You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेतून गुजरातला का वगळण्यात आलं?
- Author, रॉक्सी गागडेकर-छारा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
काँग्रेसची 'भारत जोडो' यात्रा पुढे सरकत आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूकही जवळ येत आहे. त्यामुळे काँग्रेसने 'भारत जोडो' यात्रेच्या मार्गात गुजरातचा समावेश केला असता तर काय झालं असतं, असा प्रश्न विचारला जात आहे.
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल. पण, राहुल गांधींची 150 दिवसांची 'भारत जोडो' यात्रा गुजरातमधून जाणार नाहीये. या यात्रेच्या मार्गात गुजरात राज्याचा समावेश करण्यात आलेला नाहीये, ही वस्तुस्थिती आहे.
गुजरातच्या निवडणुका संपून एक महिना उलटला तरीही राहुल गांधी त्यांच्या या 'भारत जोडो' यात्रेसाठी फिरत राहतील.
पण, मध्ये काही दिवस ते ही यात्रा सोडून गुजरातमध्ये प्रचारासाठी येतील, असं मानलं जात आहे. पण, असं झालं तर त्यांच्या या दौऱ्यात ते गुजरात निवडणुकीवर कितपत लक्ष केंद्रित करू शकतील याबाबत शंका आहे.
राहुल गांधींची 'भारत जोडो' यात्रा महाराष्ट्रातून जाणार आहे.
कन्याकुमारीमधून सुरू झालेली यात्रा जानेवारी महिन्यात श्रीनगरला पोहचेल. बारा राज्यांमधून जाणाऱ्या या यात्रेत महाराष्ट्राचा समावेश आहे, मात्र गुजरातचा समावेश करण्यात आलेला नाही.
गुजरातसह हिमाचल प्रदेशातही निवडणूक होणार आहे. या यात्रेत या राज्याचाही समावेश करण्यात आलेला नाहीये.
गुजरातमध्ये नवोदित आम आदमी पक्ष मात्र पूर्ण क्षमतेने निवडणूक लढत आहे. राज्यातील सर्व 182 जागांवर आप उमेदवार उभे करणार आहे, तर काँग्रेस मात्र काहीच हालचाल करताना दिसून येत नाहीये आणि काँग्रेस पक्ष निवडणूकही लढवणार नाही, असं अनेकांना वाटत आहे.
दुसरीकडे, आपचे नेते अरविंद केजरीवाल नियमितपणे गुजरातमध्ये येऊन आश्वासनं देत आहेत, तर गुजरात प्रदेश काँग्रेसचे नेते कुठेही दिसत नाहीयेत आणि जाहीर सभाही घेत नाहीयेत.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधताना दावा केलाय की, पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात गुजरातमधील पोरबंदर ते अरुणाचल प्रदेश दरम्यान अशीच यात्रा काढली जाणार आहे.
मात्र, जोपर्यंत ही यात्रा होईल तोपर्यंत गुजरातच्या निवडणुका संपलेल्या असतील.
'काँग्रेसने संधी गमावली'
बीबीसी गुजरातीनं याविषयी 'द हिंदू'च्या माजी सहयोगी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार स्मिता गुप्ता यांच्याशी चर्चा केली.
त्या म्हणाल्या, "लोकांशी संपर्क साधण्यासाठी या प्रकारची यात्रा हा सर्वोत्तम मार्ग आहे. देशानं अशा अनेक यशस्वी यात्रा पाहिल्या आहेत आणि राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेचे चांगले परिणामही मिळू शकले असते."
यात्रेच्या मार्गात गुजरातचा समावेश का करण्यात आला नाही, असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, "गुजरात काँग्रेसला येत्या निवडणुकांमध्ये कमी रस असल्याचं दिसत आहे. लोकांशी जोडण्याचे आणि लोकांमध्ये राहण्याचे काम पक्षानं करायला हवं. 2017 च्या निवडणुकीनंतर हे काम लगेच सुरू करायला हवं होतं. पण, तसं काहीच झालं नाही."
"लोकांशी संवाद साधण्याच्या प्रयत्नात गुजरात काँग्रेस मागे पडत चालली आहे आणि आता खूप उशीर झाला आहे. गुजरात निवडणुकीत काँग्रेसची फारशी चांगली कामगिरी होणार नाही, असं सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे आणि त्यासाठी राहुल गांधींना जबाबदार धरता येणार नाही, कारण ते 'भारत जोडो' यात्रेत व्यस्त आहेत."
2022 च्या गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आतापर्यंत गुजरातमध्ये तीन कार्यक्रम घेतले आहेत.
त्यापैकी सोमनाथमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद, दाहोदमध्ये आदिवासी समाजासाठीची जाहीर सभा आणि अहमदाबादमध्ये रिव्हरफ्रंटवर बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची जाहीर सभा या कार्यक्रमांचा समावेश आहे.
या तिन्ही कार्यक्रमांनंतर राहुल गांधी त्यांच्या 'भारत जोडो' यात्रेला निघाले आहेत.
दुसरीकडे, गुजरातमध्ये आम आदमी पक्ष चांगलाच सक्रीय झाला आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांसमोर आपनं आव्हान उभे केले आहे. अशा परिस्थितीत 'आप' काँग्रेसची मते कमी करू शकतो.
'यात्रा निवडणुकीसाठी नाही'
गुजरातला या यात्रेतून वगळण्याच्या मुद्द्याबद्दल विचारलं असता, राजकीय शास्त्रज्ञ आणि एम. एस. विद्यापीठाचे प्राध्यापक, अमित ढोलकिया यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं की, "सध्याच्या परिस्थितीत गुजरातच्या निवडणुका अगदी तोंडावर असताना या यात्रेत गुजरातचा समावेश केला असता तर गुजरात काँग्रेसमध्ये उत्साह संचारला असता. मात्र, गुजरात काँग्रेससाठी मोठ्या संख्येनं लोकसंख्या गोळा करणं नेहमीच कठीण काम राहिलं आहे. त्यांच्यासाठी हे मोठे आव्हान ठरलं आहे.
"तामिळनाडू आणि केरळसारख्या राज्यांमध्ये यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. गुजरातमध्ये या यात्रेत सामील होणाऱ्यांची संख्या कमी झाल्यास मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाईल. त्यामुळेच काँग्रेसने गुजरातला वगळले असावे."
'भारत जोडो' यात्रा गुजरातमधून गेली असती तर काय झालं असतं? त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळालं नसतं का? अनेक राजकीय विश्लेषक असा प्रश्न विचारत आहेत.
बीबीसी गुजरातीनं वेगवेगळ्या राजकीय नेत्यांशी बोलून या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपक बाबरिया यांच्या मते, "भारत जोडो यात्रा गुजरातमधून जाणं हे तार्किकदृष्ट्या ते शक्य नाही. सध्या यात्रा दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे आणि त्या मार्गात गुजरातचा समावेश करणे अवघड आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 'भारत जोडो' यात्रा ही लोकांना भेटणे आणि त्यांच्यासोबत संवाद साधणे हा उद्देश घेऊन पुढे जात आहे."
गुजरात काँग्रेसचे नेते शक्तीसिंह गोहिल या यात्रेत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मात्र त्यांच्याशिवाय गुजरात काँग्रेसचा दुसरा कुणी नेता या यात्रेत सहभागी झाल्याचं दिसत नाहीये.
याबाबत गुजरात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुनभाई मोधवाडिया यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, "या यात्रेचा निवडणुकीच्या प्रचाराशी काहीएक संबंध नसेल, असं यापूर्वीच स्पष्ट करण्यात आलं आहे. तसं केल्यास यात्रेचा मुख्य उद्देश अयशस्वी ठरेल. ही काही निवडणुकाभिमुख यात्रा नाहीये."
गुजरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी.जे. चावडा म्हणाले, "या यात्रेचा उद्देश निवडणुकीचा प्रचार करणे नसून लोकांमध्ये संवाद निर्माण करणे हा आहे. राहुल गांधींच्या निवडणूक प्रचारासाठी वेगळी योजना आखली जाणार आहे. ती चांगल्या प्रकारे अंमलात आणली जाईल."
'भारत जोडो' यात्रा तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांमधून नंतर उत्तर भारताकडे जाणार आहे. तसंच सध्या काँग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांतूनही ही यात्रा जाणार आहे.
काँग्रेस नेते मात्र जानेवारी महिन्यात गुजरात ते अरुणाचल प्रदेश अशी यात्रा काढण्याचा विचार करत आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)