सांगतात, "खर्गे एक दलित नेते म्हणून उदयास आले आहेत, पण त्यांनी कधीही त्यांच्या नावाचा गैरफायदा घेतला नाही. ते सर्व समाजाशी निष्पक्ष राहिले आहेत. पण देशातील सद्यस्थिती पाहता सर्व गुण असूनही ते पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम करू शकतील की नाही हे सांगता येत नाही."
खर्गे यांची पक्षाध्यक्षपदी निवड करून काँग्रेस पक्षाला संपूर्ण देशाला एक मेसेज द्यायचा आहे, असं विश्लेषकांचं मत आहे.
राजकीय समीक्षक के. बेनेडिक्ट बीबीसी हिंदीला सांगतात, "पक्षाच्या सर्व गटांमधील दुखावलेल्या आणि वाढलेल्या तणावाला शांत करण्यात खर्गे खूप पटाईत आहे. दुसऱ्याशी लढाई करेल अशा पद्धतीचे ते नेते नाहीयेत."
बेनेडिक्ट यांचा रोख काँग्रेसमधील असंतुष्ट गट G-23 शी संबंधित नेत्यांनी खर्गेंच्या नामनिर्देशन पत्रावर केलेल्या स्वाक्षरीच्या दिशेनं आहे.
आनंद शर्मा, मुकूल वासनिक आणि भूपिंदरसिंग हुडा हे तिघेही G-23 चा भाग होते. त्याचवेळी ए. के. अँटनी, अशोक गेहलोत, तारिक अन्वर आणि दिग्जविजय सिंग हे गांधी घराण्याचे कट्टर निष्ठावंत आहेत.
खर्गे विजयी झाल्यास पक्षासमोर आव्हानंही असतील. खर्गे विंध्य पर्वतरांगांच्या दक्षिणेकडचे आहेत. त्यांच्या दलित असण्याचा पक्षाला फायदा होऊ शकतो, पण दक्षिण भारतातील राजकारण उत्तर भारतातील राजकारणापेक्षा वेगळे आहे. विशेषत: उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये जिथँ पक्ष अत्यंत कमकुवत स्थितीत आहे.
राजकीय भाष्यकार पूर्णिमा जोशी सांगतात, "खर्गे जुने नेते आहेत. ते एक सुसंस्कृत आणि जमिनीशी जोडले गेलेले राजकारणी आहेत. त्यांना कोणीही हलक्यात घेऊ शकत नाही. पण काँग्रेसचं पुनरुज्जीवन करण्याचा जो प्रश्न आहे, पक्षातील पोकळी भरून काढण्याचा जो प्रश्न आहे, ती पोकळी खर्गे भरून काढू शकणार नाहीत. दुसरा कुणीही ही पोकळी भरून काढू शकत नाही. पण, पक्षाला राष्ट्रीय पातळीवर नवीन हुरुप देऊ शकेल, असं काही खर्गे यांच्याकडे नाहीये."
मोदी आणि शहा यांच्या निवडणूक यंत्रणेला खर्गे आव्हान देऊ शकतील, या रमेश कुमार यांच्या आकलनाशी पूर्णिमा जोशी सहमत नाहीत.
त्यांच्या मते, "खर्गे कोणत्याही प्रकारे मोदी आणि शहांना आव्हान देऊ शकत नाहीत. त्यासाठी काँग्रेसला मोदी-शहांची भाषा बोलू शकणारा, हुशार, भाजपला स्वत:च्याच खेळात पराभूत करू शकेल अशा नेत्याची गरज आहे. खर्गे एक अतिशय सभ्य व्यक्ती आहेत."
खर्गे मोदी आणि शहा यांच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत, हे बेनेडिक्टही मान्य करतात.
बेनेडिक्ट सांगतात, "खर्गे हे अतिशय मवाळ व्यक्ती आहेत. शशी थरूर हे पंतप्रधानपदासाठी चांगले उमेदवार असू शकतात, पण काँग्रेस अध्यक्षपदासाठी ते चांगले उमेदवार नाहीत. काँग्रेसला पुन्हा पक्षात नवीन प्राण फुंकण्याची, उत्साही होण्याची आणि पक्षात दुरुस्ती करण्याची गरज आहे. खर्गे मात्र भाजपशी सामना करू शकणार नाहीत."
पूर्णिमा जोशी सांगतात, "पण पुढे काय होऊ शकतं हे तुम्हाला आताच माहिती असू शकत नाही. दोन्ही पक्षांची तुलना केल्यानंतर कदाचित लोक खर्गेंना सकारात्मकपणे घेतील. पण, नेमकं काय होतं, ते अजून पाहायचं आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)