You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सचिन पायलट: हवाई दलाचं स्वप्न ते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार
राजस्थानच्या राजकारणात पुन्हा एकदा पायलट विरुद्ध गेहलोत संघर्षाला सुरुवात झालीय. 2020 साली सचिन पायलट यांच्या बंडानंतर शांत झालेलं काँग्रेस पक्षाअंतर्गत वादळ पुन्हा आक्रमकपणे समोर आलंय.
यावेळी कारण ठरलंय काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्य्षपदाची निवडणूक. अशोक गेहलोत अध्यक्षपदाची निवडणूक लढवत असल्यानं ते मुख्यमंत्रिपद सोडण्याची शक्यता आहे. अशावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री कोण, यावरून पक्षाअंतर्गत संघर्षाला सुरुवात झालीय.
पुन्हा एकदा या संघर्षाचे केंद्रबिंदू सचिन पायलट आणि अशोक गहलोत हेच आहेत.
यातील सचिन पायलट यांचा आतापर्यंतचा प्रवास आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत :
2018 साली पाच वर्षांनंतर काँग्रेसने राजस्थानमध्ये बहुमत मिळवलं होतं. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 21 जागा मिळाल्या होत्या. मात्र, 2018 मध्ये पक्षाने 99 जागांपर्यंत मजल मारली.
काही ठिकाणी मित्रपक्षांनी बाजी मारली आणि अशाप्रकारे काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत आली.
या विजयाचे शिल्पकार ठरवण्यात आलं - सचिन पायलट यांना. 2018 च्या निवडणुकीत त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली होती. त्यावेळी त्यांनी राज्याचा कानाकोपरा फिरून 2013 मध्ये काँग्रेसपासून दूर गेलेल्या किंवा हताश झालेल्या मतदाराचं मन वळवलं.
मात्र, जेव्हा मुख्यमंत्रिपदी वर्णी लागायची वेळ आली त्यावेळी अशोक गहलोत यांची निवड झाली आणि सचिन पायलट यांना उप-मुख्यमंत्रिपद देण्यात आलं.
सचिन पायलट यांनी 2002 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये ते राजकारणाच्या पायऱ्या झपाझप चढले.
सचिन पायलट 23 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यांना कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करायची होती. भारतीय हवाई दलात भरती होण्याचंही त्यांचं स्वप्न होतं.
मात्र, 11 जून 2000 रोजी त्यांचे वडील राजेश पायलट यांचा एका अपघातात मृत्यू झाला. त्या घटनेने सचिन पायलट यांच्या आयुष्याची दिशाच बदलली.
गाडी चालवत गावोगावी फिरणारा नेता
सचिन पायलट यांच्यासाठी राजकारण नवीन नव्हतं. भारतीय राजकारणात त्यांचे वडील राजेश पायलट यांचं नाव मोठं आहे. त्यांच्या आई रमा पायलट यादेखील आमदार आणि खासदार होत्या.
1977 साली उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरमध्ये जन्मलेले सचिन पायलट यांचं प्राथमिक शिक्षण नवी दिल्लीतल्या हवाई दलाच्या बालभारती शाळेतून झालं. यानंतर त्यांनी दिल्लीतल्याच सेंट स्टिफन्स कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतलं. यानंतर अमेरिकेतल्या एका विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं.
काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याआधी सचिन पायलट यांनी बीबीसीच्या दिल्लीतल्या ऑफिसमध्ये इंटर्न म्हणून नोकरी केली होती. त्यानंतर अमेरिकी कंपनी जनरल मोटर्समध्येही त्यांनी काही दिवस काम केलं.
मात्र, लहानपणापासूनच त्यांनी हवाई दलात वैमानिक होण्याचं स्वप्न बघितलं होतं.
'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं, "जेव्हा मला कळलं की, माझी दृष्टी थोडी कमकुवत आहे त्यावेळी मला खूप वाईट वाटलं होतं. कारण मला मोठं होऊन माझ्या वडिलांसारखं एअरफोर्स पायलट व्हायचं होतं. शाळेत मुलं मला माझ्या पायलट या आडनावावरून चिडवायचे. त्यावेळी मी माझ्या आईला न सांगताच विमान उडवण्याचं लायसन्स मिळवलं."
मात्र, वडिलांच्या अपघाती निधनानंतर सचिन पायलट यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यावेळी तेसुद्धा वडिलांप्रमाणेच स्वतः गाडी चालवून गावोगावी फिरायचे.
काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर 'घराणेशाहीचे' आरोप झाले.
राजकीय जीवनाच्या सुरुवातीलाच 'एनडीटीव्ही'ला दिलेल्या एका मुलाखतीत ते याविषयी बोलले होते.
ते म्हणाले होते, "राजकारण सोन्याची वाटी नाही की कुणीही पुढे सरकवेल. या क्षेत्रात स्वतःचं स्थान तुम्हाला स्वतःला बनवावं लागतं."
42 वर्षांचे सचिन पायलट आज 17 वर्षं राजकारणात सक्रिय आहेत.
आपल्या या राजकीय प्रवासाविषयी ते म्हणाले होते, "माझे वडील हयात असताना मी कधीही त्यांच्याशी माझ्या राजकीय जीवनाविषयी चर्चा केली नव्हती. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर आयुष्य अचानक बदललं. त्यानंतर मी अत्यंत विचारपूर्वक राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. कुणीही माझ्यावर बळजबरी केली नाही. माझ्या शिक्षणातून मी जे काही शिकलो त्यातून मी व्यवस्थेत बदल घडवू इच्छित होतो."
दलाई लामांकडून नम्रतेची शिकवण
सचिन पायलट दौसा आणि अजमेर मतदारसंघातून खासदार होते.
या निवडणुकींमध्ये त्यांनी अनेक सभा घेतल्या आणि थेट लोकांशी संपर्क स्थापन केला.
एका रॅलीत त्यांना पोहोचायला उशीर झाला तेव्हा त्यांनी त्यांना ऐकायला जमलेल्या लोकांची माफीही मागितली होती.
'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या एका मुलाखतीत सचिन पायलट म्हणाले होते, "दलाई लामांप्रती माझ्या मनात नितांत आदर आहे. एखादी व्यक्ती ती कुणीही असो तुमच्यासोबत 30 सेकंदही असेल त्यावेळी तुमच्या मनात नम्रपणा, धीर आणि चेहऱ्यावर सुहास्य असायला हवं, जेणेकरून तुमच्या सोबत असताना त्या व्यक्तीला अवघडल्यासारखं होऊ नये, हीच व्यक्तीची खरी ताकद असते. गेल्या 50 वर्षांपासून हेच सुहास्य त्यांच्या चेहऱ्यावर आहे."
साराशी लग्न
सचिन पायलट यांनी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांची मुलगी साराशी लग्न केलं आहे.
इंडियन टेरेटोरियल आर्मीमध्ये अधिकारी म्हणून काम सांभाळणारे सचिन पायलट यांनी मुस्लीम समाजातल्या मुलीशी विवाह करण्यावरून प्रश्न विचारणाऱ्यांना एका मुलाखतीत उत्तर दिलं होतं.
सिमी गरेवाल यांना दिलेल्या मुलाखतीत सचिन पायलट म्हणाले होते, "धर्म ही अत्यंत खासगी बाब आहे. आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेताना केवळ धर्म आणि जातीच्या आधारावर निर्णय घ्यायचे नसतात."
राहुल गांधींशी संबंध
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींपैकी एक अशी सचिन पायलट यांची ओळख आहे. आपलं म्हणणं अत्यंत स्पष्टपणे मांडणारा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं.
ब्लूमबर्ग क्विंटला दिलेल्या मुलाखतीत सचिन पायलट म्हणाले होते, "राहुल गांधी समाजासाठी काहीतरी करू पाहणारे व्यक्ती आहेत आणि त्यांच्यात सत्तालोलुपताही नाही, असं मला वाटतं."
राजस्थानात सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून बघितलं जात होतं. मात्र, काँग्रेस नेतृत्वाने मुख्यमंत्रिपदाची माळ घातली ती ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांच्या गळ्यात.
यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सचिन पायलट 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाच्या आधारे गमतीत म्हणाले होते, "या खोलीत सगळेच बसले होते. शेवटी यातले दोघं करोडपती बनतील, हे कुणाला ठाऊक होतं."
गंभीर मुद्द्यांवर स्पष्टपणे बोलणारे सचिन पायलट त्यावेळी मनमोकळेपणाने हसतानाही दिसले.
राजकारणात मोकळेपणाने हसणारे खूपच कमी नेते सापडतील.
आपलं म्हणणं प्रभावीपणे मांडण्याचं कसब त्यांच्याकडे आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)