You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'आम आदमी पार्टी' दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत, तरीही राष्ट्रीय पक्ष नाही, कारण...
आम आदमी पार्टी आता दिल्लीनंतर पंजाबमध्येही सत्तेत आली आहे. शिवाय आपने पहिल्यांदाच गोव्यातही दोन जागांवर विजय मिळवलाय.
त्यामुळे आता आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार का, हा प्रश्न विचारला जातोय. पण एखादा राजकीय पक्ष राष्ट्रीय पक्ष कधी होतो? त्यासाठी काय पात्रता असते?
एखादा पक्ष राष्ट्रीय पक्ष कधी होतो?
निवडणूक आयोगाने ठरवलेल्या नियमांनुसार एखाद्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळविण्यासाठी 3 महत्त्वाच्या अटींची पूर्तता करावी लागते, तेव्हाच त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला जातो.
- लोकसभेतील किमान 2 टक्के जागा पक्षानं तीन वेगवेगळ्या राज्यांमधून जिंकलेल्या असाव्यात.
- लोकसभेत 4 खासदार असावेत शिवाय 4 राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांत किमान 6 टक्के मतं मिळेलेली असावीत.
- किमान 4 राज्यांमध्ये पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा असावा.
या तीन पैकी एका निकषाची पूर्तता केली तरी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.
5 राज्यांमध्ये 'आप'ला मिळालेली मतं
गोवा - 6.77 टक्के
पंजाब - 42. 01 टक्के
उत्तर प्रदेश - 0.38 टक्के
उत्तराखंड - 3.32 टक्के
मणिपूर - 0 टक्के
दिल्लीत 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 'आप'ला 53.57% टक्के मतं मिळाली होती.
राष्ट्रीय पक्ष म्हणून फायदा काय?
एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर त्याला काही फायदेसुद्धा मिळतात, जसं की...
- त्या पक्षाला देशभरात कुठेही निवडणूक लढवताना एकच चिन्ह राखीव मिळतं.
- राष्ट्रीय दर्जा मिळालेल्या पक्षाला निवडणूक आयोग मतदारांची अपडेटेड यादी निवडणुकांपूर्वी पुरवतं, तसंच या पक्षाच्या नेत्यांना उमेदवारी अर्ज भरताना एकाच अनुमोदकाची आवश्यकता असते.
- या पक्षाला रेडियो आणि दूरदर्शनवर प्रक्षेपणाची सोय पुरवली जाते.
- राष्ट्रीय पक्षाला स्टार प्रचारकांची यादी वेगळ्याने काढण्याची मुभा असते. या यादीत जास्तीत जास्त 40 नेत्यांचा समावेश केला जाऊ शकतो, आणि या प्रचारकांच्या प्रवासाचा खर्च उमेदवारांच्या प्रचारासाठीच्या खर्चात मोजला जात नाही.
- पक्षाच्या कार्यालयासाठी सरकारकडून सवलतीच्या दरात जमीन मिळवता येऊ शकते.
सध्या भारतात कोणकोणते राष्ट्रीय पक्ष आहेत?
भारतात आजच्या घडीला एकूण 8 पक्षांना राष्ट्रीय पक्षांचा दर्जा देण्यात आलाय…
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- भारतीय जनता पार्टी
- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
- तृणमूल काँग्रेस पार्टी
- भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) (माकपा)
- भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा)
- बहुजन समाज पार्टी
- नॅशनल पीपल्स पार्टी
आणि आता नव्याने आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये जोरदार कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवर आपली छाप सोडली आहे. दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्येही बहुमताने पक्ष सत्तेत आलाय.
पण सध्या आम आदमी पक्षाकडे भगवंत मान यांच्या रूपानं लोकसभेत केवळ एकच खासदार आहे. पण ते आपचा पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहेत, आणि त्यामुळे त्यांना लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागू शकतो.
त्यामुळे वरील तीन निकषांपैकी कुठला एकतरी एक निकष आम आदमी पार्टीला पूर्ण करावा लागेल तरच त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो.
- लोकसभेतील किमान 2 टक्के जागा आपकडे नाहीत.
- आपकडे लोकसभेत 4 खासदार नाहीत. तसंच 4 राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांत आपकडे किमान 6 टक्के मतं सध्यातरी नाहीत.
- तसंच आपला सध्यातरी किमान 4 राज्यांमध्ये राज्य पक्षाचा दर्जा नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)