You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कॉंग्रेस महाराष्ट्रात फुटीच्या उंबरठ्यावर आहे का?
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
महाराष्ट्राचं राजकारण शिवसेनेतल्या फुटीनंतर ढवळून निघालं असलं तरीही आता त्यानंतर राज्यात कॉंग्रेस पक्षही फुटीच्या उंबरठ्यावर आहे का असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून विचारला जातो आहे. परिस्थितीही तशीच आहे. कॉंग्रेसच्या गोटातून सतत नाराजीच्या कथा बाहेर येत आणि त्यामुळे नेत्यांच्या भाजपात जाण्याच्याही.
खरंतर कॉंग्रेसबद्दलच्या या चर्चा नव्या नव्हेत. जेव्हा 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा त्याअगोदर सत्तेपासून पाच वर्षं लांब राहिलेल्या या पक्षातले काही आमदार जर आता सत्तेत नसू तर वेगळा विचार करण्याच्या तयारीत होते. अर्थात त्यावेळेस ते महाविकास आघाडी होण्याच्या बाजूचे होते.
कॉंग्रेसच्या सगळ्या आमदारांना मग जयपूरमध्ये नेण्यात आलं होतं आणि इतिहासाशी फारकत घेत शिवसेनेशी युती करण्याचा निर्णय झाला होता. पण आता महाविकास आघाडीचं सरकार गेल्यावर कॉंग्रेसचे काही आमदार सत्ताधारी भाजपाच्या वळचणीला जाण्याची भाकीतं वर्तवली जाऊ लागली आहेत.
अर्थात त्या भाकीतांना काही आधारही आहे. गेल्या काही काळात काही घटनाही तशा घडल्या आहेत. उदाहरणार्थ विधानपरिषद निवडणुकीत कॉंग्रेसची मतं फुटली. त्यांचाच पहिल्या पसंतीचा उमेदवार पराभूत झाला. त्यानंतर जेव्हा शिंदे-फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव होता तेव्हा कॉंग्रेसचे 11 आमदार सभागृहात अनुपस्थित राहिले. यापेक्षा अशा अनेक घटना घडल्या ज्यावरुन हे स्पष्ट आहे की कॉंग्रेसच्या गोटात सगळं काही आलबेल नाही.
कॉंग्रेसचे किमान चौदा आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत इथपासून ते जसे गोव्यात कॉंग्रेसचे 8 आमदार भाजपानं फोडले आणि राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेला प्रत्युत्तर दिलं, तसं जेव्हा ही यात्रा महाराष्ट्रात येईल तेव्हा कॉंग्रेसचे इथले आमदार फोडून तिला उत्तर दिलं जाईल, असे अनेक तर्क आणि भाकीतं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या वर्तवली जात आहेत. ती खरी किती आणि खोटी किती यासाठी वाट पहावी लागेल, पण ज्यावरुन हे तर्क लढवले जात आहेत त्या घडामोडींकडे सध्या लक्ष द्यावं लागेल.
अशोक चव्हाण कॉंग्रेस सोडतील?
कॉंग्रेसमधलं एक नाव जे सातत्यानं चर्चेत आहे ते म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं. ते भाजपाशी बोलणी करत आहेत असं म्हटलं जात आहे. स्वत: अशोक चव्हाणांनी या बातम्यांचं सतत खंडण केलं आहे. पण तरीही चर्चा सुरु आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळेस जे कॉंग्रेस आमदार सभागृहात हजर राहिले नाहीत, त्यात एक अशोक चव्हाणही होते. वेळेत सभागृहाच्या आत पोहोचू न शकल्याचं कारण त्यांनी दिलं, पण त्यानं भुवया उंचावल्याच. त्यांच्यासोबत प्रणिती शिंदे, विजय वडेट्टीवार, धीरज देशमुख, झिशान सिद्धिकी हेसुद्धा मतदानाला नव्हते. त्यानंतर चव्हाणांच्या नांदेडच्या घरी सध्याच्या सरकारमधले मंत्री अब्दुल सत्तार भेटायला गेले तेव्हाही प्रश्न विचारले गेले.
गणेशोत्सवादरम्यान एका ओळखीच्या गृहस्थांकडे दर्शनानिमित्त चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस एकाच वेळेस पोहोचले तेव्हा ती राजकीय भेट होती का यावरुन मोठा वादंग झाला. शेवटी चव्हाणांना खुलासाही करावा लागला होता. दोन दिवसांपासून कॉंग्रेसच्या गोटात अशी चर्चा आहे की अशोक चव्हाणांची नाराजी पाहता आणि त्यांनी पक्ष सोडू नये याकरता त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता आहे. तसंही बाळासाहेब थोरातांकडून नाना पटोलेंकडे हे पद आल्यावर कॉंग्रेसची संघटनात्मक स्थिती काही सुधारली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा चव्हाणांना संधी देण्याची सूचना पुढे आली असं म्हटलं जात आहे.
पण चव्हाणांच्या बाबतीत ज्या बातम्या येत आहेत त्या भाजपा उठवत असलेल्या अफवा आहेत असा कॉंग्रेसचा आरोप आहे/ "या सगळ्या भाजपानं उठवलेल्या अफवा आहेत. त्यात अजिबात तथ्य नाही. अशोक चव्हाण सध्या पूर्णपणे 'भारत जोडो'च्या तयारीत आहेत. प्रदेशाध्यक्षपदाबद्दल म्हणाल तर प्रदेश कॉंग्रेसनं ठराव करुन निवडीचे सगळे अधिकार सोनिया गांधींना दिले आहेत," असं प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितलं.
पण चव्हाण जर खरंच गेले तर तो कॉंग्रेसला मोठा झटका असेल. माजी मुख्यमंत्री असलेल्या चव्हाणांनी अनेक जबाबदाऱ्या पक्षात सांभाळल्या आहेत. नांदेडसोबतच मराठवाड्यामध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
विधानपरिषद निवडणूक: 8 मतं फुटली
कॉंग्रेसला वास्तविक मोठा धक्का बसला होता विधानसभा निवडणुकीत. चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना कॉंग्रेसनं उमेदवारी दिली होती. हंडोरे यांना प्रथम पसंतीचं सर्वाधिक मतं गणितानुसार दिली होती. पण प्रत्यक्षात त्यांना मिळायला हवी होती तेवढी मतं मिळालीच नाहीत आणि हंडोरे पराभूत झाले. साहजिक होतं की कॉंग्रेसची मतं फुटली होती. भाजपाकडे असलेल्या मतांपेक्षा 20 मतं त्यांना अधिक मिळाली आणि त्यातली जास्त कॉंग्रेसकडून आल्याचा कयास तेव्हाच लावला गेला होता.
पण निकालाच्या त्याच रात्री एकनाथ शिंदेंचं शिवसेनेतलं बंड झालं आणि कॉंग्रेसमधलं वादळ पेल्यातच शमलं. पण नंतर कॉंग्रेसनं मोहन प्रकाश यांची एकसदस्यीय समिती नेमली आणि त्यांनी तो गोपनीय अहवाल सोनिया गांधींना सादर केला. अर्थात कोणतीही कठोर कारवाई पक्षाविरोधात मतदान करणाऱ्यांवर अद्याप झालेली नाही. कॉंग्रेसची एकूण आठ मतं फुटली आणि त्यातली सहा भाजपाला गेली असं म्हटलं गेलं.
राहुल गांधींनी अध्यक्ष व्हावं असा प्रस्ताव, पण नेतेच अनुपस्थित
सोमवारी मुंबईत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसची महत्वाची बैठक बोलावली गेली होती. नाना पटोलेंनी ती बोलावली होती. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची पुढच्या महिन्यात होणार आहे आणि काही प्रदेश कॉंग्रेस समित्या राहुल गांधींनी पुन्हा बिनविरोध अध्यक्ष व्हावं असा ठराव करत आहेत. तसा ठराव महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसनंही मांडला. त्यासाठी ही बैठक होती. पण या बैठकीकडे अनेक मोठ्या नेत्यांनी पाठ फिरवली.
सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे, अमित देशमुख, धीरज देशमुख, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, के.सी.पडवी, संग्राम थोपटे, नितीन राऊत या मोठ्या नेत्यांसह अनेक जण अनुपस्थित राहिले. त्याचा मोठा गाजावाजा झाला. नाना पटोलेंनी प्रत्येकाची कारणं होती अशी सारवासारव केली, पण तरीही अशा महत्वाच्या प्रस्तावाला हजर न राहण्याची चर्चा होत कॉंग्रेसच्या आत काय चाललंय असा प्रश्न विचारला गेलाच.
या बैठकीत अशोक चव्हाणांनी राहुल गांधींना बिनविरोध अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला. पण उपस्थित असलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी अनुमोदनार्थ हात वर केला नाही. त्यावरुन राहुल गांधींना विरोध आहे का अशी चर्चा सुरु झाली. पण पृथ्वीराज चव्हाणांची भूमिका ही कॉंग्रेसच अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी आणि राहुल गांधींनी त्यात भाग घ्यावा अशी आहे. चव्हाण हे राष्ट्रीय पातळीवरच्या कॉंग्रेसच्या जी-23 या गटातही आहेत ज्या गटानं जाहीर नाराजी व्यक्त करुन कॉंग्रेस संघटनेत काही सुधारणा सुचवल्या होत्या.
अनेक नावं चर्चेत
या घडामोडींसह कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांची नावं सातत्यानं भाजपात जाण्याच्या चर्चेत असतात. विश्वजीत कदमांचं नावही काही दिवसांपूर्वी चर्चेत होतं. पण त्यांनाही जाहीर खुलासा करावा लागला की ते कोणताही वेगळा विचार करत नाही आहेत. मध्येच मिलिंद देवरांच्या ट्विट्सची, मुंबई कॉंग्रेसमधल्या धुसफुशीची चर्चा होते. सध्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या मढच्या बांधकामांमुळे रडारवर असलेले अस्लम शेख देवेंद्र फडणवीसांना भेटतात तेव्हा त्यांच्या नावावरुनही कयास सुरु होतात.
राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्या मते सत्तेशिवाय कॉंग्रेसची अवस्था 'हेडलेस चिकन' सारखी झाली आहे, त्यामुळे या पक्षात काहीही होऊ शकतं. "मागे पाहिलं तर दिसतं की राज्यसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस एकत्र होती. त्यांचं एकही मत फुटलं नाही. पण दहाच दिवसांनी विधानपरिषदेत 8 मतं फुटली. म्हणजे सरकार असतानाच चलबिचल सुरु झाली होती. सत्ता गेल्यावर तर परिस्थिती अधिकच बिकट झाली."
"गोव्यासारखं होईल का हे सांगणं कठीण आहे, पण ते शक्यच नाही असं नाही. एक तर नाना पटोलेंचं नेतृत्व प्रभावी आहे का याबद्दलही शंका आहेत. सगळे त्यांचं ऐकतात असं नाही. भाजपाचाही एक 'प्लान बी' असल्याचं समजतं आहे. जर एकनाथ शिंदे यांच्या गटाला न्यायालयीन लढाईत धक्का बसला आणि गरज पडली तर कॉंग्रेसचे काही जण भाजपाला हवे असतील. तशी काही आमदारांशी बोलणी झाल्याचीही चर्चा आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)