कपिल सिब्बलांची गांधी कुटुंबावर टीका, काँग्रेस नेत्यांकडून पलटवार

काँग्रेसच्या 'जी-23' गटातल्या नेत्यांमधील एक असलेले माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी गांधी कुटुंबावर टीका केली. त्यानंतर गांधी कुटुंबाच्या निष्ठावंत नेत्यांनी सिब्बल यांना प्रत्युत्तर दिलंय.

कपिल सिब्बल यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, "गांधी कुटुंबाने नेतृत्व सोडून द्यायला हवं. नेतृत्वाची संधी आता इतर कुणालातरी मिळायला हवी."

याआधी, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून राजीनामा मागितला आहे. त्यानंतर पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे.

कपिल सिब्ब्ल काय म्हणाले?

कपिल सिब्बल यांचं हे वक्तव्य समोर आल्यानंतर गांधी कुटुंबाच्या निष्ठवंतांनी पलटवार केलाय. सिब्बल यांच्यासारखे वरिष्ठ नेते आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची भाषा बोलू लागलेत, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केलाय.

राहुल गांधींचे समर्थक आणि लोकसभेत काँग्रेसचे प्रमुख व्हिप मणिकम टागोर यांनी म्हटलं की, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला हे हवंय की, गांधी कुटुंबानं नेतृत्व सोडून द्यावं, जेणेकरून 'आयडिया ऑफ इंडिया' उद्ध्वस्त होऊन जाईल."

कपिल सिब्बल यांना हे माहित आहे, म्हणूनच ते आरएसएस आणि भाजपची भाषा बोलतायेत, असंही टागोर म्हणाले.

तसंच, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनीही कपिल सिब्बल यांना सडेतोड उत्तर दिलंय.

पवन खेरा म्हणाले, "डॉ. हर्षवर्धन यांनी तुम्हाला चांदनी चौकमधून हटवायला सांगितलं नव्हतं. त्यांनी निवडणूक लढली आणि कपिल सिब्बल यांना पराभूत केलं. ज्यांना काँग्रेसचं नेतृत्व करायचंय, त्यांनी विद्यमान नेतृत्वाविरोधात घोषणा देण्याऐवजी अध्यक्षपदासाठी होणारी निवडणूक लढवायला हवी."

'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत कपिल सिब्बल म्हणाले होते की, "सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वपदावरून हटवलं पाहिजे. त्यांनी पक्षाचं नेतृत्व आता दुसऱ्या कुणाला तरी द्यायला हवं."

"काँग्रेसचं नेतृत्व स्वप्नांच्या जगात वावरतंय, मला 'सर्वांची काँग्रेस' हवीय, मात्र काही लोकांना 'घरातली काँग्रेस' हवीय."

सोनिया गांधीच राहणार काँग्रेस अध्यक्ष

"सोनिया गांधी यांनी पुढे येऊन पक्षाचं नेतृत्त्व सक्षमपणे करावं. तसेच काही आवश्यक आणि व्यापक बदल करावेत, अशी विनंती त्यांच्याकडे काँग्रेसच्या कार्यसमितीनं केली आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर सगळ्यांना विश्वास आहे."

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीनंतर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पक्षाची ही भूमिका स्पष्ट केली.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी रविवारी (13 मार्च) बैठक बोलावली होती.

या बैठकीला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि काँग्रेस मधील मोठे नेते उपस्थित होते. तब्बल पाच तासानंतर ही बैठक संपली.

या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं, "पाच राज्यांमधील निवडणुकीचा पराभव पक्षासाठी चिंतेचा विषय आहे."

"जोवर काँग्रेसची संस्थात्मक निवडणूक होत नाही तोवर सोनिया गांधी यांनीच पक्षाचं नेतृत्व करावं यावर पक्षातल्या नेत्यांचं एकमत आहे," असंही सुरजेवालांनी सांगितलं.

काँग्रेस पक्ष एक व्यापक चिंतन शिबीर बोलावेल. जिथं भविष्यातील वाटचालीविषयी सविस्तर चर्चा केली जाईल, असंही सुरजेवाला यांनी पुढे सांगितलं.

राहुल गांधींनी पक्षाचं अध्यक्षपद सांभाळायला हवं - अशोक गहलोत

एकीकडे सुरजेवाला यांनी अशी भूमिका घेतली असताना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मात्र आज दुपारी वेगळं मत मांडलं आहे.

गांधी कुटुंब काँग्रेसच्या एकतेसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि राहुल गांधींनी पक्षाचं अध्यक्षपद सांभाळायला हवं, असं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी म्हटलं आहे.

एएनआयसोबत बोलताना गहलोत यांनी म्हटलं, "राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष व्हायला हवं. गेल्या तीन दशकांत काँग्रेस पक्षाचा कोणताही सदस्य पंतप्रधान अथवा मंत्रीपद भूषवलेलं नाहीये. गांधी कुटुंब काँग्रेसच्या एकतेसाठी महत्त्वपूर्ण आहे, हे समजून घेणं आवश्यक आहे."

पक्षाच्या अंतर्गत कलहामुळे पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाला पराभूत व्हावं लागलं, असंही गहलोत म्हणाले.

ते म्हणाले, "2017 मध्ये काँग्रेस पक्ष एकत्र आणि मजबूत होता आणि आम्ही विजय मिळवला. चन्नी मुख्यमंत्री झाल्यानंतर एक वातावरण तयार झालं होतं. पण, अंतर्गत कलहामुळे आम्ही निवडणूक हरलो, ही आमची चूक आहे."

गहलोत पुढे म्हणाले, "भेदभावाचं राजकारण करणं सोप काम आहे. भाजपनं सोशल मीडियावर काँग्रेसला मुस्लिमांचं पक्ष म्हणून सादर केलं. पण आमचं ध्येय देशाची एकता आणि अखंडतता कायम ठेवणं हे आहे. निवडणुकीच्या काळात धर्म पुढे येतो आणि महागाई, बेरोजगारी हे मुद्दे मागे राहतात."

पाच राज्यात काँग्रेसला कुठे फटका बसला?

उत्तरप्रदेशमध्ये 403 जागांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येणार आहे.

तर दुसरीकडे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रचार केला होता. मात्र केंद्राच्या राजकारणात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून भूमिका बजावणाऱ्या काँग्रेसच्या फक्त 2 जागा आल्या. अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या ठिकाणीही काँग्रेसचा पराभव झाला आहे.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकूण 7 जागा मिळाल्या होत्या आणि पक्षाची मतांची टक्केवारी 6.25 टक्के इतकी होती. यावेळी मात्र निवडणुकीत त्यांची मतांची टक्केवारी घसरून 2.34 टक्क्यांवर आलीय.

विशेष म्हणजे पंजाबसारखं मोठं राज्य काँग्रेसच्या हातून निसटलं आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला 117 पैकी 92, तर काँग्रेसला 18 जागांवर विजय मिळाला आहे. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसनं 77 जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली होती.

याशिवाय गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या तिन्ही राज्यांत भाजपनं काँग्रेसला धूळ चारली आहे.

राहुल-प्रियंका यांनी स्वीकारला पराभव

निवडणुकीचा निकाल आल्यानंतर प्रियंका गांधींनी ट्वीट करुन मान्य केलंय की पक्षाला आपल्या मेहनतीचं मतांमध्ये रूपांतर करण्यात यश आलं नाही.

त्या म्हणतात की, "लोकांचं मत लोकशाहीत सर्वस्वी आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी खूप कष्ट घेतले. पक्ष संघटन मजबूत केलं. जनतेच्या प्रश्नांवर लढा दिला. पण, आमच्या मेहनतीचे रूपांतर मतांमध्ये करण्यात आम्हाला यश आलं नाही."

दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट केलं की, "मी नम्रतेने निकाल स्वीकारतो. ज्यांना जनादेश मिळाला त्यांचे अभिनंदन करतो. मी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांच्या मेहनतीबद्दल आभार मानतो. यातून आम्ही धडा घेऊ. लोकांच्या हितासाठी कायम काम करत राहू."

पाच राज्यांतील या पराभवानंतर गांधी परिवारावरच्या कामगिरीविषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार होतं.

राजीनाम्याची चर्चा

या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे तिघेही आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची बातमी NDTV या वृत्तवाहिनीने दिली होती. त्यानंतर सगळीकडेच या तिघांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती.

मात्र या बातमीत कोणतेही तथ्य नसल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करून दिली.

रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करत NDTV चे हे वृत्त फेटाळून लावलं.

ते आपल्या ट्वीट मध्ये म्हणाले, "NDTV या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने जे राजीनाम्याचे वृत्त दिले आहे, ते अत्यंत चुकीचं आणि खोडसाळ आहे. एखाद्या टीव्ही चॅनेलने सत्ताधारी भाजपच्या सांगण्यावरून काल्पनिक स्रोतांचा आधार घेऊन प्रोपोगंडा राबवणे अतिशय चुकीचं आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)