You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गोवा विधानसभा निवडणूक: अमित पालेकर कोण आहेत?
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
सोमवारी पंजाबचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून भगवंत मान यांचं नाव जाहीर केल्यावर आज मंगळवारी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून अमित पालेकर यांचं नाव आम आदमी पक्षानं जाहीर केलं.
46 वर्षांच्या आणि व्यवसायानं वकील असणाऱ्या अमित पालेकर हे गोव्यातल्या प्रस्थापित राजकारण्यांच्या तुलनेत नवखं नाव पुढे करुन 'आप'नं धक्कातंत्र आजमावण्याचा प्रयत्न केला आहे.
आज पणजीतल्या एका कार्यक्रमात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आप'चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत पालेकरांच्या नावाची घोषणा झाली.
त्यावेळेस 'आप'च्या दिल्लीतल्या आमदार आतिशी, गोव्याचे मुख्य संयोजन राहुल महांबरे हेही उपस्थित होते. 'आप'कडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असणाऱ्या अमित पालेकरांची ही पहिलीच निवडणूक असेल.
यंदाच्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत 'आप' हा एक महत्त्वाचा फॅक्टर मानला जातो आहे. 2017 मध्ये विधानसभा निवडणुकीत 'आप'नं गोव्याच्या राजकारणात प्रवेश केला आणि 39 जागांवर निवडणूक लढवली. पण सगळीकडे त्यांचा पराभव झाला होता.
त्यानंतर गेल्या पाच वर्षांमध्ये 'आप'नं इथं संघटना उभारली, सातत्यानं आंदोलनं केली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना काही ठिकाणी यशही मिळालं. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 'आप' गोव्यात भोपळा फोडेल असे अंदाज व्यक्त केले जात आहेत.
पालेकरांच्या नावाची घोषणा करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, "गोव्यातल्या लोकांना बदल हवा आहे. काही निवडक लोकांनी गोव्याच्या राजकारणावर कब्जा केला आहे. पैसा कमवायचा आणि परत सत्तेत यायचं हे जे इथं चक्र झालं आहे ते आम्हाला बदलायचंय. गोव्याच्या लोकांनाही तेच हवंय. आम्ही दिल्लीत जे काम केलं आहे ते त्यांनी पाहिलं आहे.
"त्यामुळे आम्ही असा प्रामाणिक चेहरा देतो आहोत, जो गोव्यासाठी आपल्या जीवही द्यायला तयार होईल. तो गोव्यातल्या सगळ्या धर्मांना आणि जातींना सोबत घेऊन चालेल आणि तो उच्चशिक्षितही आहे," असं अरविंद केजरीवालांनी अमित पालेकर यांचे नाव जाहीर केल्यावर म्हटलं आहे.
अमित पालेकर हे राजकारणातही नवे आहेत आणि 'आप'मध्येही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी 'आप'मध्ये प्रवेश केला.
त्यानंतर ओल्ड गोवा इथल्या हेरिटेज स्थानांवर झालेल्या बेकायदा बांधकामाविरोधात जे आंदोलन झालं होतं, त्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. आता भाजपाच्या ताब्यात असणाऱ्या सेंट क्रूझ या मतदारसंघातून ते 'आप'चे उमेदवारही असणार आहेत.
"टॉपर असूनही इथल्या भ्रष्टाचारामुळे सरकारी नोकरी न मिळू शकलेला एक विद्यार्थी आज त्या 'आप' चा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार झाला आहे ज्यांनी गोव्यातल्या नोकरी घोटाळा बाहेर काढला. मी खात्री देतो की गोव्याला आम्ही भ्रष्टाचार मुक्त करू. आम्ही गोव्याचं आज नष्ट झालेलं वैभव परत मिळवू याची खात्री देतो," असं अमित पालेकर यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यावर म्हटलं आहे.
प्रामाणिक आणि धर्म-जात-विरहित राजकारणाबद्दल 'आप' म्हणत असलं तरीही पालेकर यांच्या उमेदवारीमागे गोव्यातली स्थानिक जातीय समीकरणं आहेत.
पालेकर हे भंडारी समाजाचे आहेत आणि लोकसंख्येच्या जवळपास 35 टक्के असणाऱ्या या समाजातून गोव्यात आजवर केवळ एक मुख्यमंत्री झाला आहे. त्यामुळे भंडारी समाजातून आमचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार असेल असं 'आप'नं यापूर्वीच जाहीर केलं होतं.
"भंडारी समाज हा गोव्यातला बहुसंख्य समाज आहे आणि त्यांच्या मनात खोलवर अन्यायाची भावना आहे. 1961 साली गोवा मुक्त झाल्यापासून आजपर्यंत केवळ अडीच वर्षांसाठी एकदा या समाजातला मुख्यमंत्री झाला होता. त्यामुळेच आम्ही भंडारी समाजातला मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली. आम्हाला जातीचं राजकारण करणारे म्हटलं जातं आहे. पण आम्ही प्रस्थापित पक्षांनी जे जातीचं राजकारण इतकी वर्षं केलं ते संपवतो आहोत," असं अरविंद केजरीवाल म्हणाले.
भाजपाची सत्ता असलेल्या राज्यात 'आप'च्या गेल्या 5 वर्षांच्या राजकारणामुळे चुरस आलेली आहे. 'आप'सोबतच यंदा तृणमूल कॉंग्रेसही इथं ताकद आजमावते आहे. मनोहर पर्रिकरांच्या पश्चात भाजपामध्येही नेतृत्वाची अस्थिरता हा प्रश्न आहेच. त्यामुळे आता 'आप'नं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जातीय समीकरणांवर नजर ठेवून निवडल्यावर गोव्याची निवडणूक कोणत्या दिशेनं जाते हे कुतुहलाचं असेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)